थोडा है थोडे की जरुरत है @ 20.08.19

बंधनाचे सुख

सोशल मिडीयामुळे कधी कधी काही गोष्टी फार पटकन कळतात आणि त्यामुळे आपण अपडेट राहतो. अशीच एक बातमी आणि त्यासोबत एक फार सुंदर गाणे मला ऐकायला मिळाले. कधीकधी ध्यानी मनी नसताना आपल्या फार जास्त आवडीची गोष्ट अचानक आपल्यासमोर आली किंवा अनुभवायला मिळाली तर तो आनंद काही वेगळाच असतो. असाच काहीसा अनुभव मला आला. जुन्या काळातील एक नटी विद्या सिन्हा हिचे नुकतेच दुःखद निधन झाले. तिला श्रद्धांजली देणारा एक लेख फेसबुकवर माझ्या वाचण्यात आला. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधे काम करणारी सामान्य व्यक्तिमत्व सादर करणारी अशी ही गुणी अभिनेत्री आपल्याला सोडून गेली. तो लेख तिच्या सर्व भुमिकांचे वर्णन करणारा होता त्या लेखकाने लेखाच्या शेवटी तिच्या अनेक चित्रपटांपैकी एका चित्रपटाचे गाणे जोडले होते. ते गाणे माझ्या अतिशय आवडीचे गाणे होते. परत एकदा ते गाणे बघण्याचा योग आला. प्रेमाच्या सुंदर भावनेचे वर्णन करणारे ते गीत संपुर्णपणे बघितल्यावर कधी नव्हे तो मी एका ओळीपाशी रेंगाळलो. कितीतरी वेळा हे गाणे ऐकले होते परंतू ही ओळ आजच्या प्रमाणे मनाला भावली नव्हती. फारच वेगळा विचार या ओळीमधे मला जाणवला. विशेषतः आधुनिक काळात जेव्हा वेगवेगळ्या नात्यांची घट्ट वीण जराशी सैल होताना आपल्याला जाणवते, जेव्हा इतरांचा फार विचार करणे गैर आहे म्हणून जरा स्वतःचा विचार करायला हवा अश्या पद्धतीचे विचार मुलांना मुद्दाम शिकवावे लागतात, कुणाच्या मधे पडायलाच नको बाबा कारण त्यामधून प्राॅब्लेम निर्माण होतात त्यापेक्षा आपण बरे नि आपले काम बरे असा विचार हा खरा व्यावहारिक विचार ठरतो, ज्या काळात आई वडील आणि त्यांची दोन मुले त्यांचा परीवार अश्या एकाच घराचे तीन वेगवेगळे परीवार झालेले आहेत किंवा ज्या काळात प्रेम करताना देखील अटींची पूर्तता केल्यावरच ते मान्य केले जाते अश्या काळात या गाण्यातला हा विचार मला फारच महत्वाचा वाटला.

आधुनिक काळात जे बदल आपण अनुभवतो आहे त्या बदलांमधे केवळ भौतिक बदलच समाविष्ट नाहीत तर आपल्या जगण्यातील बदल देखील अंतर्भूत आहेत. नात्यांचे वेगळे संदर्भ तयार झाले म्हणूनच विद्या सिन्हाच्या काळातल्या एका गाण्यात आलेला संदर्भ मला सध्याच्या बदलांच्या संदर्भात सुरुवातीला जरासा कालबाह्य झाल्यागत वाटला. सध्या प्रत्येक ठिकाणी निर्माण झालेला एक प्रॅक्टीकल ॲप्रोच अनेकांना यशस्वीतेकडे घेऊन जातो त्यामुळे अनेकांना तो आवडतो देखील. प्रत्येकच नात्यात एक अंतर राखायला हवे हा नवा दृष्टीकोन आता बघायला मिळतो. अगदी प्रेमाच्या नात्यात देखील व्यावहारिक पद्धत बाळगून स्पेस सांभाळली जाते. प्रत्येकाला स्पेस मिळायला हवी यात काहीच मतभेद असण्याचे कारण नाही परंतू नात्याच्या सर्वच बाबींना जर बंधन मानण्यात आले त्या बंधनामुळे एक जण दुसऱ्यावर वरचढ ठरतोय असा विचार करण्यात आला तर मात्र अडचण निर्माण होईल. कारण प्रेम ही मूळ संकल्पना त्यागाच्या भावनेवर अवलंबून आहे असेच आपल्याला परंपरागत शिकविण्यात आले आहे ती भावना असल्याखेरीज प्रेमाचा खरा आधार प्रेम करणाऱ्या दोघांनाही मिळू शकत नाही. परंतू यासाठी मी ऐकलेल्या गाण्यातील ती ओळ समजून घेणे महत्वाचे आहे

रजनीगंधा चित्रपटातील, रजनीगंधा फुल तुम्हारे, महके युॅंही जीवन मे हे सुंदर गीत मी ऐकत होतो. आपल्या प्रियकराचा आपल्या जीवनावरील प्रेमाचा अधिकार मी मान्य केला त्यानंतर माझे जग बदलून गेले असे हळूवार वर्णन करणारी ती प्रेयसी.

