My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

मिसालें बनाई जाती है।...
मिसालें बनाई जाती है बेटाजी, वो भुलाई नही जाती... एक महान कुस्तीपटू बापाच्या रुपात आपल्या मुलीला तिच्या जीवनातील सर्वात महत्वाचा संदेश देत असतो. पण तो संदेश आपल्या मुलीला देण्यासाठी त्याने व तो संदेश समजून घेण्यासाठी त्याच्या मुलीने जी जीवापाड मेहनत केलेली असते ती प्रत्यक्ष बघणे व त्याचा अनुभव करणे ही आपल्यासाठी व आपल्या घरातील मुलांबाळांसाठी एक सुवर्णसंधी ठरते.. ही सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त होते ती हिंदी चित्रपट सृष्टीतील एक समर्पित अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानच्या नव्या व नितांत सुंदर अश्या दंगल या चित्रपटाच्या माध्यमातून. प्रख्यात कुस्तीपटू महावीरसिंह फोगट व त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आपल्याला एक संपुर्णपणे वेगळा व मनाला भावणारा अनुभव देऊन जातो तो देखील अत्यंत संयतपणे व कुठेही लाऊड न होता. बरेच वेळा सामाजिक संदेश देणारे चित्रपट जरा अतिरंजीत वर्णने करुन संदेश समाजमनावर बिंबविण्याचा प्रयत्न करीत असतात किंबहुना झोपलेल्या समाजमनाला खडबडून जागे करण्यासाठी कधीकधी ती आवश्यकता देखील असते. परंतू आमीरखानचा दंगल चित्रपट मात्र चित्रपटाचा संदेश प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्तीने बिंबविण्याचा प्रयत्न करीत नाही तर तो सहजच चित्रपट बघण्यास आलेल्या प्रत्येकाला विश्वासात घेऊन कथानकासोबत जोडून घेतो, त्यामधील पात्रांच्या भावभावनांमधे गुंतवितो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विचारांची अनुभती घडवितो. चित्रपटाच्या कथेची पकड इतकी सहजतेने साधल्या जाते की चित्रपट संपण्याआधी मधेच एका प्रसंगी संपुर्ण प्रेक्षागृह आपसुकच कोणतीही सुचना न देता उभे राहते व पुढील चित्रपट बघण्यासाठी पुन्हा खाली बसते. चित्रपटाच्या कथानकामधे गुंतवून ठेवण्याची इतकी प्रभावी क्षमता फार क्वचित बघायला मिळते. परंतू हे सारे दंगल चित्रपट बघताना घडत असते. महत्वाचे म्हणजे चित्रपटाशी संबंधित कुणीही त्यासाठी वेगळा विशेष प्रयत्न केलेला दिसत नाही. प्रचंड मेहनत केवळ एकाच गोष्टीची आहे, जी सर्वांनी केली आहे...ती म्हणजे चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाने आपले काम अक्षरशः भान हरपून केलेले आहे. झोकून देऊन काम करणे कशाला म्हणतात याची मिसाल म्हणजे-दंगल, व्यक्तीरेखा पडद्यावर जीवंत करुन ती प्रत्यक्ष जगणे याची मिसाल म्हणजे - दंगल, ध्येयप्राप्तीसाठी संघर्ष करताना विचलित न होता आपल्या कार्यावर केंद्रीत होऊन अविरत मार्गक्रमण करणे शिकविणारी मिसाल म्हणजे - दंगल, चित्रपट हे समाजमनावर सकारात्मक परीणाम साधणारे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे हे पटवून देणारी मिसाल म्हणजे - दंगल.
कुस्तीमधे देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही करु न शकलेल्या एका जुन्या पिढीच्या कुस्तीपटूच्या वेगवेगळ्या पातळीवरील संघर्षाची व त्याचा हा संघर्ष आंतरराष्ट्रीय 

