थोडा है थोडे की जरुरत है @21.08.18

भारत माता की जय

कारगील चे युद्ध सुरु झाले. भारताच्या शांती संदेशानंतर देखील पाकिस्तानने नेहेमीप्रमाणे आपल्या देशाच्या पाठीत सुरा भोसकला. आपल्यातूनच विभाजित होऊन आपल्यावरच उलटणाऱ्या आपल्या शेजारी राष्ट्राने एक अतिशय कठीण युद्ध लढण्यास भाग पाडले. पर्वतीय क्षेत्रातील सर्व उंच ठिकाणे काबीज करुन त्यांनी दहशतवाद्यांच्या मदतीने जम्मु श्रीनगर हा -डी हायवे बंद पाडला. रसद बंद पडली अश्या जटील स्थितीमधे भारतीय सेना जिवाची शर्थ करुन लढण्यास सज्ज झाली. राजपुताना रायफल्स चा एक जवान बचान सिंह सुटीवर गेला असताना दोनच दिवसात मातृभूमीची रक्षा करण्यास परत निघाला. दोन लहान मुलांना पत्नीकडे सोपवून घरुन निघताना त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव होते. माझ्या मुलांना आणि स्वतःला सांभाळ असे तो केवळ डोळ्यांनी त्याच्या पत्नीला, भावनाला सांगत होता. भावनाच्या भावना तर तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंमुळे स्पष्ट कळत होत्या. ह्रदयात कालवाकालव होत होती. आधल्या दिवशी रात्री पतीची बॅग दोनच दिवसात परत भरुन देताना टीव्हीवर सेना प्रमुखांनी दिलेला संदेश सारखा कानावर पडत होता. गेल्या काही वर्षातील सर्वात कठीण युद्ध आपल्याला लढायचे आहे असे ते म्हणले होते. शत्रू पहाडांवर मोक्याची जागा घेऊन बसलाय त्याला वर चढून विरुद्ध दिशेने येणारा मारा सहन करुन हरवायचे आहे ही मोठी जबाबदारी सेनेवर आली होती. वायुसेना देखील अडचणीत होती कारण जवळच असलेली आंतरराष्ट्रीय सिमा ओलांडता हल्ला चढवायचा हे जिकरीचे काम होते. अश्या कठीण युद्धावर निघालेल्या बचान सिंह कडे बघत असताना भावनाने आपल्या दोन्ही मुलांचे हात घट्ट धरुन ठेवले होते. मन घट्ट करुन बचानसिंह निघाला. आपला भावनावेग सैनिकी थाटातच आवरुन एकदाही मागे वळून बघता ताड ताड निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या मुर्तीला बघून त्याची दोन्ही मुले आईला बिलगून रडू लागली. त्यांनाही जाणविले होते की यावेळी बाबांचे जाणे साधे नेहेमीप्रमाणे नाही

