थोडा है थोडे की जरुरत है @13.02.18

बातों बातों मे..

रेल्वेच्या डब्यात बसवून दिल्यावर काकुंच्या मुलाने त्यांचा निरोप घेतला. आईला सर्व सूचना देऊन तो घरी गेला. गाडी सुरु झाली. त्या कंपार्टमेंटमधे साधारण चित्र नेहेमीप्रमाणेच होते. प्रत्येकजण आपआपल्या छोट्याश्या वर्तुळात गुडुप झाला होता. कुणी पुस्तकात डोके घातले, कुणी थेट बर्थवर चढून झोपी गेले, कुणी कानात इयरफोन टाकून गाणे ऐकू लागले तर कुणी मोबाईलशी खेळू लागले. एकंदरीत प्रत्येकाने प्रवासामधील वेळे साठी आपआपला मार्ग शोधला होता. अगदी स्वतंत्रपणे. थ्री टायर एसीच्या त्या कंपार्टमेंटमधे काकू मिळून आम्ही आठ लोक होतो. त्यामधे एक जोडपे होते ज्यांची एक चार वर्षांची गोड मुलगी देखील होती. गाडी सुरु झाल्याच्या अवघ्या दहाव्या मिनीटाला त्या काकुंनी समोर बसलेल्या साधारण त्यांच्याच वयाच्या काकांशी संवाद सुरु केला. अगदी सहजपणे.. मुलगा स्टेशनवर सोडायला आला होता हा धागा त्यांनी पकडला त्याचाच आधार घेऊन बोलणे सुरु केले. सहजच त्यांनी संवाद सुरु केला आणि केवळ अर्धा तासाच्या पुढील प्रवासात काकुंनी त्या कंपार्टमेंटमधील आठही लोकांशी मैत्री केली होती आणि प्रत्येकाला स्वतःच्या छोट्याश्या वर्तूळातून बाहेर काढले होते. मला त्यांचे कौतुक यासाठी वाटत होते की त्यांच्या या संवाद साधण्याच्या प्रक्रीयेत कुठेही आगाऊपणा, किंवा आक्रस्ताळेपणा नव्हता. अगदी सहजच आणि मनापासून त्यांनी प्रत्येकाशी स्वतःहून बोलून एक छान वातावरण निर्माण केले. बॅगेतून छान स्वतः बनविलेल्या तिळगुळाच्या वड्या काढून सर्वांना दिल्या, त्या त्यांनी कश्या बनविल्या हे देखील त्या समोरच्या तरुणीला सांगितले. मला माझ्या महाविद्यालयाबाबत विचारले. आजकाल मुली किती स्मार्ट झाल्या आणि त्यांना किती छान छान गोष्टी येतात हे देखील कौतुकाने सांगितले. त्या चार वर्षाच्या चिमुरडीला छान स्वतःच्या मांडीवर बसून खास ठेवणीतल्या गोष्टी सांगितल्या. त्याचवेळी या चिमुरडीला मी सांभाळते म्हणत तिच्या आईला वरच्या बर्थवर जाऊन झोप घेण्याचा सल्ला देखील दिला. जेवताना सर्वांना आग्रह करुन स्वतःजवळचे लोणचे घ्यायला लावले. खास त्यांनी बनविलेली ज्येष्ठमधाची सुपारी सर्वांना दिली. आमच्यासोबत एक त्रिवेंद्रमला जाणारी महाविद्यालयीन युवती होती. तिच्याकडून काकुंनी केरळात जसे तांदूळ आणि ओल्या नारळाचे जे रोल बनवितात त्याची रेसीपी समजून घेतली. ती इंग्रजीतून मराठीत समजून घेण्यासाठी, अहो इंग्रजीचे प्राध्यापक मला हे समजून सांगा असे म्हणून माझ्याकडून समजून घेतली. एकंदरीत त्या साधारण सात तासाच्या प्रवासात काकुंनी प्रत्येकाशी मनापासून संवाद साधला. सात तासांकरीता त्यांनी त्या संवादाच्या माध्यमातून आम्हा आठ लोकांमधे एक अतिशय सुंदर मैत्रीचे वलय निर्माण केले सर्वांनाच त्याचा आनंद झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे हे त्यांनी अगदी सहजतेने केले. प्रत्येकाची चौकशी, गरज पडली तेथे त्या मुलीच्या आईला मदत, आपल्या जवळच्या काही छोट्या छोट्या गोष्टी सर्वांना वाटून एक अतिशय छान आनंदवर्तुळ त्यांनी तयार केले. काकुंना ज्या गावाला जायचे होते त्या स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल पण आम्ही सगळेच त्यांना निरोप देण्यासाठी खाली उतरलो. काकुंची बॅग आम्ही खाली पोहोचविली. त्यांना स्टेशनवर घेण्यासाठी त्यांची मुलगी आली होती. आम्हा सर्वांना बघून ती मिष्कीलपणे हसत काकुंना म्हणाली, आई आजच्या प्रवासातला हा तुझा परीवार ना? काकुंनी सर्वांची आपल्या मुलीशी ओळख करुन दिली. कौतुकाने तिच्या नोकरीबद्दल आणि योग्यतेबद्दल सांगितले. बहुदा काकुंच्या मुलीला काकू असे परिवार बनवितात हे माहित असावे म्हणूनच निरोप घेताना तिनेही तिच्या आईचे कौतुक करताना जे वाक्य उच्चारले ते फार महत्वाचे होते. ती म्हणाली, माझी आई आहेच स्पेशल. ती तिचा परीवार असाच वाढवत जाते आणि सगळ्यांना जोडत जाते. काकुंचा निरोप घेऊन आम्ही सगळे परत डब्यात बसलो. प्रवास सुरु झाला आणि सुरुवातीला मी वर्णन केले त्यापेक्षा एकदम वेगळे स्वरुप आम्ही सर्व अनुभवत होतो. अगदी नकळत. आता आम्ही सर्व बोलत होतो, एकमेकांसोबत चर्चा सुरु होत्या. इतकेच काय तर आम्ही रात्रीचे जेवण देखील सोबतच घेतले आणि जेवताना काकुंनी आमच्यासाठी ठेवलेल्या लोणच्याची चव घेऊन त्यांची आठवण काढीत होतो. काकुंनी केलेली जादू लक्षात येत होती. काही तासांच्या प्रवासात काकुंनी सकारात्मकतेने आणि स्वतः पुढाकार घेऊन केलल्या संवादामुळे आम्ही जोडल्या गेलो होतो. एक फारच मोठी गोष्ट काकू शिकवून गेल्या होत्या. सकारात्मक संवाद: माणसे जोडण्याचा मार्ग.

