थोडा है थोडे की जरुरत है @ 06.08.19

एक पर्याय असतोच

आता माझ्याजवळ काहीच पर्याय नाही. झाले सारे काही संपलेय. आता माझ्यासमोर मला केवळ अंधार दिसतोय. काहीही होऊ शकत नाही. माझे नशीबच असे आहे. काय करावे. मी कितीही प्रयत्न केला तरी नेहेमी असेच होते. माझ्या नशीबातच देवाने एवढे लिहीले असेल तर कुणी काय करु शकते? शेवटी नशीबाच्यापुढे मानव हतबलच असतो. समय से पहले और तकदीर से ज्यादा किसीको कुछ नही मिलता असे कुणीतरी म्हणलेय ते अगदीच खरे आहे. मी शेवटी एक मानव म्हणून नशीबरुपी शक्तीच्या हातातील बाहुलेच आहे. त्यामुळे त्या एका बिंदुवर पोहोचल्यानंतर सारे त्याच्या हातात असते. आपल्या हातातून सारे काही निसटून जाते. मी माझ्या संपुर्ण क्षमतांचा वापर केला परंतू शेवटी माझा मार्ग या अश्या डेड एंडवर येऊन थांबलाच. आता पुढे काहीही नाही. मला या संकटाला सामोरे तर जावेच लागणार आहे. कोणताही पर्याय नाही. आता येथून पुढे जाणे म्हणजे मरण्याशिवाय काहीच पर्याय नाही. १०० टक्के मरण हाच पर्याय आहे. निरमा नाव असलेल्या आणि एका कोणत्यातरी कारणामुळे मनाने संपुर्णपणे खचून गेलेल्या एका मुलीचे हे सारे नकारात्मक विचार ऐकून आर्टीस्ट नावाचा तिजोऱ्या फोडणारा परंतू व्यंजने बनविण्याची आवड असलेला एक चोर तिला अफलातून एक धडा शिकवितो. नेटफ्लिक्स या मोबाईल अॅपवर उपलब्ध असलेल्या चाॅपस्टीक नावाच्या एका अत्यंत गोड चित्रपटातील हा प्रसंग आहे. एका अफलातून विचित्र प्रसंगामधे ही बिचारी निरमा अडकते त्यामधून बाहेर पडण्यासाठी तिला आर्टीस्ट हे नाव असलेल्या एका चोराची मदत घ्यावी लागते. तो तिला त्या प्रसंगातून बाहेर काढताना एका ठिकाणी मार्ग संपल्यासारखी स्थिती निर्माण होते त्यावेळी घाबरुन जाऊन निरमाच्या या नकारात्मक बडबडीमुळे चिडून जाऊन हा आर्टीस्ट तिला धडा शिकवितो.

आपल्या जीवनात काही वेळेला असे प्रसंग येतात ज्यावेळी समोरच्या सर्वच वाटा बंद झाल्यागत स्थिती निर्माण होते. प्रत्येकाच्याच आयुष्यात असे प्रसंग येत असतात. या प्रकारच्या मनःस्थितीतून कुणीही सुटत असेल असे वाटत नाही. असल्या प्रसंगांना सामोरे जाताना अश्या अनेक बाबी असतात ज्याचा आधार कामी येतो. त्या बाबी त्या विशिष्ट प्रसंगाशी किंवा घटनेशी संबंधीतच असतील असेही नाही. अश्या कठीण प्रसंगी आपण असल्या स्थितीला सामोरे जाणे हे आपल्या व्यक्तीमत्वाच्या जडण घडणीवर देखील अवलंबून असते. काही अकारण निर्माण करुन ठेवलेले भयगंड देखील याला कारणीभूत असतात. अश्या अडकून गेलेल्या स्थितीमधून बाहेर तर आपल्याला पडावे लागते, आलेल्या स्थितीला तोंड द्यावेच लागते. अश्यावेळी एखादा बाह्यस्रोत एखाद्या व्यक्तीच्या रुपाने आपल्याला प्राप्त होतो आणि अचानक या असल्या सर्व प्रकारांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलून जातो. ती व्यक्ती आपल्याला अडचणी सोडविते असे नाही परंतू त्या स्थितीकडे बघण्याची नवी दृष्टी देते. एक नवा चष्मा आपल्याला मिळतो ज्यामधून आपल्याला तिच गोष्ट नव्या पद्धतीने बघता येते मग आपण त्या अडचणीच्या परीस्थितीवर मात करण्याचा आत्मविश्वास प्राप्त करतो. आत्मविश्वास हीच ती गुरुकिल्ली असते जी कोणत्याही स्थितीमधे मार्ग शोधण्याची क्षमता आपल्याला प्रदान करते. ही दृष्टी प्रदान करणे ही छोटीशी बाब असली तरी अडचणीच्या स्थितीमधे अडकलेलो असताना आपल्याला ती सुचत नसते अश्यावेळी एखादा बाह्यस्रोत आपल्याला त्याची आठवण करुन देतो. निरमा नावाच्या त्या मुलीच्या बाबतीत तो आर्टीस्ट नावाचा चोर नेमके हेच करतो