युद्धाची धुमःश्चक्री सुरु झाली. भावना दिवसरात्र टीव्हीसमोर बसली असायची. काहीही काम नसताना टीव्हीवरील वेगवेगळ्या मालिका बघत बसणे भावनाचे टीव्हीसमोर बसणे फार वेगळे होते. युद्धाची स्थिती जाणून घेण्यासाठी त्यातल्या त्यात राजपुताना रायफल्सच्या तुकडीची स्थिती काय हे समजण्यासाठी ती धडपडत होती. युद्ध दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. केवळ पाच सहा दिवसात युद्ध संपुन जाईल हा तज्ञांचा कयास खोटा ठरला. शत्रुजवळ मोक्याच्या जागा असल्याने भारतीय सेनेला टार्गेट करणे सोपे जात होते. रोज सैनिक शहिद होत होते. पहाडांवर चढण्याच्या प्रयत्नात वरुन होणाऱ्या गोळाबारामुळे शहीदांची संख्या वाढत होती. भावनाकरीता तो सारा काळ कसा होता याची कल्पना फार थोड्या लोकांना येऊ शकते. भारत माता की जय ही गर्जना करीत राजपुताना रायफल्स युद्ध भुमीवर निघाल्याची चित्रे बातम्यांमधे दाखविली तेव्हा तिने आपल्या पतीला शोधण्याचा प्रयास केला. परंतू दोन मिनीटाच्या त्या रीपोर्टमधे बचानसिंह तिला दिसला नाही. त्यात बचानसिंह नव्हताच. देश भावनेने प्रेरीत मातृभुमीसाठी स्वतःला समर्पित करण्यास तयार झालेले ते सारे जवान होते. या एका रिपोर्टनंतर मात्र राजपुताना रायफल्सच्या तुकडीबीबत काहीच माहिती कळली नाही. पुढचे सात आठ दिवस भावनाच्या जिवाची हुरहुर तिला जगू देत नव्हती. आपल्या पोरांचे मनोबल टिकवून ठेवण्याकरीता ती माऊली रात्री मुले झोपी गेल्यावरच आपल्या महत्प्रयासाने रोखलेल्या अश्रुंना वाट मोकळी करुन द्यायची. घरुन जाताना बचान सिंहने डोळ्यांनीच तिला सांगितले होते, आता तुलाच या मुलांनी सांभाळायचे आहे. युद्ध सुरु होते भावनाची बेचैनी वाढत होती. शहिदांची नावे रोज टीव्हीवर सांगितली जायची. ते एक एक नाव वाचले जात असताना तिच्या ह्रदयाचे ठोके वाढलेले असायचे. यादी संपली की एका बाजुने देशाचे जवान मृत्यूमुखी पडल्याचे दुःख असायचे परंतू दुसरीकडे त्या यादीत बचान सिंहचे नाव नाही म्हणून हायसे वाटायचे. विचित्र मनःस्थिती होऊन बसली होती. सामान्य नागरीक म्हणून चौकटीतले सुरक्षित जिवन जगणाऱ्या कुणालाही ही भावना कळू शकत नव्हती. दिवस पुढे सरकत होते भावनाची तगमग वाढत होती आणि एक दिवस रात्री दीड वाजता फोन घणघणला. भावनाच्या ह्रदयात धस्स झाले. रींगवरुन लक्षात येत होते, तो एसटीडी कॉल होता. बिछान्यापासून फोन पर्यंतचे जेमतेम दहा फुटांचे अंतर पार करताना भावनाच्या पायात गोळे आले. थरथरत्या हाताने तिने फोन उचलला, पलीकडून आवाज आला, मै राजपुताना रायफल्स का कमांडर इन चिफ बोल रहा हूँ, क्या मेरी बात भावना बचान सिहंजी से हो रही है? घशातला आवंढा गिळून कसातरी भावनाने होकार दिला. तो अधिकारी पुढे म्हणाला, भावनाजी हमे आपको सूचित करते हुये बडाही दुख हो रहा है की, पुढचे सारे ऐकू येई पर्यंत भावनाची शुद्ध हरपली होती.