माणसे जोडण्यासाठी बरेचवेळा बरेच लोक वेगवेगळ्या गोष्टी करीत असतात. काही मंडळी तर तो प्रयत्न देखील करीत नाही. लोकांची काय गरज आहे. आपण बरे आपले काम बरे. विनाकारण दुसऱ्याच्या जिवनात कशाला लुडबुड करायची. आपल्यातच दंग रहायचे अशी देखील मनोवृत्ती कधी कधी अभिमानाने जोपासली जाते. परंतू माणूस म्हणून आपल्याला देवाने प्राण्यांपेक्षा काही वेगळ्या अभूतपूर्व गोष्टी दिल्या आहेत ज्यामधे संवाद साधण्याची कला ही आपल्याला उपजतच प्राप्त झाली असते. या संवादाचा उपयोग मात्र वेगवेगळ्या प्रकारे करताना लोक दिसतात. काही तर माणसे जोडण्यापेक्षा जमेल त्या प्रकारे मन दुखावेल असे बोलून लोकांना आपल्यापासून दूर करण्याकरीता देखील संवादाचा वापर करतात. कायम स्वतःला सर्व दृष्टीने श्रेष्ठ मानून इतर सर्वांना कमी लेखून उद्धटपणे जी मंडळ संवाद करतात त्यांच्यापासून लोक कायम दूर जातात. परंतू या असल्या काही मंडळींना त्याचे वैषम्य देखील वाटत नाही कारण ते स्वतः निर्माण केलेल्या आत्मसंतुष्टीच्या त्या अहंवर्तुळामधे इतके मशगुल असतात की त्यांना इतरांच्या नसण्याने काहीच फरक पडत नाही. परंतू काही दिवसांनंतर मात्र ही मंडळी एकटी पडू लागतात. वेळ हातातून निघून गेली असते त्यावेळी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा लोकांचा सहवास हवा असतो. सकारात्मक संवाद साधण्याची हतोटी विकसित केल्याने लोक सोबत रहात नाहीत. कारण लोकांच्या मनात शब्दांनी दुखावल्याच्या खुणा कायमस्वरुपी व्रण बनलेले असतात. याच्या अगदी उलट वर्तन त्या काकूंचे होते ज्यांनी केवळ काही तासांच्या प्रवासात एक छोटेसे कुटुंब निर्माण केले. ती काकुंची संवाद होतोटी जमायला हवी.