अधिकार ये जबसे साजन का

हर धडकन पर माना मैंने,

मैं जबसे उनके साथ बंधी

ये भेद तभी जाना मैने

आपल्या प्रत्येक श्वासावर प्रियकराचा अधिकार मानून जेव्हा मी त्याच्यासोबत बांधल्या गेली तेव्हा मला एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीची जाणीव झाली असे ती म्हणते. ती महत्वाची गोष्ट म्हणजे मला आवडलेली विचार करायला लावणारी या गीतामधील त्या ओळीमधील भावना. प्रेमाच्या उत्कट भावनेचा मनामधे सुंदर आविष्कार झाल्यानंतर त्या प्रेमाच्या बंधनामधील सुख व्यक्त करणारी ती प्रेयसी म्हणते,

कितना सुख है बंधन मे!

बंधनाचे सुख? बंधन हे सुखकारक कसे राहू शकते? ही काय कल्पना आहे? मुळात कसलेही बंधन नको कारण व्यक्ती म्हणून सर्व प्रकारचे स्वातंत्र्य उपभोगता आले पाहिजे ते उपभोगण्याचा मला अधिकार आहे या अत्यंत आदर्श मुलभूत विचारांचा पगडा सध्या सामाजिक दृष्टीकोनातून रुढ होत असल्याने या ओळीतील संदर्भाबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकते. परंतू प्रेमाच्या तरल भावनेला जर मनापासून समजून घेतले तर मात्र या ओळीमधला गर्भितार्थ लक्षात येऊ शकेल.

प्रेम हेच मुळात एक बंधन आहे. गोड आणि हवेहवेसे वाटणारे बंधन. दोन जीव या बंधनात गुंततात हे गुंतणे त्यांना प्रचंड आवडते. असे गुंतले राहणे त्यांच्याकरीता त्यांचे म्हणून एक सुंदर विश्व निर्माण करते. त्या विश्वामधे आनंद असतो, सहभाग असतो, संवाद असतो सर्वात महत्वाचे म्हणजे सांभाळ देखील असतो. या बंधनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ओझे नसते. एकमेकांकरीता काही ना काही करण्याची ओढ असते. एकमेकांसाठी वेळ असतो. यामधे अपेक्षा असतात, अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्न असतात, अपेक्षाभंग झाला तर वेदनाही असतात परंतू त्यानंतर पुन्हा लवकरच साधली जाणारी एकरुपता देखील असते. येथे स्पर्धा किंवा इर्षा नसते तर एकमेकांना मनापासून सहकार्य असते, येथे एकमेकांकरीता केलेल्या कामाचा हिशोब नसतो तर केलेले कामही सांगण्याचा मनाचा मोठेपणा असतो, येथे एकमेकांवर कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती नसते तर एकमेकांकरीता समर्पणाची तयारी असते, एकमेकांनी समजून घ्यावे या करीता आर्जवे नसतात तर सहजच समजून घेतलेय हे देखील कधी कधी समजत नाही, येथे संवादाच्या वेळा ठरवलेल्या नसतात तर सहजच संवाद घडतो, येथे मुद्दाम घडवून आणलेला सहयोग नसतो तर येथे सहयोगीता हाच या जगाचा आधार असतो, येथे दोन जीव वेगळे स्वतंत्र अस्तित्व जपण्याची केविलवाणी धडपड करीत नाहीत तर दोघांचे मिळून एकत्र अस्तित्व जाणवून खऱ्या अर्थाने या प्रेमाच्या बंधनाचे सुख अनुभवतात. आणि म्हणूनच गाण्यातील प्रेमाची उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या प्रेयसीला त्या प्रेमाच्या बंधनात सुख वाटू शकते.

आधुनिक काळातील व्यक्तीला स्वातंत्र्याच्या कल्पना जोपासताना कदाचित या ओळींमधे व्यक्त झालेला विचार हा कालबाह्य वाटण्याची शक्यता आहे. तसे वाटणे काही गैर नाही. परंतू या स्वातंत्र्याच्या कल्पना कधी कधी प्रेमाच्या भावनेतील तरलता किंवा त्यामधील त्यागाच्या सुखापासून वंचित ठेवतात की काय असे वाटू लागते. याचे कारण व्यक्तीस्वातंत्र्य या संकल्पनेची मर्यादा काहीवेळा इतकी संकुचित होते की केवळ मी पलीकडे कुणाचाच विचार केला जात नाही. मला कुणाची गरज नाही, मी सक्षम असल्याने माझाच विचार मी करणार, मला हवे तसे वागायला, रहायला मी समर्थ आहे. समाजाचा वगैरे विचार किंवा इतरांना काय वाटते याचा विचार करणे माझ्या व्यक्तिगत विचारांवर घाला आहे असे माझे मत आहे. मला कुणाचीही गरज नाही. कुणाला जर माझ्याशी संबंध ठेवायचे असतील तर हरकत नाही, परंतू त्या कुणासाठीही मी माझ्या जगण्याच्या संकल्पना बदलणार नाही. माझ्या अटींवर शक्य होत असेल तर मान्य अन्यथा जा उडत. अश्या पद्धतीचा विचार करणाऱ्या नव्या वैचारिक प्रवाहात, कितना सुख है बंधन मे या ओळीतील प्रेमाच्या समर्पणाची आर्तता कशी कळणार

असे नितांत प्रेम करणारी व्यक्ती आयुष्यात मिळणे त्या प्रेमाच्या सुंदर जगात स्वतंत्र अस्तित्वाच्या संघर्षापेक्षा दोघांचे मिळून प्रेमाचे सहअस्तित्व जपण्याची धडपड असणे या करीता खरोखरीच नशीबच लागते. होय ना?  





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18