थोडा है थोडे की जरुरत है @ 23.04.19
ब्रॅन्डेड बुट
ऑफीसमधे दिवाळीच्या दरम्यान वेगवेगळ्या दुकानांमधे मिळणाऱ्या डिस्काऊंट संबंधी चर्चा रंगली होती. लंच लवकर आटोपल्यामुळे सर्वांना जरा गप्पा मारण्याची संधी मिळाली होती. या सर्व गप्पांमधे आनंद मात्र नव्हता. तो आपल्या डेस्कवर बसून काम करीत होता. हे कुणाच्यातरी लक्षात आल्यावर त्याला त्याने हाक मारली, अहो आनंदजी या जरा इकडे, इतके जास्त काम केल्यामुळे आपला बॉस पगार वाढविणार नाही. तेवढ्यात दुसरे कुणीतरी ओरडले, या हो आनंदराव, जरा मौलिक ज्ञान मिळतंय ते घ्या. त्यापाठोपाठ सर्वांनीच हाका मारल्यामुळे आनंदला आपले काम बाजूला ठेवून त्या समुहाच्या गप्पांमधे सामील व्हावेच लागले. पुन्हा त्याच गप्पा सुरु झाल्या. या दुकानात सध्या चांगल्या वस्तुंचा स्टॉक चांगलाय, त्या दुकानात एवढ्या रुपयांच्या खरेदीवर हे फ्री मिळणार आहे वगैरे चर्चा रंगल्या. आनंदला मात्र यात रस नव्हता कारण त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या महिन्याच्या पगाराची विल्हेवाट येत होती. मंडळींच्या चर्चा रंगल्या आणि आनंद मात्र अलगद त्याच्या गेल्या वीस वर्षांच्या आयुष्याच्या आलेखात शिरला.
महानगरपालीकेत लिपीक म्हणून लागलेला आनंद अचानक पंचेवीस हजार रुपये पगार मिळायला लागल्यामुळे फार खुश झाला होता. त्यानंतर त्याचे आयुष्य सुरळीत सुरु झाले. लग्न झाले, मुलगा झाला. घरी आई वडील सोबत होते. परंतू साधारण पाच वर्षांनंतर कालचक्र फिरले आणि आनंदच्या आयुष्यात कठीण काळ सुरु झाला. वडीलांना अर्धांगवायू झाला व ते अंथरुणाला खिळले. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासाळू लागली व त्याकरीता दवाखान्याचा मोठा खर्च सुरु झाला. त्यातच आनंदच्या लहान भावाच्या व्यवसायामधे घोटाळा झाला आणि त्याच्यावर साधारण वीस लाखावर कर्ज झाले. त्याचा परीणाम म्हणजे त्याचा लहान भाऊ व्यसनाधीन झाला त्याचे सारे कर्जदार त्याच्या भावाच्या मागे लागले. भावाच्या मागचा ससेमीरा आनंदला बघवेना. लोक पैसे वसूल करायला घरी यायला लागले व त्यांच्या घाणेरड्या शिव्या ऐकाव्या लागायच्या. शेवटी आनंदला यासाठी पुढाकार घ्यावा लागला. कार्यालयाकडून कसेतरी करुन त्याने मोठे कर्ज घेतले व सारी रक्कम फेडली. कर्जाचा मोठा हफ्ता त्याला पुढील पंचेवीस वर्षे पगारातून फेडायचा होता. भावाने काहीही करणे बंद केले व तो घरीच बसायला लागला. पुढे त्यालाही काही आजार झाले व त्याचाही खर्च आनंदलाच करावा लागायचा. संपुर्ण परीवाराचा खर्च एकट्या आनंदलाच करावा लागायचा. त्याची पत्नी फार शिकलेली नसल्याने मोठी नोकरी करु शकत नव्हती. परंतू