थोडा है थोडे की जरुरत है @ 06.11.18

गीफ्ट

पुन्हा एकदा त्याच मुद्दयावर त्या दोघांचा वाद झाला असावा असे मला वाटले. एकंदरीत हे पुढे लिहील्याप्रमाणे असावे. तिचा वाढदिवस आणि तो दिवस त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा. जसा जसा तिचा वाढदिवस जवळ येऊ लागतो तसा तसा त्याचा उत्साह वाढायला लागतो. क्षणांना पकडायचे त्यांना सुंदर रितीने साजरे करायचे ही त्याची सवय. त्यामुळे तिचा वाढदिवस तर त्याच्यासाठी पर्वणी. साधारण एक महिन्यापासून तिच्या वाढदिवसाला काय भेट द्यायची याबाबत त्याचा विचार सुरु होत असावा. भेटवस्तू अशी द्यावी की ती दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला सुखद धक्का बसावा आणि तो सुखाचा धक्का बसताना चेहेऱ्यावर येणारे ते नेमके भाव बघता यावे याला आनंद म्हणतात, अश्या विचारांचा बहुदा तो. सर्वांच्याच बाबत असा विचार करणारा तो, त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तीसाठी तर असा विचार करणार नाही तरच नवल. हे वर्ष देखील अपवाद नव्हते. एक महिन्यापासूनचा विचार शेवटी एका सुंदर भेटवस्तूच्या रुपाने त्याने तिच्या हातात ठेवला. डोळे बंद करायला लावले मग ती छान वस्तू तिच्या हातावर ठेवली. तिने डोळे उघडले आणि कसला आनंद झाला तिला.. आनंदाने डोळ्यात दोन आनंदाश्रू ओघळले. त्यांना आपल्या हाताने पुसून तो म्हणाला, कोयी नही! (पंजाबी भाषेतला तो उच्चार, काही होत नाही या अर्थाने त्याने वापरला, कारण ते संभाषण हिंदीत सुरु होते) कसला आनंद झाला त्याला. परंतू जशी तिची नजर त्या वस्तूच्या त्याच्याकडून चुकून राहीलेल्या किंमतीच्या टॅगवर गेली, तिचा नेहेमीचा प्रश्न आला. इतके महाग कशाला? आणि ही वस्तू द्यायलाच हवी का? नेहेमीप्रमाणेच पुन्हा तिने तसे म्हणल्यामुळे साहेब भडकले. आणि तावातावात त्याने त्याचा मुद्दा मांडला

