थोडा है थोडे की जरूरत है @21.11.17

एक मजेदार जपणूक

काल दुपारी मी फोन केला तेव्हा काय करत होतीस? किती वेळा फोन लावला.. मी माझ्या मैत्रीणीला विचारले. तिने जे उत्तर दिले ते ऐकून मला आजच्या काळात हरवत चाललेली एक गोष्ट निदान तिने जपलीय याचा आनंद झाला..

नवा काळ सुरु झाला आणि आपले जीवन आमुलाग्र बदलून गेले. तंत्रज्ञान आपल्या जीवनात आले आणि त्यामुळे आपण सारे एकमेकांच्या जवळ आल्याचा आभास निर्माण झाला. या नव्या जगात झालेल्या अनेक बदलांपैकी एक अतिशय महत्वाचा बदल झाला तो म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनाला एक प्रकारचा वेग निर्माण झाला. या वेगामुळे आपण धावू लागलो. धावता धावता आपल्याला त्या धावण्यात आनंद मिळू लागला कारण त्या धावण्याची काही चांगली फळे आपल्याला मिळू लागली. परंतू नंतर आपल्या लक्षात येऊ लागले की या फलप्राप्तीच्या नादात काही त्याही पेक्षा मुल्यवान गोष्टी आपल्या आयुष्यातून जवळपास हद्दपार झालेल्या आहेत. हे आपल्याला कळले तरी देखील या नव्या जगात धावण्याची जी सवय आपल्याला झालीय त्यामुळे काही गमावल्याची खंत देखील क्षणभंगूर ठरु लागली. मग ही खंत रात्री एखाद्या बारमधे व्हीस्कीच्या घोटांसोबत विरुन जाते किंवा धावून धावून थकलेल्या शरीरातील मन तिला डोके वरच काढू देत नाही. नंतरची अवस्था फार विचित्र असते ज्यामधे आपण हळूहळू तंत्रज्ञानाच्या जाळ्यात एकमेकांशी जोडलेलो असलो तरी देखील प्रत्यक्ष सहवासाच्या संधीच घेत नाही आणि मग या संधींची आठवण देखील येईनाशी होते आणि आपण देखील या वेगवान जगाचा स्वाभाविक भाग बनतो. लोक आपल्या सोबत नसतात असे नाही. परंतू ते देखील आपल्यासोबत धावणारेच असतात. त्यामुळे त्यांना धावता धावता कसे बोलायचे, कसे संबंध टिकवायचे, कसे पटकन जेवढ्यास तेवढे ठेवायचे आणि जरावेळ बाहेर येऊन पुन्हा आपल्या कोषात लुप्त व्हायचे हे छान जमत असते. या एकमेकांच्या सवयींमुळे आपण या नव्या जगात खुश राहू लागलोय. हे सारे आपले छान होत असले तरी या नव्या जगाच्या वेगासोबत ज्यांना धावता येत नाही असे काही लोक आपल्या नात्यात आहेत.. नाते म्हणजे काय तर ते आपले सारे अतिशय जवळचे परंतू आपल्यापेक्षा आधीच्या पिढीचे लोक आहेत..ती पिढी आहे आपल्या आई-बाबांची पिढी.

आपल्या आई बाबांच्या पिढीचा विचार करता या आधीच्या आणि या नंतरच्या कोणत्याही पिढीने बघितली नाहीत एवढी स्थित्यंतरे या पिढीने बघितली. अगदी तार करुन संदेश पाठविण्याच्या काळापासून तर मोबाईल हाताळण्यापर्यंतचे स्थित्यंतर त्यांनी पाहीले आहे त्यामुळे आपल्या पिढीने सहजच आत्मसात केलेल्या वेगाची या मंडळींना भिती वाटते. त्यांना जरा त्या वेगासोबत जुळवून घेणे कठीण जाते. तरीदेखील याही परिस्थितीत काही आई-बाबा आता या सर्व व्यवस्थांशी जुळवून घ्यायला लागले आहेत. परंतू इतके दिवस आयुष्य जगण्याची विशिष्ठ पद्धत त्यांनी अंगिकारली असल्याने त्यांना या नव्या वेगवान पद्धती जरा रुचत नाहीत. वाढदिवसाच्या दिवशी व्हॉट्स ॲपवर नमस्काराची इमोजी पाठवायची आणि तिकडून आशिर्वादाच्या हाताचे चित्र पाठवायचे किंवा दिवा पाठवून ओवाळल्याचा आभास निर्माण करुन आनंद मानायचा किंवा व्हीडीयो कॉलवर एकमेकांना बघून आनंद मानायचा या नव्या तंत्रज्ञानाच्या सवयी त्यांना पचनी पडत नाही. प्रत्यक्ष समोर बसवून ज्याचा वाढदिवस आहे त्याला ओवाळणे, त्याला छानशी त्याच्या आवडीची भेट देणे, त्याच्या आवडीचा पदार्थ करुन त्याला खाऊ घालणे आणि या साऱ्या गोष्टीचा त्याच्या डोळ्यात झळकणारा आनंद प्रत्यक्षात बघणे यात त्यांना धन्यता लाभते. खरे तर अशी प्रत्यक्ष भेट सहवास कोणत्याही एचडी कॅमेराफोन मुळे भरुन निघू शकत नाही परंतू आमच्या पिढीने आता ते आभासी तंत्र आत्मसात केलंय आणि म्हणून आई-बाबांच्या पिढीला काहीतरी वेगळे हवे असते. आपल्या घरांमधे पूर्वी अस्तीत्वात असलेली ती एक सुंदर जपणूक माझ्या मैत्रीणीने मला वर्णन केल्यावर मला फार भावली. तिने मला सांगितले की फोन उचलला नाही कारण बंद करुन ठेऊन दिला होता दोन तासांसाठी आणि मस्त आईसोबत पायरीवर बसून गप्पा मारल्यापायरीवरच्या गप्पा. काय सुंदर संकल्पना..जी कधीकाळी आपण जगत होतो..जी आता नव्या धावपळीच्या जगात जवळपास लुप्त झालीय.. 

