थोडा है थोडे की जरुरत है @26.02.19
खुदी को कर बुलंद..
कार्यक्रमाची पत्रिका देण्यासाठी आयोजक आले. मी कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी होतो व माझ्या हस्ते काही मंडळींचा सत्कार केला जाणार होता. ज्या लोकांचा सत्कार होणार होता त्यांची नावे देखील पत्रिकेत होती. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या लोकांची नावे होती. मला त्या सर्वांबद्दल बोलणे अपेक्षित होते त्यामुळे मी त्यांच्या बद्दलची माहिती जरा बारकाईने वाचत होतो. त्या यादीमधील एका नावापाशी मी का कोण जाणे जरा थांबलो. ते नाव मला माझ्या कुठेतरी ओळखीच्या व्यक्तीचे वाटत होते. मी माझ्या भाषणाच्या टीपणांमधे ती सारे नावे लिहून घेतली. कार्यक्रमाची माझ्या दृष्टीने तयारी झाली होती परंतू ते नाव मात्र काही केल्या मनःपटलावरुन निघत नव्हते. त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस मी माझ्या नियमीत कामांमधे व्यस्त असल्याने मला जरा त्या नावाचा आणि कार्यक्रमाचाही विसर पडला. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी त्या आयोजकांचा वेळेबाबत फोन आला तेव्हा मी परत एकदा माझे भाषणाचे टिपण बघून घेण्याकरीता कागद उघडला आणि परत ते नाव मला माझ्या भूतकाळात नेत होते. कार्यक्रमाला जातानाही ते नाव माझ्या मनात होते व त्या नावाच्या त्या व्यक्तीला मला भेटायचे होते. याचे महत्वाचे कारण म्हणजे ती व्यक्ती मला अपेक्षित व्यक्ती जर असेल तर मात्र एक अद्भूत व्यक्तिमत्व मला भेटणार याची पक्की खात्री होती. कार्यक्रमाला पोहोचलो. अतिशय नेटका आणि सुबक असा तो कार्यक्रम होता. एका मोठ्या सभागृहामधे साधारण चार पाचशे लोकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होत होता. आम्ही तीन चार जण मंचावर बसलो होतो. आणि ज्यांचे सत्कार माझ्या हस्ते होणार होते असे ते पाचही लोक समोर सभागृहात बसले होते. रंगमंचावर प्रकाशझोत असल्याने मला त्यांच्यापैकी ती व्यक्ती मात्र अजूनही दिसली नव्हती. एकेका सत्कारमूर्तीचा सत्कार सुरु झाला. सत्कार करण्यापूर्वी त्याच्या कार्याचा आलेख मांडणारी एक छोटीशी फिल्म त्यांनी दाखविली जेणेकरुन त्या लोकांच्या कामाचा परीचय सर्वांना व्हावा. चौथ्या क्रमांकावर मी ज्या नावाची वाट बघत होतो ते नाव उच्चारल्या गेले. मी जरा जास्तच काळजीपूर्वक ती त्या व्यक्तीच्या कार्याबद्दलची फिल्म बघत होतो. मनःस्वी नावाच्या एका संघटनेच्या संचालिकेच्या कार्याचा गौरव करणारी ती फिल्म मी बघू लागलो.
बंगलोर सारख्या अवाढव्य शहरामधे त्या संचालिकेने एक विशेष हेल्पलाईन प्रोजेक्ट सुरु केलाय. शहरांमधे छोट्या छोट्या कुटुंबांमधे पालकांना मुलांसाठी वेळ नाही. मशीनप्रमाणे भिंगरी लागल्यागत ते पळत असतात व पैसा कमावित असतात. मोठ्या शहरामधे रहायचे तर त्यांना तसे धावणे क्रमप्राप्त असते. परंतू त्यामुळे मुले एकटी पडतात. यापैकी बऱ्याच मुलांना सुरक्षेच्या कारणांमुळे घरात कधीकधी कोंडूनही ठेवावे लागते. मुले घरात असतात व मग आपल्याच जगात रममाण होत त्याच जगाला आपले मानू लागतात. बाहेरच्या जगातील अनेक गोष्टींपासून ते अनभिज्ञ राहतात. अशातच जेव्हा त्यांचे वय वाढू लागते तेव्हा त्यांना काही वयानुरुप प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरीता पालकांना वेळ नसतो व त्यामुळे मनातल्या मनात ही पोरे कुढत राहतात. तंत्रज्ञानाच्या आधारे निर्माण झालेले जगच त्यांचे जग उरते. यामधूनच मुलांना काही आजार झालेले आढळतात. कधी कधी या आजारांचे स्वरुप फार टोकाचे देखील असते ज्यामधूनच ब्लू व्हेल सारख्या जीवघेण्या मोबाईलच्या खेळांमधे ही पोरे अडकतात व त्यानंतर परीस्थिती हाताबाहेर कशी जाते याची जाणीव आपल्यापैकी अनेकांना आहे. बदलत्या काळानुसार जे बदल आपण स्विकारले त्यातला हा एक फार महत्वाचा बदल जो आता आपल्या अंगावर उलटतो आहे तो म्हणजे आपण छोटी केलेली कुटुंबे. बोलायला आजी