थोडा है थोडे की जरुरत है @ 06.02.18

ब्लॅक इज ब्युटीफुल

एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी ती चिमुरडी. जेमतेम नववीचे शिक्षण पूर्ण होऊन दहावीत गेलेली. दहावीचे महत्वाचे वर्ष त्यामुळे दिवसभर वेगवेगळ्या शिकवण्या, शाळा यामधे व्यस्त असायची. परंतू अचानक दहावीचे वर्ग सुरु झाल्यावर काही दिवसातच ती फार दुर्मुखलेली रहायला लागली. तिचे काहीतरी बिनसले होते. खरे तर बऱ्यापैकी हुशार या वर्गवारीत मोडली जाणारी ती पोर होती. परंतू त्यासोबतच तिच्यामधे काही अन्य महत्वाच्या गोष्टी होत्या. ती अतिशय अप्रतिम गाणे म्हणायची. परमेश्वराने तिच्या गळ्यात जन्मजातच तान बसविलेली होती. कोणतेही गाणे अतिशय मधूरपणे ती गायची ऐकणारे मंत्रमुग्ध व्हायचे. यासोबतच तिचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते तिला लिखाण करण्याची सुंदर हातोटी होती. तिचा इंग्रजीचा पेपर म्हणजे वर्गासाठी एक आदर्श पेपर असायचा. अश्या छान छान गुणांनी युक्त असलेली ती मुलगी दहाव्या वर्गात गेल्यामुळे गाण्यापासून जरा दूर गेली होती. महत्वाचे वर्ष असल्याने कदाचित तिच्या पालकांनी गाणे काही दिवस तिला बंद ठेवायला सांगितले होते. नवव्या वर्गापर्यंतची तिची अभ्यासातील प्रगती बघता तिला ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळायलाच हवे अशी तिच्या पालकांची तिची देखील इच्छा होती त्यासाठी तिने परीश्रम घेणे सुरु केले होते. परंतू अचानक काही दिवसापासून तिचा हा बदललेला नूर कुणाच्या लक्षात येत नव्हता किंवा त्याकडे दुर्लक्ष झाले. झाले असे होते की या मुलीमधे हे गायन, बुद्धीमत्ता, लेखनशैली, हस्ताक्षर सारे गुण तर होतेच परंतू सोबतच एक अजून छान गोष्ट होती परंतू त्या गोष्टीबद्दल आपल्या समाजाच्या परंपरागत विचारशैलीमधे असलेल्या दोषामुळे तिला त्याचा त्रास होऊ लागला. ती गोष्ट म्हणजे तिचा काळा रंग. तिच्या काळ्या रंगामुळे तिच्या वर्गातील काही मुले मुली तिला त्यावरुन चिडविण्याचे प्रकार सुरु झाले होते. पौगंडावस्था प्राप्त झाल्याने ती त्या काळात जास्तच काळी दिसू लागली होती काळे दिसणे म्हणजे आपल्या व्यक्तीमत्वाला लागलेले ग्रहण असे तिला त्या चिडविण्यामुळे वाटू लागले होते. ज्या वयात ती पोर होती त्या वयात विशेषतः मुलींच्या मनामधे दिसण्याबद्दलच्या किंवा सौंदर्याबद्दलच्या कल्पना निर्माण होऊ लागल्या असतात. त्या कल्पनांबद्दल योग्य पद्धतीने पालकांनी किंवा शिक्षकांनी समुपदेशन केल्यास त्या कल्पनांमधील आवास्तव भाग मनात दृढ व्हायला लागतो. तसेच काहीसे त्या मुलीबाबत झाले. आपल्याकडे सारे असूनही आपल्या रंग काळा असल्याने आपण इतरांपेक्षा कमी आहोत ही जाणीव तिच्या मनात घर करुन राहीली होती. तिच्या वर्गातील मुला मुलींच्या चिडविण्यामुळे तिच्या मनातील ती बाब तिच्या मतानुसार वैगुण्यामधे परावर्तित झाली. सर्व अभ्यासातील लक्ष विचलित होऊन ती केवळ त्याच एका गोष्टीचा विचार करु लागली. आणि तो विचार करता करताच ती कमालीची खचून गेली. कामाच्या व्यापात तिच्या आई वडीलांच्या देखील ती गोष्ट लक्षात आली नाही. या चिडविण्यामुळे तिच्या मनात जो तिच्या काळ्या रंगाबद्दल न्यूनगंड तयार झाला त्याचा परीणाम इतका भयंकर झाला की आपण अंदाजही करु शकणार नाही. त्वचेचा काळा रंग या संपूर्णपणे परमेश्वराच्या हाती असलेल्या गोष्टीचा अति जास्त विचार करुन त्या दहाव्या वर्गातल्या चिमुरडीने काय करावे?… तिने त्या ताणग्रस्त अवस्थेतच एके दिवशी संध्याकाळी आई वडील कार्यालयातून परत यायचे असताना आपल्या खोलीतील पंख्याला दोरी बांधून फास लावून घेतला…. आत्महत्या केलीलाखमोलाचे उज्वल भविष्य असलेले आयुष्य एका चुकीच्या संकल्पनेला बळी पडून मातीमोल केले. ही अत्यंत ह्रदयद्रावक घटना साधारण पंधरा दिवसांपूर्वी आपण सर्वांनी वर्तमानपत्रात वाचली. या मुलीच्या या भयानक कृत्यामुळे आधुनिक वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ समजल्या जाणाऱ्या एकविसाव्या शतकातील सतराव्या वर्षात एका महानगरामधे रंगभेदाचा एक बळी गेला.

