थोडा है थोडे की जरुरत है @20.11.18

मध्यमवर्गीय ब्रँड

दिल्लीच्या कनॉट प्लेसमधील एका चकचकीत दुकानात त्या एका सॉक्सच्या जोडीची किंमत १५०० रुपये बघून मी दचकलो. मला असे वाटले की माझ्या वाचण्यात चूक झालीय किंवा त्या टॅगवर प्रिंटींग मिस्टेक झालीय. माझ्या बाजुला उभ्या असलेल्या, अत्यंत मृदू आवाजात बोलणाऱ्या, दुकानाच्या ड्रेसकोडनुसार विशेष युनिफॉर्म परीधान केलेल्या एका मुलाला मी परत एकदा त्या सॉक्सच्या जोडीची किंमत विचारली. त्याने इंग्रजी भाषेतच मला तिच किंमत सांगितली. माझ्या चेहेऱ्यावर आलेले ते मध्यमवर्गीय आश्चर्य बघून त्याने त्या किंमतीचे विश्लेषण सुरु केले. मी उभ्या आयुष्यात सॉक्स नावाचा प्रकार वापरलेला नसून मला त्याच्या वापरापासून सारे काही सांगायचे आहे या टोन मधे त्याने त्याची कथा सुरु केली. त्या आधी एक गोष्ट स्पष्ट करतो. सॉक्सची जोडी म्हणजे एका पायाचा एक दुसऱ्या पायाचा दुसरा. हे स्पष्ट केले कारण जोडी म्हणजे माझ्यासारख्या समस्त मध्यमवर्गीय बिचाऱ्या मंडळींच्या मनात एक अधिक एक म्हणजे दोन जोड असे येऊनच जाते. त्याने सांगितलेल्या कथेचा सार असा होता की ही सॉक्सची जोडी एका नामांकित ब्रॅन्डेड कंपनीची आहे आणि याचाच अर्थ असा की त्या कंपनीने हे सॉक्स नेमके कसे बनविले, त्यात मटेरीयल काय वापरले, त्याची किंमत इतकी जास्त का आहे, या कंपनीला हे बनवायला किती खर्च आला असेल, त्याची मूळ किंमत किती असेल, शोरुम मधे इतक्या महाग किंमतीत का विकतात, कदाचित हे सारे मेंटेन करण्याची किंमत आपल्याकडून वसूल करतात, म्हणूनच आजकाल मोठाल्या शोरुम चालत नाहीत, शेवटी काहीही असले तरी सॉक्स पायातच घालायचे आहेत असले मध्यमवर्गीय प्रश्न किंवा त्यांची आपण देत असलेली उत्तरे मनात आणता, ते सॉक्स घ्यायचे क्रेडीट कार्डने काहीही बोलता त्याचे पेमेंट करायचे एवढाच होतो. येथे डिस्काऊंट जर लिहीला असेल तरच मिळेल. बरोबर किंमत लगाना हे मराठी हिंदी मिश्रीत वाक्य या दुकानात उच्चारणे या दुकानात असभ्यपणाचे लक्षण मानले जाते. असो. मुळ मुद्दा हा की ते सॉक्स जेथून उचलले तेथे ठेऊन दे ते तुझ्या कामाचे नाही हे वाक्य बोलताही त्या पोराच्या चेहेऱ्यावर मला दिसले होते. परंतू माझा वैदर्भीय बाणा जागृत झाला मग मी त्या दुकानातल्या जवळपास सर्वच महत्वाच्या वस्तुंचे भाव बघणे सुरु केले. परंतू जसे जसे मी ते बघायला लागलो तसे तसे माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. घ्यायचे म्हणल्यास मी त्यापैकी काही वस्तू तर निश्चित घेऊ शकत होतोच. माझ्या जवळच्या क्रेडीट कार्डमधे तेवढे क्रेडीच निश्चितच होते. परंतू त्या वस्तूसाठी मी एवढी भली मोठी किंमत का द्यावी हा प्रश्न माझ्या मनात सारखा येत होता. उदाहरणार्थ लेदर बेल्ट ५५०० रुपयांना, हातरुमाल जोडी ९०० रुपयांना, पर्फ्युम ५४०० रुपयांना, लेदर बॅग २३००० रुपयांना, कीचेन ३२०० रुपयांना, वॅलेट ७५०० रुपयांना, टाय पीन २६०० रुपयांना, बुट कमीत कमी किंमत ९४०० रुपये पुढे १७३०० वगैरे देखील होती. या साऱ्या किंमती बघितल्यानंतर एक लेदर बेल्ट ५५०० रुपयाला किंवा सॉक्सची एक जोडी १५०० रुपयाला घेण्याची माझी कुवत होती परंतू माझे मन त्यासाठी तयार नव्हते. कदाचित मध्यामवर्गीय कुटुंबात जीवनाचे दृष्टीकोन तयार झाले असावेत म्हणून माझे मन धजावत नसेल किंवा तशी मला सवय नाही म्हणूनही असेल. परंतू पैसे जवळ असतानाही हा खर्च मला अनाठायी वाटत होता. ब्रॅंडेड या गोष्टींची सवय किंवा क्रेज असलेल्या (क्रेज हा शब्द कोल्ह्याला द्राक्षे आंबट या अर्थाने नाही तर मानसिकता या अर्थाने वापरलाय) मंडळींना ते कदाचित सहज शक्य असेल परंतू मला माझा मध्यमवर्गीय विचार हा खर्च करायला परवानगी देत नव्हता. अश्या पद्धतीच्या पाच ते सहा वेगवेगळ्या ब्रँडच्या दुकानांमधे अश्याच किंमती बघून काहीही घेता मी कनॉट सर्कलच्या बाहेर पडलो.