बचानसिंहचा अंत्यसंस्कार होताना गावातील लोक घोषणा देत होते, बचान सिंह अमर रहे. भारत माता की जय. बचान सिंहचे पार्थिव ज्या तिरंग्यामधे लपेटले होते तो तिरंगा आपल्या मुलांसह हातात घेताना भावनाला गलबलून आले. दोन्ही बाजुने दोन मुलांना घेऊन तिने आपल्या हातांवर तो तिरंगा घेतला अचानक तिच्या मनातून हुंकार उठला, भारत माता की जय. बचान सिंहच्या अंत्यसंस्काराच्या वेळी समस्त गावकऱ्यांच्या मनात उचंबळून आलेल्या देशप्रेमाच्या भावनेमधून मोठमोठ्या गर्जना सुरु होत्या भारत माता की जय. आपल्या गावचा सुपुत्र शहीद झाला त्यामुळे त्यांच्या देशप्रेमाला उधाण आले होते त्यामुळेच सारा गाव जोरजोरात भारत माता की जय हा जयघोष करीत होता. तो जयघोष खरा होता. परंतू तो फारच तदर्थ होता. अंत्यसंस्कार आटोपल्यावर तो ओसरणार होता. काही तासांनंतर पुन्हा सारी मंडळी आपापल्या कामाला लागणार होती. पुन्हा त्यांच्या जीवनाचे रहाटगाडगे नेहेमीप्रमाणे सुरु होणार होते. शहीद बचानसिंहच्या नावाने लावलेले फ्लेक्स फाटणार होते त्याच फ्लेक्सच्या फ्रेम्स गावात पुढच्या महिन्यात आयोजित कबड्डी स्पर्धांकरीता वापरले जाणार होते. म्हणूनच बचानसिंहच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दिल्या जाणाऱ्या भारत माता की जय या घोषणांचे अस्तित्व फार मोजक्या काळासाठी होते. परंतू पतीच्या पार्थिवाभोवती गुंडाळलेला तिरंगा हातात घेताना भावना सिंह ने हळूच म्हणलेल्या भारत माता की जय या घोषणेचा अर्थ फारच वेगळा होता. कारण या घोषणेनंतर तब्बल १९ वर्षांनी जे घडले ते विलक्षण होते.

हातात तिरंगा घेऊन १९ वर्षांपूर्वी भावना बचान सिंहने उच्चारलेल्या भारत माता की जय या घोषणेचा प्रतिध्वनी परत ऐकू आला! तब्बल १९ वर्षांनी भावनाच्या मनातून पुन्हा भारत माता की जय हा हुंकार उमटला. १९ वर्षांनंतर भावनाने ऑफीसर्स ट्रेनींग ॲकेडेमी मधे तिच्या बाजुने गणवेषात उभ्या असलेल्या तिच्या मुलाच्या खांद्यावरील तीन तारे उघडले, तिचा मुलगा हितेश सिंह हा भारतीय सेनेमधे लेफ्टनंट म्हणून रुजू झाला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो रुजू होणाऱ्या रेजीमेंटचे नाव आहे, राजपुताना रायफल्स!!

१५ ऑगस्टला देशभक्तीचा तात्पुरता ज्वर चढवून, वाहतुकीचे सर्व नियम मोडीत काढून, गाड्यांचे कर्कश हॉर्न वाजवत गावभर फिरुन दिल्या जाणाऱ्या भारत माता की जय या आवाजी घोषणांपेक्षा, राजपुताना रायफल्स मधे कार्यरत राहून देशासाठी शहिद झालेल्या आपल्या पतीच्या पार्थिवावरील ध्वज हातात आल्यावर आणि त्याच रेजीमेंटमधे पुन्हा देशरक्षेसाठी आपल्या मुलाला लेफ्टनंट बनवून त्याच्या खांद्यावरील तारे उघड करताना हळू आवाजात भावना सिंह या माऊलीने म्हणलेले भारत माता की जय किती प्रभावी, खरे सर्वतोपरी समर्पक वाटते!! होय ना




Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. आपल्या दैनन्दिन जीवनातील अडचणीनना जेव्हा आपण स्ट्रगल है नाव देतो तेव्हा...
    हे वाचून आपण स्वतः खुप तुच्छ असल्याची जाणीव होते
    खुप छान लिहिलीस.

    ReplyDelete
  3. अपने पास तो इनके तुलना में...
    थोड़ा भी नही है...बहोत सारे की जरूरत है!

    ReplyDelete
  4. Sir, very nice thought written by you. This is real picture in ours life. Salute to all such Jawan. Jai Hind.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.06.21

थोडा है थोडे की जरुरत है @ 10.12.19