थोडा है थोडे की जरुरत है @ 09.07.19

उशीराचे सुख

एका माणसाला एकदा लकी ड्राॅ मधे एक बक्षिस मिळाले. सहजच काही विशेष करता त्याला ते मिळाल्याने फार आनंद झाला. ते बक्षिस म्हणजे त्याला त्याच्या परीवारासोबत एका अत्यंत देखण्या चित्रपटगृहामधे त्याला हवा तो चित्रपट बघण्याच्या पासेस. ज्या क्लासच्या पासेस त्याला मिळाल्या होत्या त्यामधे एका व्यक्तीचे तिकीट ४५० रुपये होते. त्यामुळे घरातल्या चार जणांकरीता या पासेस म्हणजे पर्वणीच होती. मध्यमवर्गीय परीवार असणारा तो माणूस ज्याला एरवी स्वत:चे पैसे खर्च करुन अश्या क्लासमधे चित्रपट बघणे जमले नसते. त्यामुळे त्याला त्याच्या परीवाराला फार आनंद झाला. त्या पासेस वापरण्याची मर्यादा मात्र सहा महिन्याची होती. सहा महिन्याच्या काळात त्यांचा वापर करायचा होता. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याने ठरविले की अनायसे पासेस मिळाल्या आहेत तर आपण एखादा चांगला चित्रपट बघितला पाहिजे. चांगल्या चित्रपटाची तो वाट बघू लागला. दोन तीन महिने निघून गेले परंतू त्याला हवा तसा चांगला चित्रपट लागलाच नाही. मग त्याच्या परीवारातील लोकांनी चौथ्या महिन्यात एक चांगला चित्रपट लागलाय असे सांगितले परंतू तो म्हणाला या पेक्षाही चांगला चित्रपट लागेल. म्हणून पुन्हा वेळ गेला. शेवटी असे करता करता पासेस चा कालावधी संपायला एकच आठवडा राहीला. आता मात्र त्या वापरल्या नाही तर त्यांची संधी जाणार होती. म्हणून जो आहे तो चित्रपट त्यांनी बघितला. तो अतिशय वाईट होता. एकंदरीत चांगला चित्रपट बघायला मिळेल त्यामधून भरपूर आनंद मिळेल या नादात त्यांना एक अतिशय वाईट चित्रपट बघावा लागला. सुख प्राप्त करण्याचे लांबविल्यामुळे, सुख प्राप्त करायला उशीर केल्यामुळे चार महिन्यापूर्वी लागलेला बऱ्यापैकी चित्रपट देखील त्याने गमावला. या मानसिकतेच्या सवयीला मानसशास्त्रामधे डीलेड ग्रॅटीफीकेशन असे म्हणतात. उशीराचे सुख.

मानवी स्वभावाचे अनेक विविध पैलू असतात. त्यामधे हा एक अनेकांमधे आढळणारा पैलू असतो. डीलेड ग्रॅटीफीकेशन. सुख प्राप्त करण्यासाठी वाट बघणे. काही प्रमाणात या मनोवृत्तीच्या लोकांची सवय चांगली असते. साधारणपणे कोणत्याही बाबतीत धीर ठेवणारी ही मंडळी असतात. अगदी नवा ड्रेस विकत आणल्यावर त्वरित वापरता तो काही महिने ठेऊन त्यानंतर वापरणे जेणे करुन बचत होऊ शकते असा विचार साधारणपणे ही मंडळी करतात. मुळात सुख मिळविण्याकरीता त्यांची वाट बघण्याची तयारी असते. त्यांच्या मनाची अशी काहीशी ठेवण असते की आता लगेच जर एखाद्या गोष्टीचे सुख प्राप्त होत असेल तर काही दिवस वाट बघितल्याने आणखी जास्त चांगल्याप्रकारे त्यापेक्षाही मोठे सुख अनुभवता येईल असा या मंडळींच विचार असतो. त्यामुळे यांना वाट बघणे जमते त्या वाट बघितल्यामुळे कधी कधी त्यांचा फायदा देखील होतो. तसा फायदा झाला की त्यांचा त्यांच्या डीलेड ग्रॅटीफीकेशन सवयीवर विश्वास बसतो आणि ते त्याच पद्धतीने वागू लागतात. या लोकांमधे आणखी एक प्रकार असतो. ही मंडळी दैववादी किंवा भाग्याचा विचार करणारी असतात. कारण सुखाची वाट बघत असताना कधी कधी त्या पद्धतीचे सुख त्यांना हुलकावणी देते त्यामुळे ही मंडळी नाराज होतात. परंतू दैववादी असल्याने आपल्या नशीबात हे सुख नाही म्हणून त्यांची स्वत:ला समजावण्याची एक स्वतंत्र प्रक्रीया यांच्या मनात कार्यरत असते म्हणूनच ही मंडळी सुखी राहू शकतत किंवा तडजोडी स्विकारु शकतात. याच्या अगदी उलट मनोवृत्ती असलेली मंडळी असतात. त्यांच्यात डीलेड ग्रॅटीफीकेशन अजिबात नसते.