तू प्रत्येकवेळी भेट घेताना आनंद व्यक्त करतेस परंतू त्याला ही जोडणी लावण्याची काय गरज आहे? आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू का देतो? त्याच्याकडे त्या वस्तू नसतात म्हणून किंवा त्या वस्तू घेण्याची त्याची स्वतःची ऐपत नसते म्हणून का? नाही. भेटवस्तू देणे ही एक अत्यंत सुखद गोष्ट आहे. भेटवस्तू देताना ती केवळ खरेदी केलेली नसते तर जिला कुणाला आपण ती देतोय त्या व्यक्तीचा स्वभाव, आवडी निवडी या साऱ्या गोष्टी आपण विचारात घेतलेल्या असतात. आवडता रंग, आवडती सवय, जवळ नसलेली परंतू हवी असलेली एखादी गोष्ट जी आपल्याला संवादातून कळलीय, ती आपण बरोबर लक्षात ठेऊन तिच घेणे हे सारे मजेदार असते. यामधून ती केवळ भेटवस्तू रहात नाही तर आपल्या जवळच्या व्य्क्तीला आपण किती ओळखतो, तिच्याकडे आपले किती लक्ष आहे, तिच्या जीवनात आपण किती सम्मीलीत आहोत या सारख्या अनेक गोष्टी त्यात साध्य होत असतात. अशी वस्तू घेताना त्याची किंमत बघितली जात नसतेच कारण ती केवळ निमीत्तमात्र असते. खरी किंमत त्याला प्राप्त होणार असते माझ्या सर्वात जवळच्या व्यक्तीने ती स्विकारल्यावर आणि या सर्व गोष्टी साध्य केल्यानंतर येतो तो क्षण जो मी आताच काही क्षणापूर्वी अनुभवला. तुला ती भेट दिल्यावर, तुझ्यासवयी प्रमाणे त्याच्यावरचा तो गुळगुळीत कागद पुन्हा वापरता यावा या हेतूने तू हळूवारपणे काढल्यावर, जेव्हा ती वस्तू तुला दिसली तेव्हा तुझ्या चेहेऱ्यावर निर्माण झालेला आनंद प्रकाश जरी तुझ्या आनंदाचे प्रतिक असला तरी तो माझ्या मनाला किती उजळून टाकतो ठाऊक आहे? त्या आनंदाच्या भरात तुझ्या डोळ्यातून वाहलेले ते दोन आनंदाश्रू आणि त्यानंतर समाधानाने माझ्या खांद्यावर तू टेकविलेले डोके हेच तर खरे सुख आहे. परंतू त्यानंतर त्या वस्तूची किंमत बघून तू विचारलेला प्रश्न कशाला हवाय? त्या प्रश्नाने त्या भेटवस्तूपासून वेगवेगळ्या प्रकारे मिळालेला आनंद कमी होतो ना! मग कशाला विचारतेस? शिवाय ही भेटवस्तू देतानाचा हेतू, याचा वापर तू जेव्हा जेव्हा करणार तेव्हा तेव्हा तुला माझी आठवण यावी हा देखील आहे. ती केवळ वस्तू नाही तर माझे अस्तित्व आहे तुझ्याजवळचे. तसे तर मला तुझ्याजवळ कायम राहता येत नाही मग निदान या भेटवस्तुंच्या निमित्ताने तरी मी तुझ्याजवळ राहू शकतो. आणि तू विनाकारण, त्याच्यापुढे त्याला बोलविले नाही. सुरेख प्रेमात पडलेले दोन जण नागपूरला जाताना शिवशाही बसमधे माझ्या समोरच्या सीटवर प्रवास करीत होते त्यांचा हा संवाद मला अगदी स्पष्ट ऐकू येत होता. आतापर्यंतच्या संवादावरुन त्या मुलाचे अगदी बरोबर आहे असे मला वाटत होते. त्याची तिला भेटवस्तू देण्यामागची इतकी गोड भावना बघून मला प्रेमातील इतकी संवेदनशीलता सध्याच्या काळातही आहे याचेच आश्चर्य वाटले. तुर्तास मी त्याच्या बाजुने होतो. तो म्हणत होता ते खरे होते

