थोडा है थोडे की जरुरत है @ 07.05.19

अक्षय परंपरा

माझ्या एका डॉक्टर मैत्रीणीच्या दवाखान्यात एका बाळाचा जन्म झाला. गेल्या वीस वर्षांपासून अमरावती शहरात प्रसुतीगृह चालविणाऱ्या एका प्रतिथयश डॉक्टरच्या दवाखान्यात एका बाळाचा जन्म होणे ही अतिशय साधी नेहेमीचीच बाब ठरेल. परंतू आज मात्र ही नेहेमीची बाब नव्हती. या बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या जन्माबाबत एक अत्यंत अद्भूत गोष्ट समोर आली. फार अपवादात्मक स्थितीमधे असे घडू शकते अशी ती घटना होती. मला ती घटना माझ्या मैत्रीणीद्वारे कळल्यानंतर त्या घटनेबाबत तिचे अभिनंदन तर करावे वाटलेच परंतू त्यासोबत आणखी एक महत्वाचा विचार माझ्या मनात आला, तो म्हणजे विश्वासाच्या अक्षय परंपरेचा

कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असताना जेथे जेथे माणसांचा संबंध येतो अश्या कार्यांमधे इतर सर्व गोष्टींसोबतच कार्यसातत्य टिकवायचे असेल तर सर्वात श्रेष्ठ मापक म्हणजे विश्वास असते. माणूस कोणत्याही व्यक्तीशी किंवा संस्थेशी किंवा प्रतिष्ठानाशी जोडल्या जातो तो केवळ विश्वासाने. बाकी गोष्टी कालांतराने गौण ठरतात. सोय, सुविधा, पैसा या सर्व बाबी सुरुवातीला फार जास्त प्रमाणात विचारात घेतल्या जातात आणि ते स्वाभाविकच आहे. परंततू माणसाच्या स्वभावाची गंमतच अशी आहे की तो मशीनप्रमाणे विचार करुच शकत नाही. वारंवार एखाद्या व्यवस्थेशी जोडल्या गेल्यावर कालांतराने त्या व्यवस्थेबद्दल त्याच्या मनात विश्वास निर्माण होतो त्यानंतर विश्वासाची एक अक्षय परंपराच निर्माण होते. खरे तर या जगात माणूस माणसाशी जोडलेला दिसतो त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे विश्वास आणि माणूस माणसापासून दूर जात असेल त्याचेही कारण विश्वासच, परंतू कमी झालेला. अक्षय विश्वासाची परंपरा सिद्ध करणारा तो प्रसंग माझ्या डॉक्टर मैत्रीणीने मला सांगितला तो सांगताना तिच्या बोलण्यातील आनंद शब्दागणिक मला जाणवित होता. आपल्या कार्यावरील विश्वास जेव्हा कुणीतरी सार्थ ठरवितो तेव्हा जो दिव्यस्वरुप आनंद होतो तसाच काहीसा तो आनंद होता

त्या बाळाचा जन्म झाल्यावर त्याला त्याच्या आईच्या बाजुला जेव्हा ठेवण्यात आले तेव्हा त्या मुलाचा बाबा देखील हजर होता त्या दोघांनी ती अप्रतिम गोष्ट माझ्या मैत्रीणीला सांगितली. गहिवरल्या स्वरात त्या छोट्याश्या नुकत्याच जन्म झालेल्या मुलाचा बाबा म्हणाला, डॉक्टर मनापासून धन्यवाद! आपल्यामुळे हा आनंद आमच्या आयुष्यात आला. परंतू आपण होतात म्हणून आम्ही निश्चिंत होतो. आम्ही कशाचाही विचार करता आपल्या दवाखान्यात आपल्या सुपुर्द व्हायचे ठरविले होते. आपण असाल तर सारे काही ठिकच होणार याची खात्री आम्हा दोघांपेक्षा इतर कुणीही देऊ शकत नाही कारण आपल्या लक्षातही नसेल परंतू आम्हा दोघांचेही जन्म आपल्याच दवाखान्यात झालेले आहेत आपल्याच निष्णात हातांनी आम्हाला हे जग बघायला मिळाले आहे. हे वाक्य ऐकताच माझ्या मैत्रीणीच्या आनंदाला पार उरला नाही. अतिशय प्रोफेशनल रहावे लागत असूनही तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळलाच. तो होता सार्थ समाधानाचा. आपल्या कामावर लोकांचा विश्वास आहे हे समजल्यानंतर वाटणाऱ्या कृतार्थतेचा. कामातील सचोटीमुळे पिढ्यान पिढ्या निर्माण होणाऱ्या विश्वासाची ती अक्षय परंपरा होती. अशी परंपरा निर्माण व्हायला कष्ट लागतात, कामामधे समर्पण लागते, सर्वात महत्वाचे म्हणजे कमालीचा खरेपणा लागतो. फसवाफसवी, लबाडी या आधारावर विश्वासाची अक्षय परंपरा निर्माण होऊच शकत नाही. माझ्या डॉक्टर मैत्रीणीला तिच्या कामामुळे भरपूर भौतिक सुख सुविधा प्राप्त झाल्या आहेत कारण सचोटीने कार्य करताना त्या स्वाभाविकपणे मिळतच असतात परंतू आपल्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव व्हावा असा तो क्षण तिला अनुभवायला मिळाला कारण विश्वासाची एक अक्षय परंपरा तिला निर्माण करता आली जी तिच्या निष्णात हातांनी जन्माला आलेल्या दोन पिढ्यांच्या रुपाने तिला अनुभवायला मिळाली.

