My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
छोटीशी...पण फार मोठी गोष्ट!!
या महिन्यात मला लौकीकार्थाने सामान्य परंतू कृतीने असामान्य असलेल्या तीन व्यक्तींना भेटण्याची व काही क्षणच संपर्कात येण्याची संधी मिळाली. या तीनही व्यक्तींचे कार्य बघता ते साधेपणात मोडणारेच होते. परंतू या व्यक्ती ती कामे करीत असताना ज्या गोष्टी प्रसरीत करीत होत्या त्या मात्र फार मोलाच्या होत्या. त्या गोष्टीहून महत्वाचे म्हणजे या गोष्टी सांगत असताना किंवा या गोष्टींचा प्रचार करताना त्यांनी त्याबाबत कुठलाही अभिनीवेश बाळगला नव्हता. अगदी सहजच त्या महत्वाच्या बाबी या व्यक्ती करीत होत्या. या व्यक्ती होत्या बोरे विकणारी काकू, चॉकलेट विकणारा दुकानदार व एका खानावळीचा मालक. सकारात्मकतेने आपल्या छोट्याश्या कार्यातून देशहिताचा प्रामाणिक प्रयत्न करणारे असे लोक बघितले की आपल्याला आपल्यातही सकारात्मक उर्जा जाणवू लागते. एकाच महिन्यात अश्या तीन व्यक्ती मला सापडल्या. पहिली होती बोरे विकणारी काकू.
माहूर गडावरुन खाली उतरताना आबालवृद्धांना वेड लावणारी ती गोष्ट मला दिसली. उकडलेली बोरे. मस्त उकडलेली आणि मीठ लावलेली बोरे म्हणजे आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला आवडणारी गोष्ट असते. केवळ पाच रुपयात भरपूर आनंद देणारी ती गोष्ट असते. ती उकडलेली बोरे मस्तपैकी रचून ठेवलेली असतात. त्यावर आजकाल छान गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ठेऊन ते भांडे सजविलेले असते. माहूरला देखील त्या काकूने बोरांचा तो ढिग छान रचून ठेवला होता. तिच्याजवळ जरा गर्दी असल्याने मला थांबावे लागले. मी तिच्या कामाचे निरीक्षण करीत असताना मला दोन महत्वाच्या गोष्टी जाणविल्या. एक म्हणजे ती प्लास्टीक ऐवजी कागदाच्या द्रोणांमधे बोरे देत होती. ते कागदाचे द्रोण तिच्याजवळ बसून तिचा नातू बनवित होता. भरभर तो कागदाचे द्रोण बनवून त्याच्या आजीला देत होता व आजी ते द्रोण भरुन बोरे देत होती. पर्यावरणाच्या दृष्टीने छोटीशी पण फार महत्वाची गोष्ट ती काकू करीत होती. परंतू त्यासोबतच आणखी एक महत्वाची बाब मला फार प्रकर्षाने भावली ती म्हणजे, प्रत्येक द्रोणासोबत ती एक आधीच फाडून ठेवलेला कागदाचा तुकडा देत होती व प्रत्येकाला एक गोड सूचना करीत होती. मस्त बोरे खा माय बापहो, पण बोरांच्या बीया मात्र या सोबत दिलेल्या कागदातच गोळा करा. एकत्र करुन खाली कचऱ्याचा डब्बा ठेवला आहे त्यात टाका... माझ्या रेणुका आईचा परीसर स्वच्छ ठेवा....स्वच्छतेचा अर्थ खऱ्या अर्थाने समजून घेऊन त्याचे पालन करायला लावणारी ती लौकीकार्थाने सामान्य वाटणारी काकू मला असामान्य वाटली.. तिच्या सूचनेसह बोरे घेऊन तिला धन्यवाद दिले व पायऱ्या उतरु लागलो... साधेपणाने गाजावाजा न करता देखील देशसेवा करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण मला अनुभवायला मिळाले. त्याक्षणी मला तो अजून एक साधाच पर्यावरण रक्षक आठवला..एका डेली नीडस् दुकानाचा मालक...