काकुंसारख्या लोकांचे मला कायम कौतुक वाटते की , मी कसे बोलू? हा प्रश्नच त्यांना पडत नाही. ही मंडळी ऑटोरीक्षात बसली तर इप्सित स्थळी ती रिक्षा पोहोचे पर्यंत त्यांनी त्या ऑटोवाल्याशी संवाद साधलेला असतो, दुकानात वस्तू खरेदी केल्यावर वस्तू घेऊन पैसे देऊन ही मंडळी शांत बसत नाहीत तर त्या दुकानदाराशी त्याला रुचणाऱ्या कोणत्यातरी विषयावर सहजच बोलून नाते निर्माण करतात. इतकेच काय तर एखाद्या चप्पल दुरुस्त करणाऱ्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या माणसाकडे चप्पल दुरुस्तीला दिल्यावर ते काम होईपर्यंत त्यांनी त्या साध्या माणसाच्या जीवनाबद्दल, परीवाराबद्दल, मिळकतीबद्दल चौकशी केली असते आणि चप्पल फार छान दुरुस्त केली म्हणून कौतुकाची पावती देखील दिलेली असते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही काकुंसारखी मंडळी हे सारे संवाद प्रयास कोणताही अभिनीवेश बाळगता अगदी सहजतेने करीत असतात. यामुळेच त्या सर्व संवादांचे फलीत लोक जोडण्यामधे होते जी मानवाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे.

या तंत्रज्ञानाच्या युगात जेव्हा एका बाजूने आपण सर्वजण -संवादाच्या विळख्यात अडकून पडण्याचा धोका निर्माण होताना, दुसऱ्या बाजूला काकुंसारखे उत्साही संवादक आपल्यासाठी प्रेरणाच ठरु शकतात. व्यक्तींचा थेट संवाद या मनःस्वी गोष्टीची सर कोणत्याही -संवादाला येऊ शकत नाही. उत्साही संवादक बनण्यासाठी आपल्याला निर्माण करावी लागेल एक विशेष प्रवृत्ती. त्या काकुंच्या संपुर्ण संवाद प्रक्रीयेचे एक सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एकदाही, चुकुनही काहीही नकारात्मक सांगितले नाही किंवा बोलले नाही. ही सकारात्मक प्रवृत्तीच या असल्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या संवाद वर्तुळांच्या निर्मितीसाठी आवश्यक बाब ठरते. नकारात्मकता वाढत जाणाऱ्या आपल्या या आधुनिक जगतात आपल्याला आपल्या सकारात्मक वृत्तीने निर्माण केलल्या संवादांनी आनंद वर्तुळे निर्माण करता येतील?



Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23