पातळीवरील यशामधे परावर्तीत करण्यासाठी जीवापाड मेहनत करणाऱ्या त्याच्या दोन मुलींची हा कथा आहे. हरीयाणातील पुरुषसत्ताक सामाजिक स्थितीमधे घडलेली ही सत्यकथा पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून बघताना एकाचवेळी अनेक गोष्टी आपल्यासमोर उलगडत जातात. मुलींनी केवळ स्वयंपाकघराशी निगडीत राहून परंपरागत पद्धतीने समाजाने ठरवून दिलेली कामेच करावी या समाजिक मनःस्थितीमधे एक कुस्तीवीर आपल्या स्वप्नांना पुरे करण्यासाठी पुत्रप्राप्तीची कामना करीत बसलेला असतो. परंतू त्याच्या पत्नीच्या ओटीत परमेश्वर मात्र केवळ मुलीच टाकतो. पण मग एके दिवशी आपले स्वप्न या मुली देखील पूर्ण करु शकतात हा शोध त्या कुस्तीपटू बापाला लागतो आणि मग सुरु होतो पहिला संघर्ष... समाजाच्या जुन्या मानसिकतेशी व त्या मानसिकतेतच वावरत असलेल्या त्याच्या मुलींशी. मुलींनी कुस्ती खेळणे हा महाभयंकर अपराध आहे असे समजणाऱ्या समाजात राहून मुलींना तयार करण्याचा संघर्ष. चित्रपटातील हा भाग फारच रोचक व कुस्ती या खेळासाठी लागणारी प्रचंड मेहनत दाखविणारा आहे. हे सारे करताना समाजातून दिली जाणारी दुषणे, मुलींची सुरुवातीची मानसिकता- बापु सेहद के लिये तू तो हानीकारक है - या गाण्यातून मांडली आहे. कुस्तीमधे अडकवून आपले बालपण व उमलणारे तारुण्य संपवू इच्छीणाऱ्या आपल्या वडीलांबद्दल मनात राग बाळगणाऱ्या या दोन्ही मुलींना केवळ चौदाव्या वर्षी लग्नाच्या वेदीवर चढणारी त्यांची मैत्रीणच फार महत्वाची गोष्ट सांगते. तुमचे वडील तुम्हाला निदान पोटजन मानून किंमत तर करताहेत, माझ्या बाबतीत तर ते देखील मान्य केले जात नाहीये. चौदाव्या वर्षी माझे लग्न लावून माझे माझ्या पालकांच्या खांद्यावरचे ओझे कमी केले जात आहे... चित्रपटात महाविरसिंहच्या मुलींना बापाची किंमत त्यांच्या एका लहान मैत्रीणीकडून कळते ही बाब खरोखरीच कल्पकतेने सादर केलीय. त्यानंतर महाविरसिंहचा मुलींशी सुरु असलेला संघर्ष संपतो व त्याचा दुसरा संघर्ष सुरु होतो समाजाशी..
पोरींनी हाफपँट घालून कुस्तीच्या आखाड्यात दंगल लढणे ही बाब कोणत्याही परीस्थितीत मान्य होणारी नसते परंतू मुळातच अतिशय जिद्दी असलेल्या महाविरसिंहला हार मानणे कबुलच नसते. हा पुढचा संघर्ष देखील तसाच रोचक व अनेक अर्थाने विचार करावयास लावणारा आहे. समाजमनाच्या विरोधात जाऊन एखादे कार्य करताना लागणारी सहनशीलता व विरोध पचविण्याची सक्षमता या दोन्ही बाबींचा परीचय महाविरसिंह व त्याच्या दोन्ही मुली गीता आणि बबीता या देतात. परंतू या संघर्षावर हे बापलेक मात करतात व जिंकतात देखील. राष्ट्रीय पातळीवर त्यांचा नावलौकीक होतो. परंतू महाविरसिंहचे स्वप्न त्याच्या पुढचे पाऊल असते. आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावणे व देशाचे नेतृत्व करणे.  पुढे या मुली आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती लढण्यासाठी तयारी करु लागतात, पण तेथेही महाविरसिंहचा तिसरा व सर्वात कठीण संघर्ष सुरु होतो. ज्याप्रमाणे गावात परंपरागत विचाराच्या विरोधात 

