थोडा है थोडे की जरूरत है @ 26.12.17
व्यवस्थेचे भय… कुणाला?
त्या दिवशी माझ्या महाविद्यालयात अचानक दोन पोलीस आले. आजकाल विविध कारणांसाठी पोलीस येऊ लागलेत. महिलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांसंदर्भात समुपदेशन करण्यासाठी तर मुलींचे महाविद्यालय असल्यामुळे नेहेमीच पोलीस अधिकारी येत राहतात. याशिवाय मुलींना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने वारंवार त्यांना भेटी द्याव्या लागतात. एकंदरीत पोलीस महाविद्यालयात येणे ही आता सामान्य बाब झाली आहे. परंतू असे असताना देखील पोलीस आले म्हणल्यावर ज्या प्रकारच्या प्रतिक्रीया उमटतात त्याची मोठी गंमत असते. मी त्या दिवशी एक सभा घेत होतो. सभा सुरु असल्याने मला भेटायला आलेली काही मंडळी अभ्यागत कक्षात बसलेली होती. तेवढ्यात हे दोन पोलीस आले. त्यांना बघितल्याबरोबर माझ्या सहायक भगिनीने त्वरीत मला माझ्या कक्षात येऊन सभेच्या मधेच सूचना केली की दोन पोलीस आलेत. मी तिला सांगितले की त्यांना थांबायला सांग कारण माझी सभा सुरु आहे. तिला ते उत्तर अपेक्षित नव्हते. ती क्षणभर थांबली कारण पोलीस आले म्हणल्यावर मी सारी कामे सोडून सर्वप्रथम प्राधान्य द्यायला हवे अशी तिची समजूत होती. तिच्या चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून मी तिला विचारले की ते आपल्याला पकडायला आले आहेत का? माझा सूर पाहून तिच्या गोष्ट लक्षात आली. तिने बाहेर जाऊन त्या दोन पोलीसांना थांबायला सांगितले. ते देखील अगदी शांतपणे माझी वाट बघत अभ्यागत कक्षात बसले. दहा मिनीटात सभा संपली व नंतर त्या पोलीसांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या सहायक भगिनीने आधी आलेल्या लोकांना प्रथम माझ्या भेटीला पाठवले व नंतर ते माझ्याशी बोलायला आतमधे आले. मी या सर्व प्रसंगाचा विचार करु लागलो. पोलीस आले म्हणल्यावर ते आपल्याला पकडायला आले अशी भावना चांगल्या माणसांच्या मनात का यावी. पोलीसी व्यवस्थेचा हा विनाकारणचा धाक तर नाही की ज्यामुळे सामान्य माणसाला या व्यवस्थेचे अकारणच दडपण यावे. खरे तर माझ्याकडे मला भेटायला आलेले पोलीस अतिशय शांतपणे आले, थांबायला सांगितले तर शांतपणे बसले म्हणजे त्यांचे वागणे हे सामान्य पद्धतीचे होते परंतू त्यांचे अकारणच दडपण चांगल्या माणसांना येते हा मात्र जरा विचारात पाडणारा विषय आहे. या पोलीस बंधुंनी त्यांचे काम सांगितल्यावर तर अजूनच विचारात भर पडली.
