थोडा है थोडे की जरुरत है @21.05.19
हास्यक्षण निर्मीती
नाटकाच्या प्रयोगाला आधीच तिकीट काढले असल्याने आम्ही जरा आरामात पोहोचलो. आजकाल ऑनलाईन व्यवहार होत असल्याने ही सोय चांगली झाली आहे. आपल्याला केवळ बुकींग नाही तर प्रेक्षागृहातील आसन देखील निवडून ठेवता येते. प्रेक्षागृहावर प्रचंड गर्दी होती. आयोजकांच्या मागे अनेकांचा तगादा सुरु होता. परंतू हतबल होऊन ते एकही आसन शिल्लक नाही असे सांगत होते. एकंदरीत शो हाऊसफुल होता. अर्थात या नाटकासंदर्भात प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद राहील हा अंदाज होताच. कारण हे नाटक होते एका अत्यंत प्रफुल्लीत, हरहुन्नरी आणि खळखळून हसायला लावणाऱ्या नटाचे. त्याचे नाव प्रशांत दामले.
प्रशांद दामले यांनी अभिनय केलेल्या अनेक नाटकांपैकी एक अत्यंत उल्लेखनीय नाटक म्हणजे एका लग्नाची गोष्ट. साधारण वीस वर्षांपूर्वी प्रशांत दामले व कविता लाड या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला या नाटकातील त्यांच्या मन्या-मनी या भुमिकांमुळे वेड लावले होते. सर्वसामान्य कुटुंबामधे तुमच्या माझ्या घरी घडावी अशी एक छानशी गोष्ट खुसखुशीत आणि निर्भेळ विनोदाच्या माध्यमातून त्या नाटकात सादर करण्यात आली होती. हे नाटक प्रेक्षकांनी अनेक वर्षे अक्षरशः डोक्यावर घेतले. नंतर त्या नाटकाचे प्रयोग बंद झाले. आता वीस वर्षांनंतर परत एकदा प्रशांत दामले व कविता लाड म्हणजे आता कविता मेढेकर या दोघांनी एकत्रीत येऊन त्यांच्या त्या नाटकाचा पुढचा भाग म्हणजे एका लग्नाची पुढची गोष्ट सादर केला आहे आणि त्या नाटकाप्रमाणेच हे देखील नाटक लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतले आहे. मन्या आणि मनी यांच्या संसाराला वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या नव्या समस्या आणि त्या समस्यांवर त्यांनी केलेली मात अशी संहिता या नव्या नाटकाची आहे. यावेळी देखील नाटकाचे संपुर्ण सादरीकरण अगदी पहिल्या नाटकाप्रमाणेच छोट्या छोट्या खुसखुशीत विनोदावर आधारीत आहे. नव्या काळानुसार पद्धत वेगळी असली तरी जबरदस्त टायमींगच्या आधारे प्रशांत दामले आणि नाटकातील सर्वच कलावंत प्रेक्षागृहात हास्य फुलवत ठेवतात. प्रेक्षक मस्त हसत राहतात, प्रसंगी टाळ्या वाजवतात आणि नाटक संपल्यावर फ्रेश झालो यार असे म्हणत प्रेक्षागृहातून बाहेर पडताना दिसतात. संपुर्ण नाटकाचा मनापासून आनंद घेताना माझ्या मनात मात्र एक विचार सारखा रेंगाळत होता. खरे तर तो विचार मला नाटक सुरु होण्यापूर्वीच त्या ठिकाणी झालेल्या गर्दी बघितल्यावरच माझ्या मनात आला होता. परंतू नाटक संपता संपता तो पक्का झाला.
एक साधी गोष्ट ज्यात फार रहस्य नाही, ज्यात फार काही विद्रोही किंवा चमत्कारीक विषय मांडलेला नाही, ज्यात फार मोठे नेपथ्य नाही किंवा तंत्रज्ञानाचा वापर नाही, ज्यातील पात्र लार्जर दॅन लाईफ देखील नाहीत. याऊलट या नाटकात सर्वसामान्य घरांमधे घडणारीच गोष्ट आहे, साधेच नेपथ्य आहे, आपल्याच घरांमधल्या कुरबुरी आहेत, त्यावर आपणच शोधलेले मार्ग आहेत, अगदी त्या आणि या अश्या दोन्हीही नाटकांमधून प्रसिद्ध झालेले गाणे,
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते, घरबसल्या मिळतं
हे देखील सामान्य माणसाच्या सुखाच्या माफक कल्पना आणि त्या आपल्या घरातच मिळविता येण्याच्या युक्त्याच व्यक्त करते. असे असले तरी ही दोन्हीही नाटके म्हणजे वीस वर्षांनंतर देखील त्याच पद्धतीच्या संहितेवर आधारीत असूनदेखील लोकांना प्रचंड आवडतात याचे कारण काहीतरी वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण आहे याची मला जाणीव झाली. त्या दृष्टीने विचार केल्यावर माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे या नाटकांनी आपल्याला दिलेली खळखळून हसण्याची संधी आणि अशी संधी आपल्या आयुष्यात सहजपणे मिळविता येते ही फार मोठी आशा.
