थोडा है थोडे की जरुरत है @27.08.19
आहे आभासी तरी..
सध्या सोशल मिडीयाच्या अती वापराबद्दल अनेक लोक सोशल मिडीयावरच बोलताना दिसतात. या सोशल मिडीयाच्या जाळ्यात आपण अडकलोय किंवा यामुळे युवा पिढीचे फार नुकसान होतेय अश्या संदर्भांचे लेख सोशल मिडीयावरच प्रकाशित केले जातात. हे सारे आभासी आहे व यामधे ज्या पद्धतीने आपण जोडलेले असतो त्याला काही अर्थ नाही वगैरे सांगितले जाते. हे सारेच अतिरंजीत किंवा वावगे आहे असे नाही. परंतू असे बोलणारे मंडळी एरवी प्रत्यक्ष एकमेकांना किती भेटत असतील हा संशोधनाचा विषय आहे. मुळातच वेगवान आणि क्लिष्ट बनलेल्या आपल्या आयुष्यात एकमेकांशी अश्या पद्धतीने का होईना जोडले राहण्याचे सुख आहे. एकमेकांच्या छोट्या छोट्या बाबी कळू लागल्या. अगदी वहिनींनी नव्या प्रकारची भाजी केली असेल तरी ती आपल्याला कळू शकते किंवा मित्राचा लहान मुलगा उन्हाळ्याची सुटी संपवून पहिल्या दिवशी शाळेत गेला असेल तर त्याचा नव्या गणवेषातील फोटो दिसतो व त्यावरुन त्याचा मुलगा कोणत्या वर्गात आहे हे कळू शकते. अन्यथा वहिनींची पाककला कधीच कळत नाही आणि मित्राचा मुलगा मोठा झाल्यावरच भेटतो. त्यामुळे या सोशल मिडीयाचे जग आभासी असले तरी देखील त्याचेही काही फायदे आहेत. या सोशल मिडीयावर भेटी होतात म्हणून प्रत्यक्ष भेटीची गरज नाही असा विचार अजूनतरी आपल्या देशात सुरु झालेला नाही. परंतू प्रत्येकाचे जीवन वेगवान झाल्यामुळे सहजासहजी भेटी होत नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मग अश्यावेळी या आभासीच का होईना परंतू आंतरजालाची गरज भासते. ही बाब आणखी स्पष्ट होण्याकरीता काही उदहरणे बघूयात.
दामले काका आणि काकू भारतात राहतात. एकुलता एक मुलगा राघव परदेशात राहतो. आपल्या आई वडीलांबद्दल मनापासून आदर असल्याने नित्य नियमाने दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान महिनाभर येऊन जातो. सगळ्या नातेवाईकांना भेटतो. साऱ्यांचे सारे करतो. दामले काका काकूंना आपल्यासोबत तिकडे परदेशात नेण्याचा त्याने प्रयत्न देखील केला परंतू काका काकूंना तिकडे अजिबात करमले नाही आणि त्यामुळे त्यांनी इकडे भारतातच राहण्याच्या निर्णय घेतला. राघव देखील पाच वर्षांनंतर परत येणार असे म्हणतोय. सध्या काका काकू स्वतःला छान सांभाळू शकतात म्हणून त्यांनी राघवला आणखी पाच वर्षे तिकडे राहण्याची परवानगी देखील दिलीय. काका काकुंना आपल्या पोराशी, सुनेशी आणि नातवंडांशी बांधून ठेवण्याचे काम हेच तंत्रज्ञान करतंय. राघव तिकडे घरी गणपती बसवतो आणि पुजा काका थेट भारतातून सांगतात. सुनेला तळलेले मोदक कसे करायचे हे काकू शिकवतात. इतकेच काय तर आपल्या नातवांना रामरक्षा आणि अथर्वशिर्ष