महाविद्यालयाच्या जवळच एक गुन्हा घडला होता व शासनाच्या परिपत्रकानुसार आता पंचनामा करताना दोन शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तो करावा लागतो असा नवा नियम असल्याची माहिती त्यांनी मला दिली. नेमका चतुर्थ शनिवार असल्याने आसपासची सारी शासकीय कार्यालये बंद होती व म्हणून ते माझ्याकडे मदत मागायला आले. महाविद्यालयात कार्यरत दोन कर्मचारी त्यांना पंच म्हणून हवे होते. मी माझ्या दोन सहकारी मित्रांना या कामासाठी जायला सांगितले. पोलीस म्हणल्यावर स्वाभाविकपणे त्यांची प्रतिक्रीया ही नेहेमीप्रमाणे मी सांगितलेल्या कामाला असते तशी नव्हती. तो दोघेही जरासा विचार करु लागले. शिवाय गुन्हा प्रकरणामधे पंच म्हणजे आपण अडचणीत तर येणार नाही ना हा स्वाभाविक विचार त्यांच्या मनात आला. त्यात वावगे असे काहीच नव्हते. आपण जर पंच म्हणून काम केले तर आपल्याला पुढे किती वेळा या गुन्ह्याच्या न्यायालयीन प्रक्रीयेमधे जावे लागेल, तेथे आपला किती वेळ जाईल, यामधून काही नव्या समस्या तर उद्भवणार नाहीत, या सर्व प्रकाराचा आपल्याला किंवा आपल्याशी संबंधित लोकांना त्रास तर होणार नाही, विनाकारणच झंझट मागे लागेल असे सारे विचार त्यांच्या मनात आले जे माझ्या मते अत्यंत स्वाभाविक होते. परंतू मी सांगितले असल्याने त्यांना फार चॉईस नव्हता. इतकेच काय तर ते गेल्यावर यांना काही त्रास तर होणार नाही हा विचार माझ्याही मनात येऊन गेला. खरे तर या दोघांना साधे पंच म्हणून कार्य करायचे होते म्हणजे पोलीसांकडून पंचनामा योग्य पद्धतीने केला गेलाय याची खात्री द्यायची होती. गुन्ह्याशी किंवा त्याच्या इतर प्रक्रीयेशी यांचा कोणताही संबंध नव्हता. केवळ पंधरा मिनीटात ते कार्य पार पडले व माझे सहकारी परत आले. काहीही होणार नाही असे मी त्यांना आश्वस्त केले. परंतू नेहेमी माझ्या बोलण्याने आश्वस्त होणारे माझे सहकारी या वेळी माझ्या आश्वासनाबाबत मात्र जरासे साशंक वाटले. हे अत्यंत स्वाभाविक होते व मी त्या साशंकतेच्या दृष्टीनेच विचार करु लागलो.
माझ्या सहकाऱ्यांची ही साशंकता माझ्याबाबत नव्हती तर ती या व्यवस्थेबाबत होती. केवळ पंचनाम्याचे पंच म्हणून कार्य करताना व कायदा राखणाऱ्या व्यवस्थेला मदत करताना सामान्य माणसाच्या मनात असे प्रश्न निर्माण होत असतील तर अश्या गुन्ह्याच्या प्रत्यक्ष पुराव्यांचे काय होत असेल. असे गुन्हे घडत असताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे काय होत असेल किंवा असतील तरी ते या व्यवस्थेला सहकार्य करत असतील का हा महत्वाचा भाग आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था राबविणारी पोलीस यंत्रणा ही सर्वात महत्वाची व्यवस्था आहे व त्याचा धाक असण्याची गरजच असते. पोलीसी जरब, पोलीसी खाक्या, त्यांची करडी नजर, त्यांचा जरब बसविणारा आवाज या साऱ्या गोष्टी त्या व्यवस्थेच्या संचालनासाठी पुरक व आवश्यक अश्याच आहेत. परंतू या सर्व बाबीचा धाक गुन्हेगारांपेक्षा सामान्य व साध्या माणसांना का वाटावा हा सर्वात महत्वाचा व चिंतनशील प्रश्न आहे. कायदा राखणाऱ्या या व्यवस्थेला गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पुढे न्याय व्यवस्थेपुढे जावेच लागते व त्यासाठी त्यांना या सर्व प्रक्रीया सामान्य माणसांच्या मदतीनेच पुर्ण कराव्या लागतात ही बाब अतिशय महत्वाची आहे. गुन्हा सिद्ध करताना लागणारे पुरावे, साक्षीदार हे पोलीसांना सामान्य नागरी व्यवस्थेमधून मिळतात. गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याच्या प्रक्रीयेत हा महत्वाचा भाग असूनही या व्यवस्थेबाबत असलेला सामान्य माणसाचा ग्रह मात्र इतक्या वर्षांनतरही बदलत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. बदलत्या काळात या व्यवस्थांनी तसेच समाजानेही परस्परांसंबंधीचे पूर्वग्रह सोडून कार्य करण्याची आवश्यकता आहे.
