थोडा है थोडे की जरुरत है @ 13.08.19

ऑफलाईन ते ऑनलाईन

जवळपास दहा वर्षांपूर्वीचा एक दिवस:

काका आणि काकू काही सामानाच्या खरेदीसाठी जायला निघाले. आजचा दिवस खरेदीसाठी ठरला होता. काकांची नोकरी फिरतीची असल्याने बऱ्याच दिवसांनंतर काकांनी वेळ काढला होता. त्यामुळे काकूंजवळ मोठी यादी होती. काही कपडे, काही भांडी, काकांकरीता त्यांना लागणाऱ्या काही वस्तू शिवाय काकूंना जरा एखादा दागिना देखील घेण्याची इच्छा होती. आज काका देखील चांगले मुड मधे होते. नुकताच बोनस मिळालेला असल्याने त्यांनी देखील तयारी दाखविली होती. एकंदरीत परांजपे काका काकू आज खरेदीचा आनंद घेणार होते

सर्वात पहिल्यांदा त्यांनी कपडा खरेदी करण्याचे ठरविले. अनेक वर्षांपासून ज्या दुकानात ते जायचे त्याच दुकानात दोघे गेले. दुकानदारापासून ते तेथे काम करणाऱ्या माणसांपर्यंत सर्वांना ते ओळखत होते. त्यांची नावे देखील त्यांना ठाऊक होती. ते सर्वजण देखील या दोघांना बघून मनापासून आनंदले. मनसोक्त कपडा खरेदी केली. गप्पा झाल्या. काकूंनी मागल्यावेळी कोणत्या प्रकारची साडी विकत घेतली होती आणि त्यापेक्षा आता जरा काकांनी बजेट वाढवून द्यावे अशी गंमत तेथील साड्या दाखविणाऱ्या नोकराने केली. काकांनी देखील मनसोक्त त्याला प्रतिसाद देऊन काकूंना आवडलेली जरा महाग साडी घेऊन दिलीया साडीमधे तू खूपच छान दिसशील असे काकांनी देखील म्हणून घेतले. हे ऐकल्यावर काकू काय गोड लाजल्या होत्या. काकांनी त्यांना आवडलेली महाग साडी घेऊन दिली याचा त्यांना फार आनंद झाला होता. दुकानाच्या मालकाच्या मुलाचे शिक्षण, त्याचे भविष्यातील प्लॅन या संदर्भात देखील काकांनी चर्चा केली खास काका काकूंकरीता त्या मालकाने थंडगार लस्सी बोलाविली. त्या दुकानदाराच्या आग्रहास्तव नवे आलेले शर्टचे कापड देखील काकांनी घेतले. काकांना ते छान दिसेल असे तो म्हणाला. काकूंनी त्याच्या वाक्याला भरभरुन प्रतिसाद दिल्यावर काका देखील खूश झाले आणि ठरलेले नसतानाही काकांनी ते कापड घेऊनच टाकले. एकंदरीत मस्त गप्पा टप्पांसोबत खरेदी झाली. आणखी काही ठिकाणी जायचे असल्याने त्या बॅगा तेथेच राहू द्या, माणूस घरी घेऊन येईल असेही दुकान मालकाने सांगितले. इतकेच काय तर आणखी खरेदी करायची आहे आणि त्यात काकूंसाठी काही दागिना घ्यायचा आहे असे कळल्यावर त्या दुकान मालकाने काकांकडून अर्धेच पैसे घेतले. बाकी लिहून ठेवले आणि जसे जमतील तसे द्या असेही सांगितले. त्या दुकान मालकाच्या उत्साहावरुन असे जाणवत होते की जणू काही त्याच्या परीवारातीलच लोक खरेदीकरीता आलेले आहेत. कपडा खरेदी आटोपून काका काकू भांड्यांच्या खरेदीकडे वळले

