थोडा है थोडे की जरुरत है @20.02.17

चांगली बाजू आहे

एका विद्येचे माहेरघर म्हणल्या जाणाऱ्या गावातील तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींचे वागणे किती वाईट आहे याबद्दलचे वेगवेगळे प्रसंग एका लग्नामधे चर्चीले जात होते. ती सारी चर्चा मी ऐकत होतो त्यामधे माझ्याही गाठीशी असलेले काही प्रसंग समाविष्ट करीत होतो. खरोखरीच विषय चिंताजनक होता त्या चिंतेची तीव्रता दिवसेंदिवस जास्त वाढतेच आहे. मुला मुलींचे वाटेल तसे वागणे, आई वडील सोबत नसल्याचा फायदा वेगवेगळ्या प्रकारे घेतल्या जाणे, पार्टी साठी रात्री रात्री बाहेर राहणे, सिगरेट पिणे, दारु पिणे किंवा त्याच्याही पुढे जाऊन अंमली पदार्थाचा वाढता अंमल या सर्व चिंतेच्या बाबी त्या ठिकाणी चर्चील्या गेल्या. यापैकी काही बाबी तर मी देखील प्रत्यक्ष बघितलेल्या असल्याने त्या चर्चेमधे मी देखील काही गोष्टींबद्दल भर घातली. या सर्व प्रकारांमुळे या विद्येचे माहेरघर असलेल्या गावात मुला मुलींना शिक्षणासाठी पाठविणे हा पालकांसाठी धास्तीचा विषय बनलेला आहे. या गावाबद्दलची ही प्रतिमा मनात असताना या सर्व प्रकारासोबत एक दुसरी बाजू अनुभवण्याची संधी मला अचानक मागच्या महिन्यात प्राप्त झाली. एका दुसऱ्या राज्यातील माझे व्याख्यान आटोपून मी या गावी गेलो तेव्हा माझ्या एका मैत्रीणीचा तिच्या क्लासचे एक प्रदर्शन आहे असा संदेश आला. अनायसे वेळ होता आणि मैत्रीणीने मोठ्या कष्टाने आयोजित केलेल्या इव्हेंटला भेट देणे आवश्यकच होते म्हणून मी तेथील एक दोन मित्रांसोबत ते प्रदर्शन बघायला गेलो. तो सारा इव्हेंट बघितल्यावर त्या गावातील मुला मुलींबद्दल मनात तयार असलेली किंवा अनुभवलेली जी प्रतिमा होती त्याची एक चांगली संपुर्णपणे वेगळी बाजू बघायला मिळाली. त्या दिवशीच्या त्या महाचर्चेमधे जे बोलल्या गेले त्यापेक्षा संपुर्णपणे वेगळे चित्र मला अनुभवायला मिळाले. ज्या तरुण तरुणींच्या वागण्यामुळे या गावाची प्रतिमा मलीन होते आहे त्याच गावातील काही तरुण तरुणी मात्र एखादा इव्हेंट असा काही करतात की तो बघितल्यानंतर छान वाटायला लागतेआणि सर्वात जास्त मनाला भावते ती म्हणजे त्या सर्व इव्हेंटमधून जाणविणारी तरुणाईची अत्यंत सकारात्मक उर्जा. या विद्येच्या माहेरघरी नांदणाऱ्या मुला मुलींची ही चांगली बाजू अनुभवून त्या गावात शिक्षणासाठी मुलीला पाठविलेल्या माझ्यासारख्या मनातून जरा धसका घेतलेल्या पालकाला मोठाच दिलासा मिळाला. तो इव्हेंट होता जपानी भाषा शिकणाऱ्या मुला मुलींच्या सेंटरचे प्रत्यक्षिक सादरीकरण.

