थोडा है थोडे की जरुरत है @28.05.19

शून्य सावली

२५ मे च्या एका विलक्षण घटनेबद्दल मनात कुतुहल होते. आपला कायम पाठलाग करणारी, आपल्या कायम सोबत असणारी, आपल्या हालचाली प्रतिरुपात सादर करणारी आणि आपलेच प्रतिरुप असणारी आपली सावली आपल्याला सोडून जाणार होती. साधारण तीन चार दिवसाआधी वर्तमानपत्रात या खगोलशास्त्राशी निगडीत या एका विलक्षण घटनेबाबत विस्ताराने माहिती प्राप्त झाली. असे का होणार याचे शास्त्रीय कारण देखील वाचण्यात आले. परंतू एक अनामिक हुरहुर मनाला लागून राहीली होती. आपली सावली आपल्याला सोडून जाणार! आपला एक अत्यंत महत्वाचा भाग जणू आपल्यापासून दुरावणार असे काहीसे मनात येत होते. काय होते असे त्या सावलीचे महत्व आणि ती जाणार तरी किती वेळ होती? जास्तीत जास्त अर्धातास. परंतू तरीही ती जाणार याबद्दल मन कावरे बावरे झाले होते. का असे?

सावली म्हणजे आपलेच असे एक प्रतिरुप जे आपल्यासोबत कायम असते आणि आपण जसे आहोत तसेच ते आपल्याला आपली भूमिका दर्शवत असते. ही खरी खुरी भूमिका दर्शविणारे कदाचित दुसरे कुणीच आपल्या आयुष्यात नसते. वेगवेगळ्या परीस्थितीत काम करताना आपण जगाचे वेगवेगळे नियम अनुसरुन जगत असतो. सामाजिकदृष्ट्या समाजाचे घटक म्हणून जगताना आपण वेगवेगळ्या भुमिका वठवत असतो. त्या आवश्यक देखील असतात. परंतू या सर्व भुमिकांच्या गदारोळात आपण मुळात कसे आहोत हे सांगणारी व्यवस्था किंवा व्यक्ती मात्र आपल्या जीवनात नसते. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून देखील असे म्हणतात की आपले खरे अंतरंग आपल्याशिवाय इतर कुणालाही कळत नाही. जवळच्या व्यक्तींना आपण आपल्या मनातील भावना बोलून दाखवितो परंतू तरीही १०० टक्के पर्यंत ते राहूच शकत नाही कारण ते कुणालाही शक्य नसते. अश्यावेळी आपल्याला अगदी जसेच्या तसे मांडणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपली सावली आणि ती आपल्याला सोडून जाणार?

जीवनात अनेक गोष्टी आपण बदलत राहतो अगदी कपड्यांच्या फॅशन पासून ते खाण्याच्या सवयींपर्यंत. इतकेच काय ज्या स्वभावाला औषध नाही असे बरेच वेळा म्हणत असतानाही, ते स्वभाव देखील बदलले आपल्याला दिसतात. परंतू स्वतःहून बदलणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपली सावली. ती तेव्हाच बदलते जेव्हा आपण बदलतो. म्हणजे आपल्याशी आणि प्रसंगी आपण केलेल्या बदलाशी प्रामाणिक राहून सतत आपल्या सोबत राहणारी गोष्ट म्हणजे सावली. ती इतकी प्रामाणिकपणे सोबत असते की तिला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व देखील नसते. तिच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची असते. इमान. आपल्या सवंगड्यासोबत कायम राहण्याचे तिचे इमान. या इमानाला जपण्यासाठी आणि आपल्या सवंगड्याला साथ देण्यासाठी स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचाही विचार करता खंबीरपणे कायम सोबत राहते ती आपली सावली आपल्याला सोडून जाणार म्हणून मन घाबरल्यासारखे झाले होते

सावलीचा आधार हा प्रत्येकालाच हवासा असतो. व्यक्तीमत्वांनुसार खरे तर आपली जडणघडण होत असते त्यानुसार आपण समाजात वागत असतो. काही लोक अतिशय खंबीरपणे त्यांच्यासमोर येणाऱ्या परीस्थितींचा सामना करतात, काही लोक मनाने दुबळे असल्याने परीस्थितीला शरण जातात आणि खचून जातात. काही लोकांना मनातून भिती वाटत असली तरीदेखील लोकासमोर मात्र ते खंबीरपणाचा आव आणून स्वतःला सादर करतात आणि काही मंडळी मुळातच खंबीर नसतात आणि आपण खंबीर नाही हे त्यांनी प्रांजळपणे कबूल केलेले असते. ढोबळमानाने मनुष्यस्वभावाचे हे चार महत्वाचे पैलू आपल्याला दिसतात. परंतू या चारही प्रकारच्या व्यक्तीमत्वांना सावलीची गरज असतेच. कारण सावलीचे महत्व हे सादरीकरणापेक्षाही सोबत असण्याने जास्त आहे. कुणीतरी कायम आपल्या सोबत आहे, आपल्याला सांभाळते आहे, ही भावना मनात सुरक्षिततेचा भाव उत्पन्न करणारी असते त्यामुळे आपण सकारात्मकतेने जगण्याचा विचार करु शकतो. जगात आपल्याला कुणीही सोडून गेले, आपला कुणीही विश्वासघात केला तरीही एका बाबतीत मात्र आपण ठाम असतो की माझी सावली मला कधीही सोडून जाणार नाही कारण माझ्या अस्तित्वावर जरी तिचे अस्तित्व अवलंबून असले तरी माझ्या अस्तित्वाशी कायमस्वरुपी साधर्म्य ठेवणारी तीच एक बाब आहे जी मला सोडून जाणार आणि म्हणून तो क्षण येऊच नये असे वाटत होते

