थोडा है थोडे की जरुरत है @22.01.19

आनंदाचा ऑक्सीजन

नुकतेच दिल्लीच्या एका फाईव्ह स्टार शाळेसमोरुन जाण्याचा योग आला. शाळा सुरु होण्याची वेळ होती व त्यामुळे शाळेसमोर तोबा गर्दी होती. फाईव्ह स्टार शाळा असल्याने तेथे शिकणारी मुले मुली देखील फाईव्ह स्टार घरातीलच होती. त्यांना सोडायला आलेल्या पालकांच्या महागड्या गाड्या बघून ते सहज लक्षात येत होते. सुंदर नेटके युनीफॉर्म घातलेली मुले मुली फार गोड दिसत होते. त्यांचा तो युनीफॉर्म देखील फारच देखणा व त्याला साजेसे चमकदार शुज, छानशी बॅग आणि चेहेऱ्यावर एक गोड निरागसपणा जाणवित होता. परंतू त्यांच्या चेहेऱ्यांमधे मात्र मला एक बाब ठळकपणे खटकत होती कारण त्यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याचा पूर्ण चेहेरा मला दिसत नव्हता. रुबाबात मोठाल्या गाड्यातून उतरुन आपल्या ममा नि पापाला बाय करताना ती मुले मोठी गोड दिसत होती परंतू तीच एक गोष्ट त्यांच्या त्या सबंध आकर्षक दिसण्यामधे खटकत होती. एरवी एक चांगली शाळा असा अभिप्राय मनातल्या मनात उमटवीत मी पुढे निघालो असतो परंतू या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीतली ती एक गोष्ट व त्यामागचे कारण मला जाणून घ्यायचे होते व म्हणून मी तेथे जरा घुटमळलो. तेथे येणाऱ्या पालकांना तर विचारणे कठीण होते कारण ते फार घाईत आपल्या पाल्यास शाळेसमोर सोडून सुसाट गाडी वळवून निघून जात होते. त्या ठिकाणी असलेला सुरक्षा गार्ड या संदर्भात मला काही सांगू शकेल याबद्दल माझ्या मनात आशा उत्पन्न झाली. त्याला मी आपसे थोडीसी बात करनी है असे म्हणून बघितले. त्याने मला अभी नही साहब, अभी सब ब्च्चे स्कुल मे आ रहे है, आप थोडी देर रुकते है तो मै आपसे बात करुंगा. मला या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबत जी गोष्ट खटकत होती व मनात कुतुहल निर्माण झाले होते म्हणून मी तेथे बाजूलाच थांबलो. तो सुरक्षा गार्ड मुलांना नीट रांगेत शाळेत पाठवित होता. मिळालेल्या वेळात मी फाटकापासूनच त्या शाळेचे निरीक्षण केले.

काय सुंदर शाळा होती ती. अत्यंत सुबक व आधुनिक इमारत. मुख्य प्रवेशद्वारावर काचेचा उत्तम उपयोग केलेला होता. सगळी कडे चकाचक होते. छान अर्धगोलाकृती अशी ती सुंदर इमारत मोठ्या डौलाने उभी होती. शाळेच्या बाह्यरुपाकडे बघूनच त्याचे अंतरंग कसे नि किती आधुनिक असेल याचा अंदाज येत होता. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षक देखील येत होते. ते देखील देखणा गणवेष घालून होते. असल्या शाळेत शिकणारी मुले किती भाग्यवान असतील याबद्दल मी विचार करीत असतानाच त्या सुरक्षा रक्षकाचे काम संपले व तो माझ्याजवळ आला. या मुलांच्या भाग्याबद्दल विचार करीत असतानाच मला खटकलेल्या गोष्टीचा तो उलगडा करणार होता. त्याने मला त्याच्यासाठी बनविण्यात आलेल्या खास केबीनमधे बसविले व माझा प्रश्न ऐकायला तो सज्ज झाला होता. 

चमकदार गाड्यामधून टापटीप होऊन उतरणाऱ्या प्रत्येक मुलामधे मला जाणविलेली कॉमन गोष्ट जी मला रुचली नव्हती ती म्हणजे, सुंदर गणवेष व तयारीसोबत या प्रत्येक विद्यार्थ्याने तोंडावर पांढऱ्या रंगाचा मास्क लावला होता. तोंड व नाक झाकून टाकणारा मास्क. बारकाईने बघितले तर गाडीतून उतरण्याआधी पालक त्या मुलांना तोंडावर मास्क लावायला सांगत होते. मास्क लावूनच ती मुले शाळेत प्रवेश घेत होती. एव्हाना प्रार्थनेकरीता ती मैदानावर गोळा झाली होती तरी देखील त्यांच्या चेहेऱ्यावर मास्क लागलेलेच होते. प्रार्थना संपवून ती मुले वर्गांमधे रवाना झाली. या मला आश्चर्यात टाकणाऱ्या गोष्टीबाबत मी त्या सुरक्षा रक्षकाला विचारले. त्याने सांगितलेले कारण ऐकून मी खरोखरीच विचारात पडलो. काही क्षण तर मला काय बोलावे सुचेना. भल्या मोठ्या या देशाच्या राजधानीमधील एका अत्यंत प्रतिथयश शाळेमधे चालणारा हा प्रकार मला संपुर्णपणे नविन व चिंतेत टाकणारा होता. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या रामप्रसाद चौबे नावाच्या त्या सुरक्षा रक्षकाने मला त्या गोष्टीमागचे कारण सांगतानाच सुरुवात मोठी मजेदार केली. तो मला म्हणाला, क्या बताए साहब, यहाँ बच्चो को भेजनेवाले सारे पेरेन्टस् पगला गये है. मला गंमत वाटली. त्याच शाळेचा सुरक्षा रक्षक असे म्हणाला त्यामुळे माझ्या मनात त्या गोष्टीबद्दल जास्त कुतुहल निर्माण झाले. त्याने जे काही मला सांगितले त्याचा सार असा होता.

