थोडा है थोडे की जरुरत है @27.11.18

हॅश टॅग चांगुलपणा

तंत्रज्ञानाच्या जगात नवनविन गोष्टींची उत्पत्ती रोजच होत असते. त्याचा वेग देखील इतका जास्त आहे की या बाबी समजून घेण्यासाठी कधीकधी आपल्याला या वेगाची सवय असलेल्या नव्या पिढीची मदत घ्यावी लागते. एक अशीच मदत मला मिळाली एक नवा प्रकार समजून घेण्याकरीता. फेसबुक किंवा व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मिडीयावर एक गोष्ट वापरली जाते ती म्हणजे हॅश टॅग. सुरुवातीला मला हा प्रकार कळत नव्हता परंतू माझ्या मुलीने तो मला समजावून सांगितला. सोशल मिडीयावर वेगवेगळी मते मांडताना जर आपल्याला काही नावे किंवा एखादा महत्वाचा शब्द ठळकपणे मांडायचा असेल तर हॅश या चिन्हासह तो लिहायचा म्हणजे तो शब्द टॅग होतो त्यामुळे आपल्या लिखाणामधील त्या शब्दाच्या आधारे लोकांना आपले लिखाण शोधायला मदत होते. त्या शब्दाच्या आधारे जास्त लोकांपर्यंत आपल्याला आपले विचार पोहोचविता येतात. साधारणपणे काही बाबी ठळकपणे मांडायच्या असतील तर या हॅश टॅग चा छान उपयोग होऊ शकतो. याचा विचार करताना माझ्या मनात एक विचार पटकन आला की असा हॅश टॅग आपल्याला आपल्या जिवनातही लावायला हवा. जिवन जगत असताना ज्या चांगल्या गोष्टींमुळे आपल्याला सामाजिक दृष्टीने जगण्याचा आनंद मिळतो त्याला हॅश टॅग लावायला हवा. यासोबतच जर आपल्याला कुण्या व्यक्तीच्या जगण्यामधील एखादी गोष्ट भावली, जर आपल्याला ती गोष्ट महत्वाची वाटली तर त्याला हॅश टॅग लावून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसरीत केली पाहीजे. जेणे करुन नकारात्मक वातावरण जाणिवपूर्वक निर्माण करणाऱ्या, मुद्दाम जातीपातींच्या चर्चा घडवून विद्वेष निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींच्या समोर हे चांगल्या वागणूकीचे हॅश टॅग आपल्याला उभे करता येतील. त्या निमित्ताने आपण आपल्याला भेटणाऱ्या लोकांमधील चांगले काय हे बघण्याच्या दृष्टीने विचारांची ठेवण तयार करु त्यामुळे आपल्याला अनेक हॅश टॅग लोकांसमोर आणता येतील. आज या लिखाणाच्या निमीत्ताने मला नुकताच भेटलेला एक हॅश टॅग तुमच्यासमोर आणायचा आहे.

गेल्या आठवड्यात आम्ही काही मित्र मंडळी अंदमानच्या आनंद सफरीवर गेलो असताना मला तो भेटला. लौकिकार्थाने एक अतिशय साधा माणूस पण त्याच्या जिवनाचे एक छोटेसे तत्व त्याला मोठा हॅश टॅग देण्यासारखे होते. पोर्ट ब्लेअरच्या तिसऱ्या दिवशीच्या मुक्कामामधे आम्ही सारे एका विशिष्ट ठिकाणाला भेट देण्यासाठी निघालो. बारटांग. अंदमानमधील हे एक विशिष्ट ठिकाण आहे कारण या ठिकाणी जिवंत चुनखडीच्या गुफा बघता येतात जेथे जुनखडीचे दगड प्रत्यक्ष वाढताना आपण बघु शकतो. यासोबतच तेथे पोहोचत असताना ज्या घनदाट जंगलामधून प्रवास करायचा असतो तेथे जारवा या आदीम आदिवासी जमातीचे लोक बघायला मिळतात. एकंदरीत अंदमान सहलीतला तो दिवस आमच्यासाठी हॅश टॅग दिवस होता. जंगलात गाड्या सोडण्याचा कालावधी ठरलेला आहे पोलीसांच्या निगराणीमधे सर्व गाड्या एकाच वेळी सोडल्या जातात. सकाळी नऊ वाजता उघडल्या जाणाऱ्या गेटवर नंबर लावण्याकरीता आम्ही सकाळीच निघून रांगेत लागलो. साधारण दोनशे गाड्या रांगेत होत्या. सकाळची वेळ असल्याने लोकांच्या सोयीसाठी तेथे छोटे छोटे हॉटेल्स उभारलेले आहे जेथे खाद्य पदार्थांची विक्री सुरु होती. या हॉटेलपैकी एका हॉटेलमधेच मला एक हॅश टॅग भेटला

साधारणपणे कोणत्याही अश्या हॉटेलमधे आपल्याला माहित असलेले चित्र असे असते की पदार्थ बनविणारा ऑर्डर घेणारा असे किमान दोन लोक असतात. एक जण ऑर्डर घेतो एक पदार्थ बनवितो त्यामुळे हिशोब व्यवस्थित ठेवता येतो. बरेच वेळा फार गर्दी झाली की मग ऑर्डरप्रमाणे प्लेट झाल्या की नाही या संदर्भात भांडणे देखील होताना आपल्याला दिसतात. गर्दी झाली की हे चित्र साधारणपणे गृहितच असते. परंतू मला भेटलेल्या हॅश टॅगच्या दुकानात मात्र फारच वेगळे चित्र होते. त्यापेक्षाही जास्त महत्वाचे म्हणजे त्या सर्व प्रकाराबद्दल जेव्हा आम्ही त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा त्याने दिलेले उत्तर मी त्याला हॅश टॅग लावावा असेच होते. साधे काम करणारा एखादा एकवीस वर्षांचा पोरगा देखील इतका छान विचार करु शकतो, इतकेच नव्हे तर त्या विचाराची अंमलबजावणी करु शकतो याचे फारच आश्चर्य वाटले. शोधण्याची इच्छा असेल तर हॅश टॅग चांगुलपणा कुठेही सहजच मिळू शकतो याचे तो पोरगा म्हणजे मुर्तीमंत उदाहरण होते