त्याला उभे रहावे लागते त्याचप्रमाणे शहरात त्याला प्रस्थापित प्रशिक्षण पद्धतीच्या विरोधात दंड थोपटावे लागतात. सिल्वर मेडल जिंकले तरी खूप झाले या मानसिकतेने लढायला तयार कणाऱ्या प्रशिक्षणाच्या ऐवजी गोल्ड मेडल मिळालेच पाहीजे या ताकदीने मैदानात उतरण्याचे प्रशिक्षण देणारा त्याचा विचार रुजविण्यासाठी त्याला लढावे लागते. एकंदरीत काय प्रस्थापित व्यवस्था जुनी किंवा कालबाह्य झाली असेल तरीदेखील ती बदलविण्याची मानसिकता सहजासहजी तयारच होत नाही. वडीलांनी दिलेले अनुभवी व जुने प्रशिक्षण आणि आधुनिक पद्धतीने दिले जाणारे खेल अकादमी मधील प्रशिक्षण या मधे गीता संभ्रमित होते व काही काळासाठी आपल्या वडीलांच्या प्रशिक्षणावरील तिचा विश्वास उडून जातो. त्यावेळचे बापाच्या व मुलींच्या मनातील द्वंद्व आणि त्याची मुक साक्षीदार त्या मुलींची आई हे सारे प्रसंग फारच सुरेख चित्रीत केलेले आहेत. कुठेही मेलोड्रामा फार लाऊड न होऊ देता साऱ्या भावभावना प्रत्यक्ष जीवनात ज्याप्रमाणे व्यक्त होऊ शकतील तश्याच त्या व्यक्त केल्या आहेत... हे या चित्रपटाचे महत्वाचे बलस्थान आहे. हा प्रशिक्षणाच्या वादाच्या संघर्षादेखील महाविरसिंह व त्याच्या मुली प्राणपणाने लढतात व विजयी होतात. आपल्या मुलीची ती आंतरराष्ट्रीय पातळीवरील श्रेष्ठत्व सिद्ध करणारी लढत दुर्दैवाने काही कारणामुळे त्या अभिमानी बापाला बघता येत नाही. स्टेडीयममधील त्याच्या रिकाम्या खुर्चीकडे बघत बघत ती पोर तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची लढत देत असते. परंतू तिच्या वडीलांनी कुस्तीचे प्रशिक्षण देत असतानाच तिला आत्मबलही शिकविलेले असते. स्वतः कुणाच्याही मदतीशिवाय उभे राहणे शिकविलेले असते. त्यामुळे वडीलांच्या अनुभवी प्रशिक्षणात शारीरिक व मानसिकदृष्ट्या तयार झालेली ती कुस्तीपटू बापाची कुस्तीपटू लेक तिच्या क्षमतेने देशाचा तिरंगा फडकवते व त्याच्या सन्मानार्थच प्रेक्षागृहातील आपण सारे कोणतीही लेखी सूचना पडद्यावर नसताना देशाभिमीनाने प्रेरीत होऊन चित्रपटाच्या मधेच उभे राहतो... हे या चित्रपटाचे खरे यश आहे. चित्रपटाचा संदेश सहजरित्या मनामनात पोहोचविण्यासाठी मिळालेल्या व्यक्तीरेखा खऱ्या अर्थाने जगण्याचे जे कार्य या सर्व कलाकारांनी केलेले आहे त्यामुळेच दंगल चित्रपट एक मिसाल बनतो. या चित्रपटातील सर्वांनीच या चित्रपटासाठी किती परीश्रम घेतले याबद्दलचे व्हीडीयोज यु ट्युबवर उपलब्ध आहेत. परंतू त्या परीश्रमांचे फलीत या नितांत सुंदर चित्रपटाच्या रुपाने अनुभवताना मनापासून आनंद होतो. 
चित्रपटातील कुस्तीपटू बाप त्याच्या मुलींना जे सांगतो की, मिसालें बनाई जाती है और उन्हे याद किया जाता है... तेच या चित्रपटाच्या योग्यतेमुळे सिद्ध झालेय.. दंगल एक मिसाल बन गई है..
 

Comments

  1. तुम्ही सगळंच लिहून टाकलं पंत ....👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18