थोडा है थोडे की जरुरत है @27.03.18

वक्त की शाँख के लम्हें

माझ्या अनेकांच्या अतिशय आवडीचे कवी ग्रेट गुलजार यांच्या काव्यप्रतिभेतून बरेच वेळा उमटत असलेली एक संकल्पना वक्त की शाँख के लम्हे मला अनेक वेळा मोहवते. किती सुंदर कल्पना सुचतात कवीला! आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा विचार करता आपण मार्गक्रमण करीत असलेल्या जीवनप्रवासाबद्दल ही संकल्पना किती चपखल बसते. जमिनीत रुजलेल्या आणि वेगवेगळ्या प्रकारे वृद्धिंगत होत जाणाऱ्या झाडाप्रमाणेच आपले जीवन असते त्या जीवनरुपी झाडावर येणारी फळे म्हणजे वेगवेगळे क्षण ज्यांच्या अस्तित्वाने आपले जीवन अर्थपूर्ण होत जाते. जसे कोणत्या झाडावर कोणते, कोणत्या आकाराचे, कोणत्या चवीचे फळ यावे हे त्या झाडाच्या संगोपन प्रक्रीयेवर, त्या झाडाला मिळणाऱ्या किंवा मिळणाऱ्या पोषक तत्वांवर, त्या झाडाला मिळालेल्या जमिनीच्या प्रकारावर, त्या झाडाला मिळणाऱ्या खतपाण्यावर तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला मिळणाऱ्या वातावरणावर अवलंबून असते तस्सेच काहीसे माणसाच्याही जीवनाचे आहे. म्हणूनच गुलजार या जीवनाला पुढे नेणाऱ्या काळाला वृक्षाची उपमा देतात त्या वृक्षाच्या फांद्यांवर रोज नव्याने बहरणाऱ्या वेगवेगळ्या क्षणांना ते विविध प्रकारच्या फळांच्या स्वरुपात बघतात. हे सारे क्षण प्रत्येकाच्या जीवनाची गोळाबेरीज मांडताना हिशोबात घ्यायचे असतात म्हणूनच त्यांना तोडू नये तर त्यांना त्या काळाच्या फांद्यांवर राहू द्यावे जसे मिळतील तसे स्विकारावे असे सांगताना गुलजार म्हणतात,

हाथ छुटे भी तो रीश्ते नही छोडा करते।

वक्त की शाँख से लम्हें नही तोडा करते।।

आपले आयुष्य देखील किती वेगवेगळ्या परीस्थितींवर आणि वातावरणावर अवलंबून असते याचा साधा विचार जरी केला तरी माझे आयुष्य मी बनविले आहे असा अहं बाळगणाऱ्या अनेक मंडळींना त्या अहंमान्यतेतील फोलपणा जाणवू शकतो. यासोबतच आपल्या आयुष्याची दुसऱ्याच्या आयुष्यासोबत तुलना करुन स्वतःला श्रेष्ठ समजणे हा अहंगंड किंवा स्वतःला अतिशय कमनशीबी समजणे हा न्यूनगंड तयार होण्यापासून वाचता येऊ शकते. गुलजारच्या मते हे सारे काळाच्या फांद्यांवर उगविणारे क्षण मनापासून अनुभवता येणे हे खरे जीवनसार आहे. हे क्षणच आपले संचीत आहे तीच आपली मिळकत देखील आहे. असे क्षण आपल्या आयुष्यात अनेकवेळा येतात. पण कधी कधी त्या क्षणांना जगण्यासाठी आवश्यक वातावरण, मानसिकता, किंवा आधुनिक शब्दावलीतील रुढ शब्द म्हणजे मूड असावा लागतो. पण मग त्यामुळे कधीकधी काही क्षण हे कळीचे फूल होता तसेच गोठून गेलेल्या स्थितीत अडकून राहतात तर काही क्षण हे भरभरुन फुलतात त्याचा सुगंध पुढच्या अनेक क्षणांना सुगंधित करतात. क्षणांना टवटवित फुलांमधे परावर्तीत करण्यासाठी मात्र एक विशिष्ट प्रकारची मनोवृत्ती आपल्या ठायी असावी लागते. ती असेल तरच हे सारे क्षण त्यासोबत बहरत असलेले आयुष्य सुरेख होते. अर्थात मनोवृत्ती असूनही क्षण बहरतीलच असेही नाही. ते सारे स्थळ काळ आणि व्यक्तीसापेक्षच असतात.

