थोडा है थोडे की जरुरत है @15.01.19

संवादी वादविवाद

आजकाल तरुणाई फार वाया गेली आहे. तरुण मुलामुलींना कसलीच शुद्ध नसते. बेताल वागणे, मनाला येईल तसेच करणे हेच काय त्यांना कळते. शिक्षण, करीयर या त्यांना आवश्यक असलेल्या बाबींवरही ते त्यांचे लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. त्यामुळे सामाजिक दृष्टीने त्यांच्या मनात काही विचार असणेही शक्यच नाही. या नव्या पिढीच्या आधारे आपला देश कशी काय प्रगती करणार हे कळत नाही. वेगवेगळ्या सामाजिक घडामोडींसंदर्भात ही तरुण पिढी इतकी जास्त अनभिज्ञ आहे की त्यांना या जगात काय सुरु आहे ते ठाऊकही नसते. खरे तर या तरुणाईने स्वतःचे एक असे विश्व बनविले आहे की त्या जगात इतर कुणालाही प्रवेशच नाही. त्यांचे त्यांच्यात काय सुरु असते ते कळूही शकत नाही. यासोबतच त्यांच्यामधे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असलेली व्यसनाधिनता हा देखील एक महत्वाचा भाग आहे. सर्रास दारु, सिगरेटी किंवा नशेच्या आहारी गेलेली तरुणाई कश्या प्रकारे या देशाचे येणाऱ्या काळात नेतृत्व करणार हे कळतच नाही. अश्या प्रकारची वाक्ये सध्याच्या तरुण पिढीबद्दल अनेक लोक बोलताना दिसतात. या वाक्यांमधे त्या विचारांमधे तथ्य नाही असेही नाही. परंतू या सर्व वाक्यांना बाजूला सारुन तरुण मंडळींचे एक अतिशय वेगळे रुप मला अनुभवायला मिळाले. निमित्त होते माझ्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका वादविवाद स्पर्धेचे.

दरवर्षी प्रमाणे माझ्या महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक कै. दादासाहेब खापर्डे यांच्या स्मृती प्रित्यर्थ एका आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले जाते. परंतू या वर्षी आम्ही सारी आयोजन समितीचे सदस्य जरा विचारात पडलो होतो. या वर्षी एखादा सामाजिक विषय चर्चेसाठी द्यावा असा विचार समोर आला त्यातूनच सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या घटनेच्या कलम ३७७ बाबत विषय द्यावा का या संदर्भात आम्ही चर्चा करु लागलो. पहिल्यांदा तर असा विषय ठेवायला नको कारण स्पर्धा जिंकण्याच्या नादात या बाबत चुकीचे बोलले जाण्याची शक्यता होती. शिवाय तसा हा विषय सामाजिक दृष्टीने संवेदनशीलच आहे कारण समलिंगी संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असला तरी त्या निर्णयाला सार्वत्रिक स्वरुपात स्विकारले गेलेले नाही त्यामुळे यासंदर्भात महाविद्यालयीन विद्यार्थी सकस चर्चा करु शकतील का याबाबत आमच्या मनात शंका होती. सोबतच या  विषयाच्या संदर्भात मत मांडायचे झाल्यास अभ्यास केल्याशिवाय मांडता येणार नाही आणि विदर्भातील मुले मुली तेवढा अभ्यास करुन येतील का ही शंका देखील मनात होती हे प्रांजळपणे मी नमुद करतो आहे. कारण जेव्हा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला तेव्हा पुण्याच्या काही महाविद्यालयांमधे त्याच दिवशी या संदर्भात विद्यार्थ्यांमधे चर्चा झाल्याचे माझ्या कानावर होते. परंतू आपल्या भागात मुले मुली या संवेदनशील विषयावर सखोल चर्चा करतील का हा संभ्रम आम्ही सर्वांनीच बोलून दाखविला. या असल्या महत्वाच्या विषयावर उथळ चर्चा जर झाली तर वादविवाद स्पर्धेचा हेतूच सफल होऊ शकला नसता अकारण त्याचे शल्य बोचत राहीले असते. असा विषय ठेवणे ही सर्वच बाबतीत एक मोठी रीस्क होती. पहिल्या दिवशी आमची सभा कोणताही निर्णय करताच संपली. दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही सर्वांनी मिळून एक धाडसी निर्णय घेतला. वादविवादाचा विषय ठरला, सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करणे हा सामाजिक दृष्टीने क्रांतीकारक निर्णय आहे.

वादविवाद स्पर्धेचा दिवस उजाडला. तोवर काही महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महिला महाविद्यालयात हा असा कसा काय विषय ठेवण्यात आला अशी चर्चा देखील माझ्या कानावर आली होती. परंतू स्पर्धा होईपर्यंत मी त्यावर भाष्य करण्याचे टाळले. स्पर्धा झाल्यावर जर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र आपले चुकले हे मान्य करण्याची माझ्या मनाची तयारी झाली होती. माझे सहकारी देखील त्याच मनःस्थितीमधे होते. परंतू ज्यावेळी ही स्पर्धा सुरु झाली हळू हळू पूर्णत्वाला गेली त्यावेळी मनातील सर्व धोके बाजुला सारुन, तरुण विद्यार्थ्यांच्या क्षमतांबद्दलचे शंकेचे मळभ दूर होऊन मी मोठ्या आनंदाने अध्यक्षीय भाषण करायला उभा झालो तेव्हा मी पहीलेच वाक्य उच्चारले की, माझ्यासकट आयोजन समितीतल्या प्रत्येकाला आज कृतार्थतेचा अनुभव येतो आहे आपले विद्यार्थी मित्र मैत्रीणी इतक्या समृद्ध परीपक्व विचारांचे धनी आहेत हे शब्दातीत सुख मी आज अनुभवतो आहे. माझा शब्द शब्द खरा होता कारण त्या दिवशी घडलेच तसे खास होते.

