थोडा है थोडे की जरूरत है @13.03.18

आनंदाश्रू

त्या दिवशी माझ्या मुलाने मला युट्युब वर फार प्रसिद्ध असलेला एक टेलीव्हीजन शो दाखविला. तो बरेच वेळा संबंधित शो बघत असतो. नेमका हा काय बघतो याबद्दल जाणून घेण्यासाठी मी देखील त्याच्या सोबत जरा वेळ बसलो. अमेरीकेमधे अतिशय प्रसिद्ध असलेला अमेरीकाज गॉट टॅलेंट नावाचा तो कार्यक्रम. भारतातही आता अश्या प्रकारचे टी.व्ही. शो सुरु झाले आहेत ज्यामधे विविध क्षेत्रामधे तरबेज असलेले लोक आपली कला सादर तरतात नंतर परीक्षक आणि जनतेकडून वोट मागून या सर्व लोकांमधून विजेता घोषित केला जातो. माझ्या मुलाने दाखविलेल्या त्या शोच्या अंतीम राऊंड मधे दोन मुलींची निवड झाली होती. एक होती १३ वर्षांची डार्सी लेन जी बोलक्या बाहुल्यांसोबत अप्रतिम सादरीकरण करत होती आणि दुसरी वर्षांची अॅंजेलीका हेल जी अप्रतिम गायन करीत होती. यामधे त्या केवळ वर्षाच्या अॅंजेलीकाचे सादरीकरण जेव्हा सुरु होते तेव्हा त्या सबंध सभागृहातील प्रत्येक जण कदाचित तो शो अमेरीकेतच नव्हे तर जगभर बघणारा प्रत्येकजण थरारुन गेला होता. इतक्या छोट्या वयाच्या मुलीकडून एक इंग्रजी गाणे अतिशय सुरात आणि सर्व लकबींसह ऐकताना प्रत्येकाला आश्चर्य आणि कौतुक अश्या संमिश्र भावनांचा अनुभव येत होता. ते सर्व बघत असताना माझे डोळे मात्र भरुन येण्यासाठी कारणीभूत ठरलेले एक चित्र जे मला सहजच बघायला मिळाले. त्या मुलीचे सादरीकरण संपल्यावर तेथे उपस्थित सर्व लोकांनी तिला उभे राहून मानवंदना दिली. हॉलीवूडच्या एका प्रख्यात अभिनेत्याने तिला जवळ घेऊन तिचे भरभरुन कौतूक केले. त्या लहानगीच्या आयुष्यातील तो फारच मोठा प्रसंग होता. कॅमेरा फिरत होताआणि फिरता फिरता तो अचानक त्या चिमुकलीच्या आई वडीलांच्या चेहेऱ्यावर थांबला. आपल्या मुलीचे होणारे कौतुक आणि तिने गाजविलेला पराक्रम बघून त्या दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्या दोघांना झालेला आनंद खरोखरीच गगनात मावत नव्हता. एकमेकांना घट्ट बिलगून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली होती. काही क्षणच तो कॅमेरा त्यांच्या चेहेऱ्यावर होता परंतू त्या संपूर्ण कार्यक्रमातील ते एक फारच सुंदर चित्र होते जे बघून माझेही डोळे भरुन आले. कुणीतरी मागे मला म्हणाले होते की असल्या कार्यक्रमांमधे आई वडीलांनी कधी रडायचे, किती रडायचे वगैरे ठरले असते. ठाऊक नाही. परंतू त्या कार्यक्रमात ज्या लहानग्या म्हणजे केवळ नऊ वर्षाच्या त्या मुलीचे जागतिक पातळीवर एवढे कौतूक होताना तिच्या आई वडीलांच्या डोळ्यात येणारे अश्रू ठरवून आणले असतील असे मी अजिबात मान्य करायला तयार नाही. कारण आपल्या मुला-मुलींच्या कर्तृत्वाने मनोमन धन्यतेचा अनुभव घेणारे जगातील कोणतेही पालक आपल्या पोटजनाच्या कौतुकाच्या वेळी भावनाविष्काराचे नाटक करु शकतील ही सुतराम शक्यता नाही. ते तर अतिशय प्रामाणिक आणि सच्चे भावनिक प्रकटीकरण होते त्यातील सच्चेपणामुळेच ते माझ्याही ह्रदयापर्यंत पोहचू शकले नकळत माझेही डोळे पाणावले. आपल्या कर्तृत्वाने आपल्या आई वडीलांना किती आणि कसा आनंद होऊ शकतो हे जर मुला मुलींना त्याच्या विद्यार्थीदशेमधेच कळले तर काय धमाल होईल. एक अफलातून स्वप्न सर्वच मुला मुलींना देण्यासाठी माझ्या मनात तयार झाले

