थोडा है थोडे की जरूरत है @28.11.17
मी टू मिशन
आधुनिक काळ सुरु झाला आणि त्या काळातील बदलांना आपण स्विकारुन त्यामधे स्थिरावायला लागलो. आता आधुनिकता म्हणून केलेली गोष्ट आपल्याला बावरुन टाकत नाही किंवा धक्का देत नाही. अनेक वर्षांच्या संस्कारांमुळे कदाचित आपल्याला ते स्विकारणे जरा जड जातही असेल किंवा प्रसंगी त्या बदलांबाबबत आपण टिकाही करत असू परंतू आता असे जगावेगळे बदल समाजात किंवा अगदी आपल्या आसपासही घडू शकतात अशी आपल्या सर्वांच्याच मनाची तयारी होऊ लागली आहे. माझ्या पिढीचे लोक आता सहजच येत्या दहा वर्षांनंतर आपली पोरे लग्न लावून देण्याची संधी देतात की सरळ सुनबाईला नमस्काराला आणतात हे ठाऊक नसल्याबद्दल विनोदही करु लागले आहेत. त्यामुळे वेगवेगळे सामाजिक किंवा सांस्कृतिक बदल होणार आहेत आणि ते फार वेगाने होणार आहेत याची मानसिक तयारी आपण करुन ठेवलेली आहे. हे सारे बदल होत असताना एक अत्यंत महत्वाचा बदल होतोय तो म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा. गेल्या पन्नास वर्षांपूर्वी या समाजात ज्यांना महत्वाचे स्थान प्राप्त करण्यासाठी झगडावे लागले व ज्यांच्या वैचारिक जडण घडणीची दखल घेतली जात नव्हती अश्या सर्व घटकांना या नव्या काळात सक्षमतेचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे आणि या घटकांचे प्रतिनिधी आता आपली मते ठामपणे विनासंकोच मांडू लागले आहेत हा आधनिक काळातील एक मोठा बदल मानावा लागेल. कारण वैचारिक प्रक्रीया ही तर निरंतर चालणारी गोष्ट आहे व प्रत्येक जीवित मनुष्याच्या ठायी विचार करण्याची मुलभूत शक्ती असते. केवळ जुन्या काळात या वैचारिक शक्तींमधून निर्माण झालेले वैचारिक धन काही मोजक्या गटांना व्यक्त करण्याचा अधिकार प्राप्त होता व त्यामुळे अनेकांचे आवाज व संवेदना या जगापुढे आल्या नाहीत. यासोबतच असे काही विषय ज्यांच्या बद्दल दबलेल्या आवाजात बोलल्या जायचे, सर्वांना ते विषय माहित असायचे परंतू मोठ्याने किंवा खुलेपणाने ते विषय मांडणे ही सभ्यतेच्या चौकटी बाहेरची बाब मानली गेली होती. अर्थात ही चौकट देखील काही मोजक्या समाजधुरीणांनी तयार केलेली असल्याने आधुनिक काळात त्या चौकटीच्या अस्तित्वाला धक्का पोहोचला नव्हे ही चौकटच उखडून फेकण्यात आली. माझ्या मनाला वाटते व ज्या गोष्टीमुळे मला त्रास झाला त्या माझ्या व्यथा आणि वेदना मी समाजासमोर निःसंकोच मांडीन अश्या पद्धतीचा एक नवा विचार काही महिन्यापूर्वीच उदयाला आलाय. ज्या घटकांना आपल्या भावनांना मोकळेपणाने वाट देता आली नाही त्यामधे महिलावर्ग फार मोठ्या प्रमाणावर होता. काही प्रमाणात लहान निरागस बालके देखील या घटकांमधे समाविष्ट होती. त्यांच्या बाबत घडणाऱ्या काही बाबी या कायम सभ्यतेच्या त्या पडद्याआड राहील्या. म्हणजे सभ्यतेच्या पडद्याआड त्यांच्याबाबत अन्याय केलेला चालत होता परंतू त्या अन्यायाबाबत वाचा फोडणे म्हणजे सभ्यतेच्या मर्यादांचे हनन ठरत होते. अश्या या बेगडी सभ्यतेच्या सर्व बुरख्यांना टराटरा फाडून गेल्या काही महिन्यापासून जगभर एक नवे मिशन सुरु झालेय त्याचे नाव मी टू मिशन.
