थोडा है थोडे की जरुरत है@19.02.19

आम्ही आहोत!

अचानक ती घटना घडून गेली. ध्यानी मनी नसताना अचानक दुःखाचा एवढा मोठा पहाड आमच्या एका मैत्रीणीवर कोसळला. सारे काही कसे सुरळीत सुरु होते. एक अत्यंत सुखी समाधानी मध्यमवर्गीय परीवार असा उल्लेख करावा असेच तिचे सारे व्यवस्थित होते. छान टुमदार घर, नवरा मोठ्या कंपनीत चांगल्या नोकरीवर, एक मुलगा आणि एक मुलगी, सोबतीला ही देखील एका कार्यालयात नोकरी करायची. घरी सासू सासरे, छान भरलेले घर असे सारे छान होते. लग्नानंतर घरच्या सर्वांनी खूप पाठबळ देऊन शिक्षण घ्यायला लावलेले त्यानंतर आग्रहाने नोकरी देखील करायला लावली. तिने देखील घरच्या तिच्या कर्तव्यांच्या आड नोकरीचे कारण येऊ दिले नाही. सारे काही नीट सांभाळणे हा तिचा स्थायी भावच होता. नवरा देखील तिला प्रत्येकच बाबतीत आधार द्यायचा. घरासंबंधीच्या बऱ्याचश्या गोष्टी तर तो तिला कळताच करुन टाकायचा. त्या झाल्यावरच आपल्या नवऱ्याने हे काळजीने केलेले आहे याची तिला जाणीव व्हायची. तिच्या लग्नापूर्वीच्या जीवनातील नाती देखील फार छान तिने जपली होती ती जपण्यामधे या घरातील सर्वांचाच तिला पाठींबा होता. तिच्या मित्र मैत्रीणींचा म्हणजे आमचा एक छान समुह आहे. त्या समुहामधेही तिला फार मोकळेपणाने जाण्याची मुभा होती. नृत्याची प्रचंड आवड होती तिला, परंतू घरात बाकी इतर कुणाला कलाक्षेत्राची जास्त आवड नव्हती. परंतू त्यामुळे तिचे अडत नव्हते. आमच्या समुहातील मित्र मैत्रीणींसोबत ती छान वेगवेगळ्या नृत्यांच्या कार्यक्रमांना जायची आपली आवड मनापासून जोपासायची. तिने नृत्य शिकावे असाही आग्रह घरच्यांचा होता परंतू तिनेच ते नाकारले होते. घरच्यांचे इतके पाठबळ असल्याने उस गोड लागतोय म्हणून मुळापासून खाऊ नये या उक्तीप्रमाणे तिने स्वतःला कार्यक्रम बघण्यापर्यंतच मर्यादित ठेवले होते. एकंदरीत अतिशय आनंदी आयुष्य ती घालवत होती. आणि अचानक तिच्या आयुष्यात ते सारे काही हादरवून टाकणारे वळण आले. आयुष्य एका विशिष्ट समाधानी मार्गावरुन चालत असताना अचानक रस्ता संपलेला असावा आणि समोर खोल दरी असावी असेच काहीतरी तिच्या आयुष्यात झाले

