थोडा है थोडे की जरूरत है @19.12.17
बोलुयात… मोकळेपणाने
आपण भारतीयांनी सेक्स संबंधी आता मोकळेपणाने बोलण्याची नितांत गरज आहे. माझ्या आजच्या लेखाचे हे पहिले वाक्य वाचल्याबरोबर आज बऱ्याच वाचकांच्या मनात काय काय प्रतिक्रीया उमतील याचा मी विचार केला. सर्वात पहिली प्रतिक्रीया ही की सरांनी आज हा भलताच विषय निवडलाय. असे तर कधी झाले नाही. हे काय नविनच? किंवा आजचा लेख पोरांना वाचायला वगैरे देण्यात अर्थ नाही. आजचे वर्तमानपत्र लपवून ठेवायला हवे कुणाच्या आणि विशेषतः पोरांच्या हाती पडायला नको. अगदी टोकाची म्हणजे हा विषय काही लेखाचा विषय राहू शकतो का? काहीही लिहायचे? शोभत नाही वगैरे. आपल्या देशाच्या सांस्कृतिक व सामाजिक संरचनेमधे या प्रतिक्रीया मनामधे येणे अजिबात गैर नाही. माझ्या सदरामधून सकारात्मक सामाजिक संवादाच्या दृष्टीने माझ्या मनातील विचार प्रसृत करण्याची जी जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयास करीत असतो त्याच जबाबदारीचे निर्वहन करताना मला हे वाक्य व त्या विषयाबाबत लिहीताना करायचे आहे. हा विषय मांडण्यासाठी कारणीभूत ठरला न्यायालयाचा एक निर्णय. मद्रास उच्च न्यायालयाच्या एका अत्यंत संवेदनशील न्यायाधीशाने शासन व्यवस्थेला तसेच सामाजिक विचारवंतांना विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांमुळे.
न्यायव्यवस्था आपले कार्य करीत असताना कधीकधी साक्षीपुराव्यांच्या पलीकडे जाऊन सामाजिक जाणीवांचेही दर्शन घडवीत असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीश महोदयांनी उपस्थित केलेले काही महत्वाचे प्रश्न. हे प्रश्न गेल्या काही वर्षात महिला आणि मुलींबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांमधे झालेल्या प्रचंड वाढीसंदर्भात आहेत. गेल्या काही वर्षांमधे महिला तसेच मुलींचे वेगवेगळ्या प्रकारे होणाऱ्या शारीरिक शोषणाचे प्रकार फार जास्त वाढले आहेत व त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. यासंदर्भात आपले मत नोंदवताना न्यायाधीश महोदयांनी काही महत्वाच्या बाबींचा उल्लेख केलाय व काही तर्क मांडलेले आहेत. अत्यंत संस्कारीत व सभ्यतेच्या सर्व परीमाणांना मनापासून जोपासण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या या श्रेष्ठ भारत देशामधे अचानक सेक्स संबधीच्या गुन्ह्यांमधे वाढ कशी काय झाली याचा विचार करण्याची आवश्यकता न्यायाधीश महोदयांनी विषद केली. आपले मत रोख ठोकपणे मांडताना त्यांनी भारतीय पुरुषांमधे सेक्स बाबत स्टार्वेशन (उपासमार किंवा संधींची कमतरता) निर्माण झाल्याने महिलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांमधे वाढ झालीय असा तर्क मांडला आहे. यासोबतच देशातील तरुण-तरुणींना योग्य वयात सेक्स बाबत अपूरे ज्ञान दिल्या गेल्यामुळे त्याबाबत छुपी उत्सुकता राहते जी पुढे घातक ठरते, दारु पिण्याचे प्रमाण वाढल्याने वाढणारा तमभाव, सांस्कृतिक व सामाजिक बंधनांमुळे सेक्स बाबत चर्चा न करण्याची वृत्ती आणि त्यामधून निर्माण झालेल्या अनेक