२५ मे ला बरोबर १२ वाजून २० मिनीटानी मी महाविद्यालयाच्या प्रांगणात ४३ डीग्री रणरणत्या उन्हामधे उभा राहीलो. हळूहळू माझी सावली कमी कमी होऊ लागली. मी हात हलवत होतो डोके हलवत होतो माझी लावली त्या साऱ्याचे प्रतिबींब दाखवित होती. परंतू ते दर्शविणे कमी झाले. आणि मग तो क्षण आला, ज्यावेळी माझी सावली मला खरोखरीच सोडून निघून गेली. मी हात हलविण्याचा प्रयत्न करीत होतो परंतू काहीच दिसेना, मी बाजूला वाकून बघितले परंतू तरीही काहीच नाही, मी चालून बघितले तरीही एरवी माझ्या मागे मागे चालणारी ती सावली चालत नव्हती, मी एकटाच चालत होतो. पाय चालत होते परंतू आपल्या सोबत कुणीतरी नेहेमी असते हा भाव मात्र नसल्याने त्या चालण्यात उत्साह नव्हता. आपल्या कायम सोबत असणारे कुणीतरी दूर गेलेय, आपल्याला सोडून गेलेय ही गोष्ट मनाला दुःखी करत होती. त्याच विचारात असताना मी परत एकदा हात हलवून बघितला आणि काय आश्चर्य! परत माझी सावली माझ्यासोबत हजर. फार फार आनंद झाला. खूप खूप जवळचे असे काहीतरी परत सापडल्याचा जो अनुपम आनंद असतो तो मला झाला. उन असताना देखील मी काही वेळ आणखी मैदानातच उभा राहीलो कधी नव्हे तेवढ्या आनंदाने माझ्या त्या सावलीकडे मोठ्या कौतुकाने बघू लागलो. मलाच कळेना की कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या आणि संपुर्णपणे माझ्याच हालचालींवर अवलंबून असलेल्या माझ्याच सावलीचे मला एवढे कौतुक का वाटते आहे. आणि मग मला खरा उलगडा झाला. हा सारा प्रभाव होता त्या शून्य सावलीच्या अनोख्या घटनेचा.

सावलीचे महत्व कितीही असले तरी किंवा सावली ही आपल्या कितीही जवळ असली तरी तिचे सतत आपल्या सोबत रहाणे हे रोजच्या जीवनाचा भाग बनलेला असतो. जे रोजचेच आहे त्याचा आपण फार विचार करत नाही. त्याची आवश्यकता जरी असली तरी देखील त्याची दखल मात्र आपले मन सहसा घेत नाही. हे देखील तितकेच खरे असते की त्या सावलीला देखील आपण तिची दखल घ्यावी अशी तिळमात्र अपेक्षा नसते. परंतू याचा अर्थ आपण त्या सावलीचा विचारही करु नये असा होत नाही. कायम आपल्या सोबत असलेल्या, आपल्याशी प्रामाणिक असलेल्या, आपली कधीही साथ सोडणाऱ्या सावलीचे महत्व आपण आपल्या जगण्याच्या धुंदीत विसरुन जातो. त्याची आठवण करुन देण्यासाठी हा शून्य सावलीचा काळ फार महत्वाचा असतो. खरे तर शून्य सावलीचा काळ येऊच नये असे मला सुरुवातीला वाटत होते परंतू त्या काळातील माझ्या सावलीच्या मला सोडून गेल्यामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे मला माझ्या त्या सर्वात प्रामाणिक प्रतिबिंबाचे अपार महत्व पटले तो शून्य सावलीचा काळ उलटल्यावर लगेच तिची पुन्हा प्राप्त झालेली सोबत जास्त तिव्रतेने अनुभवता येऊ लागली.

अशी सावली सारखी खंबीरपणे पाठीशी असलेली काही माणसे आपल्या आयुष्यात असतात. त्यांचा सहवास हा इतका सहज आणि निर्हेतुक असतो की कधी कधी त्याची ती सहजता त्यांना गृहीत धरायला लावते. ती जवळची असतात म्हणून आपण त्यांना गृहित धरतो प्रसंगी त्यांचे महत्व देखील विसरुन जातो. परंतू आपण ते कदापी विसरायला नको कारण सावलीच्या बाबत शून्यकाळ हा फार थोडा वेळाचा असतो त्यानंतर ती सावली परत येते, माणसांच्या बाबत तसे होईल असे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला मनापासून सांभाळणाऱ्या स्नेहाच्या सावल्या जपायला हव्यात. होय ना?



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18