थोडा है थोडे की जरुरत है @ 09.04.19
कार्यसिद्धीआनंद(?)
आजच्या लेखाच्या शिर्षकासमोर लावलेले प्रश्नचिन्ह वाचकांना जरा बुचकळ्यात टाकणारे ठरेल. परंतू त्याचा उलगडा या लेखाच्या शेवटी होईल.
तर, माझ्या त्या बहिणीच्या मदतीसाठी आम्ही सारे सज्ज झालो. वेळेची मर्यादा मी सर्वांना सांगितली होती. सायंकाळी ८ वाजता बदल केलेल्या कादगपत्रासह तिला विदर्भ एक्सप्रेसमधे आरक्षणासह बसवायचे होते. सगळ्यात पहिल्यांदा मी आमच्या गरीब विद्यार्थ्यांकरीता सुरक्षित असलेल्या फंडातून काही रक्कम तिच्या नावाने देण्यास सांगितली. कारण तिला पैश्यांची गरज होती. संबंधित प्राध्यापकांनी तिच्या नावाचा चेक तयार केला व तो चेक स्वतःची बँकेतील ओळख वापरुन वटवून आणला. तोवर तिच्याकडून वेगवेगळी आवेदनपत्रे लिहून घेण्याचे काम एका प्राध्यापकाने केले. तिच्या शाळेतून व कनिष्ठ महाविद्यालयातून तिच्या नावाचे प्रमाणपत्र बनवून आणले तिच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काढून दिल्या व त्यानंतर ती माझ्या एका कर्मचाऱ्यासोबत त्याच्या गाडीवर बसून बोर्डाच्या कार्यालयात गेली. नियमानुसार गुणपत्रीकेत बदल करायला तीन दिवस तर किमान लागतात आणि ते अपेक्षित आहे. हजारो विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याचा रेकॉर्ड बघणे, सोबतच्या प्रमाणपत्रांवरुन त्याची शहानिशा करुन नवी गुणपत्रीका देणे हे तसे फारच किचकट व वेळ लागणारे काम आहे. परंतू येथे माझ्या वडीलांची ओळख कामाला आली. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्या शाळेमधे शिक्षक असलेले माझे एक काका बोर्डामधे मोठे अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या करवी हे काम वेगाने करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या. माझ्या कनिष्ठ महाविद्यालयात असताना मॉडरेटर म्हणून खूप वर्षे कार्य केलेल्या एका निवृत्त प्राध्यापक भगिनीची मदत झाली. बोर्डात हे सारे काम करणारा लिपीक त्यांच्या परीचयाचा होता. त्या स्वतः बोर्डात पोहोचल्या व त्यांनी त्या लिपीकाला विनंती केली. तो देखील तत्परतेने हे काम करण्यास तयार झाला. त्याने त्याच्या हातातील त्या दिवशीचे काम सोडून या कामाला प्राधान्य दिले. दहावी आणि बारावी अश्या दोन्हीही गुणपत्रिका बदलवायच्या असल्याने त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली. चालान द्वारे फी भरावी लागली. त्या माणसाने चालान देखील स्वतः भराभर भरुन दिल्या व माझ्या कर्मचाऱ्याने त्या खात्यात भरुन पावत्या नेऊन दिल्या. सारे काही नीट सुरु असताना नव्या गुणपत्रीका प्रिंट करुन देण्याची व्यवस्था तातडीने उपलब्ध होणार नाही असे कळल्यामुळे काम थांबले. बोर्डातून फोन आला म्हणल्यावर मी उत्साहाने फोन उचलला व मला ही बातमी कळली. काय करावे सुचेना. पर्याय काय राहू शकतो हा विचार मनात सुरु असतानाच माझे घड्याळाकडे लक्ष गेले, १.१० वाजले होते. अजून तर बराच पल्ला गाठायचा होता.
काम करायचे ठरविल्यानंतर ते केलेच जाते हा अनुभव मला त्यानंतर आला. एव्हाना त्या बोर्डातील लिपीकाच्या आसपास या कामाची माहिती कळली होती. हे काम गुणपत्रिका प्रींटींग करण्यावर अडकले बघून त्या लिपीकाच्या एका सहकाऱ्याने सुचविले की आपल्याला लेखी स्वरुपात कोऱ्या गुणपत्रीकेवर सर्व माहिती लिहून त्याला प्रमाणित करुन देता येईल. परत आशा पल्लवित झाल्या. हिरमुसल्या चेहेऱ्याने खिन्न झालेली माझी बहिण पुन्हा हसू लागली. झपाट्याने काम पुढे सरकले. कोऱ्या गुणपत्रिकांवर माहिती लिहून ती साहेबांसमोर स्वाक्षरीकरीता ठेवण्यात आली. माझ्या त्या काकांनी सांगून ठेवल्यामुळे त्या साहेबांनी देखील मिटींग सुरु असतानासुद्धा विशेष बाब म्हणून मिटींग थोडावेळ थांबवून स्वाक्षऱ्या केल्या व साधारण २.१५ च्या सुमारास दहावी आणि बारावीची सुधारीत गुणपत्रीका घेऊन ती मुलगी माझ्या कर्मचाऱ्यासोबत विद्यापीठाच्या दिशेने निघाली.