बाहेर पडल्यावर दुसऱ्या एका व्यवस्थेत जाण्याचा निर्णय घेतला. दिल्ली पालिका बाजार. अनेक दुकानांच्या त्या जमिनीखालील मार्केटमधे प्रवेश केल्याबरोबर कनॉट प्लेसच्या संपुर्णपणे वेगळा अनुभव अगदी दरवाज्यावरच आला. सॉक्स विकणारा एक पोरगा माझ्या जवळ आला मला त्याने चार सॉक्स जोड्यांची (येथे जोडी म्हणजे दोन पायाचे दोन मिळून एक जोडी अश्या चार जोड्या) एकुण किंमत २०० रुपये सांगितली. मी त्याची क्वालीटी बघितली नंतर घेऊ असा विचार करुन त्याला नाही म्हणून निघालो. त्यानंतर सुरु झाला खास पालिका बाजार स्टाईल व्यवहार. तो पोरगा माझ्या मागेच लागला. त्याने मला मी किती पैसे देऊ शकतो हे विचारणे सुरु केले. काय बोलावे ते सुचेना. त्याने भाव कमी करणे सुरु केले तो मला सॉक्स घेण्याची विनंती करु लागला. भाव कमी करता करता २०० रुपयाचे त्याने ८० रुपये सांगितलेआता मला त्या सॉक्सच्या क्वालिटीबद्दल शंका वाटू लागली. त्यामुळे मी ते घेता तेथून पुढे निघालो. तेथील प्रत्येकच दुकानात ब्रँडेडच्या नावाखाली वेगवेगळ्या वस्तू विकल्या जात होत्या. पण त्या वस्तूंच्या किंमती मात्र प्रत्यक्ष सांगायच्या द्यायच्या वेगवेगळ्या होत्या. या दोन्हीमधील तफावत दूर करणे हे दुकानदाराचे कसब बघण्यासारखे असते. वस्तूची किंमत इतक्या मोठ्या प्रमाणात कमी केली जाते त्यासाठी इतका संघर्ष करावा लागतो की प्रत्येक वेळी अजूनही किंमत कमी केली असती असाच भाव प्रत्येकाच्या मनात येतो त्यामुळे येथे वस्तूच्या क्वालिटीपेक्षा किती कमी भावात मिळाली हे केंद्रीभूत ठरते. कारण एकदा दुकान सोडले की ती वस्तू आपली झाली असते त्यानंतर त्यामधे काहीही डीफेक्ट असल्यास तो दुकानदार आपल्याला ओळखतही नाही. माझी येथेही पंचाईत होत होती. वस्तूच्या क्वालीटी बद्दलच शंका मनात येत असल्याने काही घेता येत नव्हते. एका दुकानात मिळणारे ५०० रुपयांचे जॅकेट दुसऱ्या दुकानात केवळ १५० रुपयाला विकल्या जाते. त्यामुळे कोणतीही वस्तू विकत घेण्याचे समाधान लाभत नाही. कनॉट प्लेस मधे माझी समस्या वेगळी होती. येथे त्या समस्येचे दुसरे रुप मला अनुभवायला मिळाले. मी ज्या सामाजिक व्यवस्थेचा सदस्य आहे त्याला मध्यमवर्गीय का म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव मी या दिल्लीच्या  दोन अत्यंत लोकप्रीय मार्केटमधे घेतला. कसलीही खरेदी करता बाहेर पडलो जवळच असलेल्या बागेमधे जाऊन बसलो. दिल्लीला जाऊन काहीच खरेदी केली नाही? या प्रश्नाचे काय उत्तर द्यायचे याची जुळवाजुळव करायला लागलो

हे असे अनुभव मला का आले आणि या दोन्ही व्यवस्थांमधे मी का खुश नाही याचे कारण शोधण्याचा प्रयत्न मी केला. मुळात झाले असे आहे की मी या वस्तुंमधे अडकलोय. या वस्तुंच्या किंमती, वस्तुंची वैविध्यपूर्ण उपलब्धता, त्याच्या चमकदार जाहिराती, वस्तूच्या उपयोगीतेपेक्षा तिचा ब्रँड किंवा तिची कमित कमी किंमत याच गोष्टी मला जास्त आकर्षित करु लागल्यात. वस्तू ही मुळात वापरुन संपणारी बाब आहे हेच मला कळेनासे झालेय. त्यामुळे त्याच्या किंमती आणि त्याच्या माझ्याजवळ असण्याचा वृथा अभिमान हेच माझे विश्व बनलेय. ॲपल कंपनीचा फोन माझ्या किती वापराचा आहे यापेक्षा तो माझ्या हातात ठेऊन मी किती लोकांना दाखवू शकतो हे माझे ध्येय आहे. असा मी मध्यमवर्गीय माझी मूळ ओळख विसरलोय. माझी मूळ ओळख वस्तुंच्या बाळगण्यात नाही तर ती एकमेकांसोबत वाटून घेण्यात आहे, फोन असण्यापेक्षा प्रत्यक्ष संवेदनशील संवाद माझे बलस्थान आहे, स्वतंत्रपणे माझ्या चौकटीचा विचार करण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन आनंद साजरा करणे ही माझी ओळख आहे, वस्तुंचे वेगवेगळे ब्रँड माझे जिवन समृद्द करीत नाहीत तर माझ्या जीवनाच्या साध्या साध्या क्षणांना देखील महोत्सवांमधे परावर्तीत करुन आनंद लहरी निर्माण करणे हा माझा खराखुरा ब्रँड आहे. भौतिकतेच्या या असंख्य ब्रँड्समधे तो आपल्याला जपता येईल?





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23