थोडा है थोडे की जरुरत है @ 30.07.19
सेवा साफल्य
बी. ए. च्या द्वितीय वर्षाचा वर्ग सुरु होता. इंग्रजीचे प्राध्यापक वर्गात अध्यापन करीत होते. अतिशय तल्लीन होऊन त्यांचे अध्यापन सुरु होते. मी त्या महाविद्यालयात एका वेगळ्या कामाकरीता गेलो होतो व महाविद्यालयात फेरफटका मारावा म्हणून सहजच कॅरीडोरमधून चालताना त्या वर्गाजवळ थांबलो. पावसाचे दिवस असतानाही वर्गात विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी संख्या होती. तो प्राध्यापक बंधू अध्यापनामधे एवढा तल्लीन झाला होता की आम्ही लोक बाहेर उभे आहोत हे त्याच्या लक्षातही आले नव्हते. माझ्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ते मला म्हणाले की विद्यार्थ्यांशी बोलायचेय का? एरवी मी तशी संधी सोडत नसतो कारण विद्यार्थ्यांशी बोलणे हा फार आनंददायी भाग आहे. परंतू त्या दिवशी मी स्वतःला थांबविले. मी प्राचार्यांना म्हणालो, सर आपण येथेच काही वेळ थांबुयात. मी त्या प्राध्यापकाच्या अध्यापनाचा आस्वाद घेऊ लागलो. अमेरीकन कवी राॅबर्ट फ्राॅस्ट ची अतिशय गाजलेली स्टाॅपींग बाय द वूड्स कविता तो शिकवित होता. तो बोलत इंग्रजीतच होता परंतू द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सहज समजेल अश्या भाषेत त्याचे अध्यापन सुरु होते. कवितेचा मतितार्थ फार छान रंगवून तो सांगत होता व विद्यार्थी गुंग झाले होते. जीवनात अनेक आकर्षणे असली व ती आपल्याला कितीही मोहवित असली तरी आपला मार्ग न सोडता व आपण जीवनाला दिलेले यशस्वीतेचे वचन पूर्ण करण्यासाठी कायम कार्यरत रहायला हवे अश्या पद्धतीचा विचार तो फार सुंदर मांडत होता. नव्या काळाच्या मुला मुलींना हे सारे सांगताना सारे संदर्भ त्याने त्यांच्या आताच्या आयुष्याशी निगडीत असणारे दिले होते. त्यामुळे मुलांना ती कविता व त्यातील विचार फारच आवडलेला दिसत होता. बोर्डवर त्याने आपला मुद्दा समजाविण्यासाठी काही चित्र वगैरे काढले होते. सोबतच हा अमेरीकन कवीचा विचार समजावून सांगताना तो आपल्या भारतीय साहित्यातील संदर्भ देखील देत होता. त्यामुळे जीवनाबाबतचा विचार हा भाषा किंवा प्रांत या बंधनांच्या पलीकडला आहे हे देखील त्याने ठळकपणे सांगितले होते. साहित्य का शिकविले जावे व साहित्याच्या अध्यापनाचा मानव विकास प्रक्रीयेशी कसा थेट संबंध आहे याचे जिवंत उदाहरण मला तो अध्यापक भासत होता. शिक्षणाची मुलभूत संकल्पना मनापासून जगणारा व विद्यार्थ्यांना मनापासून जगायला लावणारा तो मला एक व्रतस्थच भासला. साधारण दहा मिनीटे त्याचे बोलणे ऐकल्यावर मला खरोखरीच समाधान लाभले. त्यापेक्षाही जास्त समाधान त्याला स्वतःला लाभत असणार याची मला खात्री होती. अत्यंत आनंदाने मी त्याच्या वर्गापासून पुढे निघालो व अचानक त्या वर्गात उजव्या बाजूने लिहीलेल्या एका वाक्याने माझे लक्ष वेधले. अश्या प्रकारचे वाक्य एखाद्या वर्गात लिहीलेले असणे ही एक फारच सुरेख व कल्पक बाब होती. मी माझ्यासोबत असलेल्या त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना त्या बाबत विचारले. ते म्हणाले, सर आम्ही सर्वच वर्गखोल्यांमधे ते वाक्य लिहीले आहे. मला त्या वाक्याचे देखील कौतुक वाटले आणि तो मघाचा प्राध्यापक बंधू त्या वाक्याला त्याच्या अध्यापनामधून संपुर्णपणे सिद्ध करीत होता. अश्या पद्धतीचे वाक्य खरे तर प्रत्येकच सेवेच्या ठिकाणी लिहायला हवे. काही ठिकाणी ते लिहीले नसले तरी लोक त्याचा अवलंब करतात. परंतू सरसकट जर प्रत्येकच सेवेकऱ्याने त्याचा अवलंब केला तर आपल्या विविध व्यवस्थांवरील विश्वास दृढ होण्यास फार मोठी मदत होऊ शकेल. ते वाक्य होते.
Justify your salary with self-satisfaction of service.
