थोडा है थोडे की जरुरत है @28.08.18

बिन कामाचा डबा

आपले घर आता जुने झाले. आता याचे नुतनीकरण करायला हवे असा विचार सुनबाईंनी मांडला. अगदी खरे होते तिचे. घरामधे आवश्यक त्या सोयी नव्हत्या. त्या असुविधांमुळे कामे वाढायची. त्रास व्हायचा. परंतू मला त्रास होतो आहे हे पटवून द्यायलाही सुनबाईला बरेच कष्ट घ्यावे लागले. सासुबाई तश्याच स्थितीत अनेक वर्षांपासून असल्याने आधीच्या पिढीच्या असल्याने सारे काही जुळवून घ्यावे हीच त्यांच्या जीवनाची पद्धत होती. इतर मंडळी जास्त वेळ घराबाहेर असल्याने घरातील असुविधांमुळे होणारे त्रास त्यांनाकळत नव्हते. त्यामुळे घराच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव पुढे सरकतच नव्हता. नव्या युगात वावरणाऱ्या सुनेला वाटत होते की आपले घर सुंदर असावे, त्याच सर्व मुलभूत सुविधा असाव्यात त्यासाठी तिचा खटाटोप सुरु होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर तिला त्यामधे यश मिळले. यामधे सासऱ्यांनी तिची मदत केली. त्यांनी तिचे म्हणणे बरोबर आहे असा विचार मांडला त्यानंतर चक्रे फिरली. घराचे नुतनीकरण करण्याचा निर्णय झाला. सुनबाईला फार फार आनंद झाला आणि तो अत्यंत स्वाभाविकच होता. नवे घर कसे असेल याबाबत सुनबाईची स्वप्ने सुरु झाली. घरातील प्रत्येकाने त्यात आपआपली मते देणे सुरु केले. परंतू सर्वात जास्त उत्साह सुनेचा होता. टाईल्स कुठल्या, त्याचे रंग कुठले, पडदे कोणते, त्याला शोभेसे फर्नीचर कोणते, नवनविन सुविधा कोणत्या याबाबत चर्चा सुरु झाल्या. बाहेर गेल्यावर देखील सुनबाई आता नव्या घरांकडे जास्त निरखून बघायला लागली. एखादे डीझाईन, एखादा रंग चांगला वाटला की मोबाईलवर फोटो काढून ठेवणे असे बरेच काही तिचे सुरु होते. हे सारे करताना सुनबाईच्या एक गोष्ट अजून लक्षात आली की त्यांच्या घरात नंतर कधीतरी लागतील या शिर्षका अंतर्गत खूप सारी अडगळ पडली आहे. घराचे नुतनीकरण करीत असताना सारे काही आधुनिक हवे आणि म्हणून या अडगळीला देखील घरातून काढायला हवे असा विचार तिने मांडला. आधुनिक घरात साऱ्याच गोष्टी आधुनिक असाव्यात ही तिची मागणी रास्त होती. त्या अडगळीचे तिनेच केलेले वर्णन मोठे मजेदार होते. वेगवेगळ्या आकाराचे खिळे, जुन्या चपला, जुन्या नेवारीच्या कॉटची नेवार, जुनी फाटलेली मच्छरदाणी, ॲल्युमीनीयमची शाळेत नेण्याची पेटी, एक मोठा पितळेचा ओबडधोबड डबा, वापरलेले जुने झालेले टुथ ब्रश, जुने कंगवे, तुटलेल्या हँगर्स यासारखे सामान वेगवेगळ्या डब्यांमधे भरलेले होते. यातील ९० टक्के गोष्टी कधीही वापरात येणार नव्हत्या. परंतू कधीतरी एखाद्या मेकॅनिकला पंख्याच्या आतील पार्ट्स दुरुस्त करताना त्याला ऑईल देण्यासाठी लागेल म्हणून ठेवलेले जवळपास चाळीस जुने टुथ ब्रश अश्या देखील वस्तू होत्या. त्यामुळे या सर्व वस्तू आता अगदी काढून टाकायला हव्या असे आग्रही मत सुनबाईने मांडले आणि त्या मतामुळे नुतनीकरणासाठी तयार मतांमधे मत मतांतरे सुरु झाली. जुन्या वस्तू या जुन्या पिढीला किती प्रीय असतात परीकथांमधे जसा एखाद्या पात्राचा प्राण पोपटात वगैरे असायचा तसे प्राण या वस्तूंमधे गुंतलेले असतात याचा सुनबाईंना अंदाजच नव्हता. या जुने सामान हद्दपार करायचे या निर्णयामुळे घरात तणाव निर्माण झाला. आपसातील चर्चा या वादामधे परावर्तित व्हायला सुरु झाल्या. काहीही झाले तरी मी पितळेचा मोठा डबा मात्र देणार नाही. बाकी सारे काही द्या पण तो द्यायचा नाही. सुनेने समजविण्याचा प्रयत्न केला की तो पितळेचा डबा मोडीत देऊन नव्या हॉलमधे ठेवण्यासाठी आपण पितळेची मोठा समई आणुयात. परंतू सासूबाई मात्र पितळेचा डबा द्यायला तयार नव्हत्या. असे काय आहे त्या डब्यात? पितळेचा तर आहे. सोने लागलेय का त्याला? यांचा तर प्राणच अडकलाय बहुदा त्या डब्यात!! सुनबाईची कुरकुर सुरुच होती. या तणावाच्या स्थितीला निवळण्याचे काम सासरेबुवांवरच आले. त्यांनी पाळीपाळीने दोन्ही गटांना त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने समजावून सांगितले. एखादी गोष्ट समोरच्याला समजेल या भाषेत सांगण्याची त्यांची हातोटी होती