भ्रामक समजुती, सहजपणे उपलब्ध होणारे अश्लील दृक श्राव्य किंवा वाचन साहित्य इत्यादी बाबींचा देखील उहापोह करण्यात आला. महिलांच्या व मुलींच्या बाबत वाढत्या संख्येने घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत विस्ताराने अभ्यास करण्यासाठी या सर्व मुद्द्यांसंदर्भात शासनाने अभ्यास गटांच्या माध्यमातून, राष्ट्रीय महिला आयोगाने तसेच सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू मंडळींनी उत्तर द्यावे असे निर्देश न्यायाधीश महोदयांनी दिले. आपल्या या विशेष निर्णयामधे त्यांनी मध्ययुगीन कालखंडामधे निर्माण झालेल्या सामाजिक व धार्मिक बंधनांच्या आधी सेक्स या विषयाला असलेल्या समाजमान्यते बद्दल देखील टीप्पणी केली आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे खजुराहोच्या मुर्तीकलांमधून सादर होणारे सेक्स अर्थात श्रुंगाराचे ठळक प्रकटन होय. खजुराहो लेण्यांमधे मांडण्यात आलेले प्रणय व श्रुंगाराचे चित्रण तत्कालीन समाजातील श्रुंगाराचे व त्याच्या समाजस्विकृतीचे प्रतिबिंबच आहे असे न्यायाधीश महोदयांनी सांगितले आहे. येणाऱ्या काळात जर महिला व मुलींसंदर्भात घडणाऱ्या अनेक अत्याचाराच्या घटना कमी करायच्या असतील तर याच्या अचानकपणे झालेल्या वाढीबाबत समाजातील विचारी मंडळींनी समुहचिंतन करुन आपले मत नोंदविले पाहिजे. या वरील मुद्दयांचा विचार करता हे सर्व मुद्दे अत्यंत ग्राह्य असून विचार करण्यासाखे आहेत.
सामाजिक दृष्टीने आपण पुढारलेले असलो किंवा तसा आव आणत असलो तरी देखील अद्याप सेक्स किंवा श्रुंगार या विषयाबाबत वेगवेगळ्या पिढीच्या मंडळींनी खुल्या दिलाने चर्चा करणे अद्यापही दुरापास्त आहे. मुलगा किंवा मुलगी मोठे होत असतात व त्या अनुसार होणारे शारीरिक बदल त्यांना सांगताना अजूनही मोकळीक वाटत नाही. मद्रासच्या न्यायाधीश महोदयांनी मांडलेली सारीच निरीक्षणे अतिशय चपखल आहेत. दारु पिण्याच्या बाबत तर आता लवकरच आपण जागतिक उच्चांक गाठू शकतो. दारु पिण्याच्या संधी शोधण्यातही आपण अग्रेसर आहोत. ताण असेल तर, आनंद झाला तर, एकत्र जमायचे असेल तर, जमता नाही आले तर, लग्न समारंभ असेल तर, कोणतेही कारण त्यासाठी पुरते व त्या गोष्टीचा विचित्र पद्धतीने पुरस्कार करणारे धुरीण तयार झाले आहेत. त्यांनी दारू पिऊन स्वतःच्या जीवाचे व शरीराचे काय करायचे ते करावे परंतू या असल्या दारु पिण्याच्या पुरस्कार करण्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांचे अनुकरण करु लागलाय याचे त्यांना भान उरले नाही. महिलांच्या कीटी पार्टीमधे देखील दारु ढोसून झिंगण्याचे प्रकार वाढलेत. मुलांनी अनुकरण केल्यामुळे गेल्या काही दिवसांमधील घटनांचा विचार करता १४-१५ वयोगटातील मुले देखील महिलांवरील किंवा मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे करताना आढळत आहेत. दारु पिणाऱ्या बापाने आणि काही प्रसंगी आईनेही दारुचा ग्लास उचलताना प्रत्येक वेळी जर आपल्या पोराची आठवण करुन त्याने दारु पिणे सुरु केली तर कसे होईल असा विचार केला तर तो दारुचा