My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

लव्ह यू डियर जिंदगी
आपल्याला वेगवेगळे आजार होतात तेव्हा आपण कसलाही संकोच न करता लोकांना त्याबद्दल माहिती देतो. ह्रदयाची समस्या आहे, किडनी खराब झाली आहे किंवा तत्सम आजार सांगितले जातात. तंत्रज्ञानाच्या जगात तर दवाखान्यात भरती होण्यापासून तर सुटी मिळण्यापर्यंतचे फोटो काढून सोशल मिडीयावर अपलोड केले जातात. परंतू विचारांच्या बाबतीत जर काही समस्या असेल व त्यासाठी एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जायचे असेल तर मात्र समस्या निर्माण होते. त्याबद्दल अजिबात बोलायचे नाही असे ठरलेले असते. ज्याला तशी समस्या असेल तो किंवा त्याचे नातेवाईक फारच वेगळ्या पद्धतीने त्या समस्येकडे बघतात. कुणाला सांगायचे नाही, संशयात्मक वागायचे, खोटे नाटे सांगायचे व असे करुन त्याचा किंवा तिचा तो मनाचा आजार लपवायचा जेणेकरुन त्याला कुणीही वेडे ठरविणार नाही. एखाद्याला किती सहजच आपण वेडे ठरवितो, नाही? मनाचा आजार हा प्रत्येक वेळी थेट वेडेपणाच्या वर्गवारीत येत नसतो तर बहुतांश वेळी वागण्याचे संदर्भ जरा विस्कळीत झाल्याने किंवा ते न कळल्याने निर्माण झालेली ती संभ्रमावस्था असते जी फार कमी वेळात व योग्य मार्गदर्शनाने दूर केल्या जाऊ शकते... मनाच्या आजारांना सरसकट वेडेपणा ठरविणे हाच मुळात वेडेपणा आहे... नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गौरी शिंदे या गुणी दिग्दर्शिकेच्या डीअर जिंदगी या चित्रपटातील मानसोपचार तज्ञ जहांगीर खान एका कार्यक्रमामधे आपले मत मांडत असतात. एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या निमित्ताने शाहरुख खानने हे चरित्र रंगविताना उपस्थित केला आहे.
माणसाचे जीवन खऱ्या अर्थाने विविध विचारांच्या जटील गुंतागुतीने बनलेले असते. मानव हा सामाजिक प्राणी असल्याने या गुत्यांमधे भाव भावनांचा समावेश असतोच परंतू त्याच्या वेगवेगळ्या पातळीवरील शाखा अडकलेल्या असतात. मानवाची मनोभूमिका ही मुळातच अतिशय जटील असून त्याचे वेगवेगळे संदर्भ असतात. जन्मापासून तो मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या अनुभवांमुळे आणि परिस्थितीमुळे मानवाच्या मनावर कळत आणि जास्त वेळा नकळत पडसाद उमटत असतात. त्या सर्व पडसादांमुळेच प्रत्येक मानवाचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व तयार झालेले असते. अश्या स्वतंत्र व्यक्तिमत्वासोबत तो जेव्हा त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या आणि बरेच वेळा संपुर्णपणे वेगळ्या व्यक्तिमत्वांमधे वावरायला लागतो त्यावेळी त्याला स्वतःच्या मूळ प्रवृत्तीच्या विपरीत बाबी स्विकाराव्या लागतात. या वेगळ्या बाबी स्विकारण्याचेही तंत्र व क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्यामुळे सामाजिक दृष्टीने वावरताना कुणी सहजच या वेगळ्या बाबींचा