थोडा है थोडे की जरूरत है@12.12.17
आनंद मिश्रण
परवा साक्षी मला म्हणाली, अविदादा माझे लग्न होतेय परंतू बाबा खुश नाहीत, नाराज आहेत. कारण छोटेसे आहे परंतू त्यांच्या नाराज असल्याने मला फार वाईट वाटते आहे. माझ्या लग्नासाठी सारे पाहुणे येणार आहेत, बऱ्याच वर्षांनंतर जवळपास सर्वांनाच येणे जमतेय, यावेळी खूप नातेवाईकांनी सुट्या काढून मुद्दाम येण्याचे ठरविले आहे. याचे कारण खूप वर्षांनंतर आमच्या परीवारात लग्न होतेय. त्यामुळे प्रत्येकजण आनंदात आहे. मुख्य म्हणजे आता आमच्या घरची नवी पिढी आता छान आनंद घेण्याच्या वयात आली आहे. अश्यावेळी सारे सारे आनंदात असताना माझे बाबा मात्र एका छोट्याश्या कारणामुळे नाराज होऊन बसलेत. बरे वाटत नाही मला.. तू बाबांशी जरा बोलतोस का? मी तिला हो म्हणालो. साक्षीचे बाबा ज्या कारणामुळे नाराज झाले होते ते कारण ऐकल्यावर मी त्यांच्याशी बोलायलाच हवे असे मला वाटले. साक्षीच्या बाबांचे चुकत होते असेही नव्हते. ज्या मुशीत आपली जडणघडण झाली ती सहजासहजी बदलविणे कठीणच असते. तिच्या बाबांबद्दल साक्षीची प्रतिक्रीया जराशी तीव्र होती कारण ती एकदमच नव्या पिढीची होती. मला मात्र साक्षीची आणि तिच्या बाबांचीही भुमिका योग्य रितीने समजत होती. म्हणूनच साक्षीच्या बाबांशी बोलण्याचे मी ठरविले.
माझा कामातून जसा वेळ मिळाला तसे मी त्यांना भेटायला गेलो. नेमका तो कुळाचाराचा दिवस असल्याने घरात गर्दी होती. पाहुण्यांनी घर भरले होते. प्रत्येकाला फार आनंद झालेला होता. महिला मंडळींचे मेंदी वगैरेचे कार्यक्रम सुरु होते. एकंदरीत आनंद आणि मज्जा सुरु होती. मला जशी संधी मिळाली तसे मी साक्षीच्या बाबांजवळ जाऊन बसलो. लग्नाची तयारी वगैरे प्राथमिक चौकशी केल्यानंतर मी माझ्या मनातल्या मूळ विषयाला हात घातला. त्यांना मी म्हणालो, काय मामा, सारी तयारी झाली छान, घर कसे भरले भरले वाटतेय, विशेष म्हणजे तुमच्या निमंत्रणाला मान देऊन सारेच नातेवाईक आलेले आहेत, छान वातावरण आहे घरात.. परंतू तुम्ही मात्र नाराज दिसताय! काय झाले? मामांना कदाचित त्यांना मनातून वाईट वाटणाऱ्या गोष्टीबद्दल कुणाशीतरी बोलायचेच होते. मामांनी लगेच आपले मन मोकळे करायला सुरुवात केली. माझ्यासाठी ही संधी होती, त्यांच्याशी संवाद साधण्याची.. मी काळजीपूर्वक त्यांचे ऐकु लागलो. मामा तावातावाने सांगायला लागले...
काय सांगू तुला, सगळया गोष्टी नीट ठरविल्या. मी गेल्या किती दिवसांपासून कामे करतोय. लग्नाचा सारा खर्च, पैश्याची जमवाजमव हे सारे कसे करावे लागते हे पोरीच्या बापालाच माहीत असते. वधुपिता होणे सोपे नाही. पण हे सगळे करत असताना आपले काही ऐकल्या गेले नाही की मोठे वाईट वाटते आणि न ऐकणारे कोण तर आपलेच पोटजन. मग खरोखरीच वाईट वाटते. काही पद्धती असतात ज्यानुसारच सारे व्हायला हवे. पण ही नवी पिढी आपलेच सुनावते. लग्न समारंभाची पद्धत आपल्या पूर्वजांनी ज्या प्रकारे तयार केली त्यामागे काही विचार निश्चित असणार ना.. ते वेडे तर नव्हते..मग त्यांच्या मार्गाने न जाऊन या समारंभाचे पावित्र्य घालविण्याचे कार्य जेव्हा हे तरुण लोक करतात तेव्हा वाईट वाटते. मामा, नेमके काय झालेय की ज्यामुळे तुम्ही इतके दुखावलात? काय सांगू तुला..मामा अगदी पडलेल्या आवाजात सांगू लागले.. आजचा कुळाचार आटोपल्यावर उद्याचा दिवस मोकळा आहे तर माझी मुलगी आणि मुलगा म्हणत आहेत की उद्या सर्व नातेवाईकांसाठी रात्री पावभाजीचा बेत ठेवायचा आणि तो डीजे की फीजे सांगायचा..धडाम धडाम वाजण्यासाठी आणि नाचण्यासाठी. सांग आता! आपल्या घरच्या लग्नांमधे असे काही बघितले आहेस का? काहीतरी वेडेपणा करायचा.. जोरजोराने ते संगीत लावायचे आणि वेड लागल्यागत नाचायचे.. अश्याने लग्नसमारंभाचे पावित्र्य भंग नाही होत? पण माझे ऐकायलाच तयार नाहीत. तूच सांग आता, तू तर प्राचार्य माणूस आहे..तू योग्य पद्धतीने सांगू शकशील... हे सारे ऐकून घेईपर्यंत ठिक होते..पण आता माझी परीक्षा होती. केवळ माझीच नाही तर माझ्यातील प्राचार्य देखील परीक्षेला बसले होते... मी काही क्षण विचार केला मामांना कसे सांगावे याचा विचार केला व मामांशी बोलणे सुरु केले..
