थोडा है थोडे की जरुरत है @ 06.03.18

देशभक्तीचे पेटंट

ती गेली.. तिचा करुण अंत झाला. दोन तरुण मुलींना पोरके करुन त्यांची आई अचानक निघून गेली. तिचे जाणे सर्वांनाच चटका लावून गेले. तिच्या मुलींनी तिच्या तीन दिवसांनंतर मिळालेल्या पार्थिवाला बिलगून केलेला विलाप आणि त्यांना झालेले दुःख खरे होते का? की त्या मुलींची आई ज्याप्रमाणे सेल्युलॉईडवर रडण्याचा अप्रतिम अभिनय करायची त्याप्रमाणेच तो देखील अभिनय होता? हा एक प्रश्न अनेक वेगवेगळ्या चर्चांमधे विचारायचा राहून गेला त्यावर पॅनल डिस्कशन करायचे राहून गेले आहे. त्याबाबत आईच्या मृत्यूनंतर नेमकी कोणती मानसिक स्थिती निर्माण होते यासंबंधी एखाद्या मानसोपचार तज्ञाची मुलाखत घ्यायची राहीली आहे. आईच्या मृत्यूवर विलाप करणाऱ्या त्या दोन मुलींच्या मनोभुमिका आता पुढे कश्या राहणार याबाबत देखील कॉमेंट यायची बाकी आहे. हे काही मुद्दे सोडल्यास त्या आईच्या मृत्यूबाबत सर्वच दृष्टीकोनातून साधारण १०० तास चर्चा सर्वच वृत्तवाहिन्यांवर घडवून आणण्यात आली सोशल मीडीयाच्या माध्यमातून कोट्यावधी लोक यामधे सहभागी झाले. अर्थात या चर्चा अजून संपलेल्या नाहीत. तिचे पार्थिव तिरंग्यामधे लपेटलेले दिसले त्यामुळे ते योग्य की अयोग्य यासंदर्भातही चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चा होण्याचे कारण म्हणजे जिचा दुर्दैवी मृत्यू झाला ती व्यक्ती एक सेलेब्रीटी चित्रपट जगताशी संबंधित प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी होती.

