थोडा है थोडे की जरुरत है @ 29.01.19

वॉर क्राय

सात वर्षांची ती चिमुरडी आपल्या गरोदर आईचा हात धरुन हळू हळू समोर चालू लागते. डोळे अश्रुंनी डबडबलेले असतात. तिच्या आईची तर स्थिती अतिशय वाईट असते. परंतू धिराने ती पोर आपल्या आईचा हात धरुन एक एक पाऊल पुढे टाकत जाते. तिच्या समोर काय असतं? देशाच्या तिरंग्यामधे लपेटलेल्या काही लाकडी पेट्या असतात ज्यामधे दहशतवादी हल्ल्यामधे शहीद झालेल्या सैनिकांचे शव ठेवलेले असतात. सर्वात मधली पेटी ज्या दिशेने ती पोर आपल्या आईला घेऊन निघाली असते ती पेटी तिच्या वडीलांच्या शवाची असते. एका काळरात्री सिमेच्या पलीकडून आलेल्या काही दहशतवाद्यांनी उरी या गावाला असलेल्या एका सैनिकी कॅम्प वर हल्ला चढविला असता तिच्या वडीलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते, परंतू चुकून त्याच्या शरीराला लागलेल्या हँडग्रेनेडची पीन निघाल्यामुळे तिच्या वडीलांचा देह त्या ग्रेनेडच्या स्फोटामधे छिन्न विछिन्न झाला होता तिने आपल्या लाडक्या बाबाला गमावले होते. वडीलांच्या शवपेटीजवळ पोहोचल्यावर त्यावर ठेवलेला तिच्या बाबांचा फोटो बघून तिच्या गरोदर आईला तर रडुच कोसळते परंतू या चिमुकलीस काहीतरी आठवून जाते. तिच्या मामाला एकदा तिने विचारले असते, मामा वॉर क्राय म्हणजे काय? सैन्यामधेच अधिकारी असलेल्या तिच्या मामाने तिला सांगितले असते, बेटा वॉर क्राय म्हणजे युद्धभुमीवर लढताना जवानांना स्फुर्ती मिळावी म्हणून एकत्रीतपणे दिली जाणारी घोषणा म्हणजे वॉर क्राय. रणांगणावर जेव्हा सैनिक लढण्यासाठी तयार होतो तेव्हा शत्रुवर तुटून पडण्यासाठी हिंमत लागते. ती हिंमत एकत्रीतपणे त्यांना मिळवी यासाठी वॉर क्राय म्हणजे घोषणा दिली जाते. गंमतीने तो म्हणतो, बेटा तू जशी वॉर क्राय म्हणते आहेस तशी ती नसते. खरी वॉर क्राय जोरात आणि जोशात म्हणली जाते ज्यामुळे शत्रुला थरकाप सुटला पाहीजे. हे सारे त्या चिमुरडीला आठवते, आपल्या वडीलांचा मृतदेह ठेवलेल्या शवपेटीकडे ती आणि तिची आई चालत जाताना त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुने मानवंदना देण्यासाठी सैनिक उभे असतात. त्या रांगेत सर्वात समोर तिचा लष्करी अधिकारी मामा देखील युनीफॉर्म मधे उभा असतो. युनिफॉर्ममधे असल्याने त्याच्या चेहेऱ्यावर एक प्रकारचा धिरोदात्तपणा करारीपणा दिसत असतो. परंतू शेवटी तो माणूस असतो. त्यालाही भावना असतात. जी बहिण गरोदर आहे, जिच्या पदरी एक छोटीशी सात वर्षांची पोर आहे अश्या आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा त्याच्या जवळच्या मित्राचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह बघणे त्यालाही प्रचंड वेदनादायीच असणार. परंतू हलता येत नाही कारण त्यावेळी तो एक सैनिक म्हणून सावधान पोझीशनमधे उभा असतो. गळ्याशी आलेला दुःखाचा आवंढा महत्प्रयासाने तो गिळतो परंतू डोळ्यातून अश्रुंची लकेर मात्र ओघळत असते. ती चिमुरडी आपल्या मनातून पार कोसळलेल्या आईचा हात धरुन बाबाच्या शवपेटीसमोर उभी असते. सैन्याच्या रीवाजाप्रमाणे आकाशात बंदुकांच्या फैरी झाडून या शुरविरांना सलामी दिली जाते त्याक्षणी त्या चिमुरडीच्या तोंडून जोरात तिच्या बाबांच्या फौज तुकडीची वॉर क्राय उमटते. बाकी सर्व सैनिक देखील तिला प्रतिसाद देतात. एरवी वॉर क्रायमुळे शत्रुला कापरे भरायला हवे असे तिच्या मामाने तिला सांगितले असते परंतू या ठिकाणी त्या चिमुरडीच्या तोंडून ती वॉर क्राय ऐकून हा प्रसंग बघणाऱ्या आपल्या सारख्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला वेदनेने कापरे भरले असते, जेव्हा हा असा प्रसंग आपण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या उरी नावाच्या एका नितांत सुंदर चित्रपटात बघतो.