मी मामांना म्हणालो, मामा तुमचे अगदी खरे आहे. या गोष्टींनी लग्नसमारंभाची जी प्रतिमा आपल्या
मनात वर्षानुवर्षे जोपासली आहे त्याला तडा जातो व ते अत्यंत स्वाभाविक आहे. वर्षानुवर्षे आपण काही तत्वे जोपासून आपल्या जीवनात मार्गक्रमण करीत असतो व त्यामुळे ती तत्वे आपल्याला योग्य वाटत असतात त्यामुळेच त्या दृष्टीकोनातून आपण जगाकडे बघत असतो. परंतू जगाचे मात्र असे नसते. जग ज्या माणसांनी बनलेले आहे त्या माणसांमधे मात्र बदल होत असतो...तो बदल केवळ वागण्यापुरता किंवा पेहेरावापुरता मर्यादित रहात नाही तर तो जीवन जगण्याच्या तत्वांनाही प्रभावित करतो. त्यामुळे काही बदल हे अपेक्षित असतात. त्या बदलांना स्विकारणे ही सर्वांसाठीच फायद्याची बाब असते. आता तुमच्या मुलीच्याच लग्नाचा विचार करता तुमची मुलगी तिच्या लग्नाचे सारे विधी शास्त्रोक्त पद्धतीने करुन घेते आहे. कुळाचार, ग्रहमक, सिमांतपुजन, विवाह हे सारे उपचार ती मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होऊन करुन घेणार आहे. ही सकारात्मकता आपण बघायला हवी अन्यथा आपल्याला न विचारता एखाद्या मुलाला सोबत आणून मी याच्यासोबत एक वर्षापासून राहते आहे, आम्ही लीव्ह इन रीलेशनमधे आहोत आणि आता आमच्या लग्नाची नोंदणी करुन द्या, एक रीसेप्शन द्या व आमचे लग्न घोषित करा असे सांगणाऱ्या मुली देखील आहेत. असे झाले तर मी तर त्या क्षणी प्राण सोडीन...मामांनी प्रतिक्रीया दिली... मी त्यांना लगेच म्हणालो, होय ना! परंतू तुमच्या पोरीने असे काहीही केलेले नाही. ती व्यवस्थित तुमच्या मर्जीनुसार या सबंध समारंभात सहभागी होऊन आनंद घेते आहे. जर तुम्हाला प्राण सोडावा वाटेल अश्या पद्धतीचे ती काहीही करत नाही तर मग तरुण पोरांची एक छोटी इच्छा आनंदाने मान्य करायला काय हरकत आहे. आपण विचार करा.. पण माझे म्हणणे पटत असेल तर मनापासून हो म्हणा व जमल्यास त्यात सहभागी व्हा... एवढे बोलून मी मामांना त्यांचा निर्णय घेण्यासाठी सोडून निघून गेलो...
साक्षीचा फोन आला.. अविदादा, उद्या रात्री यायचे आहे डीजे चा कार्यक्रम ठरलाय आणि बाबांनी परवानगी दिली... मला लक्षात आले, मामांना माझे म्हणणे पटले होते कदाचित..अर्थात त्यांच्या सहभागाबद्दल मी साशंक होतो. मी साक्षीकडे दुसऱ्या दिवशी जरासा उशीराच पोहोचलो.. सर्वांचो नाचणे सुरु होते. एक एक करुन आम्ही सर्वांनाच नाचायला लावले. मामांपेक्षा मोठे मामा देखील नाचून गेले. हे मामा मात्र दूर उभे राहून बघत होते. मग मी मावशीला त्यांना नाचण्यास आणायला सांगितले. जराशा आढेवेढ्यानंतर मामा नाचायला आले..आणि मावशीसोबत हातात हात धरुन मस्त हसत नाचू लागले.. साक्षीने माझ्याकडे बघितले व तिच्या डोळ्यात तरळून आलेले आनंदाश्रू मला दिसले..काही वेळ नाचून दमल्यावर मामा बाजूला उभे राहीले तेव्हा मी त्यांच्या जवळ गेलो व म्हणालो..मामा या सर्वांचे हसरे आणि खूप आनंदी चेहेरे बघून कसे वाटतेय? मामांनी काहीही न बोलता माझे हात हातात धरले व माझे हात जोराने दाबून स्पर्शानेच मला थँक यू म्हणाले.. हाताला मेंदी लावलेली साक्षी भावा बहिणींच्या घोळक्यात धमाल नाचत होती व तिच्या नाचावर ठेका धरुन मामा देखील टाळ्या वाजवू लागले.
जुन्या व नव्या पिढीने एकत्रीत नांदताना काही बदल मनापासून स्विकारले तर आपल्याला सर्वांनाच आनंद घेता येईल आणि कोणत्याही तत्वांपेक्षा किंवा परंपरांपेक्षा त्यामधून मिळणारा आनंद महत्वाचा हे सर्वात महत्वाचे जीवनसूत्र ज्याला कळले तोच यशस्वी जीवन जगू शकतो व इतरांनाही जगू देऊ शकतो.. विचारांचे हे सुंदर मिश्रण भरभरुन आनंद निर्माण करते व म्हणूनच हे आनंदमिश्रण प्रत्येकाने जवळ बाळगावे असेच आहे..होय ना?
Comments
Post a Comment