अमरावती शहरातील सर्वात जुन्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी सभेमधे मला बोलण्याची विनंती करण्यात आली. महाविद्यालयाचे इतर माजी विद्यार्थी जसे बोलले तसेच काहीसे मी पण बोललो. परंतू सभा संपल्यावर तेथील सर्वच प्राध्यापक बंधू भगिनींनी माझे विशेष अभिनंदन केले ते यासाठी की मी मनाला भिडेल असे काहीतरी बोललो असे त्या सर्वांचे म्हणणे होते. माझ्या बोलण्याचा मीच जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आले की मी त्या संस्थेबद्दलच्या विश्वासाच्या अक्षय परंपरेचाच उल्लेख केला होता. म्हणूनच माझे बोलणे त्या सर्वांना भावले होते कारण आपल्या संस्थेवरील विश्वास जेव्हा व्यक्त होतो तेव्हा त्या संस्थेशी संबंधित असलेल्या प्रत्येकालाच ती गोष्ट भावलेली असते. तेथे उपस्थित बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मोठ्या इमारतीबाबत, नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सुख सोयींबाबत, तेथील गतस्मृतींबाबत आपले मत मांडले जे खरे होते. परंतू माझे बोलणे सर्वात जास्त भावले याला मी कारणीभूत नव्हतो तर माझ्या बोलण्यात व्यक्त झालेला तो वर्षानु वर्षे टिकून राहीलेला विश्वास होता

मी माझ्या बोलण्यात असे म्हणलो की, या संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी बाकी सर्व गोष्टींसोबत एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीबाबत अभिमान वाटतो तो म्हणजे या संस्थेमधे चांगले शिक्षण दिले जाते हा अनेक वर्षांपासून टिकून राहीलेला जनमानसातील विश्वास होय हा विश्वास माझ्या स्वतःच्या  उदाहरणावरुन सिद्ध होतो आहे. माझे आजोबा स्वातंत्र्यपूर्व काळात या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. स्वातंत्र्योत्तर काळात माझ्या वडीलांनी याच महाविद्यालयात शिक्षण घेतले. मागील शतकातील नव्वदीच्या दशकात मी स्वतः या महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो आणि आता माझी मुलगी नव्या शतकात याच महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. या महाविद्यालयाच्या शिक्षण प्रक्रीयेवरील विश्वासाची अक्षय परंपरा सिद्ध करायला माझे हे उदाहरण पुरे आहे कारण आमच्या परीवारातील चार पिढ्या याच ठिकाणी प्रशिक्षित झाल्या. विश्वासाची परंपरा हे शब्द सर्वांच्या मनाला भावले कारण कोणत्याही कार्याची ती खरी पावती असते.

सामाजिक स्थिती कोणतीही असो किंवा आपण कितीही आधुनिकता स्विकारलेली असो, विश्वासाच्या या संकल्पनेला तोड नाही याच्याच आधारावर सारे व्यवहार कायम सुरु राहतील असा आपल्यापैकी अनेकांचा अजूनही समज आहे. कोणत्याही व्यवहारात विश्वास हाच सर्वात महत्वाचा आधार आहे. परंतू बदलत्या काळात हा दृढविश्वास काही प्रमाणात जरा डळमळायला लागलाय असे वाटू लागलेय. हे जाणवायला लागलेय कारण काही वाक्ये कानावर पडत आहेत जसे, बायपास सर्जरी करीता या दवाखान्यापेक्षा त्या दवाखान्याचे पॅकेज कमी आहे, या आणि त्या महाविद्यालयात फॅसीलीटीज जवळपास सारख्याच आहेत परंतू येथे फी कमी आहे आणि महाविद्यालय कोणतेही असले तरी शेवटी अभ्यास तर कोचींग क्लासमधेच होणार आहे, किंवा हीच वस्तू या ऑनलाईन वेबसाईट पेक्षा त्या ऑनलाईन वेबसाईटवर जास्त स्वस्त आहे. त्यावर डिस्काऊंट जास्त दिलेला आहे. या असल्या वाक्यांनी अक्षय विश्वासाची परंपरा जराशी विस्कळीत होते आहे. तंत्रज्ञानाचा प्रचंड प्रमाणात वाढलेला वापर विश्वासाच्या या परंपरेला हादरवेल की काय असे वाटू लागले आहे. अश्या परीस्थितीत आपल्याला याबाबत सजग राहून मुलभूत विश्वासाला सांभाळायला हवे. पॅकेज आणि डिस्काऊंटच्या चकचकीत जगात अस्सल बावनकशी विश्वासाची महती आपल्या दैनंदिन वागणूकीतून सिद्ध करायला हवी. नवी पिढी बरेच वेळा आपल्याकडे बघून शिकत असते. त्यांच्या दृक श्राव्य संवेदना जास्त तीव्र आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर आपणही कधी कधी विश्वासाची परंपरा मोडताना त्यांना दिसतो तेव्हा ते त्याचे अनुकरण करतात. समाजाच्या बदलत्या प्रक्रीया तर आपल्याला थांबविता येणार नाहीत परंतू विश्वास मात्र टिकविता येऊ शकेल. ते आपल्याला निश्चित करता येईल.


Comments

  1. नक्कीच.सुंदर, लेख वाचुन छान वाटले. सर आपले लेख नेहमीच प्रेरणादायी असतात तसेच काल्पनिकतेवर आधारित नसुन
    वास्तव परिस्थितीची जाणीव करुन देणारे असतात.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18