चित्रपट हे भावनांना प्रज्वलीत करणारे किती प्रभावी माध्यम आहे याचा आणखी एक अनुभव उरी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो. आपल्या देशामधे फार जास्त चर्चिल्या गेलेल्या प्रसंगी समाजभानाच्या मर्यादा सोडून झालेल्या चर्चेत राहिलेल्या सर्जिकल स्ट्राईक वर आधारित हा चित्रपट आपल्या संपुर्ण परीवारासोबत बघण्यासारखा आहे नव्हे बघितलाच पाहिजे असा आहे. सर्जिकल स्ट्राईक केला जात असताना कोणत्या पक्षाचे सरकार होते किंवा त्यामुळे त्याचा राजकीय फायदा वगैरे गोष्टी ज्या कदाचित वेगवेगळ्या चर्चांदरम्यान आपल्या कानावर आल्या होत्या त्या सर्व बाजूला सारुन ही अतिशय किचकट सैनिकी कारवाई १०० टक्के यशस्वी बनविणाऱ्या सैनिकांची मनोभुमिका समजण्याकरीता हा चित्रपट बघितला पाहिजे. या चित्रपटात ती मनोभुमिका फारच सक्षमतेने संयत स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील सैनिकी कारवाई देखील फार मेलोड्रामा येऊ देता जास्तीत जास्त वास्तविकतेकडे नेणारी आहे. चित्रपटाची पकड इतकी जबरदस्त आहे की मध्यांतर कधी होतो हे कळतच नाही. देशभक्तीचा परीचय सेल्युलॉईडवर होताना आपण प्रेक्षक असलो तरी तो रोमांच आपल्यालाही अनुभवायला मिळतो. चित्रपटाचा वेग आणि त्यामधे असलेली कथा या दोन्ही गोष्टी इतक्या प्रभावी आहेत की संपुर्ण चित्रपटात आपण त्या सैनिकी कारवाईशिवाय दुसरा कोणताही विचार करीत नाही. प्रसंगानुरुप देशभक्तीचा विचार आपल्या मनाला स्पर्श करणे हे तर स्वाभाविकच आहे परंतू त्या सोबतच अश्या प्रकारचे सैनिकी ऑपरेशन पार पाडत असताना व्यवस्था कश्या उभाराव्या लागतात त्याकरीता त्यामधे सम्मिलीत सैनिक कश्या मानसिकतेमधून जातो याचे यथार्थ चित्रण ही या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू आहे. याबाबत आपल्या ड्रॉईंगरुममधे बसून एखाद्या चॅनलवरची चर्चा ऐकून, त्यात आपल्या ज्ञानाची भर टाकून ती चर्चा पुढे रेटणे सोपे आहे परंतू प्रत्येक क्षणी जीवाचा धोका असणाऱ्या या मिशनमधे प्रत्यक्ष सहभागी झालेल्या सैनिकाचे मन जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. नेमकी तीच संधी हा चित्रपट आपल्याला देतो.

देशावर असलेले पराकोटीचे प्रेम, देशाकरीता कोणत्याही क्षणी मृत्यूला कवटाळण्याची तयारी, युद्धासाठी घरातून बाहेर पडताना परत जिवंत येता येईल की नाही याची अशाश्वती, परंतू त्याच वेळी परीवाराबद्दल वाटणारी आपुलकी, त्यांची मनात असलेली काळजी या सर्व बाबींमधे एका सैनिकाच्या जीवाची होणारी घालमेल आपल्यापैकी प्रत्येकाने संवेदनशीलपणे समजून घ्यावी ही देखील अपेक्षा निर्मात्यांची असावी कारण त्यांनी ती मांडण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे. मी, माझे कुटुंब, त्यांचा आनंद, माझे चौकोनातील आयुष्य याचाच विचार करीत जगणारे आपण या पार्श्वभुमीवर माझा परीवार त्याचा सहवास नि आनंद याच्या पलीकडे जाऊन देशाकरीता हे सारे एका क्षणात बाजूला सारुन कदाचित पुन्हा हे काहीही बघता येणार नाही ही भावना उराशी बाळगून पूर्ण ताकदीने शत्रुवर तुटून पडणारा सैनिक हा मनाने किती खंबीर असावा लागतो याचा प्रत्यय आपल्याला हा चित्रपट बघताना येतो.

सैनिकांच्या शौर्यासोबतच त्यांना या शौर्याकरीता सदैव तयार ठेवणाऱ्या त्यांच्या मनोभुमिका समजून घेणे हे आपल्याला खरोखरीच करता यायला हवे. देश हा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी बनतो सर्वांनाच हातात शस्त्र घेऊन निघणे जमत नाही ही बाब जरी मान्य केली तरीदेखील आपल्या देशाला पर्यायाने आपल्या जिवीताला सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांच्या मनोभुमिका योग्य पद्धतीने समजून घेणे त्यानंतरच त्याबाबत वाच्यता करणे ही आता आपल्या समाजाची गरज आहे. आधुनिक काळानुसार सोशल मीडीयाला आपण वेगाने स्विकारले त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर आपले मत आपण सहजच व्यक्त करतो. वेगवेगळ्या विषयांवर समाजातील सर्व स्तरांमधील लोकांनी बोलणे हे एक सामाजिक परीपक्वतेचे द्योतक आहे. परंतू या सोबतच जेव्हा आपण सशस्त्र दलातील आपल्या सैनिकांविषयी बोलतो तेव्हा त्यांच्या शौर्यगाथांसोबतच त्यांच्या मनोभुमिकांबद्दल देखील आपल्या संवेदना जागृत ठेवायला हव्यात. असे केल्यासच आपल्याला त्या वॉर क्रायचा खरा अर्थ त्यामागील मनोधैर्य जाणवू शकेल. ही वॉरक्राय ह्रदयातून जाणवून घेण्यासाठी आपण सर्वांनी विशेषतः आपल्या घरच्या तरुणांना सोबत घेऊन उरी हा चित्रपट बघायलाच हवा





Comments

  1. Really gr8! Feel proud of these dedicated people.
    Vande Mataram.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23