थोडा है थोडे की जरुरत है @ 16.04.19
नव मतदार
माझ्या पोरीने तिच्या समुहामधे झालेल्या चर्चेनंतर मला विचारलेल्या प्रश्नांमुळे एका बाजुने मला फार आनंद झाला व दुसऱ्या बाजूने कधीकधी आपले मत एखाद्या बाबतीत फारच टोकाचे होऊन जाते याबाबत जरासा खेदही वाटला. अर्थात सातत्याने आपल्याला येत असलेल्या अनुभवांमुळेही आपण कधी कधी काही मते बनवितो. ती एक स्वाभाविक प्रक्रीया आहे. परंतू आता नव्या काळात या मते तयार होण्याच्या प्रक्रीयेसोबत आपण एका गोष्टीची जोड द्यायला हवी असे मात्र मला माझ्या पोरीचे प्रश्न वाचून मनापासून जाणविले. जीवन जगत असताना आपल्याला अनुभव येतात, त्यावरुन आपले एक मत तयार होते व केवळ तेच मत योग्य आहे असा काहीसा दुराग्रही विचारही त्यासोबतच तयार होतो. हा विचार बदलण्याची तयारी आता आपल्याला ठेवावी लागणार आहे. मत तयार होणे ही जशी स्वाभाविक प्रक्रीया आहे त्याप्रमाणे ते मत वेळ पडल्यास सहजतेने बदलण्याची मानसिकता आता उपयोगाची आहे. याचे महत्वाचे कारण बदलांचा वेग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आपली मते कायमस्वरुपी तशीच राहतील असा आग्रह धरणे मुळात चूक आहे. म्हणूनच माझ्या मुलीने विचारलेल्या प्रश्नांवरुन माझे मत काही प्रमाणात निश्चितच बदलले. नव्याने मतदार झालेल्या या समुहाचा विचार मला त्या निमित्ताने कळला.
वयाची अठरा वर्षे ओलांडल्यावर पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावायला तयार झालेल्या तरुण मुला मुलींच्या समुहाचा विचार मला त्या प्रश्नांमधून दिसला. ही पोरे मतदान करताना किती खोलवर विचार करीत आहेत. तरुण मुलामुलींच्या बेभान आणि बेफाम वागण्याबद्दल अनेकवेळा आपण बोलत असतो. तसे काही मंडळी आपल्याला दिसतही असतात. परंतू मतदानाबाबत इतकी जागरुक असलेली ही पोरे व त्यांच्या मनातील विचार मला अक्षरशः थक्क करुन गेले. अतिशयोक्ती होणार नाही परंतू या सर्व बाबी आपल्याला माहित असतात परंतू मतदान करताना मात्र आपल्या भूमिका सहसा परंपरागत पद्धतीने ठरलेल्या असतात. त्यामागे विचार असतो परंतू त्या विचारालाही पन्हा एकदा तपासून बघावे का असा प्रयत्न शक्यतोवर केला जात नाही. याउलट मला प्रश्न विचारताना अमूक एका व्यक्तीला किंवा त्याच्या पक्षाला मतदान करताना माझ्या मनात काही प्रश्न आहेत. त्याचे निराकरण तुम्ही करा मगच माझा विचार पक्का होऊ शकेल आणि तो देखील तुम्ही सांगताय म्हणून नाही तर मी माझा पक्का करीन असे ठामपणे सांगणारी नव मतदारांची पिढी खरोखरीच आदर्श मतदाराच्या यादीतील वाटते. त्यांच्या वयात व्यक्तीशः मी स्वतः असताना एवढा विचार केलेला मला आठवत नाही. त्याच्या आधीच्या पिढीची तर गंमतच होती असे माझ्या आईने म्हणजे तिच्या आजीने सांगितले. आपल्या नातीच्या समुहाच्या प्रश्नांना पाहून तिच्या आजीला तिने केलेले पहिले मतदान आठवले. मोठा गंमतीदार विषय तो होता. माझ्या आईने मला सांगितले की नंतर पुढील आयुष्यात वाचन केल्यामुळे विचार तयार झाले परंतू त्या वयात मात्र असे काहीच डोक्यात नव्हते.
माझी आई २१ वर्षाची असताना विवाह पश्चात तिवसा नावाच्या छोट्याश्या गावात सर्वप्रथम ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी पात्र होती. तेथेही वेगवेगळे पक्ष होते, विषय होते. परंतू माझ्या आईने त्यावेळी अमूक एका उमेदवाराला मतदान करण्याचा हेतू, सदर उमेदवार ओळखीचा होता व मधून मधून ते भाऊ आपल्याकडे चहा घ्यायला यायचे, हा होता. माझ्या आई ने प्रांजळपणे ही गंमत मला या निमीत्ताने सांगितली. केवळ ओळख आहे म्हणून केलेल्या मतदानानंतर आज जवळपास ४७ वर्षांनंतर जेव्हा तिसरी पिढी मतदानाकरीता तयार होते आहे तेव्हा विचारांमधे पडलेला फरक लक्षणीय आहे. मला स्वतःला देखील मतदान करताना सुरुवातीला म्हणजे २१ व्या वर्षी वगैरे निवडणूकीबद्दल किंवा विविध विषयांबाबत इतका विचार केलेला आठवत नाही. नंतर पुढे जाऊन तो विचार सुरु झाला. परंतू या नव मतदारांच्या विचार करण्याच्या पद्धती बघून मला निश्चितच असे वाटून गेले की वैचारिक प्रक्रीया देखील काळानुरुप वेगवान झाली आहे. कारण मला विचारण्यात आलेले प्रश्न हे माझ्या पोरीने विचारले असले तरीदेखील ते प्रातिनिधीक स्वरुपात होते. तिच्या महाविद्यालयात किंवा समुहात याबाबत नेहेमीच चर्चा होते व ते सारे फार तळमळीने याबाबत बोलतात हे मला कळले.
निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यापासून ते त्यामधील वेगवेगळ्या बाबी, ज्या मुद्द्यांवर मते मागितली जात आहेत त्या सर्व मुद्यांचा तार्किक पद्धतीने विचार करुन चर्चा, या सर्व गोष्टींचा देशाच्या भवितव्यावर होणारा परीणाम, या सर्व प्रक्रीया सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय, त्या निर्णयाचे पृथःकरण, आर्थिक क्षेत्रामधे होणारे बदल, त्यावरील तज्ञांची मते, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंबंधी जोडल्या गेलेले विषय, त्याबाबत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे मत, महिला सुरक्षा व त्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय, अश्या बहुविविध विषयांसंदर्भात एक प्रश्नावली माझ्याकडे आली. सर्वात महत्वाचे म्हणजे या संदर्भात या मंडळींचा विचार फार भावनिकतेवर आधारित नसून तर्कावर त्यांना याची उत्तरे हवी होती. या समुहातील सर्वांनीच आपल्या ज्येष्ठांकडे या संदर्भात विचारणा केली. त्यांचे म्हणणे असेच होते की या प्रश्नांची उत्तरे तुम्ही सर्व तुमच्या अनुभवांवरुन व अभ्यासावरुन द्या आणि नंतर आम्ही त्याचा पुन्हा नव्याने विचार करु व त्यावरुन आमचे मत कुणाला द्यायचे हे ठरवू. निवडणूकीला इतक्या गांभीर्याने घेणाऱ्या या पिढीला बघितल्यावर यावेळी निवडणूकीच्या आसपास बऱ्याच सुट्या आल्याने एका सुटीमधे पाच दिवसाची सहल होईल म्हणून सुट्या टाकून परगावी फिरायला जाणारे तीन चार मित्र आठवले. निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्याकरीता सुटी दिल्यानंतरही मतदान न करणाऱ्या पगारी कर्मचाऱ्याची त्याच्या आस्थापनेने ती रजा बिनपगारी का करु नये असाही विचार मनात येऊन गेला. निवडणूक म्हणजे देशाचे भवितव्य घडविणारी लोकशाहीतील एक महत्वाची प्रक्रीया आहे असे समजून मतदानाकरीता उत्सुक असलेला नवमतदार कुठे नि इलेक्शन नामका तमाशा शुरु हो गया है या आशयाची एका चॅनलवरची जाहीरात सहजच बघून आनंद घेणारे मुरलेले मतदार कुठे, भावनिक आधारावर देशासमोरील वेगवेगळ्या समस्या समोर मांडून त्यावर राजकीय पक्षांच्या लोकांना भांडायला लावून आपल्या चॅनलची टीआरपी वाढविणारे व दंगल वगैरे नावाने कार्यक्रम करणारे इलेक्ट्रॉनीक मिडीयातील मंडळी कुठे व देशासमोरील वेगवेगळे विषय तार्किक पद्धतीने समजून घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याकरीता उत्सुक असलेले हे सारे तरुण नव मतदार कुठे!
हे सारे नव मतदार प्रथमच या महान प्रक्रीयेमधे सामील होत आहेत. त्यांचा उत्साह वाढविणे, त्यांना सकारात्मक विचार करायला मदत करणे, आपले विचार त्यांच्यावर न थोपविता त्यांना त्यांचा विचार करण्याची सवय लावणे यासाठी हा निवडणूकीचा काळ पोषक आहे. आपण सर्व जुने मतदार एकच कार्य प्रामाणिकपणे करु शकतो ज्या द्वारे या नव मतदारांना देखील प्रेरणा मिळेल आणि ते कार्य म्हणजे लोकशाहीच्या या निवडणूक नावाच्या एका अत्यंत प्रभावी प्रक्रीयेचे वैभव टिकविण्याचे कार्य. मतदान करण्याचा आग्रह करुन इतरांनाही त्याकरीता प्रेरणा देण्याचे कार्य. मतदान केल्यावर हे नव मतदार छान सेल्फी काढून सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करत असतील तर करु देणे, त्यांना प्रोत्साहित करणे व सुट्या आहेत म्हणून आपल्या घरच्या लोकांना फिरायला नेण्यापेक्षा आपल्या जबाबदारीचे निर्वहन करणे व करायला लावणे हे कार्य आपल्याला निश्चितच करता येईल. हे नव मतदार म्हणजेच नवी पिढी आहे व त्यांच्यामधील हा सर्वंकश विचार करुन मतदान करण्याचा उत्साह हा एक आशेचा किरण आहे. हा किरण सकारात्मक उर्जेच्या प्रकाशझोतामधे परावर्तित करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. ही संधी गमावता कामा नये. होय ना?
Comments
Post a Comment