थोडा है थोडे की जरुरत है @ 27.02.18

शिक्षण बदलुयात

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या वर्षीच्या दिक्षांत समारोहात विद्यापीठाचे माननीय कुलगुरु आणि प्रमुख पाहुणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माननीय अध्यक्ष यांनी आपापल्या भाषणांमधे शिक्षणासंबंधीचे दोन महत्वाचे मुद्दे मांडले. बदलत्या काळात या दोन्ही मुद्द्यांवर शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक नागरीकाला विचार करुन काही बाबी कार्यान्वित कराव्या लागणार आहेत. सध्या शिक्षणाच्या परंपरागत पद्धतींच्या उपयोगीतेबाबत फार चर्चा होताना आढळते. शिक्षणासारख्या समाज घडविणाऱ्या व्यवस्थेबाबात अशी चर्चा होणे हेच मुळात दुर्दैव आहे. परंतू तशी चर्चा होत असेल तर त्यामधून काही बदल करता येतील का या संदर्भात विचार होणे गरजेचे आहे. शिक्षण देणाऱ्या व्यवस्थाच बदलवून टाकुया असा टोकाचा विचार देखील करुन चालणार नाही कारण व्यवस्था उभारायला काही पिढ्यांचे योगदान मिळालेले असते त्या सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिलेलेच असते. परंतू या व्यवस्थांमधे काळानुरुप बदल अपेक्षित असतात, समाजाच्या अपेक्षा देखील बदलत असतात म्हणूनच शिक्षणासारख्या महत्वाच्या व्यवस्थेच्या उपयोगीतेबाबत जर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील त्या प्रश्नांना समजून घेऊन या समाज उन्नतीसाठी कारणीभूत असलेल्या सर्वात महत्वाच्या व्यवस्थेमधे आवश्यक ते बदल करण्याची जबाबदारी या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांवर येते. ज्या दोन परस्परांशी संबंधित मुद्दयांचा उल्लेख विद्यापीठाच्या दिक्षांत समारोहातील भाषणांमधे झाला त्या मुद्यांच्या आधारे या बदलांची सुरुवात करता येऊ शकते. ते दोन मुद्दे म्हणजे आपल्या शिक्षण प्रणाली मधे सामाजिक संवेदना आणि व्यवहारीकता याचा जाणीवपूर्वक सकारात्मकतेने अंतर्भाव करणे

माननीय कुलगुरुंनी पांढरकवड्याजवळ झरी झामणी या परीसरामधे अस्तित्वात असलेल्या एका अतिशय गंभीर अश्या कुमारी मातांच्या प्रश्नाबाबत वक्तव्य केले. या परीसरामधे मोठ्या संख्येने कुमारी माता आहेत ज्यांचे केवळ बांबुच्या एका मोळीसाठी किंवा बाटलीभर डींकासाठी देखील ठेकेदारांकडून शोषण करण्यात आले त्या मधून त्या मुलींच्या पदरी लहान बाळे आहेत. अगदी पंधरा सोळा वर्षाच्या लहानग्या मुली देखील या अत्याचारांना बळी पडलेल्या आहेत. आपल्या समाजातील काही प्रथा परंपरांचे ओझे इतके जास्त जास्त आहे की त्या मुलींना दुर्दैवाने समाज स्विकारत नाही त्यामुळे त्यांच्या अत्याचारामुळे त्यांच्या कडेवर असलेल्या लहान लहान बाळांच्या चरीतार्थाचा भिषण प्रश्न निर्माण झालेला आहे. माननीय कुलगुरुंच्या वक्तव्याचा पुढचा भाग अतिशय महत्वाचा होता तोच भाग आता येणाऱ्या काळात महत्वाचा आहे. समाजातील या यासारख्या अत्यंत दाहक समस्या सोडविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेचा काय कसा सहभाग राहू शकतो याबाबत तातडीने विचार करण्याची गरज आहे. या संभावना तपासून त्वरीत शिक्षण व्यवस्थेमधे कार्य करणारे मनुष्यबळ आपल्याला या समस्यांच्या निराकरणासाठी जर वापरता आले तर या व्यवस्थेच्या उपयोगीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मंडळींना ते चोख उत्तर ठरु शकेल. शाळा महाविद्यालयांमधे शिकणाऱ्या मुला मुलींच्या, तरुण तरुणींच्या मनामधे सामाजिक संवेदना निर्माण करण्यासाठी त्यांना केवळ वर्गात समाजशास्त्रे शिकवून परीक्षा द्यायला लावणे याने आता काम भागणार नाही. उलटपक्षी समाजशास्त्रे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कुमारी मातांच्या प्रश्नांसारखे सामाजिक प्रश्न अभ्यासून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रवृत्त करणे हा खरा बदल आता अपेक्षित आहे. अठरा वर्षाची चांगल्या कुटुंबातील एखादी मुलगी जेव्हा तिच्याच वयाच्या बांबुच्या एका मोळीसाठी अत्याचारग्रस्त झालेली कडेवर तीन वर्षाचे बाळ घेऊन भिक मागणाऱ्या मुलीला प्रत्यक्ष भेटेल तेव्हा या प्रश्नाची तिव्रता तिच्या लक्षात येईल. त्यासाठी अश्या भेटींच्या, त्यांना समजून घेण्याच्या त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने विचार करण्याच्या संधी जर शिक्षण व्यवस्थे मधूनच निर्माण झाल्या तर हे काम किती वेगाने होऊ शकते

