थोडा है थोडे की जरुरत है @ 12.02.19
त्याला आनंद होईल म्हणून..
मला हे अजिबात पटत नाही. माझे मत याबाबत अतिशय ठाम आहे. श्रद्धा असणे ठीक आहे परंतू त्या श्रद्धांचे अश्या पद्धतीने सादरीकरण मला मान्य नाही. या सर्व गोष्टींमुळेच आपला धर्म बदनाम होतो. अकारण देवाच्या भोवती निर्माण केलेली ही अंधश्रद्धेची वलयं नव्या काळात थोतांड वाटू लागतात आणि मग लोक देवाच्या पवित्र भावनेशी जोडण्यापेक्षा त्यापासून दूर जाऊ लागतात.
आजपासून साधारण सतरा अठरा वर्षापूर्वी शिमल्याला एका उद्बोधन वर्गाकरीता गेलो असता त्या वर्गातील एका देबोजीत नावाच्या बंगाली मित्रासोबत मी तावातावाने श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर वाद घालताना हे सारे बोलत होतो. त्या चर्चेमधे मी त्याला पुढे म्हणालो होतो की श्रद्धा असावीच कारण या सबंध विश्वाला संचालित करणारी एक अतर्क्य आणि असीम शक्ती कार्यरत आहे जी उर्जेच्या स्वरुपात कार्य करते. परंतू त्या शक्तीला आपल्याला प्रत्यक्ष बघता येत नाही म्हणून त्याची वेगवेगळी रुपे परमेश्वर या संकल्पनेतून आपल्यासमोर मांडल्या गेली आहेत. शिवाय समुह श्रद्धेच्या सहवासाने ती उर्जा आपल्याला मानसिक बळ देत राहते आणि म्हणूनच देवांची आणि मंदीरांची निर्मीती करण्यात आली. मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी याची फार आवश्यकता असते कारण माणसाचे प्रयत्न बरेचवेळा फारच थिटे पडतात, तेथे त्याचे मनोबल वाढविण्याकरीता अश्या संकल्पनांची गरज असतेच. परंतू या सर्व संकल्पना मनोधैर्य वाढविण्याकरीता कामात येतात तोपर्यंत सारे ठीक असते. परंतू याला जोडल्या जाणाऱ्या अंधश्रद्धांची जेव्हा माणसाला भिती दाखविली जाते, प्रकोप आणि अवकृपा यासारख्या बाबी समोर करुन सामान्य माणसाची गळचेपी केली जाते. तो त्यामुळे असहाय होतो व अंतीमतः तो त्या संकल्पनांपासूनच तुटून जातो. हे बरोबर नाही. त्यामुळे निदान शिक्षित माणसांनी देवाच्या या संकल्पनांना योग्य पद्धतीने समजून घेऊन त्याचा संतुलित व सामंजस्यपूर्ण पद्धतीने वापर करावा. म्हणूनच हे हातात बांधायचे गंडे दोरे याला काही अर्थ आहे का? या संकल्पनाच मुळात अश्या एका उर्जास्रोताची प्रतिके आहेत ज्याला आपल्याला बघता येत नाही तर केवळ अनुभवता येते. त्यामुळे जो विचारी आहे त्याने तरी अश्या प्रतिकांच्या आड पाळल्या जाणाऱ्या अंधस्रद्धांना खतपाणी घालू नये. हे धागे वगैरे हाताला बांधून काही मिळते का? असे सारे मी बोललो होतो. आता इतक्या वर्षांनंतर मला हे सारे आठविण्यामागे एक विशेष कारण घडले व त्यामुळेच मला त्यावेळचा तो सारा संवाद अगदी जसाच्या तसा आठवून गेला. साधारण अठरा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सामान्यपणे प्रत्येकाची विचारप्रक्रीया बदलत जाते. आपल्याही भुमिका बदलतात व त्यामुळे त्याच माझ्या मित्राकडून आलेले एक पाकीट व त्यातील एक गोष्ट मला ते सारे आठवून गेली. माझ्या त्या श्रद्धांबद्दल तावातावाने मांडलेल्या मतानंतर त्याने मांडलेले मत देखील मला आठवले.
