थोडा है थोडे की जरूरत है @ 05.12.17
माणसाचे रिप्लेसमेंट
थांबा थांबा गुरुजी, जरावेळ थांबा, पाचच मिनीटाचा प्रश्न आहे. एकदा लिंक मिळाली की तुम्ही सुरु करा. आज जरासा स्पीड कमी आहे पण तरीही लिंक होईल, जरा तुम्ही प्रयत्न करारे…अरे ते नव्या कंपनीचे डोंगल आण बरे त्याचा स्पीड खूप चांगला मिळतो, किंवा असे कर की माझ्या फोनवरुन पोर्टेबल हॉटस्पॉट करुन कनेक्शन घे, माझा अनलिमीटेड प्लॅन आहे त्यामुळे फार बफरींग होत नाही. अरे समस्या आपलीच आहे, तेथे तर बँडविड्थ भरपूर मिळते, ४० एमबीपीएस पर्यंत स्पीड असतो… प्रॉब्लेम आपलाच आहे यार..आपल्याकडे ब्रॉडबँड म्हणतात, १० एमबीपीएस चा स्पीड क्लेम करतात परंतू प्रत्यक्षात काही निट मिळत नाही…झाले झाले गुरुजी झालेच आहे.. होतेय..
हा सारा प्रकार एका लग्नसमारंभामधे लग्नमुहुर्ताच्या वेळी सुरु होता. वर आणि वधू बोहल्यावर हातात वरमाला घेऊन उभे होते. सारे वऱ्हाडी हातात अक्षदा घेऊन तयार होते, मुहुर्त घटीका टळू नये यासाठी गुरुजींचा जीव खालीवर होत होता.. सारे काही तयार होते परंतू मग हा सारा कनेक्टीवीटीचा गोंधळ का सुरु होता तर मुलाच्या आजीला जी अमेरीकेमधे आपल्या मुलाच्या, म्हणजे नवऱ्या मुलाच्या, मामाच्या बायकोच्या बाळंतपणासाठी गेली होती तिला हा लग्नसोहळा इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्यक्ष बघायचा होता व त्यासाठी हा सगळा बऱ्याच लोकांना अजिबात न समजणारा आटापीटा सुरु होता. तीन चार तरुण पोरे आपआपल्या तंत्रज्ञान निपुणतेची शर्थ करुन आजीला हा सारा सोहळा दाखविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते व सभामंडपातील साधारण दोन हजार वऱ्हाडी, वर वधू व त्यांचा विवाह लावणारे गुरुजी यांच्यासह सर्वजण संपुर्णपणे खोळंबलेले होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर कशीबशी एकदाची आजी त्या आय पॅडवर दिसू लागली. धुसर धुसर काहीतरी दिसत होते पण ती आजी असल्याबद्दल खात्री बाळगून कुणीतरी गुरुजींना सूचना केली की आता होऊन जाऊ द्या. लग्नघटीका सरुन गेल्यानंतर जवळपास वीस मिनीटांनी गुरुजींनी मंगलाष्टके म्हणावयास सुरुवात केली. त्यानंतर आजीच्या थेट अमेरीकेहून समारंभातील उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आजी मनापासून खुश झाली होती. अमेरीकेत होती तरी आज तिच्या नातवाचे लग्न असल्याने आजीने गजरा माळला होता व तो आजीने सारखा सर्वांना खुणेने दाखविला होता. किती हौशी आहेत लोक.. अमेरीकेतल्या आजीलाही समारंभात सामिल करुन घेतले. अश्या प्रकारे नातवाच्या लग्नात इ-माध्यमातून सहभागी होऊन तिने इ-आनंद प्राप्त केला. लग्न लागल्यावर नातवाने व नातसुनेने आय पॅडलाच आजी समजून लवून आजीला इ-नमस्कार केला आणि आजीने मनापासून डोळे भरुन त्या दोघांना बघितले व त्यांना इ-आशीर्वाद दिला.
