थोडा है थोडे की जरुरत है @08.01.19

भाईगीरी

एक किस्सा सांगतो. एके दिवशी तीन मित्रांना जरा दारुचे पेग घ्यायची इच्छा होते. त्यातला एक मित्र त्याच्या घरी बाटलीत जेवढी आहे तेवढी घेऊन येतो. तेवढ्यात तिघांचे भागणार नसते. रात्रीची वेळ असल्याने दुकाने देखील बंदच. अश्यावेळी काय करावे या विवंचनेत असलेले ते तिघे थोडा वेळच विचार करतात. तेवढ्यात त्यातला एक तातडीने निघतो. इतर तिघांना सोबत घेऊन. जबरदस्तीनेच. एका मोठ्या महालवजा घराजवळ गाडी थांबते. ते तिघे आले असतात चंपुताईकडे. रात्रीच्या वेळी चंपुताईकडे त्यांची सोय होईल असे त्यांना वाटत असते. परंतू दारावर थाप मारतानाच लक्षात येते की आतमधे कुणाचे तरी गाणे सुरु आहे. आवाज ओळखीचा असतो. तिघेही एकदमच म्हणतात, हा काय करतोय? चंपुताईने याला बोलावले आणि आपल्याला नाही. तोपर्यंत दार उघडलेले असते. चंपुताईवर हे तिघेही रागावतात आणि रागानेच म्हणतात तू त्याला बोलावतेस आम्हाला नाही. आम्ही जातो. चंपुताई त्यांना आग्रह करते. तिघेही आतमधे येतात. त्या गायकाच्या बाजुने बसतात. त्याची ती चीज ऐकण्यात लगेच रममाण होतात. चंपुताई लगेच त्यापैकी एकाच्या बायकोला फोन करुन बोलावून घेतात. सुरु असलेली चीज संपताच तिघांपैकी एकाला एक नवा अभंग गाण्याची फर्माईश होते आणि बाकी दोघे ऐकू लागतात. शिल्लक राहीलेला तिसरा लगेच सर्वांच्या आग्रहास्तव हार्मोनियम वाजवायला बसतो. भरभर त्याची बोटे त्यावरुन फिरायला लागतात आणि कमावलेल्या आवाजात अभंग सुरु होतो, कानडा राजा पंढरीचा. अभंग रंगायला लागतो. उरलेल्या दोघांनाही रहावत नाही. ते देखील त्यात सुर लावतात गायला लागतात. ती त्रयी गात असताना सोबत चौथ्याचे हार्मोनियम सुरु असताना तो जो सुरांचा संगीताचा अद्भुत आविष्कार तेथे निर्माण होतो त्या आविष्कारात ते तिघे आपण काय घ्यायला चंपुताईकडे आलो होतो हे पार विसरुन जातात. कारण आता त्या दारुच्या पेगमुळे येणाऱ्या धुंदीपेक्षाही कितीतरी मोठी सकस आनंद देणारी धुंदी त्याना चढली असते. ती धुंदी असते कलाविष्काराच्या आधारे जीवन समृद्ध करण्याची. ती धुंदी चढली की मग बाटली आणि पेग यामधून मिळणारी क्षणिक धुंदी देखील फिकी पडते. त्याची आठवण देखील रहात नाही. कलाप्रेमाची व्याप्तीच अशी असते की ती क्षणाक्षणाला व्यक्तीला समृद्ध बनवित नेते त्यामुळे आनंद जीवन जगता येते. त्या चौघांचे आणि तेथे बसलेल्या सर्वांचेही असेच होते. संगीताच्या आनंद सागरामधे रममाण झालेले आपल्या कलासाधनेने त्यामधील स्वरमौक्तिके उधळून आनंद घेणारे भरभरुन आनंद देणारे ते चौघे कोण होते ठाऊक आहे? सुरुवातीला गात बसलेले होते पं. कुमार गंधर्व, ज्यांनी अभंग गाणे सुरु केले ते होते पं. वसंतराव देशपांडे, ज्यांनी त्या अभंगामधे आपल्या विशिष्ट पद्धतीने स्वरांचे रंग भरले ते होते पं. भिमसेन जोशी हार्मोनीयमवर या साऱ्यांना समर्थपणे साथ करणारे हरहुन्नरी व्यक्तीमत्व होते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात भाई.

भाई व्यक्ती कि वल्ली नावाच्या एका नव्या चित्रपटातील हा प्रसंग. हा आनंदसोहळा पडद्यावर या चार मंडळींचा स्वराविष्कार समोर बसून ऐकणाऱ्या चंपुताई आणि सुनिता देशपांडे यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू आणत नाही तर प्रेक्षागृहातील प्रत्येकालाच ते सारे अभूतपूर्व वाटून आनंदाने भरुन येते. कलेच्या प्रांतात संपुर्णपणे समर्पित असलेल्या या सर्व थोर लोकांचे आयुष्य आनंदी, उत्साही आणि भरभरुन लोकांना सुख देणारे म्हणजेच एकंदरीत अतिशय यशस्वी कसे असते हे सांगणारा चित्रपट म्हणजे भाई- व्यक्ती की वल्ली. पु. लं. च्या जीवनावरील हा चित्रपट अर्थात बायोपीक म्हणजे त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या किस्स्यांचे एकत्रीकरण नव्हे तर हा चित्रपट एक विचार देतो, साधा पण अतिशय महत्वाचा. हा चित्रपट आपल्या पैकी अनेकांना पडलेल्या एका जटील प्रश्नाचे सहज सरळ उत्तर देतो. प्रश्न असा आहे की या बदलत्या काळात जेथे माझ्या सभोवताली अनेक विविध प्रकारच्या समस्या आहेत, विवंचना आहेत त्या परीस्थितीत मी आनंदाने कसे जगायचे? आणि या जटील प्रश्नाचे या चित्रपटाने दिलेले सोप्पे उत्तर म्हणजे, कोणत्यातरी कलेच्या प्रांतात आपली रुची निर्माण करा त्याच्यातील आनंदक्षणांमधे स्वतः ला झोकून द्या, जीवन आपोआप आनंदी बनेल.