तो म्हणाला होता, अविनाश तू म्हणतोस ते काही प्रमाणात बरोबर आहे. परंतू प्रत्येक माणसाची मानसिक स्थिती ही वेगवेगळी असते. परमेश्वराची ही सारी रुपे एका मोठ्या एनर्जी सोर्सचीच रुपे आहेत व म्हणूनच यांची आवश्यकता आहे. पण या पद्धतीने तार्किक विचार करुन जीवन जगणारे सर्वच लोक असतील असे नाही. प्रत्येकाची जडण घडण वेगळी असते. तुझ्या आई वडीलांनी तुला एक अत्यंत सुरक्षित व संस्कारी वातावरण प्रदान केले म्हणून तुझ्यामधे हा आत्मविश्वास निर्माण झाला व त्यामुळेच तुला देवासमोर केवळ हात जोडले तरी चालून जाते. परंतू माझ्या सारख्या मुलाला ज्याची आई मी दोन वर्षाचा असताना मला सोडून गेली, वडीलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आई मला त्या घरी टीकू देईना. मग मामाकडे राहून शिक्षण झाले. तेथेही फार काही चांगले वातावरण नव्हते. त्यामुळे कायम एका असुरक्षिततेच्या सावलीखाली मी मोठा झालो. ज्या वयात तुला आई वडीलांचा भरभक्कम पाठींबा मिळाला व त्यामुळे तुला हातात दोरे बांधावे लागले नाही त्याच वयात मी मात्र असुरक्षित व भित्रा बनलो. त्यावेळी माझ्या गावाच्या मंदिरात त्या पुजाऱ्याने माझ्या हातावर बांधलेला धागा मला बळ देत होता. त्यामुळे माझ्या परीक्षा चांगल्या जात होत्या. हे सारे विचार त्या कोवळ्या वयात माझ्या मनावर इतके जास्त कोरले गेले की मला आता त्याबाबत तर्क करता येत नाही. कळते परंतू वळत नाही. वेगवेगळ्या मनःस्थिती असतात रे, त्यामुळे एकाचा तर्क दुसऱ्याला बरेच वेळा लागू पडत नाही. मला मान्य आहे की बरेच वेळा या अंधश्रद्धांमुळे फसवणूक होते किंवा काही मंडळी याचा गैरफायदा घेतात. सर्वच धर्मांमधे हे होते परंतू तरीदेखील या गोष्टी कमी होत नाहीत. याचे कारणच हे आहे की जसे जसे आपण विकसित होऊ तसे तसे आपण विज्ञानाच्या आहारी जाऊ व ते आहारी जाणे आपल्याला एका बाजूने सक्षम बनवेलच परंतू दुसऱ्या बाजूने आपल्या मनाची हतबलता वाढवत नेईल आणि आपण आजच्यापेक्षाही जास्त असुरक्षित राहू. ती असुरक्षितता वेगळ्या प्रकारची असेल परंतू हे सारे कमी होणार नाही. त्यामुळे मला माझ्या हाताला हा धागा बांधून जर मानसिक बळ प्राप्त होते आहे तर मग तू कशाला विरोध करतोय? त्यावर मी परत काहीतरी बोललो होतो कारण मला ते मान्यच नव्हते. परंतू आज त्याने पाठविलेले पाकीट उघडल्यावर जी गोष्ट मला दिसली ती हातात घेतल्यावर मला अठरा वर्षांनंतर त्याच्या त्यावेळच्या वक्तव्याला फक्त विरोध करण्यापेक्षा त्याच्या बाजूनेही विचार करता येऊ शकतो ही शक्यता जाणवली. कदाचित अठरा वर्षात माझ्या विचारप्रक्रीयेत झालेल्या बदलामुळे असेल परंतू मी त्याची बाजू समजून घेता येऊ शकतो या निर्णयाप्रत आलो होतो. पाकीटातील त्या वस्तूकडे बघत मला ते सारे काही आठवले. परंतू त्या वस्तूसोबत माझ्या मित्राने सोबत लिहीलेल्या छोट्याश्या संदेशामुळे मी विचारात पडलो. त्याने लिहीले होते, प्रिय अविनाश, नुकतेच भुतानला जाण्याचा योग आला. तेथे एका मॉनेस्ट्रीमधे गेलो तर मला तेधील धर्मगुरुंनी ही गोष्ट दिली. ते म्हणाले की तुमच्या मनात याक्षणी ज्या तुमच्या जवळच्या व्यक्तीचे नाव येत असेल त्याला ही द्या. कसे ठाऊक नाही परंतू मला तू आठवलास. तुझ्यासाठी म्हणून मी हे मुद्दाम पाठवतोय. तुझे विचार मला आठवतात परंतू जर तू याचा स्विकार केला तर मला आनंद होईल. चिठ्ठीच्या घडीच्या आत एक मनगटावर बांधायचा मण्यांचा बँड होता.
आजपासून अठरा वर्षांपूर्वी मी असा एखादा बँड हातात आल्याबरोबर फेकूनच दिला असता. परंतू आता मात्र मी त्याकडे बराच वेळ बघत राहीलो, माझ्या मित्राने मला ते पाठविण्या मागची भावना माझ्या मनाला स्पर्शून गेली व माझ्या मित्राला आनंद होईल म्हणून मी तो बँड माझ्या मनगटावर बांधला.
जीवन जगत असताना आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांमुळे, आपल्या वाचनामुळे व आपल्यावरील संस्कारांमुळे आपल्या जीवनाची चौकट आखत असतो व त्यानुसार जगत असतो. परंतू आपल्याला समाजात वावरायचे असेल व लोकांना आपल्या आयुष्यामधे सुरेख मैत्रीपूर्ण नात्यांमधे बांधून ठेवायचे असेल तर मात्र आपल्याला या चौकटी लवचिक ठेवाव्या लागतात. कारण कधी कधी काही गोष्टींना दुसरी बाजू देखील असते, आपल्याला न दिसलेल्या काही कडा असतात व त्या जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपल्या समोर योग्य संदर्भ स्पष्ट होतात. त्यावेळी आपल्याला ती विचार चौकटीची लवचिकता उपयोगात येते. याच्याही पुढे जाऊन आपल्याला काही गोष्टी पटल्याच नाही तरी केवळ जवळच्या व्यक्तीला आनंद होईल म्हणून करण्यातही मोठा आनंद असतो हा अनुभव तो बँड हातावर बांधताना मला मिळाला. माझ्या हाताला त्याने पाठविलेला बँड बांधलेला फोटो त्याला पाठविल्यानंतर त्याला झालेला आनंद त्याच्या फोनवरील आवाजावरुन मला स्पष्ट जाणवत होता. मला नाही पटत आणि त्यामुळे मी करणार नाही असे म्हणून तोडून टाकण्यापेक्षा, मला पटत नाही परंतू तुला आनंद मिळत असेल तर मी करीन असे म्हणून जोडण्याचा प्रयत्न कधी कधी करायला काय हरकत आहे?
Comments
Post a Comment