थोडा है थोडे की जरुरत है @ 23.07.19

मूड चा सूड

त्या दिवशी कार्यालयात फारच तणतण झाली. एकही काम नीट होत नव्हते. कार्यालयात पोहोचल्यावरच प्रचंड गरमी होत असताना केबीनमधला एसी काम करेना. केबीन साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याने नीट साफसफाई केली नव्हती. त्यात कार्यालयातील दोन तीन कर्मचारी सुटीवर होते. एक सांगता गेला होता. कामे तुंबलेली होती. काही कार्यालयांकडून तातडीने माहिती मागविण्यात आली होती. ती पाठविण्यासाठी लोक नव्हते. माहिती तयार झाली तर नेमका नेटवर्क चा प्राॅब्लेम उभा झाला. त्यामुळे अडथळे जास्त निर्माण झाले. तेवढ्यातच सहकारी प्राध्यापकाची तक्रार करीत एक दुसरे प्राध्यापक येऊन गेले. छोटेसे कारण परंतू त्यामधून उद्भवलेले भांडण विकोपाला गेले होते. असे काहीतरी सकाळपासूनच सुरु झाले. एकंदरीत तो दिवस कटकटीचाच होता. दुपारी देखील असेच काहीतरी घडत गेले आणि आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात बरेच वेळा उजाडतो असा तो दिवस माझ्याही आयुष्यात उजाडला होता. दिवसभर वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करुन करुन मी थकून गेलो. सारा मूड खराब होता. त्याच मन:स्थितीमधे मी घरी पोहोचलो. दिवसभराच्या ताणामुळे प्रसंगी राग येऊनही बोलता येणे अशी देखील स्थिती अनुभवल्यामुळे मी घरी रागाच्या थाटातच पोहोचलो. घरात पाऊल टाकल्याबरोबर मुलगा मोबाईल कानाला लावून काहीतरी ऐकताना दिसला. आधीच डोक्याचा पारा चढलेला असल्याने मी त्याला त्याच्या त्या कृतीवरुन सुनावणे सुरु केले. अभ्यास करायला हवा, फालतू वेळ घालवतो, अश्याने वेळ हातातून निघून गेल्यावर मग काय करशील?, वडील घरी आल्यावर पाणी पण विचारत नाही, माझ्या कष्टांची किंमत नाही वगैरे वगैरे यथेच्छ मार्गदर्शनात्मक रागावणे झाले. ते आटोपल्यावर मला लगेच काॅफी हवी होती त्याचवेळी बायकोच्या बहिणीचा फोन आला होता. झाले मग काय? पुन्हा भडका उडाला. मी आल्याबरोबर मला काय हवं नको ते बघायला नको का? माझ्यापेक्षा बहिणीचा फोन महत्वाचा आहे का? तिला पण कळत नाही का कधी फोन करावा ते? मी एवढी मेहनत करतो दिवसभर, वेगवेगळ्या समस्या सोडवतो आणि घरी परत आल्यावर साधी काॅफी देखील लवकर मिळू नये, माझी काही किंमतच नाही वगैरे वगैरे पद्धतीने रागाचा दुसरा एपीसोड झाला. खरे तर तो फोन काही मिनीटातच आटोपला होता परंतू काॅफीचा कप हातात येईपर्यंत हे सारे माझे सुरु होते. काॅफी पिऊन होत नाही तो मुलीचा पुण्याहून फोन आला नाही म्हणून रागाचा तिसरा एपीसोड सुरु झाला. तिला कर्तव्याची जाणीवच नाही. अजून होस्टेलवर पोहोचली नाही. इथे आम्ही काळजी करीत बसतो पण यांना कदरच नाही. ही काय वागण्याची पद्धत झाली का? हे सारे सुरु असतानाच मुलीचा फोन आला. मग काय? हीच सारी वाक्ये मी तिला ऐकविली. सोबत आणखी दहा बारा ऐकविली आणि रागारागात फोन ठेवून दिला. काॅफी प्यायल्यावर जरा बरे वाटायला लागले. रागाचा पारा जरा कमी झाला. बायकोने विचारले, काय झाले? मी म्हणालो, माझा आज मूड नाही. आज एक गोष्ट व्यवस्थित झालेली नाही. माझा मूड अजिबात ठीक नाही. तिने मला शांतपणे प्रश्न विचारला, मग आज त्या मूड चा सूड घेताय का