तिची ही नकारात्मक बडबड ऐकून तो तिच्या हाताला धरुन तिला त्या दहाव्या मजल्यावरील खोलीच्या बाहेर काढतो. तिला असे वाटते की तो तिला घरातून हाकलून लावतो आहे. परंतू तो तसे करत नाही. तो तिला धरुन आणखी काही मजले वर असलेल्या टेरेसवर ओढत घेऊन जातो. ती ओरडत राहते परंतू तो तिचे काही एक ऐकत नाही. सर्वात वरच्या मजल्यावरील गच्चीवर तो तिला आणतो. साधारण पाच फुट उंचीची पॅरापीट वाॅल तेथे असते. एका ठिकाणी त्या पॅरापीट वाॅलच्या जवळ काही पोती पडलेली असतात. त्या पोत्यांवरुन तो तिला वर चढवतो. ती घाबरते. तो तिला पॅरापीट वाॅलवर उभे करतो स्वतः तिच्या बाजुने उभा रहातो. तिचा हात त्याने धरुन ठेवलेला असतो. आपण विचार करु शकतो की त्या बिचाऱ्या आधीच अडचणीने थकून गेलेल्या निरमा चे काय होत असेल. पंधरा मजली बिल्डींगच्या सर्वात वरच्या मजल्यावरील गच्चीवरील पॅरापीट वाॅलवर उभे राहून खाली बघितल्यावर तिला तर गरगरायला होते. ती गच्च डोळे मिटून घेते. तो तिला विचारतो, तुझ्या म्हणण्याप्रमाणे येथून उडी मारल्यावर आपल्याला मरण्याशिवाय काही पर्याय आहे का? तिलाही वाटते, हा काय प्रश्न आहे आणि ही काय जागा आहे असला प्रश्न विचारण्याची! ती बिचारी घाबरत असते आणि तो तिला पुन्हा पुन्हा विचारतो, तुझ्या मतानुसार येथून उडी मारल्यावर मरणाशिवाय काही पर्याय आहे का? ती ओरडून नाही नाही म्हणते. काही वेळ तिला तसेच घाबरलेल्या स्थितीमधे ठेवून नंतर तो अचानक तिचा हात धरून पॅरापीट वाॅलच्या आतल्या बाजूने उडी मारतो. ती चकित होते. तो तिचा हात सोडून देतो आतापर्यंत तिच्यासोबत अत्यंत उद्धटपणे व्यवहार केलेला आर्टीस्ट तिला शांतपणे समजावतो. मी तुला उडी मारण्यासंबंधी सांगितले होते. आपण आतल्या बाजूने देखील तर उडी मारु शकतो. परिस्थीती कोणतीही असो, एक पर्याय नेहेमी उपलब्ध असतो. कायम घाबरत घाबरत जगणाऱ्या निरमाच्या आयुष्यामधे तिला मिळालेला हा छोटासा परंतू अत्यंत महत्वाचा धडा असतो. निरमाचे व्यक्तिमत्व अश्या पद्धतीचे असते की बहुतांश परिस्थितींमधे तिला आनंदापेक्षा भितीचा आभास जास्त प्रमाणात होत असतो. आपला संपुर्ण आत्मविश्वास जवळपास गमावलेली, कोणतेही काम करताना बावरुन जाणारी, आपले मत सक्षमतेने व्यक्त करु शकणारी, स्वतःहून निर्णय करु शकणारी, छोट्या छोट्या निर्णयांसाठीदेखील कायम कुणाच्यातरी परवानगीची वाट बघणारी, स्वतःमधील क्षमता माहीत असूनही कोणत्यातरी अनामिक दडपणामुळे त्यांचा वापर करण्यास धजावणारी या सर्व प्रकारामुळे स्वतःचा विकास करु शकणारी असे निरमाचे व्यक्तिमत्व असते. परंतू आर्टीस्ट ने शिकविलेल्या धड्यामुळे तिचे जीवनच बदलून जाते. चित्रपटाच्या पुढील भागात तिच्या बाबतीत निर्माण झालेल्या संकटावर ती मात करते त्या योगे तिचे व्यक्तिमत्व पार बदलून जाते. करण तिला आर्टीस्ट ने शिकविले असते. एक पर्याय असतोच.

खरे तर किती छोटासा विचार आहे परंतू या विचाराच्या आधारे आपल्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही परिस्थीतीवर मात करण्याचे मन मात्र तयार होऊ शकते. शेवटी खेळ सारा मनाचाच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे भयगंड बरेच वेळा मनामधे रुजविलेले असतात. त्या भयगंडांचा पगडा इतका जास्त असतो की त्याच्यापुढे कोणतेही तत्वज्ञान किंवा विचार ते भयग्रस्त मन स्विकारतच नाही. आपल्या जीवन जगण्याच्या माणूस म्हणून स्वतःला विकसित करण्याच्या मूलभूत अधिकारांचा देखील कधी कधी या भयांमुळे विसर पडतो. अमूक एक गोष्ट मी केली तर मी संपलो असा विचार करीत करीत अनेक गोष्टी करायच्या राहून जातात मग वेळ निघून गेल्यावर उरतो तो केवळ पश्चात्ताप. अर्थात या पश्चात्तापावर तोडगा म्हणजे माझ्या नशिबात एवढेच आहे अशी आपल्याच मनाची घातलेली समजूत. ही समजूत फार काळ टिकत नाही. आपण जे गमावले आहे त्याचे दुःख मात्र कायम टोचणी देत राहते. त्यापेक्षा ज्यावेळी आता यापुढे काहीच नाही अशी स्थिती निर्माण होते त्यावेळी एक पर्याय असतोच हा मंत्र उराशी बळगला तर अनेकांना निरमा सारखे स्वतःला बदलता येईल आणि मग आत्मविश्वासाने कोणत्याही अनामिक दडपणाशिवाय मनमोकळा श्वास घेता येईल. तो आयुष्यातील सर्वोत्तम सकारात्मक बदल ठरेल. होय ना?






Comments

  1. पर्याय असतोच नसला तर तो काढावा लागतो ....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18