पुढच्याच आठवड्यात एके दिवशी सकाळी सासुबाईंनी सुनेला बोलाविले त्या म्हणाल्या, बाळ तुला वाटते ते बरोबर आहे. हे सारे सामान आता जुने झाले आहे त्याचा या नव्या व्यवस्थेमधे काहीच उपयोग नाही हे मला पटले आहे. वस्तुंमधे माझा जीव अकारणच अडकलेला आहे. साधा तो पितळेचा डबा परंतू मी किती आग्रह करतेय त्यासाठी. तू तुझ्या पद्धतीने कर सारे. हे घर आणि या घरातील सर्व गोष्टी मी जरी जमविल्या असल्या तरी मी हे सारे अत्यंत आनंदाने तुला सोपवायला हवे. या वस्तूंचे काय एवढे? या वस्तुंपेक्षा कितीतरी लाख मोलाची मुले, सुना आणि नातवंडे मला मिळाली आहेत. आता माझा जीवनाचा आनंद मी त्यातच शोधण्याचे ठरवायला हवे. पण मी मात्र या डब्यांमधे, आणि वस्तुंमधे गुरफटून गेलीय. माझ्या पश्चात हे सारे तुम्हालाच तर सांभाळायचे आहे. मी ही सारी जमवाजमव संसाराची मांडणी वयाच्या अठराव्या वर्षापासून केली. आता मी थकलेय. परंतू माझे मन अजूनही या भांड्यामधे, त्यांच्या रचनांमधे गुरफटलेले आहे हे बरोबर नाही हे मला आता पुरते पटले आहे. बेटा, हे सारे मी रागावून अजिबात बोलत नाहीये. मला मनापासून वाटले म्हणून सांगितले. आता मला काहीच समस्या नाही. तूम्ही मिळून या जुन्या वस्तूंबाबत निर्णय घ्या आणि सर्व काढून टाका. सारे नविन आणा. मलाही नव्या करकरीत घरात रहायला आवडेल. आणि हो तो पितळेचा डबा पण देऊन टाक आणि एक छान समई घेऊन ये. छान कल्पना आहे तुझी. सासुबाईंचे हे बोल ऐकल्यावर सुन एकदम खुश झाली. सासरेबुवांनी समजावले हे तिच्या लक्षात आले. परंतू त्यांच्या निर्णयामुळे तिला फार आनंद झाला. सुनबाईशी बोलून सासुबाई त्यांच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांचा हात हातात घेऊन सासरेबुवा म्हणाले, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्या वयात जसे तू वागायला हवे तसेच तू वागलीस. सासुबाईंनी उत्तर दिले, तुम्ही सांगताच असे की पटल्याशिवाय रहात नाही. दोघेही हसले अचानक त्या घरातला तणाव निवळून गेला