साध्या टपराच्या शेडमधील त्याचे ते दुकान. रोजच्या गरजा पुर्तीचे ते एक साधे दुकान, परंतू त्या दुकानाचा मालक एका छोट्याश्या उपक्रमाद्वारे बदल घडवितो. या माणसाच्या दुकानात वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी लोक येत असताना बरेच वेळा त्याला त्या वस्तू प्लॅस्टीकच्या बॅगमधे द्याव्या लागतात. प्लॅस्टीक पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे व त्याच्या वापराचा मानवाच्या व प्राण्यांच्या जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फार विघातक परीणाम होते व त्यासाठी पर्यावरणवादी वेगवेगळ्या परीषदांच्या माध्यमातून जनमानसापर्यंत प्लॅस्टीकच्या वापराचे दुष्परीणाम पोहोचवित असतात, त्यावर शोधनिबंध लिहीतात, लोकांना विविध लेखांच्या माध्यमांतून याबाबत माहिती दिली जाते वगैरे वगैरे या दुकान मालकाला ठाऊक नाही. कारण या सर्व प्रयासांचा प्रत्यक्ष परीणाम किती प्रमाणात होतो आणि किती लोक घरुन निघताना कापडाची पिशवी सोबत ठेवतात हे त्या दुकान मालकाला माहित आहे. त्याने एक छोटीशी कृती करणे सुरु केले व ती कृती त्याने लहान मुलांच्या माध्यमातून सुरु केली. त्याच्या दुकानात बरेच वेळा आईने पिटाळल्यामुळे लहान मुलेच सामान न्यायला यायची. मुलाला प्लॅस्टीकच्या बॅगमधे सामान देताना तो सांगायचा की पुढल्यावेळी जर तू घरुन पिशवी घेऊन आला तर तुला एक चॉकलेट बक्षिस मिळेल. मुलांच्या ते बरोबर लक्षात राहीले. पुढल्या वेळेपासून प्रत्येक मुलगा आठवणीने आईकडे पिशवी मागू लागला व त्याला त्याबद्दल या दुकानदाराकडून चॉकलेट बक्षिस मिळू लागले. एका मुलाला बक्षिस मिळताना बघून दुसऱ्यानेही तसेच सुरु केले. असे करुन त्याच्या दुकानात प्रत्येकच जण पिशवी घेऊन यायला लागला..आता त्या दुकानात सामान घ्यायला गेल्यावर प्लॅस्टीकची बॅग न मागता पिशवी नेली असल्यास एक सुंदर थँक यू मिळतो व सोबतच एक छोटेसे चॉकलेट बक्षिस म्हणूनही मिळते. -माझ्या मिळकतीतला छोटासा भाग समाजासाठी देतो..आणखी मोठे काम मी करु शकत नाही...मी छोटा माणूस आहे....-पर्यावरण संरक्षण लोकांकडून प्रत्यक्ष व हसत खेळत राबवून घेणाऱ्या त्या खूप मोठ्या माणसाकडून चॉकलेट घेतानाच अश्याच पद्धतीचे परंतू जरा वेगळे कार्य करणारा एक हॉटेलचा मालक आठवला..
वरुडला एका शिक्षक कार्यशाळेच्या निमीत्ताने मला जाण्याचा योग आला. मध्यंतरात मला आयोजकांनी एका हॉटेलमधे जेवायला नेले. अत्यंच स्वच्छ व सुबक मांडणी असलेले ते हॉटेल होते. सोबतच घरघुती पद्धतीच्या जेवणाची थाळी तेथे होती. जेवण रुचकर तर होतेच परंतू हॉटेलच्या मालकाने केवळ गल्ल्याच्या खुर्चीवर बसून ऑर्डर देण्यापेक्षा एक वेगळा प्रकार करण्याचे व्रत घेतले होते. हा माणूस सर्व ग्राहकांजवळ जात होता. थाळ्या आतुनच वाढून न आणता टेबलवर मांडून काय हवे ते विचारुन वाढल्या जात होत्या. त्यांनी बनविलेल्या चार भाज्यांपैकी एखादी भाजी आवडत नसेल तर ती वाढली जायची नाही. पान वाढल्यावर हा हॉटेल मालक हात जोडून सर्वांना पोटभर जेवण करण्याची विनंती करीत होता पण सोबतच एक सूचना अत्यंत नम्रपणे देत होता. -मालक, जेवण पोटभर होऊ द्या. तुम्ही आमचे अतिथी आहात.. सावकाश सुग्रास जेवणाचा आस्वाद घ्या..विनंती इतकीच आहे की पानात अन्न टाकू नका...आपण पोटभर जेवण केलात तर आनंदच होईल परंतू पानात अन्न वाया न जाऊ देता जर आपल्याला जेवणाचे समाधान मिळाले तर आम्ही आपले आभारी राहू....जय जय रघुवीर समर्थ...-अशी सूचना प्राप्त करुन सुग्रास जेवणाचा आस्वाद मी घेतला...अर्थात अन्न पानात टाकायचे नाही हा विचार डोक्यात ठेऊनच. प्रत्येक टेबलवर जेवण सुरु होण्यापूर्वी हा मालक हे छोटेसे काम करतो.. अन्नाची बचत हे फार मोठे कार्य तो एका छोट्या कृतीतून करु शकतो.. तो मोठाच माणूस आहे...
सामाजिक भान जपणारी व आपल्या छोट्या छोट्या कृतीतून समाजसेवा करणारी अशी अनेक मंडळी आपल्याला भेटत राहतात व बरेचवेळा दुर्लक्षित देखील राहतात. ही साधी माणसे आपल्यालाही खूप काही शिकवून जातात. देशावर प्रेम असेल व या देशासाठी इतर लोक काय करीत आहे याबाबत चर्विच्चरण करण्यापेक्षा मी एखादी अशी कृती करु शकतो का ज्यामुळे छोटासा का होईना पण चांगला बदल घडेल असा विचार आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात दृढ व्हायला हवा. असे झाल्यास १२५ कोटी जनसंख्या असलेल्या या आपल्या देशाचे हे प्रचंड मनुष्यबळ सकारात्मकतेमधे परावर्तीत होऊन अनेक बाबतीत मोठी कार्ये होऊ शकतात. १२५ कोटी जनता करणारच आहे. माझ्या दृष्टीने मी एक अशी कृती कायमस्वरुपी करुन बदल घडवून आणू शकतो का हा प्रयास करुया.. शेवटी तेजस्वी प्रकाशाची वाटचाल ही या पणती पासून त्या पणतीपर्यंत अश्या साखळी रुपानेच घडत असते. आपल्या सदविचाराची पणती प्रकाशमान करुन पुढील पणतीला सदविचारी प्रकाश देऊया व या प्रकाश पर्वातील एक छोटासा परंतू महत्वाचा आधार बनुया!!
अविनाश सर लाख टके की बात आहे..
ReplyDeleteया छोट्या छोट्या गोष्टीतुनच आपण समाज भान जपायला पाहिजे.