थोडा है थोडे की जरूरत है @07.11.17

चांगुलपणाचे राजदूत

रोजचे वर्तमानपत्र हातात घेतल्यानंतर मला एक बाब फार प्रकर्षाने जाणवते. इतक्यात बातम्या वाचत असताना जास्तीत जास्त बातम्या या नकारात्मक दिशेने जाताना आढळतात. अनियमितता, भ्रष्टाचार, आतंकवाद, मोर्चे, आंदोलने, बंद, संप, वादविवाद, जातीवाचक वाद, अपघात या आणि असल्या अनेक बातम्यांनी वर्तमानपत्र भरलेले असते. वर्तमानपत्र हा समाजाचा प्रत्यक्ष आरसा असतो असे मानल्यास हे सारे नकारात्मक चित्र आपल्याला खिन्न करायला लागते. परंतू मग परत एक मुलभूत प्रश्न मनात येतोआपल्या सभोवताली इतक्या नकारात्मक बाबी घडत असताना या सर्व नकारात्मक बाबींचा नकळतपणे आपल्याही मनावर परीणाम होत असताना देखील हे जग सुरु कसे आहे? या जगाचे रहाटगाडगे बऱ्यापैकी सुरु राहते. या सर्व नकारात्मक घडामोडींनी विषण्ण झालेले मन परत नव्या उभारीने नव्या दिवसाच्या स्वागतासाठी का तयार होते? याचे उत्तर मला लाभते या जगात या सर्व नकारात्मकतेच्या पार्श्वभूमीवर शांतपणे कोणताही गाजावाजा करता कधी कधी अवचित भेटून जाणाऱ्या चांगुलपणाच्या देवदुतांच्या कामांना बघूनहोय या आपल्या जगात, अगदी आपल्या आसपास कितीही मनाला खिन्न करणाऱ्या गोष्टी घडत असल्या, त्या गोष्टींचा मानसिक किंवा शारीरिक त्रास होत असला तरीही, या खिन्नतेला सकारात्मक उर्जेमधे परावर्तीत करण्याची क्षमता या चांगुलपणाच्या राजदूतांकडे असते. परंतू गंमत अशी असते की ही मंडळी ती करीत असलेली अफलातून कार्ये सकारात्मकता निर्माण व्हावी या हेतूने किंवा त्याबद्दल फार गवगवा व्हावा आणि त्या माध्यमातून त्यांना लोकप्रियता लाभावी या हेतूने करीत नसतात. माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणसासारखे कार्य करावे आणि ते देखील कुणालाही सांगता, शांतपणे करावे हाच त्यांच्या जीवनाचा आदर्श असतो ते तो मोठ्या कष्टाने जोपासत असतात. बरेचवेळा तर हे लोक असे काही कार्य करीत आहे हे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना देखील माहीत नसते. कारण समाजसेवा देखील लोकांना सांगून सांगून केल्या जाणाऱ्या जगात वावरत असलेल्या आपणा सर्वांना या असल्या कार्याची माहीती देखील मिळत नाही. परंतू आपण जर बारकाईने लक्ष दिले तर आपल्याला या महत्वाच्या व्यक्तींच्या अफाट कार्याबद्दल कळू शकते आपल्याला आपल्या जीवनाला सकारात्मक आणि क्रियाशील बनविण्यासाठी चेतना प्राप्त होते. हे लोक त्यांच्या अस्तित्वाने आपल्याला जाणवून देत असतातकितीही वाईटाचा अंधार पडला तरीही त्या तिमीराला मिटविण्यासाठी मी चांगुलपणाची एक पणती हातात धरली आहेत्या प्रकाशापासून प्रकाशमान हो आणि मनापासून जीवन जगया असल्या राजदूतांपैकी एक मला रोज मी फिरायला जात असलेल्या मैदानावर भेटतो