आधुनिक काळाच्या वेगवेगळ्या प्रगतींसोबत काही अभिशाप आपल्याला लाभले आहेत. यामधे समाजातील नैतिक अवमुल्यन हा मोठा व ठळकपणे जाणवणारा बदल आहे. प्रत्येक बाब फायदा किंवा नफा या तत्वावरच बघणे सुरु झाले व त्यामधून मग प्रचंड स्पर्धा उत्पन्न झाली ज्या स्पर्धेने फार अक्राळ विक्राळ रुप धारण केले. निरलस, स्वच्छ आणि निस्सीम प्रेम या गोष्टीची जागा फायदा व गैर फायद्याने घेतली व त्यामधूनच मग काही घटकांच्या बाबत जसे महिला किंवा बालकांबाबत विचित्र घटना घडू लागल्या. पैश्याच्या भ्रष्टाचाराच्या पलीकडे जाऊन आणखी जास्त घृणास्पद प्रकारांचा अवलंब विविध क्षेत्रात सुरु झाला. ज्यामधे सदोदित चकचकित वाटणारे चित्रपट किंवा मीडीयाचे क्षेत्र असेल किंवा खेळाचे क्षेत्र असेल तेथे हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. स्पर्धा प्रचंड असल्याने कसेही करुन यश मिळवायचेच किंवा काही गोष्टींमधे तडजोड केल्याशिवाय यश मिळतच नाही असा विचार या चमकदार क्षेत्रांमधे प्रस्थापित झाल्याने या क्षेत्रात पुढे जाणाऱ्या अनेकांना अश्या घृणास्पद तडजोडी करण्याची मानसिकता ठेवावीच लागली. व त्यामधून कुठेही व्यक्त न होता हा अत्याचारांचा किंवा गैरफायद्यांचा सिलसिला सुरु राहीला. जो फायदा करुन देतोय व ज्याला मिळतोय अश्या दोघांनाही ती बाब योग्य वाटल्याने त्याबद्दल कुणालाही बोलण्याची आवश्यकता वाटत नव्हती व त्यामुळे अनैतिक किवा असामाजिक असल्या तरीदेखील या गोष्टी कुणीच बोलत नव्हते. पण अचानक गेल्या काही महिन्यापूर्वी हॉलीवुडच्या एका अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्रीने मी टू मिशन म्हणून सुरुवात केली ज्यामधे तिने तिच्या चित्रपट क्षेत्राच्या सुरुवातीला तिला भोगावी लागलेली अत्याचारांची व गैरफायदा घेतलेल्या प्रसंगांची जाहीरपणे वाच्यता करुन मला हे भोगावे लागले अशी कबुली दिली. ज्या विषयांच्या बाबत आजपर्यंत केवळ दबल्या आवाजातच बोलले जात होते त्या एका अत्यंत संवेदनशील व खाजगी विषयाबाबत त्या अभिनेत्रीने सर्वांसमक्ष वाच्यता केली. तिच्या या धाडसाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक झाले व अश्या पद्धतीच्या अन्यायाबाबत बोलल्या जाऊ शकते असे कळल्याबरोबर जगात सगळीकडे आणि आपल्या देशात सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणांया महिलांनी त्यांच्या जीवनात सामना कराव्या लागलेल्या अन्यायाबाबत जाहीर कबुली देणे सुरु केले. मी टू मिशन अंतर्गत आतापर्यंत शेकडो महिलांनी त्याच्या करीयरच्या सुरुवातीच्या टप्प्यांवर त्यांना कराव्या लागलेल्या या पद्धतीच्या तडजोडी किंवा त्यांच्या बाबत झालेल्या अत्याचारांबद्दल जाहीरपणे आपले मत मांडले आहे. आता या मिशन मधे काही लहान मुले देखील सामील झालीय ज्यांना अश्याच प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या मोहीमेद्वारे ज्यांनी अश्या प्रकारचे अत्याचार केले त्यांना शिक्षा दिली जावी असा काही हेतू दिसत नाही. कारण या सर्व व्यक्तींनी अत्याचार करणाऱ्यांची किवा गैरफायदा घेणाऱ्यांची नावे सांगितलेली नाहीत. मुळात त्यांना जे भोगावे लागले ते आतापर्यंत सभ्यतेच्या चौकटीमुळे त्यांना मनातच दडवून ठेवावे लागले होते ती त्यांना बोचलेली वेदना त्यांनी आज समाजासमोर उलगडण्याचे धारीष्ट्य दाखविले आहे. या त्यांच्या धारीष्ट्याबद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल. अर्थाच या मिशनवर टिकाही खूप झाली. विशेष म्हणजे महिला वर्गाकडूनही याबाबत टिकेचा सूर उमटला. या सर्व महिला म्हणजे सौ चुहे खाकर बिल्ली... असा प्रकार आहे किंवा या माध्यमातून पुन्हा एकवार प्रसिद्ध होण्याचा नवा मार्ग यांनी शोधला आहे अश्या पद्धतीची टिका महिलांकडूनही करण्यात आली. प्रसिद्ध होण्याचा हा प्रकार आहे या आरोपामधे काही प्रमाणात तथ्य असेलही परंतू आपण बदललेल्या परीस्थितीमधे या बाबीकडे सकारात्मकतेने बघून आपल्या मनाची आधुनिकता दाखवू शकतो का हा महत्वाचा प्रश्न आहे.
काहीही झाले तरी आपल्या भारतीय समाजामधे आजही संस्कारांच्या विविध मर्यादा पाळल्या जातात. आधुनिकता स्विकारली तरी देखील आपल्या समाजातील बुवांची आणि त्यांच्या मागे वेडे होणाऱ्या भक्तांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे अजूनही आपल्या समाज आधुनिकता व परंपरावाद याच्या संयुक्तिक स्वरुपामधे अडकलेला आहे. अश्यावेळी आपल्या जीवनातील मनाला बोचणारी वेदना जी कदाचित कधीच सांगू नये अशी आहे ती जाहीरपणे व्यक्त करण्याचे धारीष्ट्य ज्यांनी दाखविले त्यांना आपण समर्थन द्यायला हवे. ते चांगले किंवा वाईट याबाबत नंतर चर्चा होऊ शकते नव्हे व्हावीच. परंतू मोकळेपणाने वेगवेगळ्या विषयांबाबात मत मांडणे ही आधुनिकतेची खरी ओळख आहे. या मिशनच्याही पलीकडे जाऊन अजूनही असे विषय समाजात आहेत ज्याबाबत बोललेच जात नाही व त्यामधूनच मग धर्माच्या नावाखाली किंवा समाजाच्या नावाखाली लूट केली जाते. मी टू मिशन बाबत वेगवेगळी मते असू शकतात परंतू धारीष्ट्याने असा एखादा खाजगी परंतू सामाजिक दृष्टीने महत्वाचा विषय चर्चीला जाणे ही एक नव्या बदलाची नांदीच आहे असे म्हणावे लागेल..
Comments
Post a Comment