या विद्येच्या माहेरघराचे एक वैशिष्ट्य असेही आहे की मराठी भाषेच्या जपणूकीसोबत महत्वाच्या आंतरराष्ट्रीय भाषा शिकविणारी काही प्रतिथयश आणि प्रभावी केंद्रे या गावात आहेत. यामधे जर्मन, फ्रेंच तसेच जपानी भाषा शिकविणारी केंद्रे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. अश्याच एका जपानी भाषा शिकविणाऱ्या केंद्रामधे माझी मैत्रीण ती भाषा शिकविण्याचे काम करते. त्या वर्गाचे प्रात्यक्षिक सादरीकरण असे त्या प्रदर्शनाचे स्वरुप होते. भाषा शिकत असताना त्या देशाच्या सांस्कृतिक, राजकीय सामाजिक चळवळींचा देखील अभ्यास केला जातो हे मला त्या प्रदर्शनात पाऊल ठेवताक्षणी लक्षात आले. आपली मातृभाषा का जपावी लागत असते मातृभाषा केवळ एक भाषा नसून त्यामधून संपुर्ण संस्कृती प्रतिबींबीत होत असते हे कळणाऱ्या प्रत्येकाला मला त्या प्रदर्शनाबद्दल सांगावे वाटते. जपानी भाषा शिकत असताना जपान मधील जपानी संस्कृती त्या अंतर्गत असलेले खानपान, तेथील वेगवेगळ्या परंपरा, तेथील समाजमान्यता, तेथील आधुनिक विकासात्मक वाटचाल, तेथील तंत्रज्ञान, तेथील पुरातन वैचारिक लोक चळवळी, तेथील काही अंधश्रद्धा, काही मजेदार गोष्टी, तेथील वेगवेगळे सण, त्या प्रसंगी परीधान केले जाणारे पेहराव, अश्या विविध गोष्टींचे दर्शन घडविणारे ते अफलातून प्रदर्शन होते. जपानमधील सामाजिक व्यवस्थांमधील छोट्या छोट्या गोष्टी फार बारकाईने मांडण्याचा प्रयत्न या प्रदर्शनात करण्यात आला होता. याच्या तयारीसाठी ती सारी तरुणाई तीन दिवस रात्र अक्षरशः झटत होती. वेगवेगळ्या प्रकारे कलात्मक पद्धतीने त्यांनी ते प्रदर्शन सजविले होते. वेगवेगळ्या स्टॉल्सवर मुले मुली वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे ही सारी माहिती देताना त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता. आम्ही जेव्हा या प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा तो तिसरा दिवस त्यातही अंतीम तास होता परंतू त्या मुला मुलींचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नव्हता. जपानी पोषाक परीधान केलेल्या त्या मुलीने जपानी पद्धतीने आम्हाला अभिवादन केले त्यानंतर जपानमधे सदोदित भुकंपाची भिती असल्याने त्यांच्या नव्या आधुनिक इमारती बांधताना कोणते नवे तंत्रज्ञान वापरले जाते आहे याबद्दल तिने फार छान माहिती दिली. जपानी परंपरागत भविष्य सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आम्हाला बघायला मिळाल्या. सोबतच काही मुलामुलींनी जपानी पदार्थ बनवून त्याचा स्वाद मिळवून दिला तर त्याच्याच सोबत काड्यांनी भात कसा खाता येऊ शकेल याबाबत एक छोटीशी परीक्षा पण त्यांनी घेतली. ओरीगामी हे जपानमधील विशेष तंत्र जे आता केवळ कागदांच्या वस्तू बनविण्यापुरते मर्यादित नसून सौर उर्जा तयार करण्यासाठी देखील या डीझाईन्सचा वापर केला जातो आहे हे सांगणारा तो २१ वर्षांचा पोरगा इतक्या उत्साहाने सारे सांगत होता की मनाला प्रसन्न वाटत होते. कागदांवर आपल्या इच्छा लिहून ती त्या कृत्रीम झाडाला बांधण्याचा परंपरागत प्रकार देखील फारच विलोभनीय होता. एकंदरीत त्या मोठ्या सभागृहात तरुणाईचा तो सळसळता उत्साह आणि त्या ठिकाणी आढळणारी सकारात्मक उर्जा खरोखरीच त्या गावातील मुलामुलींची एक अतिशय वेगळी आणि आकर्षक बाजू मला दाखवित होती.