ती लोणची, पापड वगैरे करुन जमेल तशी मदत त्याला करायची. मुलगा मोठा झाल्याने त्याच्या शिक्षणाचा खर्च देखील वाढू लागला होता. या सर्व प्रकारांमुळे आनंदला व त्याच्या पत्नीला इच्छा असूनही दुसऱ्या अपत्याला जन्म न देण्याचा कटू निर्णय घ्यावा लागला. फार दुःख झाले होते आनंदला त्या दिवशी. दोघेही पती पत्नी एकमेकाला आधार देत होते परंतू स्थिती दोघांचीही सारखीच होती. एकमेकांच्या डोळ्यातील अश्रु एकमेकांना दिसणार नाहीत याची पुरेपुर काळजी ते दोघेही घेत होते. स्वतःच्या सर्व स्वप्नांना गुंडाळून ठेवून त्याने व त्याच्या पत्नीने जगण्याची सवय करुन घेतली. त्यामुळे मोठमोठ्या दुकानांमधे मिळणारे डीस्काऊंट त्यांना कधीच दिसत नव्हते, मोठमोठ्या खरेदी आपल्याकरीता नाहीच हे त्यांनी ठरवून टाकले होते. म्हणूनच कार्यालयात सुरु असलेल्या चर्चेमधे आनंदला रस वाटत नव्हता. अचानक कुणीतरी एका बुटांच्या एका ब्रॅन्डेड कंपनीच्या महासेलबद्दल बोलत होते व आनंद आपल्या भूतकाळातून वर्तमानात आला. त्याचा मित्र त्याला सांगत होता, अरे आनंद तुला नवा बुट घ्यायचा होता ना? बघ आता संधी आहे. तुला ५० टक्के डिस्काऊंटवर ब्रॅन्डेड कंपनीचा बुट मिळू शकतो. आनंदला खरोखरीच एक चांगला बुट घ्यायचा होता, अनेक दिवसांपासून. त्याचा जुना बुट आता पार फाटून गेला होता. काही ना काही कारणांमुळे नवा बुट घेणे मागेच पडायचे. परंतू आता पंधराशे रुपयांमधे हा तीन हजाराचा बुट मिळणार होता, त्यामुळे घ्यावा का असा विचार त्याच्या मनात आला. त्याच विचारात आनंद घरी आला. रात्री जेवणे झाल्यावर नेहेमीप्रमाणे पत्नीसोबत एक फेरी मारायला तो निघाला. त्या दिवशी तो काहीच बोलत नाही हे बघून त्याच्या पत्नीने ओळखले की काहीतरी गडबड आहे. तिने बरेच वेळा विचारल्यावर त्याने तिला त्या डिस्काऊंटमधे मिळणाऱ्या बुटाबद्दल सांगितले. खरे तर त्यांना इतका मोजून मापून घरखर्च चालवावा लागायचा की त्यांच्यासाठी ती चैनच होती. परंतू कधी नव्हे ते आपल्या नवऱ्याला काही चांगले खरेदी करण्याची इच्छा झालीय म्हणून तिने त्याला तो बुट घेऊनच टाका असे सांगितले. त्या घराकरीता तो किती खस्ता घेतो व स्वतःच्या आवडी निवडी देखील त्याने पूर्णपणे गुंडाळून ठेवल्यात हे तिला चांगलेच ठाऊक होते. आठवड्यातून एकदा त्याला कधीतरी पान खायची हुक्की यायची परंतू त्याने ते देखील बंद केले हे ती जाणून होती. ती म्हणाली, मागच्या महिन्यात विजेचे बील जरा कमी आले व त्यामुळे काही पैसे उरलेत. त्यात माझ्या जवळचे काही टाकुयात आणि तुम्ही उद्या तो पंधराशे रुपयांचा ब्रॅन्डेड बुट घ्याच. त्याने पण ठरविले, यावेळी हिंमत करुन घेऊयात.
