थोडा है थोडे की जरूरत है @14.11.17
सांगीतिक शांतता
संगीत हे प्रत्येक मानवाला अनादी अनंत शक्तीशी जोडण्याचे कार्य तसेच माणसातल्या माणूसपणाच्या संवेदना जागृत ठेवण्याचे महत्वाचे कार्य करीत असते. संगीत ही निसर्गाची माणसाकरीता मिळालेली सर्वात सुंदर निर्मीती आहे ज्यामुळे माणसाला अन्य प्राण्यांपेक्षा अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. संगीताचे विविध प्रकार आहेत. प्रत्येकाला संगीताचा कोणता प्रकार आवडावा हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अभिरुचीचा भाग असतो. परंतू संगीत आवडतच नाही अशी व्यक्ती सापडणे जवळपास असंभव असते. संगीत सुरांच्या आधारे अत्यंत एक अनोखे विश्व निर्माण करते ज्यात आपण स्वतःला विसरुन त्याच्या अद्वितीय आनंदात रममाण होऊ शकतो जो आपल्याला निर्मळ आणि निखळ आनंद देते. बरेच वेळा आध्यात्मिक संदर्भांमधे देखील मनःशांतीसाठी संगीताचा वापर करायला हवा असे सांगितले जाते. ध्यानासाठी देखील बरेच वेळा संगीताचा वापर केला जातो. संगीताच्या प्रकारामधे काही प्रकार हे शरीराला धुंद करणारे तर काही बुद्धीला चालना देणारे असतात, परंतू काही मात्र थेट मनाला भिडतात. काही सुर त्यांच्या आवाजावर मात करुन एक प्रकारची सांगीतिक शांतता निर्माण करतात. असे संगीत निर्माण होताना सारा मेळ जुळून यावा लागतो. कवीच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेले काव्य, त्याला एखाद्या जाणकार संगीतकाराने चढविलेला स्वरसाज आणि अश्या एखाद्या गीताला लाभलेला सुरेल स्वर… अश्या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले एक गीत एका छोट्याश्या पारिवारीक मैफीलीत माझ्या ऐकण्यात आले. गाण्याचे सूर असूनही त्यामधून जाणविलेली सांगीतिक शांतता मनात कायमची बसली आहे. हे गीत परत परत ऐकून ती शांतता अनुभवता येते. ते गीत लिहीलंय प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी, त्याला संगीतबद्ध केलंय सुप्रसिद्ध गायक आणि गझलकार दत्तप्रसाद रानडे यांनी आणि त्या अविस्मरणीय मैफीलीमधे ते गीत गायले होते सुरेल गळ्याची गायीका अंजली मराठे यांनी..
गाण्याचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की या गाण्यामधे आणि विशेषतः दत्तप्रसाद रानडे यांनी बांधलेल्या चालीमुळे ऐकणाऱ्याला या गाण्यामधे एक प्रकारची सांगीतिक शांतता अनुभवायला मिळते. मुळात वैभव जोशींनी देखील दोन नात्यामधला दुरावा आणि अगतिकता मांडण्याचा प्रयत्न केलाय. विरहाच्या दुःखाने कवीला पडलेले प्रश्न मनाला भिडणारे आहेत आणि गाण्यामुळे निर्माण होणाऱ्या शांततेच्याच शोधात कवी आहे असेही वाटते. म्हणजे जी शांतता शोधण्याचा प्रयत्न कवी या कवितेच्या शब्दांच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतो ती शांतता त्याला जरी सापडत नसली तरी गाणे ऐकणाऱ्या प्रत्येकाला लाभते. वैभव जोशी लिहीतात..
इतना शोर शराबा क्यूँ है,
तनहाईसे झगडा क्यूँ है
शांततेचा शोध घेणारा कवी, त्याच्या आजुबाजूने असलेल्या कोलाहलाने काहीसा त्रस्त आहे. वेगवेगळ्या प्रकारचा कोलाहल त्याच्या आसपास सुरु असतो आणि त्या बाबत तो काही करुही शकत नाही. या कल्लोळमुळे वैतागून जाऊन त्याचे जणू एकांताशी भांडण सुरु आहे असेच त्यास वाटते. ही तनहाई खरे तर मनाला हुरहुर लावणारी असते, बेचैनी वाढविणारी असते परंतू कधीकधी आवाजाच्या कलकलाटात तीच हवीहवीशी वाटायला लागते. या तनहाईमधे देखील एक प्रकारचा आनंद असतो. विरहाचा आनंद कवीला शोधायचाय परंतू त्याला तो मिळत नाही.. शांतता लाभत नाही. कधीकधी हा कोलाहल आसपासच्या आवाजांपेक्षाही मनाचा अधिक असतो. ज्याचा सकृतदर्शनी आवाज येत नाही परंतू आपल्या मनाला त्याने बेचैन करुन टाकले असते. मनःशांतीशीच कधीकधी आपले भांडण सुरु असते. बाहेरच्या आवाजांपेक्षा मनाची अस्वस्थता काही प्रसंगी जास्त त्रासदायक ठरू शकते. या मनःशांतीच्या शोधातच हा कवी भटकतो आहे. परंतू कधीकाळी असेही होते की वेदना देखील आनंददायी ठरु शकते. हे प्रेम करणाऱ्या मनाला कळू शकते. प्रेम करण्याची क्षमता प्रत्येकातच असते परंतू त्या प्रेमाची अनुभूती मात्र फार कमी लोकांना मिळत असते. खऱ्या प्रेमाच्या अनुभूतीमधे वेदना आनंद देणारी असते. आनंद देणारी वेदना हा भावनांचा विरोधाभास प्रेम करणारी व्यक्तीच समजू शकते. वैभव जोशी लिहीतात..