सामाजिक सौहार्दतेच्या दृष्टीने निर्माण झालेली पोलीस किंवा न्यायालय या व्यवस्था समाजाचे हित जोपासण्यासाठीच निर्माण झाल्या आहेत व त्या याच दिशेने कार्य करीत असतात. परंतू या व्यवस्थांच्या संचालनामधे गेली अनेक वर्षे काहीतरी त्रुटी राहीली असणार ज्यामुळे याबद्दलचे ग्रह फार दृढ झाले आहेत. म्हणूनच सज्जनाने कोर्टाची पायरी चढू नये किंवा पोलीसांना सहकार्य करणे म्हणजे विनाकारणची झंझट मागे लागणे असे मत अजूनही समाजात दृढ आहे. या व्यवस्थांबद्दल हे असे मत कुणी मुद्दाम तयार केले असेल अशी शक्यता नाही तर यांच्या संचालनामधे लोकांना आलेल्या अनुभवांमुळे हा प्रचार होत गेला व अनेक वर्षे तो होत राहील्यामुळे आज ही स्थिती निर्माण झाली की या समाजाच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या असलेल्या व्यवस्थांकडे जाताना साध्या व सामान्य माणसाच्या मनात साशंकता निर्माण होते. या व्यवस्थांमधे कार्य करणाऱ्या प्रत्येकाने व समाजातील विचारी घटकांनी याबाबत चिंतन करण्याची गरज आहे. सामान्य माणसाला न्यायालय व कायदा राबविणाऱ्या यंत्रणा आपल्या वाटायला हव्या. यासाठी प्रयत्न केले जात नाहीत असे अजिबात नाही. निश्चितच पोलीस यंत्रणा व न्यायव्यवस्था यांच्याकडून बरेच वेळा समाजाभिमुख होण्यासाठी प्रयत्न केले जातात परंतू त्या उपक्रमांमधे बहुदा औपचारिकता जास्त असते व त्यामुळे त्याचे हवे तसे परीणाम दिसून येत नाही. माझ्या घरी आलेली पोलीसची गाडी मला मदत करायला आली नसून मला पकडायला आली आहे ही भिती सामान्य माणसाच्या मनात निर्माण होत असेल तर काहीतरी चुकते आहे. अमरावतीचे माजी पोलीस आयुक्त व माझे मित्र माझ्याकडे महालक्ष्मीच्या प्रसादाला आले असताना आमच्याकडे काय गडबड झाली ही चर्चा आमच्या कॉलनीत रंगली होती. महालक्ष्मीच्या प्रसादाला पोलीस आयुक्त येऊ शकतात हा विचार कुणाच्याच मनात आला नाही.
समाजाच्या सकस विकासाच्या दृष्टीने मोठ्या संख्येने असलेल्या सामान्य माणसांना या सर्वात महत्वाच्या व्यवस्थांबद्दल आस्था निर्माण होण्यासाठी व त्यांना गुन्हेगारांना शासन करण्यासाठी सहकार्य करण्याच्या दृष्टीने या व्यवस्थेतील लोक व आपण सर्व मिळून बदल करुयात… व्यवस्थेनेही बदलावे व आपणही आपल्या भुमिका बदलवूयात.. असे झाल्यासच या व्यवस्थेचा धाक सामान्य माणसांऐवजी गुन्हेगारांना वाटेल व समाजात भयविहीत वातावरण निर्माण होऊ शकेल.
Comments
Post a Comment