आमच्या मैत्रीणीने दिलेली माहीती देखील रंजक प्रेरणादायीच होती. त्या इव्हेंटसाठी ती पोरे गेल्या महिन्याभरापासून विचार प्रक्रीया करीत होते. वेगवेगळे प्रकार त्यांनी ठरविले, त्यानंतर त्याबाबत माहिती प्राप्त केली, त्यानंतर मॉडेल किंवा उपक्रम चांगल्यात चांगला कसा होईल यासाठी त्यांनी आपल्या शिक्षकांची मदत घेतली. शिक्षक देखील भाषा शिकवून सिलॅबस पूर्ण केल्याची धन्यता मानणाऱ्यांपैकी नव्हते त्यामुळे त्यांचे भरपूर पाठबळ या मुलांना मिळाले. त्यानंतर फायनल रीहर्सल सुरु झाल्या. कुणी काय सांगायचे, कसे सांगायचे, वेषभुषा काय करायची इथपासून तो सभागृहाची सजावट कशी करायची इथपर्यंत योजना करण्यात आली. त्यानुसार आपल्या अत्यंत समर्पित प्राध्यापकांच्या मदतीने त्या पोरांनी सुंदर इव्हेंट साजरा केलातो देखील त्यांच्या वर लादल्या गेलेल्या मरगळीत प्रस्तुतीसह नाही तर प्रचंड सकारात्मक उर्जेचा साक्षात्कार घडविणाऱ्या संवादाच्या आणि संपुर्णपणे मनापासून केल्या गेलेल्या सादरीकरणासह

विद्येच्या माहेरघरी या जपानी भाषा शिकणाऱ्या मुला मुलींनी भाषेसोबतच त्या देशाची सांस्कृतिक सामाजिक वाटचाल समजून घेण्याचा त्याला सादर करण्याचा हा प्रयत्न मला एक अनोखी वेगळी आणि चांगली बाजू दाखवून गेला. खरोखरीच आपल्या जीवनात आपण काही स्वतःच्या किंवा इतरांच्या अनुभवांच्या आधारे कोणत्याही बाबतीत किंवा व्यक्तींच्या बाबत आपले मत तयार करतो. ही एक अत्यंत स्वाभाविक मानसिक प्रक्रीया आहे. परंतू या मतांना बरेच वेळा बदल करण्याच्या प्रवृत्तीची जोड मिळाली की मग प्रत्येक गोष्टीमधे किंवा व्यक्तीमधे असलेली चांगली बाजू स्विकारणे जड व्हायला लागते. समाजातील प्रत्येक सुशिक्षित विचारी मंडळींनी जमेल त्या प्रमाणात या चांगल्या बाजू शोधून त्या समाजापुढे आणण्याचे कार्य केले पाहीजे. त्या करीता आपल्याला प्रत्येकच बाबीसंबंधी ठाम मत बनवून ठेवता चांगली बाजू शोधण्याची मानसिकता विकसित करणे गरजेचे आहे. वर्तमनाचे वर्णन करणारी वर्तमानपत्रे देखील जेव्हा आपल्यासमोर आपले वर्तमान ठेवतात तेव्हा ते नकारात्मकता जास्त जाणवते. दोष वर्तमानपत्रांचा नाही, नकारात्मकतेतून निर्माण होणारी वृत्ते आपल्याला खळबळजनक वाटतात तीच मनाला भावतात. परंतू प्रत्येक बाबतीत चांगली बाजू बघण्याच्या सवयीमुळे आपल्याला आपले जग सुंदर वाटू लागते आपले जीवन आनंदी करण्याचा यापेक्षा सोपा मार्ग नाही. प्रदर्शनातील एका छोट्या मित्राने मला माझी इच्छा लिहून गंमतीने झाडाला बांधायला सांगितली

त्या मुलाने स्वतः तयार केलेल्या त्या जपानी पद्धतीच्या कार्डवर मी त्या मुलाच्या नावे लिहीलेतुझ्या ठायी असलेली आनंद निर्माण करणारी सकारात्मक उर्जा मला उमजली, ती माझ्या ठायी येऊन माझे आयुष्य त्यामुळे आनंदी व्हावे ही माझी इच्छा पूरी व्हावी…    




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23