भांड्यांच्या दुकानातही साधारण असाच प्रकार होता. काका काकूंच्या लग्नाच्या वेळी देखील त्याच दुकानातून भांडी घेतली होती. दुकानातील जवळपास सारेच लोक परीचयाचे. येथे लस्सीच्या जागी चहा बोलावण्यात आला. बाकी खरेदीची पद्धत तीच. येथे काकूंना नवे आलेले ताक घुसळणी यंत्र घ्यायला बाध्य करण्यात आले, अर्थात प्रेमाच्या आग्रहाने. नवनविन वस्तू दाखविण्यात आल्या. एकमेकांसोबत चर्चा करुन त्यांची खरेदी सुरु होती. काकांना मऊ भात आवडायचा म्हणून त्यासाठी एक छोटासा कुकर घेण्याची काकुंची इच्छा होती. त्यासाठी काकूंनी पैसे देखील गोळा करुन ठेवले होते. दर महिन्याला थोडे थोडे करुन आठशे रुपये जमले होते. काकुंच्या आनंदाला पार उरला नाही जेव्हा त्या दुकानदाराने त्यांना तो कूकर साडे सातशे रुपयातच दिला त्यामुळे उरलेल्या पैशात काकूंना काॅपर बेस असलेले एक भांडे छोट्या फोडणीसाठी लागणारी एक छोटी कढई देखील मिळली. काय आनंद झाला काकूंना त्या वस्तू हातात घेताना! आनंदाने खुलून आलेला काकूंचा चेहेरा बघून काकांना खरोखरीच समाधान लाभले. असाच आनंद त्यांना पुढच्या खरेदीच्या वेळी देखील झाला जेव्हा आरश्यात त्यांनी काकूंचा चेहेरा बघितला.

काकूंना बऱ्याच दिवसापासून एक छोटे मंगळसूत्र घ्यायचे होते. त्यासाठी त्यांच्या ठरलेल्या सोनाराकडे हे लोक गेले. आपली फसवणूक होणार नाही हा अनेक वर्षांच्या ओळखीतून निर्माण झालेला विश्वास या ठिकाणी देखील होताच. दुकानात गेल्यावर दुकानाचा बदललेला नूर बघून त्यांना आनंद झाला. त्या बदलाबाबत गप्पा झाल्या. दुकानाच्या मालकाने स्वतः उठून काय काय नवे बदल केले ते दाखविले. काकांनी देखील त्यांच्या नव्या पिढीने केलेले बदल कसे छान आहेत याचे कौतुक केले. एव्हाना सायंकाळ झाली होती. काकांच्या हस्ते दुकानात आरती करण्यात आली. त्यानंतर काकूंकरीता मंगळसूत्रांचे वेगवेगळे पॅटर्न दाखविण्यात आले. काका कौतुकाने ते बघत होते. या ठिकाणी मात्र दोघांचा चाॅईस जरा वेगवेगळा होता. काकूंना एक मंगळसूत्र आवडले होते आणि काकांनी त्यांच्यासाठी वेगळे पसंद केले. अचानक काका म्हणाले थांब! मी सांगतो. काकांना जे मंगळसूत्र काकूंकरीता आवडले होते ते त्यांनी उचलले आणि काकूंच्या लक्षातही यायच्या आधी स्वतःच्या हाताने काकुंच्या गळ्यात घातले. किती लाजल्या काकू! आरश्यात त्या स्वतःला निरखू लागल्या. त्याच्या मागे उभे राहून काकूंचा चेहेरा आरश्यात बघत काका हळूच पुटपुटले, काय गोड दिसते माझी राणी हे मंगळसत्र घातल्यावर! त्यानंतर काकुंनी दुसरे कोणतेही मंगळसूत्र बघितले नाही. काकांच्या आवडीचेच त्यांनी घेतले. काही पर्यायच नव्हता. कारण त्यांच्या आवडीपेक्षा काकांची आवड त्याक्षणी जास्त महत्वाची होती. काय सुरेख क्षण होते हे सारे. दोघांनी सोबत अनुभवलेले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या भाषेत याला ऑफलाईन खरेदी म्हणतात