मैदानावर फिरायला जाताना माझ्या मनात बरेचवेळा तेथे पडलेला कचरा, थुंकाथुंकी बघून वाईट वाटते. मैदान हे खेळाडूसाठी एक पवित्र जागा असते. त्या मैदानावर जास्तीत जास्त खेळाडू येतात, मेहनत करतात आणि त्यांच्या मेहनतीनुसार ते मैदान त्यांना फळ देखील देते. म्हणूनच जवळपास प्रत्येक खेळाडूची मैदानावर प्रवेश करतेवेळी त्याला नमस्कार करण्याची पद्धत माझ्या मनाला फार भावते. परंतू नमस्कार करुन मैदानावर आलेला हाच खेळाडू त्याच मैदानावर त्याला हव्या त्या ठिकाणी जेव्हा थुंकताना दिसतो, व्यायामानंतर खाल्लेल्या बिस्कीटांचे रिकामे पुडे मैदानावरच टाकतो, कागदाच्या चिठ्ठ्या, खराब प्लॅस्टीक अश्या तत्सम गोष्टी मैदानावरच टाकून देतो तेव्हा मात्र त्या खेळाडूची त्या मैदानाबद्दलची आस्था खरी की खोटी याबद्दल मनात शंका उत्पन्न होते. पण या सर्व बाबींमुळे माझ्याप्रमाणे वाईट वाटून घेता, त्या मैदानावर एक साठी उलटलेला माणूस प्रवेश करतो..एका अत्यंत वेगळ्या हेतूने. तो जे कार्य करतो ते करीत असताना तो कुणाशीही बोलत नाही. मैदानावर येऊन त्या माणसाचे आपले कार्य शांतपणे सुरु होते. व्यायामाच्या निमीत्ताने फिरता फिरता हा माणूस त्या मैदानावर खेळाडूंनी किंवा इतर लोकांनीही केलेला कचरा उचलण्याचे कार्य करतो. निमुटपणे आणि सातत्याने. मैदानावर पडलेले कागद, प्लॅस्टीक, इतर कचरा इत्यादी हा माणूस इमाने इतबारे उचलत असतो. कुणालाही कचरा उचलण्याची विनंती करता, कुणालाही सांगता शांतपणे एका मैदानाच्या स्वच्छतेचे कार्य करणारा हा चांगुलपणाचा राजदूतच नाही का? त्याला कुणी स्वच्छतेची शपथ दिलेली नाही, त्याला कुणी स्वच्छतेचा दूत म्हणून नॉमीनेट केलेले नाही, त्याचा कुठे फोटो नाही, त्याची कुठे बातमी नाही, इतकेच काय मी आज त्याचा गौरवपूर्ण उल्लेख करतोय हे देखील त्याला ठाऊक नाही. त्याने स्वतःहूनच ते कार्य ठरविले आहे. त्याच्या त्या कार्यामधील आणखी एक विशेषता म्हणजे तो ते कार्य अत्यंत आनंदाने करतो. कचरा टाकणाऱ्यांवर चिडत, त्यांना शिव्या घालत किंवा जे कचरा उचलत नाही त्यांच्या कडे छद्मीपणाने बघत वगैरे तो हे कार्य करीत नाही. तो चेहेऱ्यावर हास्य जे त्याच्या मनातील समाधानाच्या स्रोतापासून निर्माण झालेलेल असते ते चेहेऱ्यावर ठेऊन इतरांनी केलेला कचरा उचलण्याचे कार्य करीत राहतो…. किती मोठा आहे तो माणूस आणि किती महत्वाचा आहे त्याचा संपुर्ण निस्पृह चांगुलपणा

असाच एक राजदूत मला अकोल्याला एका रुग्णालयात भेटला. अकोल्याला रुग्णालयात दाखल असलेल्या माझ्या एका नातेवाईकाला भेटायला मी गेलो होतो. दुपारची वेळ होती. त्या माझ्या नातेवाईकाजवळ त्यांचा मुलगा थांबला होता. त्याला जरा बाहेर जायचे होते म्हणून त्याने मला तेथे थांबण्याची विनंती केली. मी लगेच होकार दिला. पण तो मला म्हणाला की, जर तुम्हाला जमत नसेल तर मी नानाकाकांना सांगतो, ते थांबतील. मी त्याला विचारले नानाकाका कोण? त्याने मला लांबुनच दाखविले नानाकाका. त्यांच्या कामाबद्दल मला त्याने सांगितल्यावर मी थक्क झालो. असाही माणूस असू शकतो आणि असेही कार्य तो सातत्याने करु शकतो या गोष्टीवर माझा त्या दिवसापासून विश्वास बसला