मूड चा सूड? हे शब्द ऐकून मी एकदम भानावर आलो. अरे! खरंच की! आज माझ्या दिवसभराच्या कामामधे अनंत अडचणी आल्या. त्या अडचणींमुळे माझा मूड खराब होता. परंतू त्या मूड चा सूड मी ज्यांचा त्या अडचणींशी दुरान्वयानेही संबंध नाही अश्या मंडळींवर का काढतो आहे? कामाच्या ठिकाणी मी काही जणांना बोलू शकलो नाही, काही ठिकाणी हतबल झालो, उगाच त्रास सहन करावा लागला या साऱ्या गोष्टींचे उट्टे मी घरी आल्यावर का काढतोय? उलट घरी आल्यावर त्या सर्व ताणाच्या गोष्टी विसरुन मला निवांत प्राप्त करता यायला हवा. परंतू तसे करता हे मी काय करतोय? अस विचार करु लागल्यावर मला माझ्या चुकीची जाणीव झाली. आपले रागावणे, चिडचिड, आरडा ओरडा उगाचच होता हे मला जास्त तिव्रतेने जाणविले जेव्हा मला काही गोष्टी शांतपणे ऐकल्यावर कळल्या. त्या ऐकल्यावर तर मी माझ्या उगाचच चिडण्यावर मनातल्या मनात फारच खजील झालो. कधी कधी आपण कसलाही विचार करता बोलायला लागतो. परंतू नंतर जेव्हा समोरच्या व्यक्तीचा दृष्टीकोन लक्षात घेतो तेव्हा आपले रागावणे किंवा चिडणे निरर्थक होते हे जाणविते. अश्या चुकांचा आणि वयाचा काही संबंध नाही. परंतू अशी चूक झाल्यावर आणि ती आपल्या लक्षात आल्यावर एक गोष्ट मात्र तातडीने करायला हवी. मी ती केली. परंतू ती गोष्ट करण्यास मला भाग पाडले माझ्या घरातील तिघांनी, ज्यांच्यावर मी चिडलो होतो.

  प्रथम मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही मला रागावलात परंतू मी काय ऐकत होतो ठाऊक आहे का? सकाळी तुम्ही मला सांगितले होते की लता मंगेशकरांचे या चिमण्यांनो परत फिरा गाणे ऐक, खूप छान आहे. मी आताच शाळेतून आलो. थकलो होतो म्हणून तुम्ही संगितलेले गाणे ऐकत बसलो होतो. मला खूप आवडले म्हणून दोन तीन वेळा ऐकत होतो. तुम्ही मला सांगितले ते अगदी खरे आहे. लताआजीचा सूर किती सुंदर लागलाय या गाण्यात. मजा आली. त्याचे बोलणे ऐकल्यावर मी काहीच बोललो नाही. मी तीच गोष्ट केली जी मला करणे क्रमप्राप्त होते. नंतर पत्नीने सांगितले की बहिणीचा फोन आला होता कारण तिला आॅनलाईन काही माहिती भरायची होती. त्यासाठी महत्वाचे संदर्भ हवे होते. ती माहिती भरण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे ते संदर्भ देणे आवश्यक होते. तेवढी माहीती देण्याकरीता तो फोन होता. परंतू नेटवर्क बरोबर नसल्याने मधे मधे अडचणी येत होत्या म्हणून तो काॅल साधारण दहा मिनीटे पर्यंत सुरु होता. काॅफीपेक्षा ते निश्चितच जास्त तातडीचे होते म्हणून काॅल केला होता. मला अचानक कार्यालयातील माहिती पाठविण्याची अडचण आठवली. पुन्हा मी शांत बसलो परत मी तीच गोष्ट केली जी मला करणे भाग होते. तिसऱ्या टप्प्यावर जरा वेळाने मुलीचा परत फोन आला. ती म्हणाली, बाबा, तुम्ही मला एकदम रागावले पण माझे म्हणणे ऐकलेच नाही. मी बाहेर गेली होती वेळेतच परतणार होती परंतू जोराचा पाऊस सुरु झाला. मग पावसात गाडी चालवायला मला तुम्हीच मनाई केलीय. शिवाय पावसात जास्त भिजू नको कारण मला कफ होतो असे आईनेच मला सांगितलेय. म्हणून मी पाऊस थांबण्याची वाट बघितली. मोबाईल ओला होऊ नये म्हणून पाऊचमधे नीट ठेवून गाडीच्या डीक्कीत ठेवला होता त्यामुळे फोन करु शकली नाही. घरी आल्याबरोबर लगेच तुम्हाला फोन केला कारण मला माहित होते की तुम्ही खूप काळजी करीत असाल. हे ऐकल्यावर माझे तर बोलणेच बंद झाले. किती चुकीचे वागलो होतो मी. कसलाही विचार करता मी माझ्या बिघडलेल्या मूड चा सूड काढला. मुलीचे ऐकल्यावरही मी तीच गोष्ट केली. मी तिघांनाही मनापासून साॅरी म्हणालो. कारण माझीच चूक होती मला ती उमगली होती.

बरेच वेळा आपल्या कामाच्या ठिकाणी झालेल्या ताणामुळे आपला मूड बिघडलेला असतो. तो ताण बिघडलेला मूड घेऊन आपण घरी येतो त्याचा जमेल तसा सूड आपल्याच लोकांवर काढतो. ही बाब स्री पुरुष दोघांनाही समान स्वरुपात लागू आहे. अश्या पद्धतीने मूड चा सूड काढणे गैरच आहे. याच्या अगदी उलट कामाचा ताण कामाच्या ठिकाणी विसरुन घरी आल्यावर अख्ख्या घराचा मूड छान करण्याच्या कल्पनांचा विचार करायला हवा. आणि एखाद्या वेळी अजाणतेपणी सूड काढलाच त्यानंतर आपली चूक कळली तर कसलाही संकोच करता उगाचच इगो बाळगता मनापासून साॅरी म्हणावे. बघा असे केल्यावर बिघडलेला मूड कसा फ्रेश होतो ते!!




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18