दहा वर्षानंतरचा आजचा दिवस:

काका आणि काकू दोघांजवळही स्मार्ट फोन आलेले आहेत. दोघांनाही हे फोन स्मार्ट पद्धतीने वापरता येतात. परत आजचा खरेदीचा दिवस होता. काका त्यांच्या खोलीत होते काकू हाॅलमधे बसल्या होत्या. आता ते परंपरागत खरेदीचे दुकान नव्हते तर दुकानच काकुंच्या मोबाईलमधे आले होते. काकुंनी ते अॅप उघडले आणि हजारो ब्रॅंडच्या वस्तू समोर हजर होत्या. वेगवेगळ्या कंपन्यांचे हवे ते प्राॅडक्टस् तेथे होते. काकुंनी देखील काही प्राॅडक्ट बघितले. मग साड्या बघितल्या. त्यामधून तीन चार निवडल्या मग त्यातील एक फायनल केली. नंतर काकुंनी गळ्यात घालायला मोत्यांचा एक दागिना घेतला. त्याचे देखील हजारो प्रकार होते. त्यापैकी एक घेतला. लगेच त्याचे पेमेंट केले झाले. त्या वस्तू घरपोच येणार होत्या तीन दिवसात. तिकडे काकांनी देखील त्यांच्याकरीता एक दोन शर्ट घेतले. त्यावर त्यांना चांगला डिसकाऊंट मिळाला. सोबत त्यांनी एक परफ्युम देखील मागविला. त्यांच्याकडे असलेल्या नेट बॅंकींगच्या सहाय्याने त्यांनी पेमेंट केले. त्यांनी निवडलेल्या वस्तू देखील तीन ते चार दिवसात घरपोच येणार होत्या. दोघांची मिळून स्वतंत्रपणे केलेली खरेदी अर्धा तासात आटोपली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या भाषेत याला आॅनलाईन खरेदी म्हणतात.

फलाईन पासून ऑनलाईन पर्यंत जाणे ही आपल्या नव्या आणि बदलत्या युगाची अपरीहार्यता आहे. हे असे होणारच कारण स्मार्ट फोन सोबत आपल्याला स्मार्ट व्हायचे आहे. सारे काही भराभर आणि परीश्रम करता करायचे आहे. यामधे सुविधा आहे, वेळेची बचत आहे, भरपूर चाॅईस आहे, बसल्या बसल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे प्राॅडक्टस् बघण्याची सोय आहे, निवडीचा चाॅईस आहे, प्रचंड मोठे डिसकाऊंट आहेत, वस्तू आवडली नाही तर घरबसल्या परत करायची सोय आहे, त्वरीत पेमेंट आहे ही सारी ऑनलाईनची वैशिष्ट्ये आहेत. यामधे सारे काही आहे केवळ काहीच गोष्टी नाहीत त्या म्हणजे, सोबत सोबत खरेदीकरीता घालविला जाणारा वेळ नाही, एकमेकांच्या आवडीनिवडी समजून एकमेकांकरीता केलेली खरेदी नाही, दुकानदारासोबतच्या गप्पा नाहीत, तेथील माणसांशी सलोखा नाही, आपल्यासाठी खास मागविलेली लस्सी नाही, आपल्या हाताने तिच्या गळ्यात आपल्याला आवडलेले मंगळसूत्र घालणे नाही, तू किती गोड दिसतेस हे वाक्य नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे वाक्य ऐकून आरशातच दिसणारे ते लाजणे नाही

फलाईन कडून ऑनलाईन कडे जायचेच आहे, तरी देखील त्याकरीता काय काय गमवावे लागणार आहे हा विचार प्रत्येकाने निदान एकदा करावा, होय ना?




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18