आपल्या सेवेबद्दल मिळणारा जो मोबदला आहे तो साफल्यभावनेने स्वतः करीता अंकित केला पाहिजे. जी सेवा आपण देतो आहे त्या सेवेचा आर्थिक मोबदला मिळणे ही तर व्यवहाराची बाब आहे परंतू आपण दिलेल्या सेवेबद्दल आपण स्वतःला समाधान लाभणे ही सेवा साफल्याची खरी ओळख ठरते. अनेक ठिकाणी असे सेवा साफल्य प्राप्त करणारे लोक आपल्याला आढळतात. एखाद्या कर्मचाऱ्याच्या सेवेचे मुल्यमापन करताना जे वेगवेगळी परीमाणे ठरविली जातात त्यात हा एक शब्द नसतो परंतू त्याचे महत्व मात्र अनन्यसाधारण असते.
सेवेचे मुल्यमापन करताना वेगवेगळ्या सेवांच्या दृष्टीने वेगवेगळी परीमाणे असतात. काही ठिकाणी किती काम केले याचे मोजमाप केले जाते, फाईल्स किती पुढे सरकवल्या हे बघितले जाते, काही ठिकाणी संशोधन किती केले किंवा संशोधन लेख किती लिहीले यावरुन मुल्य ठरते तर काही ठिकाणी केलेल्या कामाचा निकाल हा देखील कार्याचे मुल्यमापन करण्याकरीता गृहीत धरला जातो. हे मुल्यमापन करताना शिक्षणाच्या क्षेत्रात तर आजकाल विद्यार्थ्यांकडून मुल्यमापन करणे देखील सुरु झाले आहे जी एक फार चांगली बाब आहे. एकंदरीत वेगवेगळ्या कार्यलयांतून या स्वयं मुल्यमापनाचे वेगवेगळे तक्ते बनविले जातात. त्यामधे कर्मचारी आपण केलेल्या कामाची माहिती लिहीतात व त्यानंतर त्यांचे वरीष्ठ आपल्या तपासणी अहवालावरुन त्या तक्त्यांचे मुल्यमापन करतात व नंतरच कर्मचाऱ्याला पदोन्नती दिली जाते व त्याचा आर्थिक मोबदला त्याला मिळतो. परंतू या सर्व स्वयंमुल्यमापन करणाऱ्या तक्त्यांमधे एक बाब लिहीलेली नसते जी खरे तर असायला हवी. ती म्हणजे सेवा साफल्य प्रमाण.
स्वयंमुल्यमापनाच्या तक्त्यांमधे प्रत्येक कर्मचारी स्वतः केलेल्या कामांची नोंद करीत असतो. परंतू हे काम सुरु असताना दुसऱ्या कुणीही त्याच्या कामाचे मुल्यमापन करण्यासोबत त्याचे स्वतःचे मुल्यमापन मनातल्या मनात सुरु असते. हे मुल्यमापन आपण कार्य केलेल्या समाधानाचे असते. ते कुठेही लेखी स्वरुपात नोंदविले जात नसले तरी देखील मनामधे मात्र ते निश्चित नोंदविल्या जाते. वर उल्लेखित अध्यापक त्याचा तास संपवून जेव्हा वर्गातून बाहेर पडला असेल तेव्हा त्याचा चेहेरा सेवा साफल्याच्या तेजाने उजळलेला असणार यात तिळमात्र शंका नाही. प्रामाणिकपणे सेवा दिल्यानंतर ज्याला ती सेवा प्रदान केली आहे त्याचा आनंदित झालेला चेहेरा आपल्या मनात अपूर्व समाधानाचा भाव निर्माण करतो हा अनुभव अनेकांचा असणार. असे प्रत्येकाच्या बाबतीत होत असल्याने स्वयंमुल्यमापनाच्या अहवालावर सेवा साफल्याचा एक रकाना ठेवायला काय हरकत आहे? मुळात स्वयंमुल्यमापन हे प्रामाणिकपणे केले जावे ही अपेक्षा प्रत्येकच व्यवस्थेमधे आहे. मग त्यासोबत सेवा साफल्य देखील प्रमाणिकपणे लिहीले जाईल हा विश्वास आपण सर्वांनीच बाळगायला हवा. या निमीत्ताने सेवा साफल्य ही संकल्पना जी सध्या केवळ मनातच आहे ती अधिकृतपणे व्यक्त केल्या जाऊ शकेल व ती व्यक्त करावयाची असल्याने ती मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
त्या महाविद्यालयातून बाहेर पडताना त्या अध्यापकाची काही वाक्ये आठवली. आपले ध्येय जर ठरले असेल तर मग त्या ध्येयप्राप्तीच्या मार्गात येणारी अनेक आकर्षणे, मोह आपल्याला मोहित करतात. त्यांचा आनंद घ्यावाच, परंतू आपल्या ध्येयप्राप्तीच्या अंतीम टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे वचन आपण स्वतःलाच दिलेले आहे ते कधीही विसरता कामा नये. ते कायम मनात ठेवून आनंदाने सेवा दिल्यास ती सेवा साफल्याची अनुभूती मिळाल्या शिवाय राहणार नाही. कायम मनात कोरुन ठेवाव्या अश्या त्या ओळी आहेत:
The woods are lovely, dark and deep
But I have promises to keep
And miles to go before I sleep!!
Comments
Post a Comment