ज्या दिवशी सारे जुने सामान नेण्यासाठी माणूस येणार होता, त्या दिवशी दुपारी सासरेबुवा सासुबाईंना घेऊन नाटक बघायला गेले. त्यानंतर एका मित्राकडे जायचे त्यांनी ठरविले. दुपारी त्या सर्व सामानाची विल्हेवाट लावून टाकावी अशी सूचना त्यांनी सूनबाईंना केली. सायंकाळी ती दोघे घरी परतली तेव्हा जवळपास सारे जुने सामान गेलेले होते परंतू तो मोठा ओबडधोबड असलेला पितळेचा डबा मात्र हॉलमधे छान कोपऱ्यात मांडून ठेवला होता आणि त्याच्या भोवती मस्त सजावट केलेली होती. नातवंडे ओरडत आली, आजी तुझा डबा आता इथे हॉलमधे ठेवला आहे आणि तो इथेच राहणार. सासुबाईंना आश्चर्य वाटले आणि फार आनंद देखील झाला. त्यांनी सूचकपणे सासरेबुवांकडे बघितले आणि नजरेनेच विचारले, सांगितलेच का? पण मनापासून आनंद झाला सूनेचे केवळ हात हातात धरुन पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी आशिर्वाद दिले. त्या पोरीच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले. किती मोठी चूक ती करणार होती हे तिला जाणविलेत्या क्षणी सासरेबुवांचे शब्द तिला आठवले

बेटा, तू सारे सामान काढून टाक. तुझ्या सासुला मी समजावीन. फक्त मी तुला या बिनकामाच्या पितळेच्या डब्याची गोष्ट सांगतो. तुझा नवरा जेव्हा जन्मला त्यावेळी आमची परीस्थिती अतिशय बेताची होती. मला फारच कमी पगार होता. जन्मताच तुझ्या नवऱ्याला कावीळ झाली होती. त्यावेळी काही सोय नव्हती परंतू मुंबईहून एक इंजेक्शन मागवले तर काही होऊ शकणार होते. परंतू त्या इंजेक्शनची किंमत खूप जास्त होती. पोराच्या जिवाचा प्रश्न होतास्वाभीमानाने जगायचे होते त्यामुळे कुणाकडे हात पसरायचे नाही असे ठरले होते. त्यावेळी तुझ्या सासुच्या आग्रहाखातर हा तिच्या अत्यंत आवडीचा पितळेचा डबा, जो तिने माहेरहून साड्यांच्या ऐवजी घेतला होता तो मी गहाण ठेवला पैसे मिळवून इंजेक्शन बोलाविले ज्यामुळे तु्झ्या नवऱ्याचे प्राण वाचले. नंतर मी तो डबा सोडवून आणला. पोरी, या डब्यात तुझ्या सासुचे प्राण नाहीत तर या डब्यामुळे तुझ्या नवऱ्याचे प्राण आहेत. असा आहे हा बिनकामाचा डबा!!  




Comments

  1. विचार करायला लावणारा,आयुष्यातील छोट्या पण महत्वाच्या गोष्टी चे खूप छान स्पष्टीकरण केले सर तुम्ही यात.मी पण आज नविन गोष्ट जी आयुष्य बहरून काढेल ती शिकले.त्याकरिता आभार.

    ReplyDelete
  2. सासू सून यांच्या वादाचा हा मुख्य विषय आहे कारण सासू निवृत्त होत नाही आणि सूनेला हाआपला नविन संसार सुरू करावा असे वाटते यावर समजूतदारपणा हा आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18