थोडा है थोडे की जरुरत है@14.04.19
बहुत याद आते हो तुम
सायंकाळची वेळ. ऑफीसमधून घरी यायला खूप उशीर झाला होता. आज खूप काम झाले होते. ताण निर्माण करणारे काम असल्याने जास्तच थकवा जाणवत होता. नेमके आज घरी कुणीच नव्हते. माझी मर्सीडीज कार पार्क करुन घरात आलो. पत्नी आणि मुलगा बाहेर गेले होते. स्वतःच्या मेहनतीने व पैश्याने बांधलेल्या माझ्या मोठ्या घरात मी एकटा बसलो होतो. ब्लेझर बाजूला काढून ठेवले, टॉयची नॉट सैल केली, फ्रीजमधून पाण्याची थंड बाटली घेऊन मी स्वतः दिल्लीला जाऊन खरेदी करुन आणलेल्या आलीशान सोफ्यावर आरामात बसलो. रीलॅक्स होण्यासाठी, मागच्या वर्षी अमेरीकेला गेलो असता तेथून खास आणलेल्या बोसच्या चार लाख रुपयांच्या म्युझीक सिस्टीमवर गाणे लावले. डोके मागे रेलून डोळे मिटून गाणे ऐकू लागलो. जसविंदरसिंग या गोड गळ्याच्या गायकाची सीडी मला माझ्या एका मित्राने दिली होती. तीच ऐकू लागलो. जसविंदर गाऊ लागला..
बहुत याद आते हो तुम,
हर रोज दिलकी कोई रग छेड जाते हो तुम
कैसे बढे फासले, मुझको पता ना चला
करना मुझे माफ मै, जाने कहाँ पे था गुम
अचानक मला माझ्याच जोरजोरात बोलण्याचा आवाज येऊ लागला. दोन वयस्कर लोकांसमोर उभा राहून मी तावातावात बोलत होतो. आता बस झाले. तुमचे वागणे दिवसेंदिवस विचित्र होऊ लागले आहे. किती सहन करायचे आम्ही? आता तुमचे वय झाले आहे याची तरी जाणीव ठेवा. मी आता माझ्या भविष्याकरीता पैसा कमावू की तुमच्या या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊ? तुमचा काळ संपला. इतके मोठे घर बांधले मी, तुमच्यासाठी सगळ्या सोई केल्या, कधी राहीलो होतो का आपण स्वतंत्र खोलीत? त्या चाळीतल्या तुमच्या दोन खोल्यांच्या घरामधे कोंबून कोंबून जन्म गेला. आता चांगले निवांत रहायला घर झालेय परंतू तुम्हाला त्यात सुख नाही. तुमच्या या असल्या विचित्रपणाचा फार त्रास होतो आहे. ७९ वर्षांचे माझे बाबा आणि ७५ वर्षांची माझी आई यांना मी हे ऐकवत होतो. माझे ऐकल्यावर त्यांचे बोलणे सुरु झाले. तूला पैश्याचा माज आला आहे. आम्ही त्या दोन खोल्यांमधे राहूनच तुला वाढविले आहे. आम्ही का बदलायचे? इतक्या वर्षांच्या आमच्या सवयी तुझी बायको म्हणते म्हणून का बदलायच्या? तू बायकोच्या ताटाखालचे मांजर झालाय त्यामुळे तुला आई बापाची किंमत नाही. तू आम्हाला तुझ्या घरात ठेवलेस म्हणजे आमच्यावर उपकार करतो आहेस का? असे असेल तर आम्हाला आमच्या चाळीतल्या घरात सोडून दे. तुझा हा बंगला तुला लखलाभ. शब्दाला शब्द वाढत गेला. कुणाचे बरोबर किंवा कुणाचे चुक यापेक्षाही कुणाचा इगो मोठा याबाबत स्पर्धा सुरु झाली. जगातील सर्वात जवळच्या नात्यामधे दुरावा निर्माण झाला. तो कसा झाला, काय चुकले काहीच कळले नाही आणि एके दिवशी त्या दोघांना माझ्या गाडीने मी चाळीतल्या घरात सोडून आलो. निघताना वळून देखील बघितले नाही. आता घरात एकटा असताना, अचानक आई बाबांची आठवण आली. काय करीत असतील ते आता? जसविंदर पुढे गाऊ लागला.
