थोडा है थोडे की जरुरत है @ 16.07.19
मनाचा काॅपीराईट
प्रवास सुरु होता. मिरची नावाचे रेडीओवर एक चॅनेल लागले होते. त्यावर बरीच हिंदी गाणी सुरु होती. मधे मधे ते समालोचक ज्यांना आरजे अर्थात रेडीओ जाॅकी म्हणतात ते बोलत होते. मजेदार सुरु होते सारे. अचानक त्यांनी आता आपण मराठी गाणी ऐकुयात असे घोषित केले त्यामुळे मी जरा उत्सुकतेने ऐकू लागलो. कोणते मराठी गाणे लागेल याचा अंदाज करीत असतानाच मला अक्षरश: आश्चर्याचा धक्का बसावा असे गाणे त्यांनी लावले. खरे तर मी नव्या मराठी सिनेमामधील गाणे अपेक्षित केले होते परंतू हे गाणे तर एकदम फारच जुने आणि बालपणीच्या रम्य आठवणींना उजाळा देणारे होते. माझ्या सोबत असलेले माझे सहकारी प्राध्यापक मित्र देखील आनंदित झाले. ते गाणे बालपणी इतके वेळा ऐकलेले होते की त्याचे सुरुवातीचे संगीत सुरु झाल्याबरोबर आम्ही दोघांनीही एकाच वेळी ते गाणे ओळखले. गाणे सुरु झाले आणि आम्ही दोघेही त्याचा छान आस्वाद घेऊ लागलो. पण पहिली ओळ ऐकल्यावर पुढची ओळ मनात आली असताना कानावर मात्र काहीतरी भलतेच पडले. आम्ही दोघेही चमकलो. आपण काहीतरी चुकीचे ऐकले असे दोघांनाही वाटून गेले. परंतू आम्ही काहीच बोललो नाही. कारण पुन्हा एकदा ऐकुयात असे वाटले. धृवपद पुन्हा गायल्या गेले व पुन्हा भलतेच काहीतरी ऐकू आले. आता मात्र दोघांचीही खात्री पटली की हे मूळ मराठी गाणे नाही तर त्याचे रीमिक्स आहे. जे गाणे ऐकून आपल्याला आनंद होईल असे आम्हास वाटत होते ते होते,
गोरी गोरी पान फुलासारखी छान,
दादा मला एक वहिनी आण!
लहानपणापासून मला एक वहिनी आण असे लडीवाळपणे आपल्या भावाला विनविणारी त्याची बहिण आणि तिच्या या खोडकर पण हव्या हव्याश्या वाटणाऱ्या आर्जवावर हळूवारपणे हसणारा भाऊ हे सुरेख चित्र मनात घर करुन बसले होते. परंतू या सुरेख चित्राला संपुर्णपणे विस्कटून टाकणाऱ्या ओळी जेव्हा आम्ही ऐकल्या तेव्हा काय बोलावे सुचेना. आम्ही ऐकलेल्या ओळी अश्या होत्या,
गोरी गोरी पान फुलासारखी छान,
याले पहिली नको म्हनून दुसरी आन.
माझ्या सोबतचे माझे सहकारी मित्र मला म्हणाले की सर, हा काॅपीराईटचा भंग नाही का? मला जी माहिती होती ती मी त्यांना सांगितली. काॅपीराईट असतोच परंतू रीमिक्स करताना मूळ गाण्याचे शब्द, त्याचे संगीत, त्यात वापरलेली वाद्ये, त्याचा ताल, त्याची लय या सर्व बाबतीत नियमाने ठरवून दिलेल्या प्रमाणाच्या वर जर बदल केले तर काॅपीराईट कराराचा भंग होत नसावा असे मला वाटते. कारण प्रत्येकच वेळी रीमिक्स करताना मूळ मालकाची परवानगी घेतच असतील असे नाही. त्यामुळे त्याकरीता प्रमाण ठरवून दिले आहे व त्यानुसार तेवढ्या प्रमाणात जर बदल केले तर बहुदा काॅपीराईट कराराचा भंग होत नाही. एकंदरीत काॅपीराईट व त्यामधून विस्कळीत किंवा मोडतोड करुन सादर होणारे संगीत यासंदर्भात आमची चर्चा सुरु झाली व अचानक मी एक वाक्य बोलून गेलो. त्यांना मी म्हणालो, सर हे सारे ठीक आहे की अमुक प्रमाणात बदल केला तर कोणत्याही गीताची तोडमोड करण्याची परवानगी मिळते व त्यामुळे काॅपीराईट कराराचा भंग देखील होत नाही परंतू या सर्व प्रक्रीयेमधे मनाच्या काॅपीराईटचे काय?