विदर्भ एक्सप्रेसमधे तिकीट उपलब्धच नाही अविनाश, म्हणून माझ्या मित्राचा फोन आला. तात्कालची तिकीटे देखील संपलेली आहेत असे त्याने सांगितले. अश्या अडचणीच्या वेळी हमखास मार्ग काढणारा एक रेल्वे आरक्षण करणारा एजंट माझ्या ओळखीचा होता. त्याने एक मार्ग काढला व मी जमवून देतो असे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावरुन त्याला खात्री वाटत होती. परंतू तो म्हणाला की गाडीत बसल्यावरच काय जे व्हायचे ते होईल. माझ्या लक्षात आले की टीसी कडून हे काम जमवायचे त्याच्या मनात असेल. वेगळ्या नावाने प्रवास वगैरे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सहजच विचार केला की त्या मुलीला प्रवासात काही अडचण झाली तर साऱ्या प्रयत्नांवर पाणी फेरले जायचे. त्यामुळे माझ्या दुसऱ्या एका सहकाऱ्याने तातडीने आमदार साहबांकडे धाव घेतली व त्यांची शिफारस घेऊन आकस्मिक कोट्यामधे नियमानुसार पैसे भरुन आरक्षण करता येईल का याचा प्रयत्न करुन बघतो म्हणून माझा सहकारी रवाना झाला.
तोवर आमची मुलगी विद्यापीठात पोहोचली होती. २ ते ३ जेवणाची सुटी असूनही तेथील कर्मचारी महिला केवळ दहा मिनीटात जेवण आटोपून मदतीकरीता आली. सकाळी १०.३० पासून कामाच्या तुलनेत अतिशय कमी मनुष्यबळ असलेल्या व्यवस्था यशस्वीपणे चालवित असताना काय काय कामे करावी लागतात याचा अंदाज कधी कधी व्यवस्थेच्या बाहेर राहून येत नाही. महाविद्यालयातून दिलेली प्रमाणपत्रे त्यांनी त्या ठिकाणी तपासली परंतू परत एक समस्या उद्भवली. प्रक्रीया पूर्ण करुन पुढील तपासणी करणारा कर्मचारी सुटीवर होता. त्याचे सुटी घेण्याचे कारण देखील रास्त होते. तो सुटीवर असल्याने काम अडणार नव्हते परंतू त्याच्या टेबलवरचे काम करीत असताना मूळ दस्तएवज तपासण्याकरीता वेळ लागणार होता. हजारो विद्यार्थी पदवी घेऊन पास होत असल्याने मूळ कागदावरुन दस्तऐवज वेगळ्याच माणसाने तपासायला बराच वेळ लागला असता म्हणून आता कदाचित हे काम उद्याच होऊ शकेल असा सूर निघाला. उद्या? मी फोनवर अक्षरशः ओरडलोच. त्या मुलीला आज आपल्याला कसेही करुन रात्री ८ च्या रेल्वेमधे बसवायचे आहे. परिस्थीती सांगितल्यावर ताबडतोब त्या सुटीवरील कर्मचाऱ्याला फोन करण्यात आला व विश्वास बसणार नाही परंतू तो त्याच्या घरुन केवळ अर्ध्या तासात विद्यापीठात पोहोचला. व्यवस्था कोणतीही असो, नकारात्मक चित्र बरेचवेळा ठळकपणे मांडले जाते परंतू तीच व्यवस्था अश्या प्रकारेही कार्य करु शकते. धावपळ करीत तो पोहोचला तेव्हा घड्याळात सायंकाळचे ६.२० झाले होते. कामाचे तास संपले होते परंतू माझे कार्यालय आणि विद्यापीठाच्या परीक्षाविभागातील काही लोक उपस्थित होते. धावपळ करीत तपासणीच्या प्रक्रीया झाल्या. सुदैवाने विद्यापीठात गुणपत्रीका प्रिंट करण्याची व्यवस्था उपलब्ध होती. प्रिंटींग करुन देणारे अधिकारी देखील होते. प्रक्रीया करता करता जवळपास ७.१० झाले व साधारण सव्वा सात वाजता त्या मुलीच्या हातात तिसरी गुणपत्रीका पडली. या दरम्यान त्यासाठी लागणारी फी, वेगळ्या काऊंटरवर जाऊन भरणे नस्ती तयार करुन त्यावर साहेबांचे रीमार्क घेणे, विशेष बाब म्हणून काम वेगाने पुढे सरकविणे ही सारी कार्यालयीन कामे अनेक मंडळींनी करुन मोठी मदत केली. अधिकृत कागदपत्र द्यायचे असल्याने सर्व प्रक्रीया पार पाडणे क्रमप्राप्तच होते.
