थोडा है थोडे की जरुरत है @05.02.19

राजमलाई

बाबा, आज मला माझ्या आवडीचे चॉकलेट हवंय. माझ्या मित्राचा मुलगा हट्ट करीत होता. आज माझी परीक्षा संपली त्यामुळे आज मला चॉकलेट हवंच आहे. गेले आठ दिवस मी तुम्हाला काहीही मागीतले नाही आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अभ्यास देखील केला. आता तुम्हाला माझे ऐकावेच लागेल. मला चॉकलेट हवे. माझा मित्र मात्र लगेच तयार होत नव्हता. मी त्याला म्हणाले की एका चॉकलेट साठी त्याला परवानगी का देत नाहीस? एवढे काय त्यात? माझा मित्र म्हणाला, अरे त्याचे चॉकलेट म्हणजे तुला माहीत नाही. ते काही आपल्या काळातले पन्नास पैसे किंवा एक रुपयाचे आहे का? आज तो त्याच्या आवडीचे म्हणजे नव्याने बाजारात आलेले ज्या चॉकलेटची जाहीरात त्याने टीव्हीवर बघितलीय ते पावणे तिनशे रुपयाचे चॉकलेट मागतोय. पावणे तिनशे? मी उडालोच. हो! पावणे तिनशे आणि माझा पोरगा म्हणतोय की फक्त टू हन्ड्रेड अँड सेवन्टी पाईव्ह रुपयेच तर हवे आहेत! पावणे तिनशे रुपयाचे चॉकलेट असल्याने माझा मित्र त्याला नकार देतोय ते बरोबर आहे असे मला वाटले. आता पर्यंत त्या बापलेकाच्या वादामधे त्या पोराकडून असलेला मी चॉकलेटची किंमत ऐकल्याबरोबर त्याच्या बापाचा पक्ष घेऊ लागलो. दोघांचा वाद जरा वाढल्यावर मी माझ्या मित्राला म्हणालो की हे प्रकरण मी सांभाळू का? तो म्हणाला, अगदी आनंदाने! ते प्रकरण जरा कठीण होते परंतू मी प्रयत्न करुन बघण्याचे ठरविले. सर्वप्रथम मी त्या पोराला सांगितले की तू म्हणतो तसे आणि तेच चॉकलेट तुला मी घेऊन देणार! माझे हे वाक्य ऐकल्यावर त्या गड्याची कळी खुलली. पण, आता मी पुढचे वाक्य बोलायला सुरुवात केल्यावर त्याने कान टवकारले. मी त्याला सांगितले की तुला चॉकलेट हवंय हे मी तुझे ऐकणार परंतू त्या आधी तुला माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. तो अजून खुश झाला. वा! चॉकलेट देखील मिळणार आणि स्टोरी देखील. त्याचा पुढचा मला अपेक्षित प्रश्न आलाच. काका कुणाची स्टोरी सांगणार? स्पायडर मॅन की एक्सपॅन्डेबल्सची? त्याचा उत्साह कायम ठेवत मी त्याला सांगितले की मी तुला एका गुड मॅनची स्टोरी सांगणार आहे. गुड मॅन? हे काय? मला ठाऊक नाही. कोणत्या चॅनलवर आहे? त्याचे प्रश्न सुरुच. बेटा, ही कुठल्याच चॅनलवर आलेली स्टोरी नाही. ही माझ्या मेमरी चॅनलवर असलेली स्टोरी आहे. माझ्या शेवटच्या वाक्याचा अर्थ त्याच्या लक्षात आला नाही. परंतू त्याबद्दल चौकशी करण्याच्या आधीच तो स्टोरी सांगा म्हणून मागे लागला कारण त्या स्टोरीच्या समापनापलीकडे त्याला त्याच्या मनातले आणि त्याला हवे असलेले चॉकलेट दिसत होते. मी त्याला जवळ बसविले आणि गोष्ट सांगणे सुरु केले. त्याला मी सांगितले, या गोष्टीचे नाव आहे, राजमलाई.