ज्या कंपनीमधे तिचा नवरा नोकरी करायचा त्या कंपनीमधे एके दिवशी एक भयानक अपघात घडला. चूक नेमकी कशी झाली हे कळले नाही. रात्रीच्या शिफ्टमधे तिचा नवरा काम करीत होता. मशीनचे काम सुरु होते. मशीनची दुरुस्ती त्याच्या नेतृत्वामधे सुरु होती. अतिशय अजस्त्र मशीन होती ती. वेगवेगळे ब्लेडस् त्यामधे होते फार मोठ्या प्रमाणात कटाईचे काम त्यावर व्हायचे. काही तांत्रीक अडचणीमुळे ती मशीन बंद पडली त्यामुळे उत्पादन थांबले. कंपनीमधील वरच्या पदांवरील अधिकारी तिच्या नवऱ्याच्या फार मागे लागले होते त्यामुळे त्याने आपल्या टीमला सोबत घेऊन दिवसरात्र मेहनत सुरु केली होती. केवळ तीन ते चार तास झोप त्याची व्हायची. सारखे काम सुरु होते. हा त्या संपुर्ण कामाचा प्रमुख होता. त्या दिवशी रात्री संपुर्ण मशीन ठिक झाली त्याची टेस्ट घेण्याचे ठरले. मशीन सुरु करण्यापूर्वी सारे काही ओके आहे आता ती सुरु करायला हरकत नाही या रजीस्टरवर त्याने सही केली. डोळ्यात झोप होती तो पूर्ण थकून गेला होता. त्याने अंगठा दाखवून दूरवरच्या ऑपरेटरला मशीन सुरु करण्याचा निर्देश दिला. धाड धाड आवाज करीत ती अजस्त्र मशीन सुरु झाली आणि काही क्षणातच तेथे जे काही झाले ते समजण्यापलीकडले होते. ते तसे का झाले? कसे झाले? याचा विचार करायलाही संधी मिळली नाही अश्या प्रकारे ते सारे घडले. परंतू त्या घटनेमुळे आमच्या मैत्रीणीचे अवघे आयुष्य बदलून गेले. तिचा त्या घटनेशी थेट संबंध नसला तरी तिचा नवरा संबंधित होता. त्याच्या बाबतीत घडलेली ती घटना तिच्याही बाबत घडलीच कारण त्या घटनेचे पडसाद त्या संपुर्ण कुटुंबावर पडले. छान काहीसे अचानक कोलमडून पडावे असाच तो प्रकार झाला.

मशीन मोठा आवाज करीत सुरु झाली त्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजासोबत आणखी एक ह्रदयाचा ठाव घेणारा आवाज त्या ठिकाणी निनादला. एका भिषण किंकाळीचा. दूरवरच्या ऑपरेटरला देखील ती किंकाळी ऐकू आली आणि त्याने ती मशीन बंद केली. तोवर त्या मशीनला असलेल्या मोठमोठ्या ब्लेडवरुन रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. झाले असे की त्या अजस्त्र मशीनच्या आत एक कर्मचारी अडकून गेला होता ते कुणाच्याही लक्षात आले नाही. विशेषतः आमच्या मैत्रीणीच्या नवऱ्याची ती जबाबदारी होती की सारे तपासून घेऊन मगच मशीन सुरु करण्याची परवानगी द्यावी. परंतू कामाच्या ताणामुळे तपासणी नीट झाली नाही तो कामगार मशीनमधे कापल्या गेला. त्यानंतर जे झाले ते वाईटच होते. त्या साऱ्या प्रकरणाचा ठपका या तिच्या नवऱ्यावर ठेवण्यात आला. त्याला बडतर्फ करण्यात आले. त्याला कोणतेही आर्थिक फायदे मिळाले नाही. सगळीकडे निंदा नालस्ती झाली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नोकरीवरुन काढून टाकल्यावर तो घरी असताना केवळ पंधरा दिवसात आपल्या हातून एक जीव गेला असा विचार करत करत त्याच्या मनावर परीणाम झाला त्याचा नर्वस ब्रेकडाऊन झाला त्याचा परीपाक म्हणजे अर्धांगवायूचा झटका येऊन तो एका खोलीमधे लोळागोळा होऊन पडला. उपचार सुरु झाले परंतू डॉक्टरांनी सांगितले की आता हा यामधून सावरायला काही वर्षे लागू शकतात. बरा झाला तरीही हा कामावर कधीही जाऊ शकणार नाही