अरुणाचल प्रदेशात सिमावर्ती प्रदेशामधे सैन्यदलात कामाला असलेल्या अरुणला जेव्हा त्याचे आजोबा गेल्याचा संदेश प्राप्त झाला तेव्हा तो सिमेवर गस्त देत होता. असा संदेश मिळाल्यावर त्याच्या कमांडंटने त्याला सुटी दिली परंतू ब्रह्मपुत्रा नेमकी खवळली होती. अरुणला आपल्या गावी यवतमाळला पोहोचणे शक्य नव्हते. वेगवेगळ्या प्रकारे त्याने आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करुन बघितला परंतू लवकर पोहोचणे शक्य नव्हते. शेवटी त्याने तो येऊ शकत नाही असा संदेश दिला. परंतू त्याच्या एका भावाने त्याला इंटरनेट कनेक्टीवीटी असलेल्या गावी पोहोचायला सांगितले. त्यानुसार अरुण इटानगर येथे पोहोचला. त्यानंतर मग येथे यवतमाळला अंत्यसंस्काराचे विधी सुरु झाले. अरुणला ऑनलाईन आपल्या आजोबांचे अंतिम दर्शन घेता आले. आजोबांचा अतिशय लाडका नातू होता तो. तो सैन्यामधे दाखल झाल्यावर आजोबांनी त्याच्यासंबंधी वर्तमानपत्रात आलेली बातमी व्यवस्थित कापून जवळ ठेवली होती. प्रत्येकाला ते मोठ्या कौतुकाने त्याच्याबद्दल सांगायचे. अरुण देखील आजोबांवर फार प्रेम करायचा व त्यामुळे त्याला आजोबांचे अंत्यदर्शन करायचेच होते. इतकेच नाही तर तो व्हीडीयो कॉलवर ऑनलाईन असताना त्याच्या मित्राने तो मोबाईल फोन धरुन अंत्ययात्रेतही त्याला सामील करुन घेतले. स्मशानभुमीमधे परत काही काळासाठी रेंज गेली तेव्हा तेथील विधी काही काळ थांबले होते. कारण अरुणला सारेच काही प्रत्यक्ष अनुभवल्याचा फील देण्याचे त्याच्या मित्रांनी ठरविले होते. काही ज्येष्ठांनी हळू आवाजात समजावण्याचा प्रयत्न केला देखील परंतू भावनांच्या आवेगासमोर कुणाचे चालत नाही. शेवटी स्मशानभूमीच्या एका कोपऱ्यात जाऊन त्याने रेंज मिळविली आणि अरुण पुन्हा ऑनलाईन आला. त्यानंतर मग भडाग्नी देण्यात आला. मोबाईल हातात घेऊन अरुणला प्रदक्षिणाही करविण्यात आली व अश्या प्रकारे अरुण त्याच्या आजोबांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाला.
वरील दोन्ही प्रसंगांबाबत आपण जर बारकाईने विचार केला तर त्याचे वाचन करत असताना हे चांगले आहे किंवा हे काहीतरीच आहे अश्या दोन टोकाच्या विचारांच्या मधे आपण फिरतोय असे जाणवेल. काही बाबतीत असे वाटायला लागते की किती छान आहे हे तंत्रज्ञान ज्यामुळे जी व्यक्ती हजर राहू शकत नाही त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग असल्यागत आपल्याला वाटते. परंतू एका बाजूला काय हे सारे आभासी असल्यागत आणि सारेच तंत्रज्ञानाच्या आधारे करायचे म्हणल्यावर तो अपेक्षित भाव कसा येणार असाही विचार आपल्या मनात येतो. मुळात अशीच काहीशी अवस्था सध्याच्या काळात आपल्या मनाची झालेली आहे. ज्या मुलांचा जन्मच या तंत्रज्ञानाच्या विस्फोटानंतर झालाय त्यांच्या संकल्पना जास्त स्पष्ट आहेत. शरीराच्या अनेक महत्वाच्या अवयवांसारखाच मोबाईल हा एक अवयव आहे असे त्यांना जन्मापासूनच पटल्यामुळे त्यांना संभ्रम नाही. समस्या इतरांची आहे. मनाच्या कोठल्यातरी कोपऱ्यात प्रत्यक्ष भेटीची आस जिवंत असलेल्या मनांना कुठेतरी दुखते आणि म्हणून आपल्या मनात असे संभ्रम निर्माण होतात.