आपल्यावर इतके मनापासून प्रेम करणारा आपला मित्र चिडला म्हणल्यावर मात्र तिने पटकन त्याचा हात हातात घेतला त्याला सॉरी म्हणले. त्याचाही राग लगेच गेला. परंतू मुलीने आपला मुद्दा मात्र सोडला नव्हता. तो शांत झाला म्हणल्यावर ती म्हणाली, तू म्हणतोस ते बरोबर आहे. माझी तर मान्यता आहे की मी अतिशय भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखा सोबती लाभलाय जो माझ्या बाबत इतक्या संवेदनशीलतेने विचार करतोय. मी तुझ्या भेटवस्तुंमागील भावना समजून घ्यायलाच हवी. मी घेते रे, परंतू माझे पण याबाबत काही म्हणणे आहे. मघा सहजच कानावर पडलेल्या संवादाचा पुढचा भाग ऐकण्यासाठी आता मात्र मी काळजी पूर्वक ऐकायला लागलो. अत्यंत शांतपणे त्या मुलीने बोलणे सुरु केले. सोन्या, माझ्या घरी आपल्या या प्रेमाला मान्यता नाही. अनेक लोकांचे माझे घर आहे. तु जेव्हा मला एखादी भेट वस्तू देतोस तेव्हा तुझ्या चेहेऱ्यावरचा आनंद मला त्यामागचे तुझे माझ्यावर असलेले नितांत प्रेम समजावून सांगत असते. पण त्याच वेळी या भेटवस्तुंच्या रुपाने एक दडपण माझ्यावर येत असते. तु दिलेली भेटवस्तू माझ्यासाठी स्वर्गाहूनही प्रीय आहे परंतू माझ्या घरच्या व्यवस्थांमुळे मला ती वापरताही येत नाही रे. ही भेट वस्तू घरात ठेवायची कशी, त्यासंदर्भात विचारल्या जाणाऱ्या पन्नास प्रश्नांची पन्नास खोटी उत्तरे कशी द्यायची याचा मला ताण येतो. एका बाजुने मला तुझे मन मोडायचे नसते दुसऱ्या बाजूने मला माझ्या घरच्या पहाऱ्याची भिती वाटत असते. मी काय करु? आता तू इतकी सुंदर साडी माझ्यासाठी आणलीस परंतू ही नेसायला नि तुला दाखवायला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही आणि तेवढे दिवस माझे मन अक्षरशः जळत राहतं की मी तुझ्या भेटवस्तूला साधा न्यायही देऊ शकत नाही. मला काय वाटत असेल? मला समजून घे सोन्या. या साडीमुळे तर मला खूप आनंद झालाय परंतू यासोबत तू दिलेले मोगऱ्याचे ते सुंदर फुल मला जास्त भावते कारण ते माझ्या उशाशी ठेवून मी प्रेमपूर्वक तुझ्या अस्तित्वाचा तो छोटासा पण ताण विरहीत अंश आनंदाने माझ्या समवेत बाळगू शकते. ही साडी मात्र नाईलाजाने कोंबून ठेवावी लागते कुठेतरी आणि मग कधीतरी ती काढावी लागते कपाटातून तितके दिवस अपराधी वाटत राहते मला. म्हणूनच मला तू दिलेले मोगऱ्याचे फुल, तू म्हणलेली एखादी कविता, मला आवडतो म्हणून माझ्यासाठी खायला आणलेला गरमागरम समोसा, मला आवडणाऱ्या गाण्याची मुद्दाम माझ्यासाठी करुन आणलेली एखादी सीडी किंवा तू माझ्या सोबत आहेस शेवटपर्यंत हे सांगणारा माझ्या हातावर ठेवलेला तुझा आश्वासक हात या साऱ्या भेट वस्तू जास्त आवडतात. कारण या मला ताणविरहीत मनाने माझ्यासोबत बाळगता येतात त्यामधून तुझे अस्तित्व बिनधास्तपणे अनुभवता येतं. आणि अस्तित्वाचेच विचारशील ना सख्या, तर तुझ्या अस्तित्वाने माझे अवघे मन व्यापून गेलेय. या भेटवस्तू तरी काही काळानंतर मिटून जातील परंतू तुझे माझ्या मनातील अस्तित्व तर मात्र माझ्या अंतिम श्वासापर्यंत राहील ना? माझ्या मनात असलेले तुझे प्रेममयी अस्तित्व ही तर तू मला दिलेली सर्वात मोठी भेटवस्तू आहे. कळतंय का? आता दोन आनंदाश्रू ढाळ ण्याची पाळी त्याची होती. एकच वाक्य कसेबसे बोलला तो. तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून मी खूप भाग्यवान आहे. हे त्याला म्हणावेच लागले कारण तिचेही बरोबरच होते.

मला रवीनगरला उतरायचे असल्याने मी त्यांच्या आधीच उठलो. उतरताना अगदी सहजच मी त्या दोघांनाही एकत्रीतच म्हणालो, आयुष्यभर असेच रहा. माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेपर्यंत गाडी मला उतरवून त्यांना घेऊन पुढे निघून गेली होती.   





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23