वेगवेगळ्या संकल्पनांनी तयार झालेले जिवन आपण सारे जण जगत असतो. या सर्व संकल्पनांचा आधार कधी ऐतिहासिक कधी राजकीय किंवा कधी सामाजिक घडामोडी असतो. काही संकल्पना या परंपरागत आपल्या जिवनाला चिकटलेल्या असतात त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होतात. समाज कितीही बदलला तरी देखील सहजच स्विकारली जाणारी एक संकल्पना म्हणजे गोऱ्या कातडीबद्दल आपल्या सर्वांना असलेले अनाकलनीय आकर्षण. काळ्या रंगाच्या व्यक्तीला हिणविले जाणे गोऱ्या रंगाच्या व्यक्तीला अग्रक्रम मिळणे ही एक विचित्र परंपरा गेल्या अनेक शतकांपासून तो अद्यापही सुरु आहे. याची व्याप्ती जगभर आहे. काळ्या कातडीच्या लोकांना गोऱ्या कातडीच्या लोकांनी गुलाम म्हणून वापरल्याचे जागतिक इतिहासातील कितीतरी दाखले आपल्याला देता येतील. नेल्सन मंडेला सारख्या नेत्याने याच गुलाम समजण्याच्या मानसिकतेविरुद्ध केवढा लढा दिला. त्या साऱ्या मानसिकतेचा आधार देखील हा दुय्यम वागणूक मिळणारा काळा रंगच होता. आपल्या समाजात या गोऱ्या रंगाचा अट्टाहास हा महिलांच्या बाबत जास्त प्रमाणात केलेला दिसतो कारण महिलांच्या सौदर्याच्या संकल्पनांमधे गोरा रंग या गोष्टीला फार जास्त प्राधान्य दिले गेले आहे अद्यापही तिच स्थिती आहे. याउलट पुरुषांच्या काळ्या रंगाला सामाजिक दृष्टीने स्विकारल्या गेले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पांडूरंग किंवा विठ्ठल सावळा असल्याबाबतचे अभंग रचण्यात आले तसेच सावळ्या कृष्णाच्या रंगावरुनही कितीतरी दोहे आपल्याला वाचायला मिळतात पण तोच कृष्ण राधा का गोरी आहे आणि त्याचा रंग काळा आहे याबद्दल यशोदेला विचारतानाचे देखील वर्णन आपल्याला वाचायला मिळते. एकंदरीत त्याच्याही मनात राधेच्या गोरे असण्याबद्दल आकर्षण होतेच असे कविला सुचवायचे होते का असा प्रश्न पडतो. मुलींच्या बाबत अजूनही सौंदर्याचे तेच मापक ठरविले जाते त्यामुळे रंगाने गोऱ्या असलेल्या व्यक्तींना स्वाभाविकच आजच्याही समाजात प्राधान्य मिळते ही बाब सत्य आहे. परंतू हा भ्रम आता मोडून काढण्या इतपत आपला समाज विकसित झालाय असे निदान सुशिक्षीतांनी समजायला हवे त्यानुसार स्वतःच्या विचारसरणीत बदल करायला हवे. फेअरनेस क्रीमच्या विरोधात एक छोटेसे आंदोलन झाल्याचे माझ्या वाचण्यात आले सोबतच त्या अर्थाची एक जाहीरातही मी बघितली. पण हा विषय या पद्धतीने नाही तर विचार खरोखरीच पटवून तो बदलावा लागेल. इंग्रजी भाषेच्या संदर्भातील अश्याच प्रकारची दादागीरी आपण गेल्या काही वर्षात बऱ्यापैकी कमी केली

