थोडा है थोडे की जरुरत है@07.08.18

सॉरी

नुकतीच एक शॉर्ट फिल्म बघितली. एका डीपार्टमेंटल स्टोअरमधे वडीलांसोबत दोन मुली खरेदी करीत असतात. खरेदी सुरु असताना अचानक लहान मुलीचा मोठ्या मुलीला धक्का लागतो. तिच्या हातातील वस्तू खाली पडते. ती पोर ती वस्तू उचलून घेते परंतू जिचा धक्का लागून ती वस्तू पडली ती लहान मुलगी मात्र शांत आणि काहीही झाल्यासारखी बसलेली असते. वडीलांच्या ही गोष्ट लक्षात येते ते तडक त्या लहान मुलीला टोकतात. खरे तर असे झाल्यामुळे तिने सॉरी म्हणायला हवे असते. परंतू ती म्हणत नाही. वडील तिला आग्रहाने सॉरी म्हणायला लावतात. तिचा आडमुठेपणा सुरुच असतो. वडील वेगवेगळ्या प्रकारे तिला समजावतात. प्रेमाने सांगून बघतात, रागावून बघतात परंतू ती हट्टी पोर अजिबात सॉरी म्हणत नाही. आपल्या वडीलांना राग येतोय हे पाहून मोठी मुलगी समजुतदारीने बाबा जाऊ द्या असे म्हणते. परंतू बाबांना याच प्रसंगी त्या चिमुरडीला तिच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा पाठ शिकवायचा असतो. सॉरी म्हणता येण्याचा.

खरे तर सॉरी हा छोटासा शब्द आहे परंतू उच्चारायला अनेकांना फार कठीण जातो. मुळात या बाबतीत इंग्रजी भाषेचे आभार मानायला हवे की एका शब्दात काम होऊन जाते. अन्यथा मराठी भाषेत आपल्याला मला माफ करुन दे एवढे वाक्य बोलावे लागते. परंतू इंग्रजी भाषेतील आपण जे अनेक शब्द मराठीतले आहेत असे म्हणून वापरतो त्यापैकीच एक म्हणजे सॉरी. परंतू हा एक शब्द उच्चारायला अनेकांना फार फार जड जाते कारण हा शब्द केवळ साधा शब्द नाही तर तो मानवी प्रवृत्तीदर्शक शब्द आहे. लहानपणापासून आपली वाढ होत असताना आपले व्यक्तिमत्व जसे तयार होते त्यावर या शब्दाचे उच्चारण ठरते. प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचे इगो घेऊन मोठा होत असतो. कुणाला बुद्धीमत्तेचा इगो, कुणाला रुपाचा, कुणाला संपत्तीचा तर कुणाला वयाचाही इगो असतो. याशिवाय लिंगभेदानुसार देखील इगो असतात. माणसांचे, महिलांचे, मुलांचे, मुलींचे वेगवेगळे इगो नैसर्गिकरीत्या तयार होत असतात. हे इगो तयार होणे काही प्रमाणात चांगले देखील असते कारण त्यामधूनच स्वाभीमानाची जोपासना होते आपण स्वत्व जपण्याचा प्रयत्न करतो. यामधूनच आत्मविश्वास देखील निर्माण होत राहतो. म्हणूनच काही प्रमाणातील इगो हा व्यक्तिमत्वाच्या सकारात्मक विकसनाकरीता उपयोगीच असतो. परंतू याची सिमारेषा फार तदर्थ आहे. हाच वेगवेगळ्या प्रकारचा इगो जेव्हा आपल्या व्यक्तिमत्वावर आरुढ होतो त्यावेळी खरी अडचण होते. कारण त्या प्रकारामधे मी सर्वोत्तम कधीही चुकणारा मी कशाला कुणाचे ऐकायचे अश्या पद्धतीचा एक सुपर इगो तयार होतो ज्यामधून सॉरी म्हणण्याची किंवा म्हणता येण्याची प्रवृत्ती बळावत जाते. मी सॉरी म्हणल्याने माझा स्वाभीमान दुखावला जाणार आहे अशी अत्यंत चुकीची भावना निर्माण होते. लहान मुलांमधे ती चिडखोरपणामुळे निर्माण होते तर मोठ्या व्यक्तींमधे ती सुपर इगोमुळे तयार होते. त्या शॉर्ट फिल्ममधे तोच सुपर इगोचा प्रकार पुढे दाखविला आहे