नेहेमीसारखा एक समुद्र किनारा, त्याच लाटा, तोच आवाज, तेच सारे काहीपण अचानकवक्त की शाँख पर एक लम्हां उगता हैएकमेकांवर नितांत प्रेम करणारी दोघे त्याच किनाऱ्यावर सायंकाळ उलटून गेल्यावर बसलेले असतात. तो सखा नि त्याची सखी.. किनाऱ्यावर पसरलेली निरव शांतता.. येत असतो तो केवळ खळखळत्या लाटांचा आवाज. तिने हळूवार त्याच्या खांद्यावर डोके टेकविलेले असते आणि त्याने तिचा हात हातात धरलेला असतो. दूरवर खाडीच्या भागाला मोठ्या उंच लाईट हाऊसमधला फिरता दिवा मधूनच चमकदार किरण दाखवितो. रात्रीच्या वेळी दूरवर समुद्रात विरत जात असलेल्या होड्या त्यांच्यावरील हळूहळू लुप्त होणाऱ्या दिव्यांसह दूर जात असतात. मधूनच एखादा सागरी पक्षी त्याच्या कर्कश आरोळीने सारा आसमंत भरुन टाकतो आणि मग शांत होतो. समुद्राच्या लाटांचे खळाळते नर्तन सुरु असते. लाटांचा तो नादमय आवाज या दोघांच्याही मनात निर्माण होणाऱ्या विचारांना लय प्राप्त करुन देतात.. पण त्या क्षणी मनातील विचारांना कोणतेही शब्द देता त्या केवळ निसर्गाच्या आवाजासह ती दोघे शांतपणे ते आनंदक्षण अनुभवत असतात. काहीही बोलता दोघांनाही एकमेकांच्या मनातील सारे काही कळत असते अशी ती प्रेममयी एकरुपता ती दोघे त्या क्षणांना अनुभवत असतात. त्या शांततेची सहसंवेदना अनुभवत असताना ती त्याला हलकेच म्हणतेगा ना काहीतरी माझ्यासाठी.. तिच्या कोणत्याच गोष्टीला नाही म्हणायचे नाही अशी त्याची सवय असल्याने सुरेल आवाजात तो केवळ तिच्यासाठी गाऊ लागतो.. अगदी हळूवारकेवळ तिच्यासाठी.. इतके हलके की त्याचे सुर त्या सभोवताली सुरु असलेल्या निसर्ग संगीतात इतके छान मिसळून जातात की त्यांना त्याच्या पासून वेगळे करणे शक्यच नसते. तिला मात्र ते बरोबर ऐकू येतात.. तिच्या मनावर रोमांच उठविणारे त्याचे सुर खोलवर तिच्या ह्रदयापर्यंत पोहोचतात आणि त्यामधून देखील त्याच्या तिच्यावरील प्रेमाची प्रचिती तिला होत राहते. त्याचे ते गाणे संपताना तो सहजच तिच्या सुंदर चेहेऱ्याकडे बघतो. मनातील भाव जसे आहेत तसे पारदर्शीपणे व्यक्त करणाऱ्या तिच्या मृगनयनी डोळ्यात आनंदाश्रु तरळत असतात. त्या आनंदाश्रुंना त्याच्या कंठातून बाहेर पडणाऱ्या प्रेममयी सुरांचे आनंद ओझे सहन होत नाही ते भावोत्कट होऊन तिच्या टपोऱ्या डोळ्यातून गालावर ओघळू लागतात. तिचेही त्याच्यावर असलेल्या जीवापाड प्रेमाची ओळख पटवून देणारे ते अश्रू तो हलकेच टिपून घेतो. सागराचा लयबद्ध खळखळाट आणि लाईटहाऊस मधील दिव्याच्या गिरक्या अजूनही सुरु असतातकाही वेळाने तो तिलाही हलकेच काहीतरी गाण्याची विनंती करतो.. तिचाही आवाज सुंदर प्रेमाने ओथंबलेला असतो त्यामुळे तिचे सुर देखील त्याच्या थेट ह्रदयापर्यंत पोहोचतात आणि त्याचवेळी दूरवर सागरातून त्यांचा आवडता चंद्र उगवला. एकमेकांच्या सहवासाने हर्षोल्हासित झालेल्या त्या दोघांच्या आनंदाला त्या चंद्राच्या सागरातून झालेल्या आगमनामुळे पार उरला नाही. चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघालेले सागराचे खळखळते पाणी, समुद्रातून जन्म घेतलेले ते चंद्रबिंब त्या सबंध वातावरणाला त्या वातावरणात प्रेमाची एकरुपता अनुभवत बसलेल्या या दोघांच्या प्रेमातूर मनांना रोमांचित करुन टाकत होते.. त्या सुगंधी वातावरणात त्याचा हात हातात धरुन तिने विचारले, सख्या एक सांगू? बऱ्याच वेळानंतर ती काहीतरी बोलणार होती म्हणून अत्यंत उत्सुकतेने त्याने तिला म्हटले, सांग ना सखेत्याच्या डोळ्यात स्वतःला गवसून मोठ्या आनंदाने ती सांगू लागलीसख्याआणि अचानक कर्कश आवाजातला अलार्म वाजला आणि त्याला खाडकन् जाग आली

