थोडा है थोडे की जरुरत है @20.03.18

स्वामी समर्थ पान सेंटर

आजच्या लेखाचे शिर्षक देखील काही जणांना जरा चकित करेल. स्वाभाविकच आहे. हे वाचून त्याबद्दल माझ्या एका मित्राने खूप राग व्यक्त केला. या नावाच्या एका पानठेल्याच्या पाटीने त्याचा तिळपापड झाला होता. त्याच्या श्रद्धेला कुठेतरी ठेच लागल्यासारखे त्याला वाटत होते. लेखाचे केवळ शिर्षक वाचल्यावर काही जणांना तसेच वाटण्याची शक्यता आहे याची मला जाणिव आहे. तरी देखील

झाले असे की, आपल्या श्रद्धा स्थानाचा वापर बरेच वेळा फार चुकीच्या पद्धतीने केला जातो या विषयावर चर्चा रंगली होती त्या चर्चेमधे सहभागी होताना माझा मित्र म्हणाला, आपल्या गावातील शिलांगण रोडला एक स्वामी समर्थ पान सेंटर नावाचा पान ठेला आहे. ज्या दुकानात तंबाखू, सिगरेट, घुटका अश्या हानीकारक गोष्टी विकल्या जातात त्या दुकानाला स्वामी समर्थांचे नाव सहनच होऊ शकत नाही. मी रोज गुरुवारी स्वामी समर्थांच्या मंदिरात जातो, मनोभावे प्रार्थना करतो, जिवन चांगल्या प्रकारे व्यतीत करण्याची मला तेथे प्रेरणा मिळते आणि घरी जाताना कायम हा पानठेला दिसतो. स्वामी समर्थांच्या नावाचा असा वापर केलेला सहन करण्याच्या पलीकडचा आहे. पण आपल्या देशात काहीही चालते. खरे तर शॉप लायसन्स देताना अश्या नावांवर बंदी घालायला हवी. हा आमच्या श्रद्धास्थानांचा अपमान आहे. हिंदुंच्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेतला जातोयवगैरे वगैरे सांगून त्याने त्याचा तीव्र संताप व्यक्त केला. नंतर ती चर्चा संपली. दोन दिवसापूर्वी पहाटे माझ्या नेहमीच्या फिरायला जाण्याच्या रस्त्याऐवजी ऐवजी त्या स्वामी समर्थ पान सेंटरच्या रस्त्याने जाण्याचा योग आला. जाताना परत येताना मी त्या दुकानाकडे तेथे सुरु असलेल्या कार्याबद्दल बघितले नंतर ते सारे माझ्या मित्राला सांगितले. मी केलेले वर्णन ऐकल्यानंतर तो विचारात पडला. त्या दिवशी त्या दुकानाच्या नावाच्या पाटीवरुन अक्षरशः भडकून गेलेला माझा मित्र आता मात्र जरा शांत होऊन विचार करु लागला. जरा वेळाने मला म्हणाला, खरंय यार, कधी कधी आपण आपल्या विचारकक्षेत राहून तयार केलेली भूमिका आणि वास्तव यात किती तफावत असते. आपण बरेच वेळा एखाद्या गोष्टीबद्दल ग्रह करुन घेतो आणि त्याला दुसरी बाजू असू शकते हा विचारच करत नाही. अश्या ग्रह करण्याची सवय झाली की मग आपली मते अकारणच ठाम बनून जातात आणि त्याचा आपण वृथा अभिमानही बाळगायला लागतो. आपला विचारही चुकू शकतो हे समजून उमजले पाहिजे. या पान सेंटरच्या बाबत माझे असेच झाले. मी चुकलो होतो. माझ्या मित्राने हे बोलल्यावर मला फार आनंद झाला. आपला विचार चुकू शकतो हे स्विकारण्याचे मोठेपण त्याच्या ठायी असल्याबद्दल मी त्याचे अभिनंदनच केले. त्याला मी जे सांगितले ते त्याचा दृष्टीकोन बदलविणारेच होते

