थोडा है थोडे की जरुरत है @ 15.05.18

कटींग चाय

मुंबईच्या अत्यंत सुंदर अश्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे वाजता मी एका दुकानाची पाटी वाचून जरासा थबकलो. या आधीच्या विमानप्रवासांच्या वेळी मला हे दुकान दिसले नव्हते. यावेळी ते नव्याने सुरु झालेले दुकान होते. त्या दुकानाची पाटी त्यावरील अक्षरे फार विशेष होती. त्या अक्षरांना वाचूनच मी त्या दुकानाकडे गेलो. दुकानाचे नाव होते कटींग चाय. नागपूरला जाण्यासाठी एयर इंडीयाचे सकाळचे फ्लाईट असल्याने मला झोप टाळण्यासाठी चहा पिण्याची इच्छा झाली. दुकानाच्या काऊंटरवर गेल्यानंतर तेथे सारे विशेष होते. वेगवेगळ्या प्रकारचे चहा तेथे एका शो केसमधे ठेवलेले होते. दुकानात सारे काही सुंदर पद्धतीने रचलेले होते. खास गणवेष घातलेली काही मंडळी तेथे काम करीत होती. ऑर्डर देण्यासाठी रांग लागली होती. मी आपला रांगेत लागलो. माझ्यासमोर साधारण दहा लोक रांगेत होते. रांग पुढे पुढे सरकत होती. माझे मन मात्र ती त्या दुकानाची पाटी कटींग चाय बघून भूतकाळात जाऊ लागले. मागे जात जात ते जवळपास पंचेवीस वर्षे मागे गेले मला आठवली त्या काळची कटींग चाय.

महाविद्यालयीन काळामधील काही विशेष दिवस मला आठवून गेले. दुपारची वेळ, बाहेर मुसळधार पाऊस सुरु असायचा. अश्यावेळी मुद्दाम आम्ही चौघे दोस्त घरातून बाहेर पडायचो. भेटायची जागा ठरलेली असायची. सायकली तेथेच ठेवायच्या जणू काही छान एखाद्या बागेत फिरतोय त्या प्रमाणे चिंब भिजत अमरावती मधील त्या खास दुकानाकडे आम्ही निघायचो. रस्त्याने लोक पावसापासून बचावण्यासाठी आडोसा धरुन उभे असायचे आम्ही चौघे मात्र रस्त्याने मजा करीत चालत असायचो. घरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या एका चहाच्या दुकानापर्यंत आम्ही पोहोचायचो. ते चहाचे दुकान अफलातून होते. एका मोठ्या गॅसवर भांड्यात चहा उकळत असायचा. दुकानासमोर दुकानात जमेल तसे गर्दीत लोक बसलेले किंवा उभे असायचे. वेगवेगळ्या समुहामधे मस्त गप्पा मारीत आमचा पण ग्रुप असायचा. पावसातच उभे राहून दुकानदाराला हातानेच एक स्पेशल खुण केली जायची तितक्या कटींग चहाची ऑर्डर दिली जायची. एका वेळेचा चहा तयार झाला की तो एका मोठ्या भांड्याला बांधलेल्या फडक्यातून गाळला जायचा. त्यानंतर जवळपास पंधरा दिवस तरी धुतलेले बनीयन घातलेला एखादा पोऱ्या एका ट्रेमधे पांढरे चिनीमातीचे कप ठेवायचा त्यात तो गरमागरम चहा ओतला जायचा. तो ट्रे उचलून तो पोरगा सर्व ग्रुपमधे चहा देत सुटायचा. कोणत्या ग्रुपला किती कट चहा हवा हे त्याला माहित असायचे. चहाचा एकच प्रकार तेथे होता. कडक मिठी बढीया चाय. हातात तो चहाचा कप घेऊन, वरुन कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घेत त्या चहाचा एकेक घोट घेत मोठा आनंद लाभायचा. चहाचे पैसे चहा घेतल्यानंतर चार रुपये, चार कटींग चहाचे. चहा घेताना चहावाला काय भाऊ, काय म्हणता? पाऊस तर खूपच पडून राह्यला वगैरे गप्पा मारायचा. त्याचवेळी चहा देणारे पोट्टे जरा रेंगाळले तर काम करा बे पोट्ट्याईहो! म्हणून तो जोरात रागवायचा देखील. काऊंटरवर बसून त्याचे सगळीकडे लक्ष असायचे. मधेच एका भांड्यातला चहा होत आला की तो आपल्या जागेवरुन उठून त्या भांड्यामधे उकळणाऱ्या चहामधे त्याच्या स्टाईलने चमचा फिरवायचा जरासा चहा तळहातावर घेऊन चाखून बघायचा. त्याचे समाधान झाले की चहा देण्यासाठी तयार व्हायचा. दादा, भाऊ, काका, अश्या हाका मारत मारत त्याचे नियोजन चालत रहायचे. दादा चार रुपये घ्या आणि सहा परत द्या असे म्हणून त्याच्या काऊंटर समोर मी दहा रुपयाची नोट धरलेली असायचीअचानक आवाज आलासर, सर, एक्स्युज मी सर, हाऊ मे आय हेल्प यू? आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चहाच्या दुकानातील ती टापटीप तयार झालेली पोरगी ओठांचा चंबू करुन मला इंग्रजीमधे चहाच्या ऑर्डरसंबंधी विचारत होती. तिच्या त्या गोड आवाजामुळे मी एकदम वर्तमानात आलो आणि मी तिला चाय होना अशी त्या काळानुसार ऑर्डर दिली. पण पंचेवीस वर्षांचा काळ लोटला असल्याने कटींग चाय देखील बदलला होता