स्विकार करुन घेतो परंतू काहींना मात्र ते त्यांच्या त्यांच्या मूळ प्रवृत्तीनुसार जमत नाही व त्याचा त्यांना त्रास होऊ लागतो. स्वतःच्या मनातील मनोभूमिकेचा पॅटर्न इतरांच्या मनोभूमिकेच्या पॅटर्नशी जुळविण्याचा ताण येऊन किंवा त्रास होऊन ज्या व्यक्तींचे मनःस्वास्थ्य विस्कळीत होते अश्या व्यक्तींना मनाचा आजार होतो. जसे मानवाच्या आसपासचे भौगोलिक वातावरण बदलले तर सर्दी, खोकला किंवा ताप असले सामान्य आजार होतात तसाच हा प्रकार आहे. त्यामुळे हे मनाचे आजार कुणालाही होऊ शकतात हे सर्वात महत्वाचे. सर्दी किवा ताप आल्यानंतर सुरुवातीला आपण आपलेच घरघुती उपाय करीत असतो व लगेच डॉक्टरकडे जाण्याचे टाळतो. बरेचवेळा या घरघुती व्यवस्थांमुळे आपला तो आजार बरा देखील होऊन जातो. परंतू त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असते कारण साधा इन्फ्लुएंझा पुढे बरेच वेळा काळजी न घेतल्याने टायफॉईडमधे परावर्तीत होऊ शकतो. अगदी याच सारखे मनाचा आजार झाल्यावरदेखील अतिशय प्राथमिक व घरघुती उपाय म्हणूनच एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जाऊन समुपदेशन करुन घेणे हा सर्वोत्तम पर्याय असतो. या असल्या समुपदेशनाद्वारे आपले वागण्याचे व विचार करण्याचे पॅटर्न अभ्यासून समुपदेशक केवळ त्यातील तृटी दूर करण्याची पद्धत आपल्याला शिकवितो. ती आत्मसात केली की छोटीशी समस्या लगेच दूर होण्यात मदत होते. म्हणूनच समुपदेशकाकडे जाणे ही एक अत्यंत साधी व सामान्य बाब समजणे गरजेचे आहे. याचे कारण वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे जर या छोट्या छोट्या मानसिक आजारांकडे दुर्लक्ष झाले तर मग मनाचे हे स्वतंत्र पॅटर्न कायमस्वरुपी बनू लागतात आणि मग त्यामधे बदल घडवून आणणे कठीण असते. 
या सबंध विवेचनावरुन एक बाब सहजच लक्षात येऊ शकते की अश्या प्रकारचा मानसिक आजार जो मनोभुमिकांच्या पॅटर्न क्लॅशमुळे तयार होतो तो कुणाच्याही बाबतीत व कोणत्याही वयात तयार होऊ शकतो कारण वयानुसार आपल्या प्रत्येकाचा पॅटर्न बदलतच असतो. त्यामुळे मानसोपचार तज्ञाकडे जाणे म्हणजे वेडे असणे हा गैरसमज समाजातून आपण सर्वप्रथम हद्दपार करायला हवा. बदलत्या काळात हे जास्त आवश्यक याकरीता आहे की आपण आता मोठ्या व एकत्रीत कुटुंबपद्धतीपासून मायक्रो कुटुंब व्यवस्थेमधे प्रवेशित झालेलो आहोत. यासोबतच आपल्या विविध व्यस्ततांमुळे सामाजिकदृष्ट्या देखील आपण वेगवेगळ्या आणि छोट्या छोट्या कोशातच जगत आहोत. आधीच्या काळात मनोभूमिकांचे पॅटर्न जुळविण्यासाठी मोठ्या परीवारात वावरणे किंवा सामाजिक उपक्रमात सहभागी होणे पुरेसे होते कारण तेथेच त्या सवयी लागायच्या. परंतू आज मात्र ते शक्य होत नाही व त्यासाठीच या पॅटर्न जुळवणीचा त्रास झाल्यास मानसोपचार तज्ञाकडे जाऊन समुपदेशन करुन घेणे ही सर्वोत्तम व उपयोगी बाब ठरते. मानासोपचार तज्ञाची भूमिका या कामात महत्वाची असते.