अर्जंट ग्रॅटीफीकेशन या प्रकारात जी मंडळी मोडतात ती त्वरीत आलेला क्षण लगेच साजरा करणारी असतात. वरचेच उदाहरण द्यायचे झाल्यास, नवा ड्रेस विकत घेतल्यावर त्याच दिवशी तो घालून फिरुन येणे हा प्रकार या मंडळींमधे असतो. यांना वाट बघायला जमतच नाही. आताच जे सुख मिळतंय त्याचा आनंद घ्यायचा. कल किसने देखा है अशी या मंडळींची सवय असते. वरील मंडळींच्या तुलनेत ही मंडळी जास्त उत्साही, जास्त लोकप्रीय भरभरुन जगणारी असतात. त्यांचे सुख प्राप्त करण्याचे प्रमाण देखील जास्त असते. परंतू अश्या मंडळींना कधी कधी भविष्याचा वेध घेता येत नाही व्यावहारिक पातळीवर ती सर्व बरेच वेळा अपयशी ठरतात. त्याचं सर्वात महत्वाचे कारण म्हणजे यांच्याकडे धीर नसतो. आलेला सुखाचा क्षण कशाचीही पर्वा करता मनापासून जगायचा ही त्यांची भावना असते. संगीत लागले असेल तर ही मंडळी त्वरीत नाचणे सुरु करतील. धमाल नाचून घेतील, कुणी काय म्हणेल याची अजिबात पर्वा करता. आधीच्या वर्गवारीतला व्यक्ती वाट बघेल, कधी मला चांगल्या गाण्यावर किंवा योग्य परिस्थीतीमधे, टीका करणार नाहीत अश्या लोकांच्या उपस्थितीत मी नाचीन. दोन्ही बाबतीत फायदे तोटे आहेत. हा वाट बघणारा कदाचित वाटच बघत राहील आणि पुढे संधीच मिळणार नाही. तर जो नाचला त्याला टिका सहन करावी लागेल

मुळात या दोन मनोवृत्ती तयार होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे सुखाच्या संकल्पनाच वेगवेगळ्या असतात आणि व्यक्तिपरत्वे त्या बदलत जातात. या दोन्ही प्रवृत्तीचा एकत्रीतपणे विचार केल्यास या दोन्हीचा मध्य काढून जगणारी व्यक्ती सध्याच्या काळात यशस्वी जीवन जगू शकते. याकरीता सुखाच्या वर्गावारी केल्या तर ते जास्त फायद्याचे राहू शकते. डीलेड ग्रॅटीफीकेशनची सवय असणाऱ्या मंडळींप्रमाणे भविष्याचा विचार डोक्यात ठेऊन आणि भविष्यातील सुखाची चिंता करुन काही बाबतीत वर्तमानात बंधने पाळण्याची गरज आहे. विशेषत: पैसा खर्च करण्याच्या बाबतीत ती काळजी गरजेची आहे. पुढे काही करताच येणार नाही आणि म्हणून कल किसने देखा है या धुंदीत आज जे आहे ते उधळून टाकायचे मग कल अगर देखने की जरुरत पडी तो, रडत बसायचे हा प्रकार बरोबर नाही. परंतू छोट्या छोट्या गोष्टींमधेही वाट बघत बसून जगण्याचा आनंद सुख लांबणीवर टाकणे हे देखील साफ चुकीचे आहे. डीलेड ग्रॅटीफीकेशन वाले तसेही करतात. अगदी पावसात चिंब भिजताना देखील, अजून चांगला पाऊस येऊ देत, बघणारे फार लोक नसू देत, फार जोराचा किंवा फारच तुरळक पाऊस नको. मध्यम स्वरुपाचा पडेल तेव्हा मी भिजीन असे म्हणले तर भिजणे राहूनच जाणार हे नक्की. डीलेड ग्रॅटीफीकेशन वाले क्षणांच्या सुखापेक्षा त्यामुळे काही अडचण तर निर्माण होणार नाही या भयापोटी सुखाचा भरभरुन आनंद घेऊ शकत नाही. याउलट अर्जंट ग्रॅटीफीकेशन वाले अकारण धाडस करुन अडचणीत सापडतात. एकंदरीत या दोन्ही मनोवृत्तींचा मध्य साधल्यास आपल्याला अतिशय आनंदी जिवन जगता येऊ शकते.

मुसळधार पावसाळ्याच्या दिवसात, जीवाची चिंता करीत, कारच्या काचा बंद ठेऊन, ७० ते ८० च्या स्पीडमधे गाडी ठेवत, गाडी मधे कुठेही थांबवता, निमुटपणे गाडी चालवत गाडीत बसलेल्या आपल्या आवडत्या व्यक्तीस शांतपणे गप्प बसायला लावून प्रवास करता येतो तो सुखरुप पूर्ण होऊ शकतोच, पुढे कधीतरी कमी पाऊस असताना, बढीया मजा करत जाऊयात याची वाट बघत. किंवा कार बाजूला ठेऊन मुसळधार पाऊस पडत असताना, जीवाची फार चिंता करीत, त्याच क्षणी आपल्या आवडत्या व्यक्तीस मोटरसायकलवर बसवून, पावसात चिंब भिजत, पावसाचे तुषार अंगावर झेलत चिंब चिंब होत प्रवासाला जायचे. निर्णय प्रत्येकाचा व्यक्तिगत आहे. डीलेड ग्रॅटीफीकेशन आणि अर्जंट ग्रॅटीफीकेशन याचा मध्य काढून घेतल्यास सुखच सुख आहे.






Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18