आजोबांसारख्या महत्वाच्या व्यक्ती आता घरात नाहीत. ते कुठेतरी आपल्या गावाकडच्या घरात राहतात कारण शहरात पोरगा व सूनबाई या दोघांच्याही पगारात वन बी एच के एवढाच फ्लॅट परवडू शकतो व त्यामुळे त्या फ्लॅटमधे आजी आजोबांकरीता खोलीच नाही. यासोबतच मुल देखील एकच कारण दोन मुलांचा खर्च बजेटच्या बाहेर जातो. या अतिशय व्यावहारिक आणि सत्य अडचणींमुळे छोटासा परीवार ही अपरीहार्यता बनली. आपल्या कामाच्या रामरगाड्यात आणि संसाराची दोन्ही टोके मिळविण्याच्या नादात मुलांकडे दुर्लक्ष करतो व त्यामधून त्यांच्यात मानसिक आजारांचे प्रमाण वाढीस लागते. या सर्व आजारांवर एकच उपाय असतो की त्यांच्याशी मनसोक्त बोलणे केले पाहिजे. त्याकरीता या व्यक्तीने ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून अश्या एकलकोंड्या मुलांना स्पॉट केले जाते व त्यानंतर त्याच्या पालकांच्या परवानगीने त्या मुलांशी संवाद केला जातो. या करीता त्या व्यक्तीने जवळपास २५ लोकांची एक टीम बनवून या एकट्या मुलांकरीता एक हेल्पलाईनच सुरु केली. याद्वारे ती या मुलांशी संवाद साधते व त्यांना सकारात्मकतेचे धडे देऊन, त्यांच्याशी मैत्री करुन त्या मुलांना जीवन जगण्याच्या मुख्य धारेमधे आणण्याचे अत्यंत पुण्याचे कार्य करते. कारण कधी कधी हे एकटेपण पुढे विचित्र मानसिक आजारांमधे परावर्तीत होऊन त्या मुलाचे किंवा मुलीचे आयुष्यभराचे नुकसान होते. ते टाळण्याकरीता आजपर्यंत जवळपास एक हजारहून जास्त मुलामुलींना आधार देणाऱ्या त्या संस्थेच्या संचालिकेचे नाव मला थेट माझ्या बालपणात घेऊन जात होते. फिल्मच्या शेवटी या संचालिकेच्या पूर्व आयुष्याबद्दल जेव्हा दाखविण्यात आले तेव्हा मात्र माझी शंका १०० टक्के खरी ठरली. तिच्या पूर्वायुष्यातील शाळेचे नाव फिल्ममधे आल्याबरोबर मी आनंदाने हरकून गेलो. आज ज्या मनःस्वी संस्थेच्या संचालिकेचा माझ्या हस्ते सत्कार होणार होता ती माझ्या वर्गातील माझी वर्गमैत्रीण होती. माझ्या हस्ते तिचा सत्कार होताना तिने मला हळूच विचारले, अवि, मला ओळखलेस का? अर्थात! मी उद्गारलो पण मला बरेच प्रश्न आहेत. तेवढ्या वेळातही मी न राहवून तिला सांगितले. ती म्हणाली मला ठाऊक आहेत तुझे प्रश्न. कार्यक्रम झाल्यावर जेवताना मी सर्व प्रश्नांची उत्तरे देते. सत्काराला उत्तर देताना अतिशय आत्मविश्वासाने आणि अस्खलित इंग्रजी भाषेत आपले मत ती मांडू लागली. मी मात्र मनाने साधारण पस्तीस वर्षे मागे गेलो. मला आठवत होती एक मुलगी जिचा प्रवेश आमच्या वर्गात झाला व केवळ दोन दिवसात आमच्या सर्वांच्या चिडविण्याची सर्वात मोठे टार्गेट ती बनली. ती जरा वेगळीच होती. दोन वेण्या सारख्या एकत्र बांधण्याचा प्रयत्न करणारी, बोलताना सारखी अडखळणारी, प्रश्नाचे उत्तर विचारल्यावर एकदम दचकून जाणारी, मधल्या सुटीत सारा वर्ग मैदानावर असताना एकटीच वर्गात बसून डबा खाणारी, जराशी वेडसरच दिसणारी व त्यामुळे सर्वांच्या चिडविण्याचे माध्यम बनलेली अशी ती मुलगी होती. हे सारे होण्याचे कारण असे होते की ऑटीझम या आजाराची सुरुवात असलेली ती मुलगी होती. एका वक्तृत्व स्पर्धेमधे भाग घेऊन स्टेजवर केवळ स्वतःचे नाव सांगून जोरात भोकाड पसरुन रडलेली व त्यानंतर मुलामुलींच्या खूप टिंगल टवाळीला सामोरी गेलेली ती माझी वर्गमैत्रीण आता माझ्या हस्ते पुरस्कार स्विकारुन ऑटीझमकडे वळलेल्या मुलांना सांभाळण्याचे कार्य करणाऱ्या एका संघटनेची संचालिका म्हणून एका भव्य कार्यक्रमामधे पाच सहाशे लोकांसमोर अस्खलीत इंग्रजी भाषेमधे आपले मत व्यक्त करीत होती. हा सारा प्रवास अद्भूत होता. कार्यक्रमानंतर जेवण करताना तिने ते सारे मला सांगितले. ते सारे ऐकल्यावर मला तोच शेर आठवला,
खुदी को कर बुलंद इतना, की हर तकदीर से पहले,
खुदा बंदे से खुद पुछे, बता तेरी रजा क्या है?
शांतपणे तिने त्या अद्भूत प्रवासाबद्दल सांगणे सुरु केले.
(क्रमशः)...
Very nice
ReplyDeleteMast pan hi kon
ReplyDelete