ते स्वप्न म्हणजे आयुष्यात काही होवो अथवा होवो परंतू किमान एकदा तरी आपल्या जन्मदात्या आईला आणि पित्याला आपला अभिमान वाटावा आणि आपल्या कर्तृत्वाने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू यावेत असा क्षण त्यांना जगायला द्यावा. त्यासाठी कितीही कष्ट घ्यावे लागले तरी चालतील पण आई वडीलांनी आपल्याला या जगात आणून जे अस्तित्व प्रदान केले त्याची उतराई होणे तर कुणालाच शक्य नाही तरीही निदान आपल्याबद्दल अभिमान वाटावा असा एक तर क्षण आपल्याला निर्माण करता आला तर तो एक अतिशय सकारात्मक भाग ठरु शकतो त्यामुळेच जिवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. परंतू असा विचार करणारी मुले मुली आपल्याला घडवावी लागतील. कारण कधी कधी तर आई वडीलांना अपमानित करण्याचे क्षण जेव्हा त्यांच्या जीवनात त्यांचीच पोरे आणून ठेवतात तेव्हा मात्र या मुलाला किंवा मुलीला जन्म दिल्याबद्दल :श्चातापाशिवाय त्यांच्याकडे काही उरत नाही त्यांना हताश व्हावे लागते

साधारण तीन वर्षांपूर्वी असाच पःश्चातापदग्ध बाप माझ्यासमोर बसून माझ्या कक्षामधे जेव्हा लहान मुलासारखा ढसा ढसा रडला त्यावेळी अतिशय असंवेदनशील बनून त्याची मुलगी बाजूने निर्विकारपणे बापाचे रुदन चेहेऱ्यावरची रेषही हलविता बघत होती तेव्हा मात्र मला त्या बापाचा खरोखरीच कनवाळा आला. कुठल्यातरी एका टवाळखोर मुलावर प्रेम आहे म्हणून घरातून निघून गेलेली ती मुलगी जिचा बाप तिला घरी चलण्यासाठी विनवणी करत होता ती ठामपणे त्याला नकार देत होती. मी सज्ञान आहे आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करु शकत नाही, माझे त्याच्यावर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबतच रहायचे आहे, तो सध्या खूप कमावत नसला तरी तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमावण्याची त्याच्यात धमक आहे, मी त्याच्याबद्दल विचारले होते तेव्हा तुम्ही मला होकार दिला नाही म्हणून मी आता त्याच्याचसोबत लग्न केले आणि आता मी त्याच्यासोबतच राहीन, तुम्ही काहीही म्हणले तरी मी ऐकणार नाही या पद्धतीची वाक्ये ती आपल्या जन्मदात्याला माझ्या समक्ष ऐकवित होती. झाले गेले विसरुन जा आणि घरी ये, मी त्या मुलासोबतच तुझे विधीवत लग्न लावून देतो. यामुळे समाजात आमची देखील पत राहील आणि तुझ्या पाठी असलेल्या दोन्ही बहिणींची लग्न व्यवस्थीत होतील नाहीतर तुझ्या या अश्या पद्धतीच्या लग्नामूळे त्यांची लग्ने कशी होतील याची मला चिंता वाटते आहे. म्हणून मी तुझ्या हवे तर पाया पडतो पण घरी चल, आपण सर्वजण बसून ठरवू आणि तुझे पुन्हा लोकांसमक्ष लग्न कसे लावता येईल याबाबत विचार करु.. तू घरी चल. सर, तुम्ही तरी हिला समजावून सांगा अशी विनंती मला करुन तो साधारण पन्नाशीचा व्यक्ती पाच वर्षाच्या लहान मुलासारखा ढसा ढसा रडू लागला. मलाच कसे तरी झाले आणि त्याच वेळी माझी त्या मुलीकडे नजर गेली. ती अत्यंत बेमुर्वतपणे, कोणतीही खंत किंवा वडीलांची अश्या प्रकारे होणारी अवहेलना बघूनही जणू काही मला काय त्याचे या थाटात उभी होती. काही वेळाने मी तिला बाहेर पाठवून दिले. तिला समजावण्याचा मी प्रयत्न करतो असे बळे बळेच आश्वासन देऊन मी त्या पालकाला पाठवून दिले. माझ्या मनात मात्र तोच तो विचार सारखा घोळत राहीला. आपल्या वडीलांच्या डोळ्यात दुःखाश्रू बघून देखील तिचे मन द्रवले नाही. अश्या प्रकारची असंवेदनशीलता मुला मुलींच्या ठायी का निर्माण होते कारण, त्याना आई वडीलांच्या डोळ्यात त्यांच्या कर्तृत्वाने येणाऱ्या आनंदाश्रूंची किंमत आणि महत्वच कळलेले नाही.

आपल्या आई वडीलांना आणि त्यांच्या आपल्यासाठीच्या मनःस्वी भावना समजून घेण्याचे तंत्र मुलांना आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांच्यामधे या संवेदनशीलतेची कमतरता असण्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या आजुबाजूने संपुर्णपणे व्यावहारिकता बाळगणारे जग बनलेले आहे. त्या व्यावहारिक जगतात अश्या प्रकारचे एखादे स्वप्न मुला मुलींच्या मनात वसविता आले तर…. प्रत्येक आई वडीलांच्या जीवनात किमान एकदा असे अभिमानी आनंदाश्रू वाहतील.. त्या प्रत्येक आई वडीलांसाठी किती भाग्याचा क्षण असेल तो!! आपले विद्यार्थी विद्यार्थिनी हा क्षण आपल्या आई वडीलांना देतील? कारण त्या क्षणाशिवाय त्यांच्या आई वडीलांना त्यांच्या मुला बाळांकडून खरोखरीच काहीही नको असते





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23