दुसरा विषय जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी मांडला तो देखील अतिशय महत्वाचा आहे. आपल्या भाषणात लोकसेवा आयोगाच्या मुलाखतींचा संदर्भ देताना ते म्हणाले की अंतिम मुलाखतीदरम्यान एका शेतकऱ्याच्या मुलाला, ज्याच्या घरी शेती आहे शेती हा त्याच्या परीवाराचा परंपरागत व्यवसाय आहे अश्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवाराला जमीनीबाबत गुंठे, एकर, क्षेत्रफळ इत्यादी प्राथमिक गोष्टी देखील ठाऊक नाहीत अशी उदाहरणे आहेत. खोलीच्या भिंतींची लांबी रुंदी सांगूनही साधा गुणाकार करुन खोलीचे क्षेत्रफळ पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला काढता येऊ नये ही शोकांतिका त्यांनी वर्णन केली यासंदर्भातही त्वरीत काहीतरी करायला हवे असे सुचविले. लोकसेवा आयोगाच्या माननीय अध्यक्षांना हेच सुचवायचे होते की आपल्या शिक्षण व्यवस्थेत अभ्यासक्रमांमधे व्यावहारिक प्रशिक्षणाचा मोठा अभाव जाणवतो. आपले अभ्यासक्रम आखताना त्याचे अध्यापन करताना केवळ गुणपत्रीकेवरील गुणांचाच विचार महत्वाचा ठरतो आहे त्यासाठी म्हणून महाविद्यालये विद्यापीठे देखील केवळ परीक्षा घेणारी केंद्रे बनत चालली आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो. पदव्युत्तर वर्गापर्यंत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात काही महत्वाची प्राथमिक व्यावहारिक कौशल्यांच्या संकल्पना तयार नसतील तर या शिक्षणाला सर्वांगीण म्हणावे का हा महत्वाचा मुद्दा या भाषणामधे मांडण्यात आला