त्या मुलीला समजावण्यामधे वडील यशस्वी होतात ती चिमुरडी तिच्या ताईला सॉरी म्हणते. पण अचानक एक बाई कानात इयरफोन लावून फोनवर बोलत त्या चिमुरडीच्याच अंगावरुन तिला धक्का मारुन पुढे निघून जाते. आपल्या वडीलांनी काही क्षणाआधीच शिकविलेला सॉरी म्हणण्याचा पाठ तिच्या लक्षात असतो. त्या चाणाक्ष पोरीच्या लगेच लक्षात येते की आपल्याला धक्का मारुन गेलेल्या त्या बाईने आपल्याला सॉरी म्हणायला हवे. पण ती तशीच निघून गेल्यामुळे ती बाबंना विचारते की तुम्ही मला शिकविलं की सॉरी म्हणायचे परंतू ती बाई सॉरी म्हणता निघून गेली. आता बाबांची पंचाईत होते. आपल्या पोरीचे म्हणणे अगदी बरोबर आहे हे बाबांना पटल्यामुळे आता बाबांची दुसरी कसरत सुरु होते. आतापर्यंत त्यांना त्या चिमुरडीला सॉरी म्हणायला शिकवायचे होते. ते तिने म्हणल्यावर आता त्या मोठ्या झालेल्या बाईला समजावे लागणार होते. बाबा त्या बाईशी बोलण्याचा प्रयत्न करतात तिला नम्रपणे समजावतात की कश्या प्रकारे तिने त्या चिमुरडीला धक्का दिला तिने तिला सॉरी म्हणायला हवे. ती बाई एखादा कुणीतरी वेडा बोलतोय असे समजून दुसरीकडे बघायला लागते. चिमुरडी पोर आपल्या बाबांकडे बघते. तिच्या बघण्यात बाबांना त्या बाईकडून सॉरी म्हणून घेण्याची नितांत गरज जाणवते. ते परत प्रयत्न करुन त्या बाईने सॉरी म्हणावे असे विनवतात. आपल्या मुलीला शिकविलेल्या तिच्या जिवनातील एका महत्वाच्या पाठाचे अस्तित्वच धोक्यात असल्याने त्यांचे प्रयत्न सुरु राहतात. मी या पोरीची माफी मागू? त्या बाईचा सारखा हेका सुरु असतो. मी माफी मागणार नाही. आपली चुक झालीय हे तिला कळत असते परंतू  एका छोट्याश्या पोरीला सॉरी म्हणायचे म्हणजे काय? तिचा इगो तिला परवानगी देत नव्हता. शेवटी तिच्या आडमुठेपणाला कंटाळून बाबा तो सर्व प्रकार त्या स्टोअरच्या मालकाला सांगतात त्या बाईने सॉरी म्हणणे किती गरजेचे आहे कारण माझ्या लहान मुलीला मी यापुढे कधीच कोणताच पाठ शिकवू शकणार नाही याची जाणीव ते त्या मालकाला करुन देतात. तो मालक देखील सर्व बाब समजून त्या बाईला तिने पोरीची माफी मागावी अशी विनंती करतो. परंतू ती बाई त्यालाही जुमानत नाही. अंतिमतः तो स्टोअर मालक पोलीसांना बोलावून आणतो. त्या बाईने केला तो सभ्यतेच्या मर्यादेचा भंग असतो त्यामुळे पोलीस येऊन त्या बाईला अटक करतात तिला त्या चिमुरडीला सॉरी म्हणायला बाध्य करतात. शेवटी ती चिडून रडत सॉरी म्हणते पोलीस तिला घेऊन जातात. तिचा तो इगो इतका जास्त वाढलेला असतो की तिची चूक लक्षात आणूनही ती सॉरी हा एक छोटासा शब्द वापरणे कठीण जाते. परंतू शेवटी सॉरी म्हणणे किती महत्वाचे असते हा पाठ आपल्या पोरीला शिकविण्यासाठी त्या बाबांना फार कष्ट पडतात. कारण पटकन सॉरी म्हणणे अनेकांना जमतच नाही.

खरे तर सॉरी हा समोरच्या व्यक्तिच्या रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी फारच उपयोगी शब्द आहे. कितीही राग आला असला तरी सॉरी हा शब्द उच्चारल्यावर रागाची तीव्रता ५० टक्क्याने कमी होते. परंतू चुक होऊनही मनात जोपासलेले इगो बरेच वेळा तो उच्चारु देत नाही. सॉरी म्हणणे हे खरे तर भुषणावह नाही कारण चूक होत नाही असा व्यक्तीच या जगात राहू शकत नाही. आपले चुकले हे कळल्यावर त्वरीत काळ, वेळ, वय हे काहीही बघता सॉरी म्हणायला फार मोठे मन लागते. परंतू वाढत्या वयानुसार ते असेलच असे सांगता येत नाही. कधी कधी तर आपल्या जवळच्या व्यक्तीला तिचे चुकत असताना देखील केवळ बरे वाटावे म्हणूनही सॉरी म्हणावे लागते ते देखील आनंदाने करायला हवे कारण ती व्यक्ती आपली असते. एका सॉरी म्हणण्यापेक्षा तिचे महत्व फार जास्त असते. परंतू अनेक मंडळींना असे सॉरी म्हणणे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी गोष्ट वाटते. खरे तर ती आपल्या माणसांना त्यांच्या मनाला जपणारी सांभाळणारी गोष्ट आहे आणि जेथे आपले मानले तेथे इगो कुठे येतो? असे म्हणतात, Apologies doesn't mean that you were wrong or the other person was right. It means that your relationship is more valuable than your ego.




Comments

  1. इगो,समजुन सुद्धा उमजत नसलेले गणित

    ReplyDelete
  2. Nice writeup Two things which are very important in life. To apologize and say sorry, that too without any expectation.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18