मानसोपचार तज्ञाकडे जाण्याचा सर्वात मोठा फायदा असा असतो की तोच केवळ आपल्या वैचारिक व मानसिक पॅटर्नकडे तटस्थ नजरेतून बघू शकतो आणि त्यामधूनच तो आपल्याला सकारात्मक जीवन जगण्यासाठी तयार करतो. समुपदेशक आपल्या समस्या कधीच सोडवित नसतो तर समस्या सोडविण्यासाठी आपली तयारी करवून देतो. हाच समुपदेशनाचा भाग फारच प्रभावीपणे डीयर जिंदगी या चित्रपटात शाहरुखखान याने मांडला आहे. एका तरुणीच्या जीवनात निर्माण झालेल्या काही समस्यांच्या निमीत्ताने ही बाब चित्रपटात सुरु होते. एकाकीपण, आई वडीलांशी विसंवाद, प्रेमातील वैफल्य, करीयरमधील आकांक्षा असल्या अनेक बाबींमुळे मन विस्कळीत झालेली कायरा नावाची एक स्वतंत्र विचारांची मुलगी देखील समुपदेशकाकडे जाण्याचे ठरविते. हा या चित्रपटातील महत्वाचा भाग आहे. आपल्याला समुपदेशनाची गरज आहे हे कळणे ही या प्रक्रीयेतील अत्यंत सकारात्मक बाब आहे. एकदा त्याचा स्विकार केला की मग सर्व बाबी सोप्या होतात.. जश्या कायराच्या बाबतीत होतात. तिचा समुपदेशक तिला जीवनाचे तिला ठाऊक असलेलेच पैलू नव्याने बघायला शिकवितो. जसे जीवन जगताना प्रत्येकवेळी किचकट व जटील विचारप्रक्रीया केली म्हणजेच तिचा दर्जेदारपणा सिद्ध होतो असे नाही तर जीवन सहज सोप्पे करुन देखील जगता येते. ही छोटीशी गोष्ट लक्षात आल्याबरोबर कायराच्या जीवनातील आत्मक्लेश कमी व्हायला लागतो. नात्यांना समजून घेणे तिला जमायला लागते, जवळच्या व्यक्तींचे स्वतंत्र मानसिक पॅटर्न ती स्विकारायला लागते, त्रागा कमी होतो आणि अखेर जीवनाचा सकारात्मकतेने सामना करुन जीवनाशी तिची मस्त दोस्ती होते.
जीवनाशी दोस्ती हा साधा वाटत असला तरीदेखील एक अत्यंत महत्वाचा विचार आहे. परमेश्वराने प्रदान केलेले जीवन भांडणे, वादावादी, त्रागा, द्वेष, मत्सर व यातून होणाऱ्या आत्मक्लेशाद्वारे देखील घालविता येते. परंतू त्याला जगणे म्हणत नाहीत ते जीवन ढकलणे होय. जीवनाशी जेव्हा दोस्ती होते तेव्हा स्विकार्हता वाढते व त्यामुळे मजेत जीवन जगण्याची सवय लागते. जीवनाशी मनापासून दोस्ती करणे आपल्याला आपला समुपदेशक शिकवू शकतो. त्यासाठी माझा जगण्याचा व विचारांचा पॅटर्न सर्वोत्तम आहे हा अहंकारी भाग मनातून दूर करायला हवा. पॅटर्नमधे कायम सुधारणेची गरज असते व बदलत्या जीवनपद्धतीनुसार त्यात बदल करावेच लागतात. त्यासाठी समुपदेशनाची गरज असते. डीयर जिंदगी चित्रपटात हा सर्व भाग विस्तृतपणे व बऱ्यापैकी यथार्थतेने मांडला आहे. जीवन जगताना मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाला महोत्सवामधे परावर्तीत करण्याच्या क्षमता निर्माण करणे हीच जीवनाशी घनिष्ट दोस्ती करण्याची सुरुवात आहे.... चला तर आपणही मनसोक्तपणे म्हणूयात.. लव्ह यू डीयर जिंदगी!!
 

  

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18