मी त्याला गोष्ट सांगू लागलो. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याश्या गावात एक मुलगा रहात होता. त्याचे बाबा शेतकरी होते आणि त्यांनी शेतातच रहायला एक झोपडी बांधली होती. हा मुलगा आपल्या आई बाबांसोबत त्या शेतातच रहायचा. तसे ते शेत गावाच्या जवळच होते त्यामुळे शाळेत त्याला पायी पायी येणे सहज शक्य व्हायचे. त्याचे बाबा शेतामधे खूप काम करायचे आणि त्याची आई देखील त्यांना मदत करायची. या मुलाला देखील शेतातील काही कामे करावी लागायची. लहानपणापासूनच तो शेतातच राहत असल्याने त्याला त्या कामांचे फार काही वाटायचे नाही. परंतू लहानपणापासूनच त्याच्या मनात एक गोष्ट फार खोलवर रुजली होती. काका, रुजली म्हणजे काय? मधेच प्रश्न आला. रुजली म्हणजे मनात स्ट्रॉंगली एस्टॅब्लीश झाली होती. त्याला ते कळले. शब्द जरा त्याला समजतील असे वापरायचे आहेत हे माझ्या लक्षात आले. गोष्ट पुढे सुरू झाली. तो मुलगा नेहेमी एकच ड्रेस घालून शाळेत यायचा. बाकी सर्व मुलांजवळ दोन दोन युनीफॉर्म होते पण त्याच्याजवळ एकच होता तो देखील त्याला शाळेकडून मिळाला होता. आठवड्यातून एक दिवस तो नेहेमी शाळेला बुट्टी मारायचा. त्यासाठी मास्तरांचा मार देखील खायचा. बऱ्याच दिवसांनंतर आम्हाला कळले की युनीफॉर्म एकच असल्याने तो धुवावा लागायचा तो वाळला नाही की त्या दिवशी त्याला शाळेला बुट्टी मारावी लागायची. इतर सर्व मुलांना त्यांचे आई वडील पॉकेटमनी द्यायचे. तो देखील फार नव्हता. पाच रुपये महिन्याला. परंतू काही ना काही द्यायचे. याच्याजवळ मात्र काहीच नसायचे. मधल्या सुटीत मुले शाळेबाहेरच्या दुकानांमधून काही काही विकत घेऊन खायचे. चिंचा, बोरकुट किंवा रावळगाव टॉफी अश्या काही मोजक्याच गोष्टी मिळायच्या. एक गोष्ट मात्र सर्वांना फार आवडायची परंतू त्याची किंमत जरा जास्त म्हणजे एक रुपया असल्याने त्याचे अप्रुप होते. कारण चिंचा किंवा बोरकुट पंचेवीस पैश्यात देखील मिळून जायचे. एक रुपया द्यावा लागायचा त्यामुळे जरा ती गोष्ट क्वचितच घेतली जायची तिचे कौतुक जास्त होते. ती म्हणजे राजमलाई. ती राजमलाई म्हणजे चॉकलेटपेक्षा जरा वेगळा प्रकार होता ज्याला दुधापासून बनविलेले चॉकलेट म्हणूयात आपण. पण त्याची चव अफलातून असायची. सर्वांनाच ती राजमलाई खावी वाटायची. परंतू प्रत्येकवेळी जमायचे नाही. इतरांनाच कठीण जायचे तेव्हा या आपल्या गरीब मुलाला तर ते जमणेच शक्य नव्हते. पण त्याला कधी ना कधी ती राजमलाई खायची होती. एकदा या मुलाचा एकमेव असलेल्या एका मित्राने राजमलाई विकत घेतली. पण ती खाण्या आधीच वर्गाची घंटा झाली त्यामुळे त्याने ती राजमलाई खिशात ठेवली तो वर्गात निघून गेला. वर्गात गेल्यावर त्याने त्याच्या या गरीब मित्राला सांगितले की आज आपण राजमलाई खाऊया. मी आणली आहे, आपण अर्धी अर्धी करुन खाऊ. या मुलाला त्या गोष्टीचा फारच आनंद झाला. कधी नव्हे तो त्याला राजमलाई खायला मिळणार होती. वर्ग सुरु झाला. ज्याने राजमलाई आणली होती त्याने सरांचे लक्ष नसताना हळूच त्याचे दोन तुकडे केले. एक तुकडा पटकन तोंडात टाकला सरांच्या नकळत खाऊन टाकला. दुसरा तुकडा त्याने त्याच्या गरीब मित्राला दिला. अनेक दिवसांची राजमलाई खाण्याची इच्छा त्याच्या मनात असल्याने त्याला तो तुकडा पटकन खाणे जमले नाही. त्याने तो तुकडा डोळे भरुन बघितला, हातात घेऊन त्याचा स्पर्श अनुभवला, नंतर त्याचा सुंदर वास घेऊन मग तो तुकडा तोंडात टाकणार तोच सरांनी त्याला पकडले. राजमलाईचा तुकडा हातात असलेला त्याचा हात मुलांमधे फेऱ्या मारणाऱ्या सरांनी वरचे वर धरला त्याला कानाला धरुन उभे केले. त्या काळच्या पद्धतीने त्यांनी त्यांस खूप बदडला त्याला ती राजमलाई कुणी दिली हे विचारु लागले. आता मात्र ज्याने राजमलाई आणली त्याला भिती वाटू लागली. परंतू खूप मार खाऊनही त्या पोराने याचे नाव सांगितले नाही. बरेच मारल्यावर सरांनी त्याच्या हातातला तो तुकडा हिसकावून खिडकीबाहेर फेकून दिला त्याला जागेवर बसायला सांगितले. वर्ग संपल्यावर राजमलाई आणलेला मित्र त्यास रागाने म्हणाला की तुला यापुढे मी देणार नाही काहीच. तुला नीट खाता पण येत नाही. आज मीच फसलो असतो. तो पण छोटाच होता आणि सहजच बोलून गेला होता. परंतू ते शब्द त्या पोराच्या जिव्हारी लागले म्हणजे तो खूप हर्ट झाला. त्या दिवशी त्याने रागारागात मित्रास सांगितले. मी आयुष्यभर कधीच चॉकलेट खाणार नाही. इतके वर्ष लोटले परंतू तो अजूनही चॉकलेट खात नाही. त्याचा तो मित्र त्याला आग्रह करतो परंतू तरीही तो खात नाही. हे सांगताना एव्हाना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ज्याला मी गोष्ट सांगत होतो, त्या चॉकलेट करीता हट्ट करणाऱ्या पोराने त्याचवेळी चमकून आपल्या बाबांकडे बघितले. त्याच्या बाबांच्याही डोळ्यातून आसवे वाहत होती. त्याला आठवले, त्याचे बाबा कधीच चॉकलेट खात नाहीत

काही क्षण गेल्यावर तो चिमुकला आपल्या बाबांजवळ गेला नि म्हणाला, बाबा, मला ते मोठे चॉकलेट नको. मला आज राजमलाई घ्यायचीय. माझ्यासाठी, आई साठी, काकांसाठी आणि तुमच्यासाठीही!! 





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18