ज्याप्रमाणे गोऱ्या रंगाचे आकर्षण आपल्याला समाजात दिसते तसेच इंग्रजी भाषेचे देखील होते. ती भाषा अन्य भाषांप्रमाणे संवादाची एक भाषा आहे असे समजता त्याला बौद्धिक श्रेष्ठतेचा जो मुलामा कदाचित इंग्रजांच्या काळी आपल्या मनावर ठसला तो उतरायला बराच कालावधी गेला. अजूनही इंग्रजी भाषेत बोलणारी व्यक्ती हुशारच असा समज काही मंडळींचा असतो. गोऱ्या रंगाच्या बाबत तो देखील महिलांच्या संदर्भात काहीतरी करण्याची गरज आहे. या संदर्भात ज्या मुलींच्या मनात असले न्यूनगंड तयार होत असतील त्यांना पालकांकडून किंवा त्यांच्या शिक्षकांकडून वारंवार समुपदेशन करण्याची गरज आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य जास्त महत्वाचे आहे त्याच्या विकासाकडे जास्त लक्ष द्यायला हवे ही फार साधी वाटणारी परंतू दुर्लक्षित होणारी बाब आहे.

बरेचवेळा फार मोठ्या गोष्टींच्या किंवा गूढ तत्वज्ञानाच्या बाबत मार्गदर्शन केले जाते परंतू तरुण वयात येणाऱ्या किंवा कोवळे विचार असलेल्या मुलामुलींच्या जीवनातील छोट्या छोट्या समस्या किंवा शंका किंवा गैरसमजूती याबद्दल संवादच होत नाही. त्याकडे हे काय सांगायचे असे म्हणून बघितले जाते. परंतू असाच एखादा विचार कधीकधी अक्राळ विक्राळ रुप धारण करुन त्या चिमुरड्या पोरीने केलेल्या कृत्यामधे परावर्तित होतो ज्याबाबत नंतर केवळ पश्चाताप केल्याशिवाय काहीच उरत नाही. आपल्या घरच्या या कोवळ्या मनांमधे सुरु असलेली नव्या विचारांची वादळे आपल्याला ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शनासोबत, सकारात्मक संवादाने सुचारुपणे मार्गस्थ करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच त्यांना सांगण्याची गरज आहे ब्लॅक इज ऑलसो ब्युटीफुलकारण चेहेऱ्यावरच्या सौंदर्याचे तेज कातडीच्या गोऱ्या रंगाने नव्हे तर चांगल्या विचारांनी वागणूकींनी तेवत असलेल्या सह्रदयातील प्रकाशाने उजळून निघत असते.



Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23