घोट त्याच्या किंवा तिच्या घश्याखाली उतरणार नाही. परंतू व्यसन असा संवेदनशील विचार करुच देत नाही…ते माणसाला रानटीच बनविते व त्यामधूनच गुन्हे घडताहेत असे न्यायाधीश महोदयांचे मत आहे. या सोबतच सहज उपलब्ध होणारे अश्लील साहित्य जे मोबाईलच्या माध्यमातून सहज मुला-मुलींपर्यंत पोहोचते व ज्यामुळे सेक्स संबंधीचे अतिशय चुकीचे संदर्भ मुला-मुलींच्या मनात तयार होतात. परंतू हे असे संदर्भ तयार होऊ नये म्हणून शिक्षण प्रणालीमधे या सर्व बाबी शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावून सांगण्याची व्यवस्था उपलब्ध नाही. काही अभ्यासक्रमांमधे ते भाग आहेत परंतू हव्या त्या पद्धतीने शिकविणारे शिक्षक उपलब्ध नाही. सेक्ससंबंधीचा पाठ कसातरी घाईघाईने शिकवून टाकला व सुटले असे म्हणणारे शिक्षक व शिक्षिका बऱ्याच प्रमाणात आहेत. असल्या विषयांवर काय व कसे बोलावे हेच समजत नाही असे म्हणून सेक्स संबंधीच्या परंपरागत न बोलण्याच्या भावना आजही सोबत बाळगणारे शिक्षक असतील तर प्रबोधन कसे होणार? घरांमधे देखील तशीच परीस्थिती अजूनही आहे. या सर्व गोष्टींबाबत शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रबोधन करण्याच्या व्यवस्था अजूनही आपल्याला निर्माण करता आल्या नाहीत. याउलट अभ्यासक्रमांमधे या विषयाचा समावेश करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यामुळे संस्कृतीचे हनन होईल म्हणून काही स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी त्याला कडाडून विरोध केला व दुर्दैवाने तो सारा भाग अभ्यासक्रमांतून वगळण्यात आला. सांस्कृतिक व सामाजिक चौकटीमधे नितिमुल्यांची जोपासना व्हायलाच हवी परंतू सेक्स शिक्षण ही एक स्वतंत्र बाब असून त्यासंदर्भात पाळण्यात येणाऱ्या दडपणयुक्त गुप्ततेमुळे अडचणी निर्माण होतात. कारण त्यासंदर्भात बोलले नाही तरी ती मानवाची महत्वाची गरज व शारीरिक विकासाशी निसर्गतः जोडल्या गेलेली बाब आहे. त्या गोष्टीला नाकारता येत नाही. परंतू सेक्स संबंधीच्या चर्चांना किंवा प्रबोधनाला सामाजिक पातळीवर अनेक वर्षांच्या पारंपारिक बंधनांमुळे प्राधान्य दिले जात नाही व त्यामुळे याचा वाट्टेल तसा प्रचार छुप्या पद्धतीने होत असतो. अत्यंत अनैसर्गिक पद्धतीने या सर्व बाबींचे वर्णन करणारे व्हीडीयो व क्लीप्स मोबाईलच्या वेगवेगळ्या अॅपवर उपलब्ध आहे. ज्यामधे सेक्स बद्दल अतिशय बिभत्स व अनैसर्गिक वर्णने मुलांना सहज उपलब्ध होतात. बऱ्याच पालकांना याचा पत्ताच नाही. अश्या प्रकारे विकृती निर्माण होऊन त्यामधून महिलांबाबत व मुलींबाबत गुन्हे घडत आहेत व या गुन्ह्यांमधे फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे ही न्यायाधीश महोदयांची चिंता गंभीर आहे. ही विविध कारणे अधोरेखीत करुन त्यांनी आपल्याला मते मांडायला सांगितली आहेत. आपल्यापैकी प्रत्येकजण विचारी आहे व वितार प्रवर्तक देखील आहे.
चला तर सर्व मिळून न्यायाधीश महोदयांना आपल्या मतांनी व विचारांनी प्रतिसाद देऊयात.. मोकळेपणाने बोलुयात..
Comments
Post a Comment