दुसऱ्या दिवशी ऑफीसात जाताना आनंदच्या बायकोने त्याला पंधराशे रुपये दिले. संध्याकाळी नवे बुट घालूनच घरी या आणि हे जुने तेथेच सोडून या. किती खराब झालेत ते आणि समोरुन फाटले देखील आहेत. त्या दिवशी ऑफीसमधे आनंद आनंदातच होता. लंचमधे मुद्दाम त्या मित्राकडून बुटांवर डिसकाऊंट देणाऱ्या दुकानाचा पत्ता त्याने लिहून घेतला. आनंद सहस्त्रबुद्धे खरेदी करण्यासाठी दुकानाचा पत्ता मागताहेत हा एक आश्चर्याचा आणि त्यानंतर आनंदला चिडविण्याचा प्रसंग ठरला. आनंदने देखील ते चिडविणे एन्जॉय केले. सायंकाळी उत्साहातच तो त्या दुकानापाशी गेला. एकदम दुकानात शिरण्याची हिंमत झाली नाही परंतू बाहेर शोकेस मधे लावलेले बुट त्याने न्याहाळले. सहजच त्याला वाटून गेले की बऱ्याच दिवसांनी बुट घेतोय, तो देखील ब्रॅन्डेड तर मग बायको सोबत हवी. सेल सुरु आहे सोबत तिला पण एखादी चप्पल घेऊन देऊयात. त्याने ठरविले की घरी जायचे आणि बायकोला सोबत घेऊनच बुटाची खरेदी करायची. घरी आल्यावर बायकोला पटापट तयार व्हायला त्याने सांगितले. तिला देखील बरे वाटले. ती तयार झाली. दोघेही बाहेर जाण्यास निघाले. आनंदने पैसे नीट वरच्या खिशात सुरक्षित ठेवले होते. पाचशे रुपये त्याने देखील त्याच्या जवळचे सोबत घेतले होते कारण बुटांसोबत बायकोकरीता देखील चप्पल घेण्याचा त्याचा विचार होता. ती दोघे बाहेर पडणार तेवढ्यात त्यांचा दहाव्या वर्गातील मुलगा शिकवणीवरुन घरी आला. बाबा, मी दोन मिनीटात फ्रेश होऊन येतो, मला तुमच्याशी एक काम आहे. तुम्ही जरासे नंतर जाल का बाहेर? अत्यंत लाडाचे पोर होते ते त्यामुळे त्याचे मायबाप जरावेळ थांबले. फ्रेश होऊन आल्यावर मुलगा म्हणाला, बाबा माझ्या शाळेची ट्रीप जाते आहे परवा. मी नाव नोंदविले आहे. उद्या मला शाळेत सकाळी दोन हजार रुपये भरायचे आहे. माझे सर्वच मित्र जात आहेत. मला पैसे द्या ना! एकुलता एक मुलगा आहे आपला. त्याला काहीच कमी पडायला नको असे आनंदने आधीच ठरविले होते. क्षणाचाही वेळ न लावता आनंदने शर्टाच्या खिशातून दोन हजार रुपये काढून मुलाच्या हातावर ठेवले. मुलाने, बाबा आय लव्ह यू म्हणत त्याला मिठी मारली व पैसे घेऊन तो त्याच्या खोलीत निघून गेला. आनंदच्या मागे उभे राहून त्याच्या बायकोने हा प्रकार बघितला व तिने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. टचकन पाणी आले आनंदच्या डोळ्यात. पण बायकोला ते अश्रू दिसू न देता हसून तो म्हणाला, माझा जुना बुट उद्या शिवून घेतो, म्हणजे अजून एक वर्षे तर चिंता नाही. आनंदचा मुलगा मात्र आनंदात निघून गेला होता. त्याला ते अश्रू दिसलेच नाहीत.
मला असे वाटते, प्रत्येकच पिढीतील आई बापाच्या डोळ्यात हे असले मन मारल्याच्या प्रसंगांमुळे अश्रू येत असावे. परंतू त्या अश्रूंची किंमत मुलांच्या पिढीला बरेचवेळा कळत नाही, ती त्यांना आई वडीलांच्या भुमिकेत गेल्यावरच कळते. ही असल्या अश्रूंची किंमत आधीच जर मुलांना कळली तर? सहसंवेदनांचा एक घट्ट अनुबंध तयार होईल दोन्हीही पिढ्यांमधे! असे व्हायला हवे, होय ना?
Very nice.This is reality but should be realise by today's generation. Dr R E Khadsan Shegaon
ReplyDeleteReally it is heart touching story described in simple words. We need to let our children understand our feelings about them.-- Unniti A. Shaligram.
ReplyDeleteReal story
ReplyDelete