कौनसा दर्द है, तेरी रगों मे
यार तू इतना मिठा क्यूँ है
आपल्या प्रेमी सहचारी व्यक्तीचा गोडवा शोधत असताना त्याचा स्रोत त्याच्या मनातील वेदना आहे हे कळण्याचे सामर्थ्य फार कमी लोकांकडे राहू शकते. या वेदनेचा आधार खरे आणि उच्च कोटीचे समर्पित प्रेम असल्याने त्या वेदनेतही गोडवा शोधला जाऊ शकतो. कारण मुळात अनेक साहित्य कलाकृतींमधे प्रेमाचा खरा आधार त्याग आणि समर्पण हाच मांडलेला आपल्याला दिसतो. तोच धागा पुढच्या कडव्यातही वैभव जोशी पकडतात.. ते लिहीतात,
मेरे बादल सूख चुके है,
तेरा दामन गिला क्यूँ है
प्रेमातील एकरुपता मांडताना, वेदनांनी माझ्या मनाला संपुर्ण कोरडेपणा आला असला तरी देखील तुझ्या आधाराचा ओलावा अजूनही कसा शिल्लक आहे हे कोडे पडलेले आहे. माझ्याकडे तर जवळपास काहीच उरलेले नाही, माझे मन तर वेदनांनी होरपळून निघालेले आहे परंतू त्या वेदनेवर फुंकर घालण्याचा निस्वार्थी आणि कोणतीही अपेक्षा नसणारा ओलावा तुझ्या ठायी कसा आहे हा प्रश्न एका प्रेम करणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याबद्दल पडलाय. तो कुणालाही पडला तरीही त्या प्रेमाची श्रेष्ठता इतकी जास्त आहे की एकाच्या मनाचा कोरडेपणा घालविण्यासाठी दुसऱ्याच्या मनाचा ओलावा हा टिकणारच आहे या शाश्वती बद्दलचा प्रश्न कवीने मांडला नाहीये तर उलटपक्षी त्या प्रश्नातून एक आपल्या प्रेमाच्या व्यक्तीच्या मनातील ओलाव्याबद्दलचा आश्चर्यरुपी विश्वासच व्यक्त केला आहे. कवितेच्या शेवटच्या कडव्यात देखील वैभव जोशींनी विरहाची कल्पना मांडताना दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनातील अगतिकता आणि परीस्थितीने निर्माण केलेली व्यथा मांडली आहे. वैभव जोशींनी या शेवटच्या कडव्यात ती हतबलता व्यक्त करणारा प्रश्न जरी विचारला असला तरीदेखील त्यामुळे निर्माण होणारी मनाची अस्वस्थता आणि त्यासाठीच प्रेमाच्याच आधारे शोधल्या जाणाऱ्या मनःशांतीचा संदर्भ जोडल्या जातो. वैभव जोशी लिहीतात,
साफ नजर आता है सबकुछ
फिर दोनो मे शिशा क्यूँ है
प्रेमाच्या भावनेच्या आधारे दोघांची मने इतकी एकरुप आहेत की त्यांनी धारण केलेली नितळता संपुर्णपणे पारदर्शी आहे. दोन प्रेम करणारे जीव वेगळे नाहीच कारण त्यांची शरीरे जरी वेगळी असली तरी देखील त्यांची मने, त्या मनात उठणारे एकमेकांबद्दलचे तरंग, वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात एकाचवेळी मनात येणारे समान विचार, त्या विचारांचे एकाचवेळी उमटलेले हुंकार, त्या हुंकारांना दिलेला सारखाच प्रतिसाद हे सारे इतके एकरूप की अक्षरशः प्रतिबिंब असावे. परंतू इतकी एकरुपता असूनही त्यांच्यातील वेगळेपण किंवा विरह कायम आहे एखाद्या स्वच्छ आणि नितळ काचेप्रमाणे. जी काच त्यांना एकमेकांपासून वेगळी करते. या कडव्याचे बारकाईने निरीक्षण केले असता यामधे ती काच असायला नको असा सूर या शेवटच्या प्रश्नातून आलेला आपल्याला जाणवतो. वैभव जोशींच्या लेखनाची ही कमाल आहे की प्रत्येकच दोन ओळींच्या शेवटी प्रश्न टाकून त्यांनी रंजकता वाढविली आहे परंतू शेवटच्या कडव्यात मात्र या दोन प्रेम करणाऱ्यांच्या एकरुपतेला पुर्णत्व बहाल करण्याकरीता ती स्वच्छ काच बाजूला सारायला हवी असा विचार त्यांनी मांडला आहे कारण त्या एकरुपतेमधेच ती कमालीची आनंददायी मनःशांती लाभू शकते असा विश्वास नकळत व्यक्त करण्याचा प्रयत्न देखील कवीने केलेला आपल्याला दिसतो. दत्तप्रसाद रानडे यांनी ज्या सुरावटीमधे ही कविता बांधली ती आपल्याला त्या अनादी अनंताशी एकरुप होण्याच्या प्रक्रीयेतील शांततेचा अनुभव घडवून आणणारी आहे. त्या शांततेला सुरांची साथ असली तरी त्यामधून प्राप्त झालेली सांगीतिक शांतता मी अद्यापही विसरु शकलेलो नाही…
आजही कधीतरी मन बेचैन असेल आणि विचारांच्या कल्लोळाने कोलाहल माजला असेल तर मी सहजच या गाण्याच्या रुपाने अनुभवलेली सांगीतिक शांतता अनुभवतो…आणि मन खरोखरीच शांत होते. त्या शांततेचे मुल्यच करता येत नाही…ती अनमोल असते.
Comments
Post a Comment