शिडशिडीत बांधा आणि छान भरपूर उंची असलेले नानाकाका निवृत्त होऊन साधारण सात वर्षे झाली होती. निवृत्ती पश्चात त्यांनी स्वतःहून कुणालाही सांगता ठरवून सातत्याने एक कार्य करण्याचे योजीले जे ते गेली सात वर्षे करीत आहेत. रोज दुपारी दोन च्या सुमारास नानाकाका एका थर्मासमधे साधारण पाच सहा कप चहा घेऊन त्या रुग्णालयात येतात. तो चहा त्यांनी स्वतः बनविलेला असतो. ते तेथे येऊन बसतात आणि रुग्णालयात भरती असलेल्या ज्या रुग्णांच्या नातेवाईकांना काही वेळाकरीता कुठे जायचे असेल त्यांच्या जागी रुग्णाजवळ थांबण्याचे काम ते करतात. रुग्णाला तीन साडेतीन वाजता चहा बिस्कीटे देतात, प्रसंगी भरवतात देखील आणि चार वाजेपर्यंत थांबून तो रुग्णाचा नातेवाईक परत आल्यावर ते घरी परत येतात. एका दिवशी दोन किंवा तीन रुग्णांच्या नातेवाईकांना काही काळ सुटी देण्याचे काम ते करतात. हे छोटेसे वाटले तरी दिवसरात्र रुग्णाजवळ थांबून राहणाऱ्या नातेवाईकाला तो मोठा दिलासा ठरतो. याबाबत रुग्णालयात सर्वांना माहिती आहे. कुणाला गरज पडल्यास तेथील परीचारिकाच काकांना बोलावून घेतात. ही इतकी मोलाची सेवा करणारे काका नित्यनियमाने रुग्णालयाच्या बाहेरच्या बाकावर रोज दुपारी दोन वाजता हजर असतात चार वाजता परत जातात. कधीकधी कुणालाही त्यांची गरज पडत नाही तरी ते दोन तास तेथे बसलेले असतात, गरज पडली तर मी हजर असावा म्हणून. काय म्हणावे या चांगुलपणाला. ही बाब रुग्णालयाव्यतिरीक्त कुणालाही माहीत नाही. नानाकाकांना देखील मी माझ्या लेखात त्यांचा उल्लेख करतोय हे माहित नाही कारण ते या उल्लेखासाठी हे कार्य करीत नाही

हे चांगुलपणाचे राजदूत कोणत्याही प्रसिद्धीसाठी ही कार्ये करीत नाहीतते करतात स्वतःच्या मनात उमटणाऱ्या एका प्रश्नासाठीतो प्रश्न असतो.. देवाने मला माणूस म्हणून इतका छान जन्म दिला ज्यामधे मला प्रगतीशील आणि संवेदनापूर्ण विचार करण्याची शक्ती असलेला मेंदू दिला.. त्याचा उपयोग मी खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्यासाठी करतोय का? अर्थात हे चांगुलपणाचे राजदूत त्या प्रश्नाचे उत्तर देखील मोठ्याने देत नाहीतते मैदानावरचा कचरा उचलायला निघतात किंवा खांद्याला चहा बिस्कीटांची शबनम बॅग लावून दवाखान्याकडे निघतातया राजदूतांच्या मनातील प्रश्न आपल्याही मनात निश्चित उमटत असतातत्या प्रश्नांना आपल्याला अनुत्तरीत किंवा दुर्लक्षित ठेवता या राजदूतांप्रमाणे उत्तर देता येईल?



Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18