देखील काकांनी शिकविले आहे थेट भारतातून. वेळेत फरक असला तरी नातवंडे आजोबांच्या शिकवणीची वाट बघतात व मनापासून वेगवेगळे संस्कृत श्लोक शिकून घेतात. त्यामुळे तेथील शाळेमधे त्यांच्या नातवांना खूप बक्षिसे मिळतात. भारतीय मूळ असलेल्या माणसाने ती शाळा काढलीय व तेथे संस्कृत आवश्यक विषय आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या आधारेच हे होते आहे. अन्यथा कधीकधी घरातील लहान मुलांच्या खोलीला लागून आजी आजोबांची खोली असते परंतू त्या खोलीत जाऊन प्रत्यक्ष त्यांच्याकडून काही शिकून घेणे कुठे होते आहे? इथे तर आजी आजोबा वाट बघत राहतात नातवंडांची आणि त्यांना तर वेळच नाही. इथे काही ठिकाणी प्रत्यक्षात सुनबाई सासुबांना स्वयंपाक घरात प्रवेशही करु देत नाही व पाहुण्यासारखे वागवते. या असल्या प्रत्यक्षात नसलेल्या संवादापेक्षा दामले काकांचा व काकुंचा आभासी संवाद केव्हाही जास्त उपयोगाचा आहे.
माझे एक प्राचार्य मार्गदर्शक निवृत्ती पश्चात मुंबईला राहायला गेले. नातवंडांकडे लक्ष देण्याची त्यांची ड्युटी सुरु झालीय. मुलगा व सून दोघेही नोकरी करीत असल्याने त्यांना व मॅडमना तेथे जावे लागले. यात गैर काहीच नाही. निवृत्तीपश्चात मुलांना गरज असेल तर जायलाच हवे व हे दोघेही अतिशय आनंदाने तिकडे गेले. परंतू इतकी वर्षे आपल्या भागात नोकरी केली असल्याने, किंवा सारेच नातेवाईक इकडे असल्याने सरांना अजिबात करमत नाही. मॅडमचा तरी नातवंडांमधे वेळ जायचा. परंतू सरांचा वेळ जाईना. मग सरांनी याच सोशल मिडीयाचा फायदा घेतला. आता ते अतिशय आनंदात आहेत. रोज सकाळी आपल्या भागातील वर्तमानपत्रे मोबाईलवर वाचतात, छान व्हाॅटस् ॲपच्या माध्यमातून आमच्या प्राचार्यांच्या समुहात सहभागी होतात. येथे घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना त्यांना कळतात, त्या योगे आमच्या सारख्या नवख्या लोकांना ते मार्गदर्शन देखील करतात, इतकेच काय पण एखाद्या वेळी एखाद्या विषयावरुन जर या व्हाॅटस् ॲपवर भांडण पेटले (असे अनेक समुहांमधे पेटत असते) तर ते भांडण यशस्वी मध्यस्ती करुन सोडवितात देखील. अश्याप्रकारे हा सोशल मिडीया, हे आभासी जग त्यांच्याकरीता एक मोठा आधार आहे. याद्वारे ते आपल्या भागाशी जोडलेले राहू शकतात. खरे सांगतो, प्रत्यक्ष आपल्या गावात राहत असताना जेवढा त्यांच्याशी संपर्क होणार नाही तितका आता होऊ लागलाय. मनात आल्याबरोबर त्यांना आमच्याशी व आम्हाला त्यांच्याशी किंवा त्यांना आम्हा सर्वांशी किंवा आम्हा सर्वांना त्यांच्याशी अगदी सहजच संवाद साधता येतो व समस्यांचे निराकरण होते, चर्चा होतात व मार्ग सापडतो. सर्वात महत्वाचे म्हणजे सहवासात असल्याचा आभास का होईना परंतू सहवास घडतो.
