थोडा है थोडे की जरुरत है @ 30.04.19

भान नसलेल्यांचे भान

सध्या आपल्या देशात सर्वदूर केवळ एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे, ती म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या आपल्या देशात होत असलेल्या निवडणूका. मोठमोठ्या कार्पोरेट हाऊसेस पासून ते एखाद्या गावातील छोट्या चहा टपरीपर्यंत सर्वदूर या निवडणूकांबाबत चर्चा सुरु आहे. मतदान होण्याआधीच्या चर्चा आणि मतदान झाल्या नंतरच्या चर्चा. यामधे काही घनघोर चर्चा सोशल मिडीयावर देखील होत आहेत. परवा तर मतदान होण्याआधीच महाराष्ट्रात कोण कुठे निवडून येणार याबाबत एक संदेश वाचायला मिळाला. त्या संदेशामधील अतिआत्मविश्वास बघून तर मला निवडणूक आयोगाला विनंती करावीशी वाटली की त्यांच्या द्वारे मतमोजणीची जी भव्य प्रक्रीया श्रमपूर्वक राबविली जाणार आहे ती त्यांनी स्थगित करुन हा संदेश बनविणाऱ्याकडूनच निकाल जाहीर करुन घ्यावा. सर्वच स्तरावर निवडणूक त्यामधील संभावित निकालाबाबत चर्चा सुरु आहे. यामधून कोणतेही क्षेत्र सुटलेले नाही. मिडीयाचा तर यासंदर्भात मोठा हातभार आहे. इलेक्ट्रॉनीक मिडीया प्रिंट मिडीयामधे देखील यासंदर्भात जास्तीत जास्त कव्हरेज दिले जात आहे. अर्थात लोकांना जे जास्तीत जास्त आवडते त्या बातम्यांचा पुरवठा करणे ही त्यांच्या दृष्टीने अत्यंत स्वाभाविक बाब आहे. या बातम्यांच्या गदारोळात अमरावतीच्या प्रिंट मीडीयाने एक बातमी प्रकाशित केली जी कदाचित या सर्व मोठमोठ्या बातम्यांच्या गर्दीत अनेकांच्या वाचण्यात आली नाही किंवा आली असेल तरी बाकी आकर्षक मसालेदार चर्चांमधे त्या बातमीचे महत्व जास्त जाणवले नाही. कारण बरेचवेळा प्रींट मिडीयात आलेल्या बातमीवर सोशल मिडीयामधे लोग बरेच दिवस चर्चा करतात किंवा त्या बातम्या पोस्ट करतात. ही बातमी मात्र पोस्ट झाली नाही. परंतू निवडणूकीच्या त्यामधील सत्वाच्या दृष्टीने ती बातमी आपल्यापैकी बऱ्याच मंडळीना भानावर आणणारी होती. ज्यांना भान नाही असे लौकिकार्थाने म्हणले जाते अश्या मंडळींची ती बातमी होती.

यावेळी इलेक्शन मुळे मजा आली आणि म्हणूनच आम्हाला ट्रीपची संधी मिळाली असे आमच्या वहिनी मोठ्या आनंदाने सांगत होत्या. उच्चविद्याविभुषित वहिनी त्यांच्या उच्चविद्याविभुषित प्राध्यापक पतीचे सहल आयोजित केल्याबद्दल कौतुक करीत होत्या. आम्ही चार परीवार मिळून फिरुन येणार आहोत. निवडणूकीच्या निमित्ताने सलग तीन दिवस सुट्या आहेत एक फक्त शनिवारची सुटी घेतली की पूर्ण पाच दिवस मिळतात म्हणून आम्ही राजस्थानला जाऊन येणार आहोत. १६ तारखेला सायंकाळी निघायचे आणि २१ ला सकाळी परत येऊन कामावर हजर असा प्लॅन आहे असे माझा मित्र अतिशय उत्साहात सांगत होता. मी त्याला सहजच म्हणालो की १८ तारखेच्या मतदानाचे काय? अरे यार, आपल्या मताने काय फरक पडणार आहे? काही नाही आणि कुणाला मतदान करायचे, तू सांग! आणि त्यानंतर राजकारणाचा घसरलेला स्तर वगैरे संदर्भात त्याने मला तत्वज्ञानाचा एक मोठा डोज पाजला या सबंध प्रक्रीयेपासून चांगली माणसे कशी दूर जात आहेत वगैरे सांगून स्वतःला त्या चांगल्या माणसांच्या चौकटीत बसवून मोकळा झाला आणि ठरल्याप्रमाणे १६ तारखेला ते चार परीवार मतदानाचा अधिकार प्राप्त एकूण ११ सदस्यांसह अधिकाराचा वापर करता राजस्थानच्या सहलीला रवाना झाले. सध्या त्यांचे राजस्थान सहलीचे फोटो फेसबुकवर झळकत आहेत आमच्यासारख्या अनेक मित्र मैत्रीणींनी त्या फोटोंना लाईक करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. मतदान कमी झाले म्हणून पुण्यातील लोकांवर अनेक विनोद बनवून लोकांनी सोशल मिडीयावर पाठविले. खरे तर या विनोदांना अनेक गावे अनेक व्यक्ती पात्र आहेत. केवळ पुण्याचेच नाही तर या देशातील जवळपास सर्वच शहरांमधील अनेक सुज्ञ भानावर असलेल्या लोकांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाचे प्रमाण ६० टक्क्यांवर जाऊ दिले नाही. सुट्यांचा फायदा घेत सहली काढून, उन्हाचा कांगावा करुन, राजकारणाबद्दल अनास्था व्यक्त करुन आपला हक्क बजावला नाही त्याचे खोटे समर्थन करुन आपले भान सिद्ध करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतू त्यांचे डोळे खाडकन उघडणारे, त्यांच्या निंदनीय कृतीबद्दल आत्मपरीक्षण करायला लावणारे एक मोठे काम अमरावती जिल्ह्यात झाले ज्याची देशभर चर्चा व्हायला हवी. ज्यासंबंधी आलेली वर्तमानपत्रातील बातमी राष्ट्रीय मीडीयावर दाखवायला हवी ज्या ठिकाणी मतदान कमी झाले त्या गावांमधे त्या बातमीची चर्चा व्हायला हवी इतकी महत्वाची ती बातमी आहे. मतदान केले जावे यासाठी निवडणूक आयोग अनेक प्रयत्न करीत असतो. त्यामधे मतदार जागृतीकरीता जाहीराती बनविल्या जातात. त्या जाहीराती पैकी एक जाहीरात या बातमीच्या अनुषंगाने तयार केल्या जाऊ शकते. लौकिकार्थाने भानावर नसलेल्या काही पोरांनी केलेल्या मतदानामुळे तरी सुज्ञांनी भानावर यावे अश्या आशयाची ती जाहीरात बनविल्या जाऊ शकते. कारण चमकदार बातम्यांच्या गर्दीत हरविलेल्या त्या बातमीचे महत्व अनन्यसाधारण आहे.