माझी मैत्रीण म्हणाली, यावेळी माहेरी गेली असताना ठरविले होते की लहानपणी जसे आईजवळ बसून पायरीवरच्या गप्पा रंगायच्या तश्या रंगवायच्या. सर्वात आधी फोन बंद करुन ठेवला. कारण त्यावर येणारे नोटीफीकेशन्स स्वस्थतेने बसूच देत नाहीत. दोन अडीच तास आपण फोनची कोणतीही रेंज नसलेल्या ठिकाणी निवांत बसलो आहे अश्या विचाराने मी मनाला तयार केले. मग रात्री आईच्या हातची चवळीच्या शेंगांची भाजी खायची इच्छा असल्याने मी आणि आई शेंगा तोडायला घेऊन पायरीवर बसलो. बरीच वर्षे उलटली परंतू अजूनही आपण पायरीवर मावतोय असा मस्त विनोद आईने केला आणि आपण दोघींनीही स्वतःला मेंटेन ठेवलंय अश्या कॉम्प्लीमेंट दिल्या. बाबा आतून हसत होते पण आम्ही लक्ष दिले नाही. आणि त्यानंतर शेंगा तोडता तोडता आईसोबत मस्त गप्पा रंगल्या. लहानपणीचे अनेक प्रसंग आठवत गेले, आम्ही करीत असलेल्या खोड्या, त्याचा आईला होणारा त्रास, गावाकडचे ते सुंदर दिवस, ते सारे अनेक स्नेही मंडळींच्या निखळ एकरुपतेचे वातावरण, माझ्या जुन्या मैत्रीणी, या सगळ्या गोष्टी पुन्हा उजळून निघाल्या. आमच्या गप्पांमधे मग बाबा देखील अंगणात खुर्ची टाकून सामील झाले. मग काय आठवणींचा सुगंधी पेटाराच उघडल्या गेला. किती किती गोष्टी ज्या कदाचित आठवल्याही नसत्या त्यांची उजळणी झाली, नकळत बालपणात मस्त फेरफटका मारुन आल्यागत वाटले. बालपणात गेलीच होती तर सहजच आईच्या मांडीवर डोके ठेऊन जरावेळ झोपून घेतले. माझ्या डोक्यावरुन मायेने हात फिरविताना आई म्हणाली..किती भराभर मोठी झालीस गं पिल्लू माझी.. आणि मग आईला तेच छान गाणे म्हणायला लावले.. श्रावणात घन निळा बरसलाअजूनही माझे हट्ट पुरविणारी माझी माय..मस्त गाऊ लागली..खरे सांगते, तो क्षण तस्साच थांबवून टाकावा वाटला.. आयुष्याची सगळी धावाधाव थांबवून निवांत आणि प्रसन्न वाटावे असे वाटले त्या काही क्षणांमधेआईचे गाणे संपले तेव्हा आनंदाश्रुंनी आणि समाधानाने डोळे डबडबून गेले होते.. आईने तिच्या पदराने डोळे पुसून दिले.. तिला कळले होते मला काय मिळाले त्या दोन अडीच तासांच्या पायरीवरच्या गप्पांमधून आणि होमलाही कळले की आई बाबांना देखील काय मिळाले त्या क्षणांमधे माझ्या सहवासानेअश्या रंगल्या आमच्या पायरीवरच्या गप्पा.. माझ्या मैत्रीणीने केलेले हे वर्णन ऐकत रहावे असे असेच होते.

खरोखरीच या धावाधावीच्या जगात आपण काही महत्वाच्या आणि मनाला अतिशय जास्त सुखावणाऱ्या गोष्टी दुर्लक्षित करु लागलो आहोत आणि त्याचे प्रमाण इतके वाढलेय की त्याची बोचही कमी होऊ लागली आहे. माझ्या पिढीच्या लोकांनी कधीतरी स्वतःला एकदा प्रश्न विचारावा की आई बाबांसोबत या पायरीवरच्या गप्पा मारुन किती दिवस झालेत? अर्थात या गप्पांसाठी आई-बाबांच्या पिढीनेही सकारात्मकतेने तयार असायला हवे अन्यथा बरेच वेळा अकारण तक्रारी करण्यासाठी, नकारात्मक बोलण्यासाठी किंवा भूतकाळातील कटू स्मृतींना पुन्हा पुन्हा उगाळण्यासाठी हा वेळ खर्च होण्याची भिती असते. सकारात्मकतेने जुन्या परंतू केवळ चांगल्या स्मृतींच्या आठवणींनी आनंदित होण्यासाठी अश्या पायरीवरच्या गप्पा मारायलाच हव्यात. ती एक मजेदार आणि खूप जास्त सुखावणारी गंमत आहे




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18