माझ्या त्या तिला समजलेल्या प्रश्नावर तिने मला प्रतिप्रश्न केला, कौनसा चाय सर. पंचेवीस वर्षात झालेल्या बदलांमधे हा देखील एक बदल होता, मी आता सर झालेलो होतो. त्यानंतर माझ्यासमोर त्या पोरीने साधारण पन्नास प्रकारच्या चहांची यादी असलेला एक कागद धरला. त्यावरुन नजर फिरवताना काही तर चहांचे प्रकार मी पहिल्यांदाच वाचत होतो. इटालीयानो कॉरीएंडर टी या नावावरुन नेमका कसा चहा हे समजून घेण्याचाही मी प्रयत्न केला नाही. त्या यादीत माझ्या दुर्दैवाने कडक मीठी चाय नव्हती. मी आता कोणती ऑर्डर देतो याची वाट बघत बसलेली ती पोरगी चेहेऱ्यावर वेगवेगळे भाव आणून बघत होती. मग माझा वैदर्भीय बाणा जागृत झाला. मी तिचीच मदत घ्यायचे ठरविले. तिला मी म्हणालो की मेरेको इसमे कुछ समझमे नही रहा है. माझा खास मराठमोळा हिंदी टोन ऐकून ती मला म्हणाली, तुम्हाला साधा चहा हवा का? तिच्या त्या तोंडाच्या चंबूमधून इंग्रजाळलेले का होईना पण मराठी शब्द ऐकून मी मनातल्या मनात गर्व आहे मला मराठी असल्याचा असे म्हणून घेतले. मी त्वरीत होकार दिला त्या चहांच्या प्रकारातून सुटका करुन घेतली. पण अद्याप माझे धक्के कमी झाले नव्हते. तिला वाटला तो चहा तिने माझ्यासाठी ऑर्डर करण्याचे ठरविले त्याचे बील माझ्या हातात दिले. त्यावरचा एका कटींग चहाच्या किंमतीचा आकडा बघितल्यावर मी चक्रावून गेलो. चार कटींग चहाचे चार जणांचे चार रुपये देणारा मी, पंचेविस वर्षानंतर चहाच्या नावाखाली काय मिळणार याची खात्री नसलेला मी, एका कटींग चहाचे १४० रुपयांचे बील बघून धास्तावलो. मला गंमत म्हणून त्या चंबूवालीला विचारावे वाटले की, तुम्ही चहा सोबत दोसा किंवा इडली फ्री देताय का? आता ऑर्डर दिल्यामुळे माझा नाईलाज होता. पेटीएम नावाच्या आधुनिक पैसे देण्याच्या पद्धतीने मी पैसे दिले हातात कुपन घेऊन माझ्या नंबरची वाट बघत बसलो. माझ्या कुपन वरचा नंबर दिसल्यावर मी तो त्या पोरीने तिच्या मनाने बनविलेला चहा घेऊन आलो. चहा नेताना तिने मला परत सांगितले, चहात साखर नाही ती पॅकेट्समधून घालून घ्यावी आपल्या सोयी प्रमाणे. मला परत सहजच विचारण्याची इच्छा झाली, चहा तरी घातला आहेस ना? परंतू मी तो प्रश्न अत्यंत वेगळ्या नव्या चवीच्या त्या चहासोबत गिळला

बदलत्या काळासोबत सारे जग बदलत असताना, अमरावतीच्या त्या टपरीवर मिळणारा कंटीग चहा प्रतिष्ठीत होऊन थेट आंतरराष्ट्रीय पातळीचा ब्रॅंड बनलेला आहे याचा मला खरोखरीच अभिमान वाटत होता. त्या काळी मिळणारा आनंद खूप होता आता तो नाही असे देखील मी म्हणणार नाही. काळाचे बदल स्विकारायला हवेतच आपण. प्रत्येकवेळी आमच्या काळी असे होते आता ते कसे वाईट असे दाखविण्याचाही प्रयत्न माझा नाही. पावसात चिंब भिजून घेतलेल्या केवळ त्या रुपयाच्या चहाची मी आता एका अत्यंत सुशोभित आधुनिक दुकानातील १४० रुपयांच्या चहाची त्या निमीत्ताने माझ्या मनःपटलावर उमटलेल्या तुलनेची गंमत सांगण्याचा प्रयत्न केला. खरे सांगतो, आनंद तेव्हाही मिळाला आनंद आताही मिळाला. कारण आनंद हा किंवा १४० या पैशाच्या आकड्यावर नाही तर मानण्यावरच अवलंबून असतो. होय ना?





Comments

  1. वा क्या बात है ..सुंदर लेख ..
    खरचं ....पाऊस चहा आणि लिखाण अप्रतिम योग असतो ...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18