मुंबईतल्या एका चाळीतील एका खुराड्यागत खोलीमधे त्याला जाग आली जेथे बाहेर नळावर पाणी भरणाऱ्यांचा कोलाहल सुरु झाला होता, चार दिवसानंतर पाणी आले असल्याने किती भरु नि किती नाही या तयारीत भांडणे सुरु झाली होती. त्याची पत्नी देखील एव्हाना त्या गर्दीत हातात बादल्या घेऊन पोहोचली होती. याला जाग आलेली बघून एक बादली ठेवली आहे, लवकर घेऊन या असे ती खालून ओरडली. पाणी भरुन त्याला लोकलच्या गर्दीत धक्के खात खात जिवनाचा मार्ग शोधायचा होता. चाळीच्या बाजूच्या केमीकल फॅक्टरीमधून रोजच्या प्रमाणे घाणेरडा दर्प सबंध चाळीत पसरला आणि त्याला त्याच्या वास्तवाची जाणिव झाली. गुलजारच्या पुस्तकातील वक्त की शाँख के लम्हे नही तोडा करतेही ओळ वाचता वाचता केव्हा झोप लागली ते आधल्या रात्री त्याला कळलेच नव्हते.. आवरासावर करण्यासाठी त्याने गुलजारचे ते पुस्तक नीट ठेवण्यासाठी उचलले.. पाने उलटली होतीत्याचे सहजच लक्ष गेले.. गुलजारच्या लेखनाकडे.. त्या पानावर गुलजारने  लिहीले होते

वक्त की शाँख पर कुछ लम्हे खिलते है, कुछ खिलकर मुरझा जाते है और कुछ बेचारे खिल ही नही पाते.. वो तो बस सब्र का इम्तेहान देने के लिये ही पैदा होते है

आपल्या प्रत्येकाच्या जीवनरुपी वृक्षाच्या फांद्यांवर उगविणारे काळाच्या गर्भात दडलेले सर्वच लम्हे कवीला कसे काय कळतात?




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23