विद्यार्थ्यांची संख्या वर्गात फार असल्याने प्रत्यक्ष संपर्क ठेवणे जवळपास अशक्य आहे, त्यामुळे आजकाल महाविद्यालयातील विद्यार्थी हा शिक्षकांपासून दूर जातो आहे व त्याचे केवळ प्रायव्हेट कोचिंग क्लासच्या भरवश्यावर भागते अश्या पद्धतीची तक्रार करणाऱ्या माझ्या एका मित्राला एक सुंदर कल्पना दिली व आज त्याचा सर्वांशी संपर्क प्रस्थापित झाला. कितीही नाही म्हणले तरी आजकाल महाविद्यालयात मोबाईल फोन न बाळगणारा विद्यार्थी विरळाच. त्यापेक्षा त्याच तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ती कल्पना माझ्या मित्राला दिली. त्याने त्याच्या वर्गातील सर्व मुलामुलींचा एक व्हाॅटस् ॲप ग्रुप तयार केला. त्यच्या तो ॲडमीन आहे. त्यामुळे त्य ग्रुपवर त्याचे नियंत्रण आहे. वर्गात त्याचे अध्यापन तो करतोच परंतू प्रत्येक पीरीएड च्या आधी त्याने त्या विशिष्ट प्रकरणाबाबत संदर्भ मुलांना आधीच दिलेले असतात. जास्तीत जस्त विद्यार्थी ते वाचून येतात. त्यामुळे अनेक विषयांवर सकस चर्चा होते. आधल्या वर्षांचे पेपर्स, काही व्हीडीयो, काही भाषणे किंवा काही महत्वाच्या नोटस् हे सारे तो त्या समुहावर मुलांना देतो. याचा परीणाम असा झाला की मुले त्याच्यासोबत जोडली गेली व त्यामुळे त्यांनी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सोडून दिले. ज्याचा वाढदिवस असेल त्याला अभिनंदन देणे सुरु झाले. त्या समुहावर त्याचे नियंत्रण आहेच व ते योग्य पद्धतीने राखल्यामुळे त्याचा प्रचंड फायदा माझ्या मित्राला झाला. तो सध्या त्याच्या महाविद्यालयातील सर्वात विद्यार्थीप्रीय शिक्षक बनलाय.
मुद्दा हाच आहे. या तंत्रज्ञानाला आभासी म्हणून आपण लांब ठेवू शकणार आहोत का? याचे स्पष्ट उत्तर नाही हे आहे. हे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलंय. त्यामुळे त्याला आभासी म्हणून नावे ठेवण्यापेक्षा त्याला नियंत्रणात ठेऊन अनेक चांगल्या गोष्टींकरीता कसे वापरता येईल यावर आता विचारांची शक्ती खर्च व्हायला हवी. बाकी साऱ्या गोष्टींपेक्षाही प्रत्यक्षात वर्षानु वर्षे एकमेकांना न भेटणारे मंडळी सहजच भेटू लागले, बोलू लागले, एकमेकांबद्दल जाणून घेऊ लागले, छान छान फोटो काढू लागले, ते एकमेकांना पाठवू लागले, त्यावर काॅमेंट करु लागले व आनंदित होऊ लागले तर आभासी असला तरीही हा संपर्क मोलाचा आहे. संपुर्ण परीवार सोबत बाहेर पडत असताना ताणलेले चेहेरे घेऊन बाहेर पडण्यापेक्षा घरच्या तरुण पोरीने सर्वांना पाऊट (ओठांचा चंबू) करुन एकत्रीत फोटो घेतला व फेसबुकवर अपलोड केला तर ती चांगलीच गोष्ट आहे. आभासी असले तरी ते कधी कधी प्रत्यक्षातील मनभेदापेक्षा हे छानच आहे. त्यावरील नियंत्रणाची दोरी आपल्या हातात ठेवून त्याचा आनंद घ्यावा, बघा कशी मज्जा येते, फोटो काढताना ओठांचा तो चंबू करुन!!
अगदी खरं आहे! 👌👌👌🙏
ReplyDelete