महेश मांजरेकरांनी बनविलेला हा एक सर्वांगसुंदर चित्रपट. भाई व्यक्ती की वल्ली? शिर्षकामधे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तरच हा चित्रपट देतो. वल्ली बनून जीवनाच्या प्रत्येक क्षणाला कलात्मकतेने आनंददायी बनवीत स्वतःसोबतच इतरांच्याही आयुष्यात आनंदाचे वसंत फुलविणारी आपल्याला जवळची वाटणारी व्यक्ती म्हणजे, भाई! पु.लं. च्या अफाट जीवनाचा हा पहिला भाग बघताना जीवन समृद्ध कसे होत असते याचा धडाच मिळतो. उत्तुंग प्रतिभा लाभलेल्या वेगवेगळ्या मंडळींच्या एकत्र सहवासातील जीवन कसे असू शकते, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन जर मजेदार आणि सहज असेल तर ती हसरी सहजता किती लोभस असू शकते या साऱ्या गोष्टींचा सुरेख उलगडा या चित्रपटात मांजरेकरांनी केला आहे. सबंध चित्रपटात मांजरेकर दिग्दर्शक म्हणून कुठेही पु.लं. च्या व्यक्तीमत्वावर आक्रमण करीत नाहीत. ज्या सहजतेने पु. लं.नी जीवनातील हसु आणि आसुचा मेळ बसविला आनंदी जीवन जगून अनेकांना आनंदी केले तसाच हा चित्रपट सहज आनंद देत जातो. खुसखुशीत विनोद, छोट्या छोट्या गमती जमती, संयतपणे हाताळलेले कारुण्य प्रसंग, मराठी भाषेच्या दर्जेदारपणाचा सहज परीचय, कलाकार लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध हे सारे विलक्षण देखणे आणि विलोभनीय आहे. मराठीतील सर्वच मातबर मंडळी या चित्रपटात आहेत परंतू सागर देशमुख आणि इरावती हर्षे यांनी पु.. आणि सुनिताबाईंच्या भुमिका समर्थपणे उभ्या केल्या आहेत. सध्याच्या आपल्या सभोवतालच्या काळात हा चित्रपट म्हणजे रणरणत्या उन्हात अचानक गोड वाऱ्याची झुळुक यावी सहजच तिने सुखावून जावे अश्या पद्धतीचा आनंद देणारा अनुभव आहे. त्याचे कारण ही कहाणी एका आनंदयात्रीची आहे.

जीवन जगण्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाने ती आखणी केली असते. त्याची सवय झाली की मग त्याच चौकटीत त्या व्यक्तीला आनंद मिळायला लागतो. महत्वाची बाब ही आहे की असा आनंद घेण्याची प्रक्रीया आपण आपल्यापुरती सिमित ठेवली आहे की या आनंद प्रक्रीयेमधे आपण आपल्या जीवाभावाच्या लोकांना किंवा इतरांनाही सामील करुन घेतो की नाही हे तपासणे. स्वतः पुरता आनंद मिळविण्याच्या अनेक पद्धती आहेत बरेच लोक ते करीत असतात. परंतू असा सिमित आनंद काही दिवसांनी तोच तो पणा येऊन रुक्ष वाटू शकतो. परंतू कलाक्षेत्रामधे कोणत्या ना कोणत्या प्रकारात रुची असलेले मंडळी मात्र त्यामधून मिळणारा आनंद एकमेकांना देत जगतात त्यामुळे त्यांचा आनंद हा वाढता कायम वैविध्यपूर्ण राहतो. त्याची व्याप्ती वाढत जाते या मंडळींना भरभरुन जीवन जगता येते. शेवटी जीवनाचा हिशोब मांडताना हेच तर मांडावे लागते ना?

पहाटेच्या सूर्यनारायणाला स्मरुन एक सुंदर दिवस जगायला दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानून जगणे सुरु होते तो दिवस सरताना दिवसातील सर्व क्षणांना मनापासून जगत, प्रेम करीत, आनंद घेत देत, मनमुराद हसु फुलवित विविध कलांचा आस्वाद घेत कृतार्थतेचा अनुभव मिळविणे म्हणजेच तर यशस्वी जीवन होय. होय ना? हे जीवन कसे जगायचे हे आपल्याला सहज सोप्या पद्धतीने शिकवितो, भाई : अफलातून व्यक्तीमत्व असलेली वल्ली!! जीवनाच्या निखळ आनंद क्षेत्रातील ही भाईगीरी बघायलाच हवी आणि मनात रुजायलाही हवी!! 





Comments

  1. मी पण कालच पहिला चित्रपट,फेसबुक वर पण शेअर केलंय माझं मत.एकच खटकलं,भाईंचं स्मोकिंग दाखवणं(करणं नव्हे, त्याबद्दल मी काय आणि कसं बोलणार),ते टाळता आलं असतं तर बरं झालं असतं. मोठ्यांचा आदर्श लहान ठेवतात ना?आणि लहानांना स्वतःच्या अवगुणाच समर्थन करायला असे संदर्भ कामी येतात.असो, सिनेमा छान,तुमचं परीक्षण/भाष्य देखील अप्रतिम च👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23