खरोखरीच शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्याच नव्हे तर या देशातील प्रत्येकानेच आता या संदर्भात विचार करण्याची वेळ आली आहे. समाजिक संवेदना जीवन जगण्याची व्यावहारिकता या दोन्ही बाबींचा अंतर्भाव या संपुर्ण प्रणालीमधे करण्यासाठी फार वेगाने बदल करावे स्विकारावे लागणार आहेत. कारण एका बाजुने जागतिक पातळीवर भारतीय तरुणांना प्रचंड संधी उपलब्ध होण्याची स्थिती निर्माण होताना जर आपले विद्यार्थी कमकुवत ठरले तर येणाऱ्या काळात वैश्विक नेतृत्वाकडे झेपावणाऱ्या आपल्या देशाच्या वाटचालीमधे खीळ बसल्याशिवाय राहणार नाही. अर्थात यासाठी सर्वांनी एकत्रीत प्रयत्न करायला हवेत. या सबंध शिक्षण प्रणालीला निरुपयोगी समजून याचा ताबा खाजगी क्षेत्राकडे देण्याचे मनसुबे कुणीही बाळगू नये कारण शिक्षण हे सार्वजनिक क्षेत्रामधेच मोठे सर्वसमावेशक होऊ शकते. खाजगी क्षेत्राची चढाओढ, तेथील अर्थकारण जीवघेणी स्पर्धा या बाबी शिक्षण क्षेत्रासाठी कधीही पोषक राहू शकणार नाही. परंतू शिक्षण क्षेत्रामधे जर वर उल्लेखित दोन महत्वाचे बदल लवकरात लवकर केल्या गेले नाही तर यामधील खाजगी क्षेत्राचा शिरकाव अटळ आहे त्यासोबतच या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात महत्वाच्या व्यवस्थेला अद्याप असलेला समाजाचा पाठींबा संपुष्टात येईल जी सर्वात जास्त घातक बाब ठरेल

शैक्षणिक प्रक्रीयेत गेलेला आपला मुलगा किंवा मुलगी व्यावहारिक दृष्टीने सक्षम झालाय आणि त्याच्या मनात सामाजिक जाणीवा निर्माण झाल्यात या दोन गोष्टी कोणत्याही पालकाला या व्यवस्थेवर संपुर्ण विश्वास ठेवण्यासाठी त्याला सहकार्य करण्यासाठी उद्युक्त करतील. सध्या दोन्ही बाबींचा अभाव आहे त्याचा त्वरेने विचार करण्याची गरज दिक्षांत समारोहामधे माननीय कुलगुरु माननीय प्रमुख अतिथी यांनी बोलून दाखविली. या दोन मुद्द्यांवर विचारपूर्वक काम करण्याची जबाबदारी एकत्रीतपणे सर्वांची आहे. प्रत्येक विषयांशी संबंधित व्यावहारिक कौशल्ये शोधून त्याचा अंतर्भाव अभ्यासक्रमांमधे करण्याकरीता त्यासोबतच अध्यापन प्रक्रीयेमधे आवश्यक ते बदल तातडीने करण्यासाठी आपल्याला कार्य करावे लागेल

जेव्हा भाषेच्या वादासंबंधी योग्य विचार करुन आपली एखादी विद्यार्थिनी एखाद्या फोरमवर आपले मत मांडेल, जेव्हा अर्थसंकल्पावरील चर्चेमधे आपला वाणिज्य पदव्युत्तर विद्यार्थी विचार प्रदर्शित करेल, आपला शेतकी अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी त्याच्या वडीलांना आधुनिक पद्धतीची शेती करण्यास मदत करेल, घाण झालेल्या नद्यांना स्वच्छ करण्यासाठी लोकांमधे आमचा विद्यार्थी जनजागृती करेल, कुमार वयीन मुलींच्या समस्या सोडविण्यासाठी गृहविज्ञान शिकलेली आमची विद्यार्थिनी एखादे केंद्र चालवेल किंवा कुमारी मातांच्या पुनर्वसनासाठी आपले विद्यार्थी समाज जागृती करुन प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने वर्तमानपत्रात लिखाण करुन, लोकप्रतिनीधींना सांगून, समाजाची वैचारिक दिशा बदलवून त्या कुमारी मातांना समाजात सामावून घेण्याचे प्रयत्न करतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण शिक्षणाचे वैभवशाली अधिष्ठान पुनःस्थापित करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले असे म्हणावे लागेलहोय ना?







Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23