सध्याच्या धावपळीच्या जगात आपण वेगवेगळ्या कामात व्यग्र असताना निखळपणे हसण्याकरीता बरेचवेळा वेळ मिळत नाही. हसायचे नसते असे नाही परंतू जीवनात व त्याच्या प्रक्रीयेमधे क्लिष्टता वाढल्याने तशा संधी शोधण्याची आपल्यातच असलेली क्षमता कमी झाली आहे. सामाजिक दृष्टीने झालेले बदल देखील या करीता कारणीभूत आहेतच. परंतू त्याही परिस्थीतीमधे हसण्याच्या संधी शोधण्याच्या क्षमता गमावणे ही एक मोठी हानी सामाजिक दृष्टीने होतेय. यामधूनच निर्माण होणाऱ्या अनेक समस्या जसे, तरुणपणीच अनेक लोकांना येणारे वैफल्य, अनेकांना घरांमधेच वाटू लागलेला एकटेपणा, पिढ्यांमधील संपत चाललेला संवाद याचे प्रमाण वाढते आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर सर्वच वयोगटातील लोकांना समुपदेशनाची वाटणारी मोठी गरज हे या बदलाचे द्योतक आहे. खरे तर आजपासून वीस पंचेवीस वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आपल्या घरांमधे वादविवाद किंवा ताण तणाव नव्हते असे नाही. ते तर कायमच होते. वेगवेगळ्या स्वभावांचे लोक एकत्र राहणार म्हणजे मतभेद हे स्वाभाविकपणे रहाणारच. परंतू त्यावेळी आपल्या कौटुंबिक व्यवस्थांमधे एकत्रीत राहून हसण्याचे प्रसंग व संधी सहजच उपलब्ध होत असल्याने ताण नियोजनाचे तंत्र वेगळे निर्माण करावे लागत नव्हते. हास्य निर्मीती सहजच होत होती व त्यामुळे समस्यांचे प्रमाण फार कमी होते. आता दुर्दैवाने ती एकत्र कुटंब पद्धती कधी बदलत्या मानसिकतेमुळे किंवा कधी परीस्थितीमुळे अस्तित्वात राहू शकत नाही. ही वास्तविकता स्विकारायला हवी. ती स्विकारुन प्राप्त परिस्थीमधे आपल्या रोजच्या जीवनात मनमुराद हसण्याच्या, आनंदाच्या वेगवेगळ्या संधी शोधण्याची आवश्यकता प्रत्येकालाच कळलेली असते. परंतू या संधी कश्या शोधायच्या हे नेमके ठाऊक नसल्याने त्याकरीता हे प्रशांत दामलेचे नाटक मदत करते.
प्रशांत दामलेच्या देखील इतक्या वर्षांच्या यशाचे रहस्य कदाचित तेच असावे. कारण त्यांच्या अभिनयाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे टायमींगच्या आधारे निर्माण होणारा विनोद. रोजचे जीवन जगताना फार विशेष काहीच होऊ शकणार नाही ही जाणीव असल्याने जे छोटे छोटे प्रसंग असतात त्या प्रसंगांमधेच खुसखुशीतपणा ओतून त्यांना विनोदी बनविण्याची हातोटी प्रशांत दामले सादर करीत असल्यानेच त्याची एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळख आहे. या यशस्वीतेसोबत एक आणखी महत्वाची बाजू म्हणजे या विनोदाच्या व हास्य निर्माण करण्याच्या कौशल्यामुळे त्यांना लार्जर दॅन लाईफ भुमिका सादर कराव्या लागत नाहीत तर रीअल टू लाईफ भुमिका सादर करुनही त्यांनी हे प्रचंड यश मिळविलेले आहे हे एक मोठे वैशिष्ट्य आहे. वीस वर्षांपूर्वीची आनंद निर्माण करणारी कथा वीस वर्षांनंतर सामाजिक परीस्थिती पूर्णपणे बदलल्यानंतरदेखील तशीच्या तशी लागू पडते व लोकांना मोहवून टाकते ही फारच विलक्षण बाब आहे असे मला वाटते. खरे तर आपल्या आजूबाजूचे जग इतके झपाट्याने बदलत असताना कोणतीच कायम राहू शकेल याबद्दल शंका वाटते. या बदलांचे परीणाम अजाणतेपणी आपल्याही मनावर इतक्या खोलवर असतात की माणसामाणसांच्या नात्यांबद्दलही सहजच शंका उत्पन्न होतात. मनात शंका घेऊनच जगणारेही अनेक मंडळी आपल्याला दिसत असतात. अश्या सर्व काळात काहीतरी अजूनही तसेच सुंदर, तसेच मोहक आणि तसेच मनाला वेड लावणारे आहे असे ठळकपणे आपल्याला जाणवून देणारे हे नाटक आणि त्यामधील महत्वाची भुमिका वीस वर्षांनंतरही सादर करणारे प्रशांत दामले व कविता मेढेकर हे ग्रेटच.
नाटक चांगले की बरे याबाबत जरा मते वेगवेगळी असू शकतात परंतू त्यामधे सादर करण्यात आलेली रोजच्या जीवनातील क्षणोक्षणी आनंद निर्माण करण्याची वृत्ती ही खरोखरीच शाश्वत आहे. ती कधीही बदलणार नाही. ती तर ताणविरहीत जीवन कसे जगायचे या प्रश्नाचे सर्वात मोठे उत्तर आहे.
मस्त लिहिलंस अवि
ReplyDeleteछान लिहिलंय सर.
ReplyDeleteछान आहे
ReplyDeleteआवडले!
ReplyDelete