वरील प्रसंगांचा विचार करता यामधे काही प्रमाणात या तंत्रज्ञानाचा वापर योग्य किंवा हितकारक आहे असे आपण मान्य करुयात. परंतू तंत्रज्ञानाची चमक इतकी जास्त रेखीव आणि आकर्षक असते की तेच आपले विश्व आहे असे भासू लागते व त्यामुळे हळू हळू प्रत्यक्ष माणसाला तंत्रज्ञानाने रीप्लेस करण्याचा प्रयत्न केला जातो जो मात्र आपल्या एकंदरीत जिवनमानामधे हिताचा नाही. हे सारे आभासी तंत्रज्ञान आपली सोय म्हणूनच आपल्याला वापरता यायला हवे. परंतू बरेच वेळा हा एक सुटकेचा मार्ग निवडला जातो व मग प्रत्यक्ष भेटीच्या, सहवासाच्या किंवा सहसंवेदना अनुभवण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रीयेला कुठेतरी दुय्यम स्थान मिळायला लागते. इंटरनेटच्या कितीही एमबी स्पीडवरुन ऑनलाईन सहभागी झालेल्या व्यक्तीला व त्यामधे समाधान मानणाऱ्याला काही गोष्टींबाबत काय सांगता येईल…
जेव्हा माझ्या मनाला एखाद्या गोष्टीचे अतिव दुःख झाले असते व सबंध जगाचा राग आलेला असतो, तेव्हा माझ्या हातावर केवळ हात ठेऊन एकही शब्द न बोलता मी तुला समजू शकतो, तुझे बरोबर आहे, तुला लोकांनी समजून घ्यायला हवे, पण मी तुझे दुःख जाणतो हे सारे केवळ स्पर्शाने सुचविणारा तो प्रेमाचा स्पर्श ऑनलाईन कसा आणायचा? जेव्हा काम करुन करुन मी पूरता थकून जातो, वेगवेगळ्या ताणांमधे काम करताना शरीरासोबत मनही थकलेले असते व अश्यावेळी एखाद्या शांत संध्याकाळी तुझ्या मांडीवर डोके ठेऊन मला जरा विसावता येईल, माझ्या केसांमधून तुझा हलकेच हात फिरतो आहे, व त्या प्रेमभरल्या स्पर्शासोबत माझ्या मनाला शांत वाटू लागते, साऱ्या विवंचना हळू हळू विरुन जातात आणि काही क्षणातच प्रसन्न चित्त होऊन मी पुन्हा नव्या क्षितीजांकडे झेपावण्यासाठी सज्ज होतो… माझ्या क्लांत मनाला दिलासा देणारा तो निवांत सहवास आणि तसा प्रेमाचा स्पर्श ऑनलाईन कसा आणायचा? तू अमेरीकेत आहेस हे अभिमानाने लोकांना सांगून आता आम्हाला कंटाळा आलाय. कारण तुझी भेट सध्या केवळ त्या कॉम्प्युटरच्या पडद्यावरच होते. या थंडीच्या दिवसात आम्हा दोघांनाही फार थंडी वाजते, रात्री अंथरुणातून उठताना खूप पाय दुखतात, अश्यावेळी तू आमच्या अंगावर गरम शाल पांघरुन द्यायचास आणि हात चोळून द्यायचास ज्यामुळे उबदार वाटायचे… तुझ्या कृतीमागे तुझ्या मनात असलेली आमच्याबद्दलच्या काळजीयुक्त प्रेमाची उब ऑनलाईन कशी आणायची?
इंटरनेट माणसाची सोय आहे, रीप्लेसमेंट नाही.
Comments
Post a Comment