पहाटे पाच वाजता हे पान सेंटर चालविणारी चमु तेथे हजर होते. ते सेंटर चमुच चालवित असावी असे मला वाटते. पहाटे पाच वाजता त्या पानठेल्याजवळचा सर्व परीसर झाडून स्वच्छ केला जातो. त्यानंतर पानठेल्याच्या सर्व वस्तू साफ केल्या जातात. सगळी कडे छान पाणी शिंपडून आणि मधून मधून सडा देखील टाकला जातो. त्यानंतर पानठेल्याचा मुख्य मालक जो पहाटे शुचिर्भूत होऊन आलेला आहे तो छान पुजा करतो. पानठेल्यात आजुबाजूला उदबत्तीचा सुवास दरवळतो. पूर्ण पानठेला साफ करुन दिवसभराची तयारी केली जाते. प्रत्येक पानठेल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे गाणी सुरु असतात. या पानठेल्यावर देखील गाणी लागतात. परंतू सुरुवात आरतीने होते. त्यानंतर पहाटे पहाटे छान वेगवेगळी भजने सुरु असतात. स्वामी समर्थांच्या भजनानेच सुरुवात होते. अश्या प्रकारे सारे वातावरण मंगलमय होऊन जाते. पुजा झाली की मग दिवसभर येणाऱ्या ग्राहकांसाठी तयारी सुरु होते. दोन मुले दिवसभर लागणारे घुटके तयार करतात. एका मोठ्या जाड कापडामधे सर्व जिन्नस टाकून एका खडबडीत लादीवर ती कापडाची पुरचुंडी रगडणे सुरु होते. अतिशय मेहनतीने ती दोन पोरे ते काम करीत होती. मी चार किलोमीटर फिरुन परत आल्यावरही त्याचे ते काम सुरु होते. पाने स्वच्छ धुवून ठेवणे, सर्व गोष्टी वेगवेगळ्या भांड्यांमधे काढून ठेवणे, प्यायला पाणी भरुन ठेवणे. रात्री आवरुन ठेवलेली प्रत्येक गोष्ट पुन्हा नव्याने रचून, सजवून ठेवणे हे सारे काम तीन चार जण मिळून करतात. सकाळी पाच वाजता सुरु झालेले हे स्वच्छतेचे तयारीचे काम जवळपास दोन तास अतिशय मेहनतीने आणि मनापासून चालते त्यानंतर मग ग्राहक येतात. दिवसभर पानठेला सुरु राहतो. कदाचित त्या चमुतील वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेळी पानठेल्यावर बसत असतील. परंतू सकाळी पाच पासून ते रात्री साडेदहा पर्यंत ते दुकान सुरुच असते. विविध ग्राहकांच्या आवडीची वेगवेगळी पाने, घुटके, कुणाला काय तर कुणाला काय असे सगळे बनवत बनवत दिवस संपतो. रात्री साडे दहा वाजता सारे काही मांडून ठेवलेले पुन्हा आवरुन ठेवावे लागते. त्याला देखील जवळपास पाऊण तास लागतो. रात्री साधारण सव्वा अकराच्या सुमारास दुकान वाढवून (दुकानदार दुकान बंद केले असा उच्चार करता वाढवले असे म्हणत असतात) ती चमू घरी जाते. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता कामावर हजर. हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा या तिनही ऋतुंमधे खंड पाडता सकाळी पाच वाजता स्वामी समर्थ पान सेंटरचे काम सुरु होते रात्री सव्वा अकरा वाजता संपते. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सारे काम ती मंडळी अतिशय मेहनतीने आनंदाने करतात. पहाटे सगळी साफ सफाई सुरु असताना मी त्यांना मस्त गमती जमती करताना बघितले. छान आनंद घेऊन काम करतात, मेहनत करतात आणि प्रामाणिकपणे आपला चरीतार्थ चालवितात. आता या पानठेल्यावर ते अनेकांच्या शरीराला घातक असणारा घुटका किंवा सिगरेट विकतात या बाबीमुळे आपण त्यांना वाईट ठरवायचे का हा महत्वाचा प्रश्न आहे. सोबतच ती विक्री केली जात असल्याने त्या दुकानाला स्वामी समर्थांचे नाव देणे योग्य आहे का हा देखील प्रश्न आहेच. हा विचार करतानाच मला पटकन आठवले, दोन वर्षांपूर्वी जळगावला पुजेचे सामान विकणाऱ्या एका श्री गणेश पुजा साहित्य नावाच्या फार मोठ्या दुकानाच्या मालकाला त्याने सेल्स टॅक्स भरला नाही म्हणून दंड ठोठावण्यात आला होता. त्याच्या दुकानाच्या नावाचे काय करावे?

माझ्या मित्राने दिलेली प्रतिक्रीया प्रत्येकाने द्यावी असा आग्रह धरणे चूक आहे. जिवन जगत असताना असे प्रसंग येत असतात त्यावेळी त्यांच्या कडे बघण्याची दृष्टीच मुळात आपला जिवनाबद्दलचा दृष्टीकोन ठरवत असते. मनात आपणच ठसवून ठाम केलेल्या पूर्वग्रहांनी जगाकडे बघायचे की माझ्या विचारांना लवचिक ठेवून बदलत्या स्वरुपात विचार करायचा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत अधिकार आहे. एक मात्र नक्कीआपण ठरविलेल्या भूमिकांपेक्षाही वेगळा विचार असू शकतो, आपण बघत असलेल्या गोष्टीची दुसरी बाजू असू शकते, आपल्या विचारकक्षेच्या पलीकडेही विचार आहे तो जर चांगला असेल तर मला तो स्विकारता आला पाहीजे अशी मनोवृत्ती आपल्याला एक अमुल्य गोष्ट देते ती म्हणजे जगण्याचा निखळ आनंदआणि सोबतच आपल्यापेक्षा कुण्याही वेगळ्या व्यक्तींना विचारक्षमता आहे त्यांच्या विचारांचा आपल्याला सन्मान करता येतो ही देखील एक उपलब्धीच ठरते.. स्वामी समर्थांच्या प्रेरणेने एक प्रामाणिक आणि समर्पित व्यवसाय कार्यरत होत असेल तर त्याच्या नावाच्या पाटीला बघून राग येण्याचे कारण उरत नाही असे वाटतेबाकी आपल्या विचारांना सक्षम करण्यासाठी स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेतच..




Comments

  1. अप्रतिम सर
    खरच वेगळ्या बाजूने पाहण्याचा गुण असलाच पाहिजे
    आणि तुमच्या लिखाणावर बोलायला मी खूप लहान आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23