पद्मश्री श्रीदेवी या आपल्या देशाच्या पहिल्या लेडी सुपरस्टार म्हणविल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचे कायद्यांचे सक्षमतेने काटेकोरपणे पालन करणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई या शहरात निधन झाले. तिचे निधन ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले अशी बातमी येऊन धडकली जी काही क्षणातच व्हायरल झाली. या पाठोपाठ पन्नाशीतील लोकांनी आता आपल्यालाही काळजी घेतली पाहिजे, कधीही काहीही होऊ शकते अश्या आशयाचे काळजीवाहक संदेश पाठवून या सर्व महाचर्चेला सुरुवात केली. तोपर्यंत इतक्यात काहीच सनसनीखेज झालेले नाही त्यामुळे मजा येत नाही अश्या मुडमधे गेलेल्या दृकश्राव्य वाहिन्या खडबडून जाग्या झाल्या आता पुढचे तीन दिवस काळजी नाही असे म्हणून कामाला लागल्या. देशातल्या काही महत्वाच्या ह्रदयरोग तज्ञांना देखील अचानक वृत्तवाहीनीवर येऊन आपले मत मांडता येऊ लागले. ह्रदयरोगापासून सुरु झालेल्या या चर्चा अपघाती मृत्यू पासून तो दारु पिऊन बाथ टबमधील मृत्यूपर्यंत पोहोचल्या. बाथ टबची देशातील विक्री अचानक वाढली आहे या विनोदापासून ते श्रीदेवीची हत्या करण्यात आली यामधे अंडरवर्ल्डचा हात राहू शकतो या कयासापर्यंत चर्चा पोहोचल्या. तिच्या हत्येचा कट तिच्या पतीने केला त्याने ते कृत्य कसे केले असेल याचे प्रत्यक्ष बाथ टबमधे झोपून वेगवेगळे डेमो दिल्या पासून तो तिचे पार्थिव तिरंग्यामधे का लपेटण्यात आले ते कसे चूक किंवा बरोबर या संदर्भात चर्चा अद्यापही सुरु आहेत. श्रीदेवीच्या दुर्दैवी मृत्यूच्या वेळीच एका वीर जवानाची काश्मीरमधे हत्या करण्यात आली परंतू त्याची चर्चा मीडीयावर नाही यासंदर्भातही चर्चा झाली. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करण्याचे देशभक्तीचे पेटंट घेऊन घमासान सुरु आहे. हे सारे योग्य की अयोग्य या संदर्भात आता बोलणे खरोखरीच गैरलागू आहे. सोशल मीडीया हा प्रकारच वेगवान माहीती आदान प्रदान करण्याचा स्रोत आहे मोबाईल नावाच्या कायम सोबत असलेल्या उपकरणावर तो सहज उपलब्ध असल्याने त्याचा वापर केला जाणार हे गृहीतच आहे. या सर्व बाबीकडे सकारात्मकतेने बघायचे झाल्यास आज आपले मत मांडणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पूर्वी कोणत्याही घटनेबाबत समाजातील विशिष्ट बुद्धीजीवी वर्गच आपले मत प्रदर्शित करायचा. वर्तमानपत्रात लेखन करुन किंवा कोणत्यातरी कार्यक्रमाच्या माध्यमातून जाहीरपणे. या दोन्ही माध्यमांमधून मत प्रदर्शित करणारी मंडळी मर्यादित स्वरुपाची होती. समाजातील एक मोठा वर्ग यापासून दूर होता. त्यांच्या मनात विचार येत नव्हते असे नाही परंतू व्यक्त व्हायला संधी नव्हती जी आता सोशल मीडीयाने उपलब्ध करुन दिली म्हणून कोणत्याही घटनेबाबत अनेक लोक मत व्यक्त करतात त्यामुळे कधीकधी तो अतिरेक वाटतो. समाजातील विविध समुहातून विचार व्यक्त होणे ही समाजिक सुदृढतेची नांदी आहे. परंतू या विचारांच्या प्रकटीकरणामधे आता संवेदनशीलता येणे गरजेचे आहे. त्यातील उथळपणा कमी होऊन आपल्या देशाच्या सांस्कृतिक वैभवाला शोभेल अशी विचारांची खोली यात येणे अपेक्षित आहे. यासोबतच आता आधुनिक काळानुसार काही बाबींना बदलवून नव्याने त्याचा विचार करण्याची देखील गरज आहे. श्रीदेवीच्या दुर्दैवी मृत्यूबाबत करण्यात आलेल्या महाचर्चेमधे तिचे पार्थिव तिरंग्यामधे लपेटायला हवे होती की नको या संदर्भातील चर्चा राष्ट्रध्वजाच्या सन्मानासंदर्भात काही महत्वाचे मुद्दे उपस्थित करुन गेले. खरे तर घटनेमधे युद्धभुमीवर शहीद झालेल्या जवानांव्यतिरीक्त इतर कुणाचेही पार्थिव तिरंग्यात लपेटायला परवानगी नाही. परंतू आपला देश लोकशाही राबविणारा मोठ्या प्रमाणात विविधता असणारा देश आहे. त्यामुळे ध्वजाचा वापर हा मोठ्या राजकीय उच्चपदस्थ नेत्यांसाठी करण्यात येऊ लागला त्यास समाजमान्यता देखील होतीआपली भारतीय मानसिकता ही भावनिक गुंतणूकीच्या आधारावर कार्य करते त्यामुळे तर्काच्या आधारावरील निर्णय आपल्याला फारसे पचनी पडत नाहीत. ही बाब या सबंध चर्चेच्या अनुषंगाने लक्षात ठेवायला हवी. या देशाच्या एका माजी पंतप्रधानांची त्यांच्या अंरक्षकांकडूनच निर्घृण हत्या करण्यात आली. सारा देश त्यावेळी हादरुन गेला. त्या वेळी त्यांचे पार्थिव तिरंग्यामधे लपेटण्यात आले होते. त्यावेळी या देशामधे स्वाभाविकपणे उठलेल्या भावनिक लहरमध्ये घटनेतील ध्वज वापरासंबंधीच्या त्या कलमाची आठवण कुणाला तरी झाली का किंवा ते योग्य ठरले असते का? राजकीय उच्चपदस्थ व्यक्तींसाठी केली जाणारी बाब ही व्यक्तीपरत्वे कशी बदलता येईल? कारण कोणताही मृत्यू हा दुर्दैवीच असतो मृत्यूपश्चात वैर संपवून पार्थिवाचा सन्मान करण्याची आपल्या देशाची परंपरा आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवून मोठ्या झालेल्या सन्माननीय व्यक्तीला मृत्यूपश्चात अशी आदरांजली देण्याबाबत विचार करायला त्यानुसार घटनेतच नाही तर आपल्या मानसिकतेतही बदल करायला काय हरकत आहे. या चर्चांच्या गर्तेत हा सकारात्मक आणि सर्वसमावेशक विचार करायला काय हरकत आहे.