वेगवेगळ्या महविद्यालयांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी बोलणे सुरु केले त्यांनी त्या सभागृहामधे जी विचार मौक्तिके मांडली त्यांना तोड नव्हती. कलम ३७७ संबंधात एवढी सखोल सकस चर्चा मी हा निर्णय आल्यापासून ऐकलेली नव्हती. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक स्पर्धकाने या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन आपला टोन हा वादविवादाचा ठेवता चर्चेचा ठेवला होता. प्रतिस्पर्ध्याचे मुद्दे खोडून काढताना देखील कुणीही बोलण्याच्या मर्यादा सोडल्या नव्हत्या ज्या गोष्टीची  वादविवाद स्पर्धेमधे हमखास शक्यता असते. परंतू असे एकही वाक्य कोणत्याही तरुण-तरुणीने उच्चारले नाही. उलटपक्षी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. खरे तर तो वादविवाद राहता संवादच घडत होता. कलम ३७७ संबंधीचे विस्तृत विवेचन तर या मुलांनी केलेच परंतू या संदर्भातील जागतिक स्थिती देखील मांडली. जगात कोणकोणत्या देशांमधे समलैंगिक संबंध किंवा तृतियपंथी समाज घटकाबद्दल कोणकोणते कायदे अस्तित्वात होते. कोणकोणत्या देशांनी कशा प्रकारे या कायद्यांमधे सुधारणा केली, या सुधारणा करीत असताना सामाजिक व्यवस्थांमधून कशा प्रकारची आंदोलने उभी झाली, त्यांना कोणकोणत्या पातळीवर विरोध झाला, त्या विरोधामागील राजकीय सांस्कृतिक कारणे कोणती होती या सर्व बाबी विद्यार्थ्यांनी तपशीलवार मांडून अक्षरशः उपस्थितांची मने जिंकली. सदर कायदा भारतात राबविला जाताना त्या कायद्याचे स्वातंत्र्यपूर्व काळातील उगमस्थान कोणते. त्यामधे आतापर्यंत न्यायालयीन पातळीवर कोणकोणत्या पद्धतीचे निर्णय झाले भारतात या कायद्याचे उन्मुलन ही सामाजिक दृष्टीने क्रांतीकारक बाब आहे अथवा नाही या संदर्भात अतिशय वैचारिकतेने मते मांडली गेली. सदर स्पर्धेत विरोधात बोलणाऱ्या स्पर्धकांनी देखील भारतीय समाजमन, परंपरांचा आपल्याला असलेला वारसा, या निर्णयाचे सामाजिक दृष्टीने विपरीत परीणाम या सर्व बाबींचा उहापोह केला. या विद्यार्थ्यांनी देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर काही देशांनी या संदर्भात काही स्वतंत्र योजना केल्या आहेत जेणे करुन सामाजिक सौहार्दता कायम राहील त्यांचीही चर्चा केली. सर्वात महत्वाची बाब जी मला अतिशय जास्त उल्लेखनीय वाचली त्या गोष्टीकरीता तर मी या सर्व मित्र-मैत्रीणींचे त्यांना या संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मार्गदर्शकांचे मनापासून अभिनंदन केले कारण ती बाब फारच महत्वाची शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाला खरे तर प्रत्येकालाच अभिमानास्पद होती. सदर निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे विषयामधे ही त्याचा उल्लेख आहे परंतू एकाही विद्यार्थ्याने चुकुनही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय चुकला असे एकदाही म्हणले नाही. या निर्णयाचे समाजिक परीणाम याच मुद्द्यांभोवती सारे जण बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत एक अवाक्षरही काढता त्याचा मान राखण्याचे कार्य सर्वांनी केले. ही संयत विचारक्षमता अश्या प्रकारचे सादरीकरणाचे भान खरोखरीच कौतुकास्पद होते.

तरुणाईचे हे मी मांडलेले रुप त्या दिवशी त्या सभागृहात सर्वांनीच अनुभवले. तो विचारांचा सुंदर प्रवाह बघितल्यावर या पिढीला केवळ दोष देत बसण्यापेक्षा यांना चांगल्या विचारधारेमधे आणणे हे फार महत्वाचे आहे. कारण त्यांचे स्वतःचे जग त्यांनी बनविले असले तरी आपण त्यांना ते बनवू दिलेय हे सत्य नाकारता येत नाही. त्यांच्या जगात जाऊन त्यांना अश्या चांगल्या विचारप्रवाहामधे आणणे हे आता आपले कर्तव्य आहे. त्यांच्या आपल्या वेगवेगळ्या जगातच वादविवाद होण्यापेक्षा संवाद होणे गरजेचे आहे. होय ना?







Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23