होय मनाचा काॅपीराईट! तो असतो. त्याचे काय? ही गीते म्हणजे केवळ गीते नाहीत तर त्यांसोबत आमचे बालपण व त्यामधील रम्य आठवणी जोडल्या गेल्या आहेत. कगदावरील नियमाच्या आधारे गाण्यामधे तोडमोड करुन प्रत्येकच गाणे रिमीक्स बनवून ते नाचण्यायोग्य बनवायचे या नव्या सांगीतिक पद्धतीमधे मनाच्या काॅपीराईटचे किती उल्लंघन होतेय याचा विचार नको का करायला? ज्या वहिनीला आणण्याचे आर्जव आमच्या मनातील गीतात केले जाते व त्यामधील ती गोड भावना आमच्या मनात जो आनंद निर्माण करते त्याची तोड निदान आम्हाला तरी या गाण्याच्या नव्या अवतारात सापडत नाही. बहिणीच्या आर्जवातील तो लडीवाळपणा आणि त्यामधून व्यक्त होणारी कल्पनाशक्ती याची उंची फार मोठी आहे. ती कडवी, त्यामधून व्यक्त झालेले भाव आम्हाला निखळ आनंद देतात. ती बहिण पुढे म्हणते,
वहिनीला आणायला चांदोबाची गाडी,
चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी,
हरणाची जोडी तुडवी गुलाबाचे रान,
दादा मला एक वहिनी आण!
या सर्व ओळींमधून शब्दागणिक व्यक्त होणारे भाव किती निर्मळ आणि रम्य आहेत. काळ बदलला तरी त्यामधील सात्विकता तसुभरही कमी झालेली नाही किंवा होऊ शकत नाही कारण या असल्या गीतांच्या निर्मीतीच्या वेळी यामधे सहभागी असलेल्या सर्व कलावंतांनी अत्यंत समर्पितपणे ते कार्य केले आहे. या गीतांसोबत एक पिढी मोठी झाली आहे. ती मोठी होताना या सर्व सुरेल काव्यामधील भाव या पिढीने तीव्रतेने मनामधे अनुभवलेले आहेत. ते सारे भाव अत्यंत प्रामाणिकपणे अनुभवलेले असल्याने आजही त्या सर्व भावविश्वामधे रममाण करविण्याची ताकद या कलाकृतींमधे आहे. त्यामुळेच या असल्या सुंदर गीतांच्या नव्या पद्धतीच्या सादरीकरणाने काॅपीराईट कलमाचा भंग होत नसला तरी देखील मनाच्या काॅपीराईटचा भंग मात्र पदोपदी होत राहतो. कारण आमच्या मनातील ओळी जर पुढे दिल्याप्रमाणे आमच्या कानावर पडल्या तर,
पहिलीशी जमलं तुय वाटलं असं होतं
इलू इलू तुयं जोरात झालं सुरु व्हतं
पन भांडन तुमचं झालं त्याचा आमाले तान,
याले पहिली नको म्हनून दुसरी आन!
या असल्या काव्यामुळे व मोठमोठ्या डीजेवर हे गाणे कर्णकपाळी वाजत असल्याने मनाच्या काॅपीराईटचे काय होते ते सांगताच येणार नाही.
मुळात या प्रकारची रिमीक्स गाणी ऐकणाऱ्यांच्या अभिरुची वगैरे बद्दल मला टिका करायची नाही. प्रत्येकाची आवड स्वतंत्र असू शकते व त्यामुळे तशी आवड जोपासण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच मिळावे. आक्षेप केवळ एकच आहे की आपापल्या आवडी निवडी नुसार प्रत्येकाने तशी निर्मीती करावी व त्याचा आनंद घ्यावा. या अश्या नवनिर्मितीकरीता आधीचे निर्माण करुन ठेवलेले व जे आमच्या मानसिक जडण घडणीचा भाग आहे त्याची तोडमोड का करावी? स्वतंत्रपणे आपली कल्पनाशक्ती वापरुन नवे शब्द, नवी लय, नवे संगीत नियोजन व नवी धुन तयार करुन त्याचा आनंद घ्यावा. त्याला कुणाचीही मनाई राहू शकत नाही. परंतू या अश्या चोऱ्या करुन, त्यामधला भाव संपवून, त्याची वाटेल तशी तोडमोड करुन, अनेकांच्या मनाचे काॅपीराईट उध्वस्त करुन कसला आनंद प्राप्त होणार आहे? आणि तो होत असेल तर मात्र त्या आनंदला सक्त आक्षेप आहे. कारण मनाचा काॅपीराईट हा प्रत्येकाचा स्वतंत्र असतो.
मनाचा काॅपीराईट ही साधी बाब नाही तर ती एकेकाच्या व्यक्तीमत्वाची ओळख असते. हा काॅपीराईट वर्षानुवर्षे जगत आलेल्या एखाद्या विशिष्ट संस्कारीत चौकटींमुळे तयार होतो. त्या काॅपीराईटच्या सवयींमुळे मनाला पैलू पडले असतात व त्यामधे आपण रमत असतो व आनंद घेत असतो. अश्या मनाच्या काॅपीराईटला विस्कटविण्याचे काम कुणीही करु नये. त्यामधून निर्माण होणाऱ्या भावविश्वाची खिल्ली उडवू नये तसेच त्याला कमी लेखू नये. कारण कागदावरच्या काॅपीराईट मधील कोणतीही कलमे केव्हाही बदलता येऊ शकतात परंतू मनाच्या काॅपीराईट मधे फार बदल करु शकत नाही कारण तो केवळ आपल्या मनाचा नव्हे तर आपल्या चारीत्र्याचाही भाग असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या मनाच्या काॅपीराईटचा सन्मान करायला शिकुयात!!
Comments
Post a Comment