ती बातमी होती, परतवाड्याजवळून साधारण बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या वझ्झर नावाच्या गावी ४८ दिव्यांग मुला मुलींनी केलेल्या मतदानाची. वझ्झर या गावी शंकरबाबा पापळकर या तपस्वी माणसाकडून चालविल्या जाणाऱ्या स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग आश्रमातील मुलामुलींनी मतदानाचा हक्क बजावला. ज्यांना समाज भानावर नाही असे म्हणतो, ज्यांना भान नाही म्हणून घरातून बाहेर काढून दिलेय, ज्यांना रेल्वे स्टेशनवरील कचराकुंडीत जन्मताच फेकून देण्यात आले अश्या सर्व दिव्यांग मुला मलींना त्यांच्या आधार कार्डवर बापाचे नाव देऊन त्यांचा खराखुरा बाप बनून त्यांना सांभाळणारा महात्मा शंकरबाबा पापळकर त्यांना केवळ सांभाळतच नाहीये तर त्यांचे भान जपण्याचे महत्कार्य देखील करतोय. आश्रमातील एकूण ४० मुली मुले अश्या या माझ्या दिव्यांग भावा बहिणींनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या दिवसाची सुटी सहलीच्या माध्यमातून एन्जॉय करणाऱ्या अनेक महाभागांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही घटना आहे. मतदान करवून घेण्यासाठी प्रशासन देखील किती प्रयत्न करु शकते याचा वस्तुपाठ देखील या निमित्ताने बघायला मिळाला. हे ४८ दिव्यांग भाऊ बहिणी मतदान करण्यास इच्छूक आहेत असे कळल्यावर परतवाड्याचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील त्यांच्या समर्पित चमुने काय केले हे जाणून घेणे देखील क्रमप्राप्त आहे. या प्रशासनाच्या चमुने प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस आधी वझ्जरच्या आश्रमामधे डमी पोलींग बुथ तयार केला. सर्व यंत्रणा उभी केली या सर्व दिव्यांग मुलांना प्रत्यक्ष मतदानाचे प्रशिक्षण देण्यात आले. नियमानुसारच हे मतदान व्हावे याकरीता प्रशासनाने केलेली ही मेहनत खरोखरीच कौतुकस्पद आहे. प्रशासनातील या मंडळींना उन्हाचा त्रास, केवळ ४८ मतदारांकरीता एवढे मोठे कष्ट घेण्याचा कंटाळा, साऱ्या व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी उभ्या करणे याचा त्रास असे काहीच होत नाही? नाही! त्यांना असे काहीही झाले नाही कारण एक अभूतपूर्व कार्य त्यांना घडवून आणायचे होते त्यांनी ते यशस्वीपणे घडवून आणले. निवडणूकीच्या दोन महिने आधीपासून दिवसरात्र काम करणाऱ्या प्रशासनाला काही वेळा काही कारणाने आपण दोष देत राहतो. कधी कधी आपल्याला झालेला त्रास खरा देखील असतो. परंतू निवडणूकीच्या काळात दोन महिने दिवसरात्र एक करुन या देशातील नागरीकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मेहनत करणाऱ्या या सर्व व्यवस्थेकडे पाठ फिरवून सहलीला निघून जाणाऱ्या किंवा उन जास्त आहे म्हणून कुलरमधून बाहेर निघता मतदान टाळणाऱ्या या देशाच्या सूज्ञ(?) नागरिकांना काय म्हणावे?

मतदानाचे देशकर्तव्य पार पाडणारी परंतू लोकांच्या दृष्टीकोनातून भानावर नसलेली ४८ दिव्यांग (खरे तर दिव्य) मुले मतदानाच्या दिवसाला लागून आलेल्या सुट्यांचा फायदा घेत सहलीवर जाऊन मतदान केलेले उच्चविद्याविभूषित या पैकी खरे भान कुणाला आहे कोण भानावर नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही!!





Comments

  1. अरेरे, उच्चविद्याविभूषित वहिनी आणि प्राध्यापक महाशय??? �� खरचं कीव येते. आपलं पोट भरलेलं असलं की झालं अश्या मेंटयलिटी ची ही अप्पल पोटी लोकं... कमाल आहे ��☹️��

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18