दबे पाव आके मुझे, जगाती है यादे तेरी
बचपन की बाते सभी, फिरसे सुनाते हो तुम
आई सांगायची, मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा फारच व्रात्य होतो. फार जास्त उद्धटपणे बोलायचो विशेषतः बाबांशी. याचे कारण ते मला सारखे बोलायचे. त्यांच्या दृष्टीने माझे काहीना काही कायम चुकतच रहायचे. माझ्या काही सवयी होत्या जरा विचित्र. पण त्या वयातल्या सर्वच मुलांच्या त्या असतात. रात्री उशीरापर्यंत जागणे सकाळी नऊ वाजेपर्यंत झोपले राहणे. टवाळ्या करणे. काहीही बाहेरचे खाणे अश्या सर्व गोष्टी होत्या ज्या बाबांना पटायच्या नाही. या सर्वच बाबतीत ते मला टोकत रहायचे. त्यामुळे मी फार भांडायचो. त्यावेळी आई माझी बाजू घ्यायची. परंतू माझी परीक्षा असली की माझ्यासाठी नवे पेन मात्र बाबाच आणायचे. अगदी आठवणीने. माझ्या परीक्षेच्या काळात माझ्या चांगल्या यशासाठी ते गणपतीच्या मंदिरात अभिषेक करवून घ्यायचे. दसऱ्याला माझ्याकरीता नवा ड्रेस ते स्वतःच्या पसंतीचा आणायचे पण मला तो आवडायचा नाही अजीबात. ते मला सारखे सांगायचे, आपले स्वतःचे घर आहे ही किती जमेची बाजू आहे. दोन खोल्या का होईना पण आपण स्वतः च्या घरात राहतो. येथे पाणी मुबलक आहे आणि घरापर्यंत नळ आहे. इतर ठिकाणी दूरुन दूरुन पाणी आणावे लागते. तुला त्याची किंमत नाही. तू आपला तासभर आंघोळ करीत बसतो. मी देखील त्यांना म्हणायचो की मला तुम्ही माझ्या सवयी बदलायला नका सांगू. तुम्ही जगा तुम्हाला हवे तसे. असे आमच्यात वाद होत रहायचे. त्यांचे चुकत होतेच पण माझेही चुकत होते. परंतू बाबांनी मला घरातून बाहेर नाही काढले. मी मात्र त्यांना स्वतः सोडून आलो. असे कसे केले मी? माझ्या मोठ्या घरात माझ्या आई बाबांकरीता मी स्थान ठेवले नाही. त्यांचे चुकत असले तरी, त्यामुळे वाद होत असले तरी संवादामधून हे सोडविता आले नसते का मला? मी तसा प्रयत्न केलाच नाही. मी माझ्यातच दंग होतो. माझ्या आई बाबांशी जसे मी भांडत होतो तसा मलाच संवादही करता आला असता. परंतू मी तसे केले नाही कारण मी एक महत्वाची गोष्ट विसरुन गेलो, जी आता जसविंदर गात होता.
कैसे गया भुल मे, कुदरत का है ये नियम
पहुचंगा मै भी वहाँ, हो जिस जगह आज तुम
आज ज्या थाटात मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केलेल्या घरातून माझ्या वृद्ध आई बाबांना बाहेर काढले, त्यांच्याशी संपर्क देखील ठेवत नाही आणि त्यांना त्यांच्या घरात सोडून एकटेपणाच्या स्थितीत नेऊन ठेवले, तीच अवस्था माझी देखील होणार आहेच. वयाच्या ज्या अवस्थेमधे ते सध्या आहेत त्या अवस्थेत मी देखील पोहोचणार आहे हे साधे परंतू त्रिकालाबाधित सत्य मी विसरुन गेलो. असे कसे झाले? जसविंदरचे गाणे संपत होते. पुन्हा तीच ओळ तो गात होता,
बहुत याद आते हो तुम,
हर रोज दिल की कोई रग छेड जाते हो तुम
गाणे संपले आणि तुला फोन लावला. काय करु सांग? मला काही कळत नाहीये पण काहीतरी मोठी चूक मी करुन बसलोय असे फिलींग येतेय. हे सारे तुझ्याजवळच बोलता येते म्हणून सारे सांगितले. आता तू सांग, काय करु?
मी माझ्या मित्राला म्हणालो, तुझी बायको आणि मुलगा घरी आले की त्यांना सोबत घेऊन आजच थेट चाळीतल्या तुझ्या घरी जायचे. आई बाबांना शांतपणे बसवून त्यांचे हात हातात धरुन ही चार वाक्ये बोलायची. आई बाबा, माझे चुकले कारण मी पूर्णपणे तुमची बाजू समजून घेऊ शकलो नाही. माझी पण एक बाजू होती ती तुम्ही समजू शकला नाहीत पण मी ती समजावू शकलो नाही हे देखील तितकेच खरे. आपण आपल्यातील वाद विसरुन पुन्हा एकदा सोबत राहुयात कारण आम्हाला तुमची गरज आहे. चला ना आपल्या घरी, आपले घर तुमची वाट बघते आहे. ही चार वाक्ये मनातला इगो बाजूला ठेवून म्हण. बघ कसा चमत्कार होतो ते!
ही चार वाक्ये पिढ्यांमधील कितीही मोठी अंतरे कमी करतात. ही वाक्ये सर्वच पिढ्यांनी म्हणायला हवी. कुण्या एका पिढीनेच ती म्हणावी असेही नाही. हे सर्वांनाच कळते केवळ आधी कुणी म्हणायची या पेचात सारे अडकलेले असतात. हा पेच सुटायला हवा. आपणच सोडवूयात, होय ना?
चिंतनीय!
ReplyDeleteKhup Chan
ReplyDeleteसुरेख
ReplyDelete