सर्वात वेगात गाडी चालविणारा माझा एक मित्र तोवर विद्यापीठात पोहोचला होता. दिवसभर त्या मुलीला वेगवेगळ्या कार्यालयात नेऊन तिचे काम करवून घेणारा माझा कर्मचारी तोवर पार थकून गेला होता. म्हणून त्याची सुटी करुन दुसरा मित्र तेथे पोहोचला. त्याला बडनेऱ्याला जाताना राजापेठहून जायचे होते जेथे त्याला तिचे तिकीट मिळणार होते. सुसाट वेगाने गाडी हाकीत तो तिला घेऊन निघाला तोवर ७.३५ झाले होते. राजापेठहून तिकीट घेऊन त्याने तिला स्टेशनवर पोहोचविले तेव्हा घड्याळात ८.०३ मिनीटे झाले होते. गाडी येऊन थांबली होती परंतू सुटली नव्हती. त्याचे कारण म्हणजे बडनेऱ्याला एक सामाजिक संस्था चालविणाऱ्या माझ्या मित्राने त्याच्या ओळखीच्या स्टेशन मास्तरला सांगून गाडी पाच मिनीटे थांबवून ठेवली होती. आमच्या त्या बहिणीला योग्य त्या डब्यात बसवून माझ्या मित्राने काम झाले म्हणून फोन केला तेव्हा या कामाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सर्वांनी मिळून किती मोठे काम केले होते!! तो एक अपूर्व कार्यसिद्धीआनंद होता. पण,
मागच्या आठवड्यातील लेख वाचून माझ्या एका अमेरीकतील विद्यापीठात काम करणाऱ्या विद्यार्थीनीने मला पुढे काय झाले ते विचारले. लेख प्रकाशित होण्याआधीच मी तिला हे सारे सांगितले. तिने या सर्व प्रयासांचे कौतुक केले परंतू ती म्हणाली, सर यहाँ के युनिव्हर्सीटीमे अगर ऐसा होता तो इतना सब कुछ करने की जरुरत नही होती. आणि त्यानंतर तिने मला असे काम जर अमेरीकेत करायचे असते तर कसे झाले असते हे सांगितले. तिचे वर्णन ऐकल्यावरच मी आजच्या लेखाच्या शिर्षकासमोर प्रश्नचिन्ह (?) टाकले.
अमेरीकेत सर्व विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा एक डेटाबेस त्यांच्या शाळेपासून तयार केला जातो. त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी बॅकअप असतो. चूक झाली लक्षात आल्यावर शाळेने ती गुणपत्रीका ज्युनीअर कॉलेजला पाठविली असती व तेथील प्राचार्यांनी त्यांच्या जवळचे दस्तऐवज संगणकावरच बघून त्याला एका क्लिकवर अप्रुव केले असते. असेच सर्वच पातळीवर कार्यालय प्रमुखांकडून ते केवळ अप्रुव केल्या गेले असते. त्या पाच पाच मिनीटाच्या अप्रुवल नंतर तिच्या डेटाबेसमधे आपोआप बदल झाले असते व ती अपडेटेड कागदपत्रे नोकरी देणाऱ्या कार्यालयात दिसू लागली असती. त्या मुलीला कुठेही न जाता, केवळ दोन ते तीन फोन कॉल करुन व तिच्या डेटाबेसचा आयडेंटीफिकेशन नंबर व्हेरीफाय करुन केवळ पंधरा मिनीटात हे काम कुठेही न जाता करता आले असते.
हे ऐकल्यावर माझ्या या बहिणीला आम्ही सर्वांनी मिळून केलेल्या मदतीमुळे अकारणच मनात निर्माण झालेला आत्मगौरव ओसरला आणि तंत्रज्ञान या पद्धतीने वापरण्यासाठी आपल्याला अजून खूप काम करायचे आहे हा विचार मनात आला. वर उल्लेखित प्रसंगामधे अनेक मंडळींनी फार मेहनत घेऊन प्राप्त परिस्थितीमधे त्या मुलीची मदत करुन फारच मोठे कार्य केले यात शंकाच नाही. परंतू तंत्रज्ञानाचा आणखी प्रभावीपणे वापर जर आपण करु शकलो तर अनेक कामाचे तास वाचू शकतात व तंत्रज्ञान जे कार्य करु शकत नाही अश्या मानवविकासाकरीता हे सारे मनुष्यकार्यतास वापरात आणल्या जाऊ शकतात. म्हणूनच मंडळी, अजून खूप काम बाकी आहे! होय ना? चला तर, आणखी एका नव्या व्यवस्थेच्या निर्माणासाठी सह उड्डाण करुयात!!
Comments
Post a Comment