तो म्हणाला, साहेब या वेडेपणाची सुरुवात साधारण दिड वर्षापूर्वी झाली. शाळेत एका मुलाला प्रार्थनेच्या वेळी चक्कर आली व तो घेरी येऊन खाली पडला. त्याला लगेच दवाखान्यात नेले व काही तासातच तो मुलगा बरा देखील झाला. परंतू डॉक्टरकडून सर्वांना असे कळले की त्याला दिल्ली शहरात असलेल्या भयानक प्रदुषणामुळे श्वास घ्यायला त्रास झाला व त्यामुळे त्याला घेरी येऊन तो मैदानावर पडला. झाले! मग काय ही बातमी फुटली, पालकांपर्यंत पोहोचली. या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेशित करणारे सारेच पालक अत्यंत जागरुक आहेत. तातडीने या सर्व पालकांची सभा बोलावण्यात आली. झालेल्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करणारी भाषणे झाली. शाळेने या संदर्भात काहीतरी ठोस पावले उचलावी असे सांगण्यात आले व त्या सर्व विचार मंथनातून हा एक निर्णय करण्यात आला की मुलांना जेव्हा या वातावरणात रहावे लागते तेव्हा तेव्हा त्यांनी तोंडावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मुले एसी गाडीतून उतरण्याआधीच मास्क लावून घेतात. त्यांच्या एसी वर्गखोल्यांव्यतिरीक्त कुठेही वावरायचे असल्यास त्यांना मास्क लावावा लागतोच. इतकेच काय परंतू त्यांच्या पीटी च्या तासालाही जेव्हा ही मुले मैदानात हे थोडीफार कवायत करतात तेव्हा देखील त्यांना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.  या कारणांमुळे शाळेने मैदानी खेळ देखील बंद केलेले आहेत. मुलांना प्रदुषणापासून वाचविण्यास्तव पालकांच्या सूचनेवरुन ही योजना राबविली जाते आहे. जाताना ही पोरे पुन्हा मास्क लावून गाड्यांमधे बसतात व नंतर आपल्या मोठाल्या एसी घरांमधे गुडुप होतात. प्रदुषणाशी त्यांचा कमीत कमी संबंध यावा व त्याचे विपरीत परीणाम त्यांच्यावर होऊ नये या करीता हा उपाय पालकांनीच सुचवून या शाळेत अंमलात आणला आहे. जमिनीला मुलांचे पायच लागू देत नाही साहेब इथले पालक!! आपल्या पाल्यांच्या स्वास्थ्याबाबत इतक्या जास्त प्रमाणात जागरुक असलेल्या व वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड किंवा लीड या सर्व घातक वायुंपासून आपल्या पाल्यास वाचवू बघणाऱ्या या सर्व पालकांचे एका बाजूने कौतुक मनात येत असताना मनात एक प्रश्न उमटलाच, या वातावरणात असलेल्या आनंदाच्या ऑक्सीजनचे काय?

लहान मुलांचा विकास होत असताना त्यांच्या सुरक्षेची तजविज करणे हे पालकाचे कर्तव्य असले तरी त्याला जमिनीशी जोडून ठेवणे हे देखील महत्वाचेच आहे. जमिनीवर खेळणे, माती अंगाला लागणे, आजुबाजुच्या वातावरणाचा सामना करणे, वेगवेगळे अनुभव घेणे, पडणे, लागणे, परत उठणे, या साऱ्या बालपणीच मिळणाऱ्या गोष्टी मुलांच्या विकासाकरीता आवश्यक असलेला आनंदाचा ऑक्सीजन म्हणून काम करतात. मुलांना घातक वायुंपासून वाचविताना काळजीचा अतिरेक करुन नकळत या आनंदाच्या ऑक्सीजन पासूनही आपण वंचित ठेवतो आहे हे उच्च शिक्षित पालकांना कळायला हवे. कारण बाकी साऱ्या गोष्टी आयुष्यात त्या मुलांना मिळतील परंतू बालपणी मिळणारा हा आनंदाचा ऑक्सीजन त्याला आयुष्यभर पुरणारी एक गोष्ट देणार आहे व ती म्हणजे जीवनाला मनापासून स्विकारण्याची वृत्ती व कोणत्याही परीस्थितीत आनंद निर्माण करण्याची प्रवृत्ती. आयुष्यभर आनंदी राहण्याच्या सुंदर प्रक्रीया शिकविणारा हा आनंदाचा ऑक्सीजन, मुलांना लहानपणीच तोंडावर मास्क लावून वंचित करण्यापेक्षा, भरभरुन मिळवून देण्याचेही कर्तव्य पालकांचेच आहे ना?




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23