एखाद्या सुंदर चित्रावर रंगाचा डबा सांडून ते चित्र एका क्षणात विस्कटून जावे असे सारे काही घडले. पहिल्या पाच सहा दिवसांची सहानुभूती आटोपल्यावर नातेवाईक देखील पांगले. त्यानंतर आमच्या मैत्रीणीसमोर प्रश्न उभा झाला चरीतार्थाचा. नवऱ्याचा कंपनीतला बऱ्यापैकी मोठा पगार बंद झाला. हिची स्वतःची नोकरी फार जास्त पगाराची नव्हतीच. मुलांची शिक्षणे, घरात सासु सासरे, नवऱ्याची औषधे आणि जगण्यासाठीचा खर्च ही सहजच निभावली जाणारी कार्ये आता तिच्यापुढे भली मोठी आव्हाने बनली.

आम्ही सर्वांनी तिला भेटायला जायचे ठरविले. परंतू भेटायला जाणे म्हणजे केवळ सहानुभूती दाखवून परत येता तिला आम्ही तुझ्या सोबत आहोत हे कृती मधून जाणवून देण्याचे ठरले. सुदैवाने आमच्या समुहातील प्रत्येकच जण आर्थिक सुस्थितीत असल्याने सर्वांनी मिळून काहीतरी ठोस करण्याचे ठरले. सर्वांनी मिळून तातडीने चार लक्ष रुपये गोळा करुन दोन दोन लक्ष रुपये स्वतंत्रपणे तिच्या दोन्ही मुलांच्या भविष्यातील शिक्षणाकरीता गुंतवून टाकले. एक मित्र एका मोठ्या शाळेच्या संचालक मंडळात चांगल्या पदावर असल्याने तिला त्या शाळेमधे त्वरीत नोकरी देण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या तिला मिळणाऱ्या पगाराच्या दुपट्ट पगार तिला मिळण्याची व्यवस्था त्यामुळे झाली. त्या गावातील कोचिंग क्लास वाले काही मंडळी ओळखीचे असल्याने तिच्या मुलांना त्यामधे विनामुल्य प्रवेश मिळवून देण्यात आले. एका मोठ्या औषधी कंपनीत एरीया मॅनेजर असलेल्या आमच्या एका मित्राने तिच्या नवऱ्यासाठी होलसेल रेटमधे कायमस्वरुपी औषधी मिळवून देण्याची तसेच औषधांची सॅम्पल्स विनामुल्य मिळण्याची व्यवस्था लावून दिली. आमच्या समुहातील जवळपास प्रत्येकाने तिच्या जिवनाला सुरळीत करण्यासाठी संपुर्ण मदत केली. आम्हाला तिच्याकरीता ही मदत करण्याची मनापासून इच्छा या साठी झाली की आमच्यापैकी प्रत्येकाशी ती मैत्रीच्या सुंदर भावनेने जोडल्या गेली होती. ते तिचे वैशिष्ट्य होते. प्रत्येकाशी संवाद ठेऊन तिने नाते जपले होते. ही सारी मदत कार्यान्वित करुन आम्ही सारे निघालो तेव्हा आम्हा सर्वांचे हात धरुन अनेक दिवसांनंतर ती पहिल्यांदा हसली. आमच्यापैकी कुणीही काहीही बोलू शकत नव्हता. सारे मिळून तिचे हात हातात धरुन आम्ही तिला केवळ एकच सांगत होतो, आम्ही आहोत.

कुणाच्याही आयुष्याची यशस्विता किती संपत्ती मिळविली, किती प्रसिद्धी लाभली, किती मानमरातब मिळाले यापेक्षा आपल्याला खांद्यावर विश्वासाने हात ठेऊन मी आहे हे सांगणारे लोक आपल्यासोबत किती आहेत यावर जास्त अवलंबून असते. असे किती लोक आपल्या आयुष्यात आपल्याला जोडता आले आणि अश्या किती लोकांच्या आयुष्यात आपण देखील मी आहे असे म्हणतो आहे यावरच खरे माणुसपण ठरते.

.




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18