इतर दुकानांप्रमाणेच इडली, वडा, चहा, कॉफी असे खाण्या पिण्याचे जिन्नस पुरविणारे त्याचे छोटेसे हॉटेल ते होते. परंतू इतर दुकानांप्रमाणे किमान आवश्यक दोन लोक येथे नव्हते. तो एकटाच होता. पदार्थ बनवून तो समोरच्या भांड्यात टाकायचा समोर उभ्या असलेल्या गर्दीने ते उचलून खाणे सुरु करायचे. ऑर्डर नाही की प्लेटचा हिशोब नाही. त्याने स्पष्ट विनंती केलेली होती. आप लोग सब ग्रुपमे आये है, आप खाईये और आपही हिसाब करके मुझे पैसे दिजीये. हा प्रकार फारच वेगळा होता. आमच्या वीस जणांच्या ग्रुप सोबत तीन चार ग्रुप आणखी होते. जसे जसे तो पदार्थ बनवित होता तसे तसे चारही ग्रुपमधील वेगवेगळे लोक समोर येतील ते पदार्थ आपापल्या डीश मधे घेऊन आस्वाद घेत होते त्याचा काहीच हिशोब नव्हता. त्या पोराचा हा अव्यवहारिक प्रकार बघून आम्हालाच त्याची चिंता वाटली म्हणून आमच्या ग्रुपमधील प्रत्येकाला आम्ही सूचना केली की प्रत्येकाने स्वतः खाल्लेल्या पदार्थांची संख्या लक्षात ठेवायची. सारे आटोपल्यावर त्या मुलाला पैसे विचारले तर तो हसून म्हणाला की आप लोग हिसाब करके जो होता है वो दे दो. त्याने प्रत्येकच ग्रुपला असेच सांगितले. आम्हाला त्याच्या त्या वर्तनाचे फारच जास्त आश्चर्य वाटत होते. पंधरा मिनीटापूर्वीच मी तेथे रस्त्यावर भटकंती करताना एका दुकानात प्लेटच्या संख्येवरुन झालेले भांडण बघून आलो होतो. परंतू येथे फारच वेगळा प्रकार होता. आमच्या पैकी एका मित्राने सर्वांनी खाल्लेल्या पदार्थांची संख्या विचारुन एकूण बिलाचा हिशोब करुन त्या पोराच्या हातात रक्कम ठेवली त्याने ती मोजता सरळ त्याच्या डब्यात ठेऊन दिली आणि तो पदार्थ बनविण्यात गर्क झाला. त्याच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीचे मला कौतुकच वाटले परंतू त्याच्या नुकसानाबद्दल काळजी देखील वाटली. कारण माझ्या समोर पाच जणांचा एक ग्रुप त्याच्याकडून पदार्थ खाऊन गर्दीचा फायदा घेत एक छदामही देता निघून गेलेला मी बघितला. त्यामुळे त्याला पैसे देताना मुद्दाम आम्ही या साऱ्या प्रकाराबाबत त्याला विचारले. यासंदर्भात त्या पोराचे उत्तर मनाला सुखद आनंद देणारे तर होतेच परंतू जिवनात काही मुल्य जोपासायची असतील तर उच्चविद्याविभूषितच असायला हवे असे अजिबात नाही तर साधे पणाने जिवन जगत असतानाही मुल्यांची जपणूक केली जाऊ शकते याचा प्रत्यय आला

तो मुलगा म्हणाला, सर! मै हिसाब रखताही नही. लोग अपना हिसाब करके पैसे देते है और मै रख लेता हूँ. मैने आजतक कभी हिसाब किया नही, लोगोको नास्ता खिलानेमे मुझे आनंद मिलता है और वो उसका पैसै दे देते है. अक्षरशः कमाल होती ती त्या मुलाची. परंतू माझ्या मनात पैसे देता निघून गेलेला ग्रुप होता म्हणून मुद्दाम त्याला मी विचारले की कधी कधी लोक पैसे देता जात असतील तर मग तुझे नुकसान होते त्याचे काय? त्यावर तो मुलगा जो बोलला तो खरा त्याच्या चांगुलपणाचा हॅश टॅग होता. तो म्हणाला, सर, ऐसा नही होता. लोग सारे अच्छे है और इमानदारीसे पैसे दे देते है. कोयी प्रॉब्लेम नही होता. असे म्हणून मस्तपैकी हसून गरमा गरम चहाचा कप हातात देऊन मला तो म्हणाला, कोयी नही सरजी!! 

माझ्या दुकानात येणारा प्रत्येक माणूस हा प्रमाणिक आहे पदार्थांचा आस्वाद घेतल्यावर त्याचे पैसे प्रामाणिकपणे देणारच आहे हा लोकांवरच्या चांगुलपणावरचा त्या छोट्याश्या दुकानमालक पोराचा विश्वास त्याच्याबद्दल एक मोठा हॅश टॅग माझ्या मनात उमटवून गेला. चला तर आपले जिवन विचार समृद्ध करणारे असे चांगुलपणाचे हॅश टॅग शोधुयात आपली मने कलुषित करणाऱ्या विचारांपुढे सक्षमपणे उभे करुयात कारण तसेच हॅश टॅगच शाश्वत असतात. होय ना?





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23