उदाहरण द्यायचे झाल्यास, अमरावतीच्या हिंदु स्मशान भुमीत प्रत्येक पार्थिवाला अग्नी देण्याआधी मानवंदना देण्याची प्रथा आहे. यामधे प्रत्येकच पार्थिवाला ती दिली जाते. मृत्यूचे कारण विचारुन जर मृत्यू मद्य प्राशनाने झाला असेल किंवा कुख्यात गुंडाचे पार्थिव असेल तर ती देण्यात येत नाही असा प्रकार नाही. मृत्यू पश्चात ती व्यक्ती परमेश्वर नावाच्या मूळतत्वामधे समाविष्ट होत असल्याने परमेश्वरसदृश्यच मानली जाते त्यामुळे मृत्यूनंतर तो भेदाभेद उरत नाही. सिनेमात काम करत होती त्यामुळे श्रीदेवीच्या कार्याची तुलना युद्धभुमीवर लढणाऱ्या सैनिकाच्या कार्याशी करणेच योग्य नाही. अश्या कोणत्याही व्यक्तीची सैनिकाच्या बलीदानाशी तुलना होऊ शकत नाही कारण सैनिकाचे कार्य सर्व तुलनांच्या पलीकडचे असते. खरे तर या देशाला मोठे करणाऱ्या आपापल्या परीने देशसेवा करणाऱ्या कुणाच्याही कार्याची कुणाशीही तुलना करणेच मुळात चूक आहे. एक देश चालवायचा असेल त्याला मोठा बनवायचा असेल तर देशातील प्रत्येकच व्यक्तीचे योगदान महत्वाचे कामाचे असते. प्रत्येकजण स्वतःच्या बौद्धिक, शारीरिक, शैक्षणिक योग्यतेनुसार कार्य करीत असतो. त्या प्रत्येकाने देशभक्तीचे आपापले पेटंट नोंदणीकृत करायला हवे. मला सोपविलेले काम अत्यंत प्रामाणिकपणे करुन मी माझ्या देशाला चालविणाऱ्या व्यवस्थेमधे माझा वाटा देतो आहे असा अभिमान बाळगून वागायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या कामाला मी स्वतःच उत्तरदायी आहे. म्हणूनच देशभक्तीचे पेटंट कोणत्या एका सेवेच्या नावाने नोंदणीकृत होऊ शकत नाही ते प्रत्येकाने स्वतःच नोंदणीकृत करावे लागते त्यानुसार कर्तव्यपूर्ती करावी लागते. अश्या अनेक पेटंटच्या भरवश्यावरच देश मोठे होतात. सोशल मिडीयावर या बाबत देखील चर्चा होऊ शकतेमते वेगवेगळी राहू शकतात. त्या सर्व विचारांचा सन्मान करुन एक नव विचार निर्माण करुया.. आपल्याला असे निश्चित करता येईल.




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23